व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

कम्प्युटरचे व्यावसायिक सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्स इतरांना देण्याबाबत ख्रिश्‍चनांचा काय दृष्टिकोन असावा?

काहीजणांना वाटेल की असे करण्यास काही हरकत नाही कारण येशू तर म्हणाला: “तुम्हाला फुकट मिळाले, फुकट द्या.” पण हा त्यांचा गैरसमज आहे. कारण येशू येथे लेखाधिकार असलेल्या साहित्याच्या किंवा कम्प्युटर प्रोग्रॅम्सच्या (सॉफ्टवेअर) मोफत प्रती इतरांना देण्याविषयी बोलत नव्हता. अशा साहित्याचा वापर करण्यासंबंधी कायद्याचे काही नियम आहेत. परंतु, तो सेवाकार्याच्या संदर्भातील देण्याविषयी बोलत होता. शहरोशहरी, गावोगावी जाणाऱ्‍या आपल्या प्रेषितांना येशू म्हणाला की, तुम्ही राज्याचा प्रचार करा, आजाऱ्‍यांना बरे करा, भुते काढा. यासाठी त्यांना लोकांकडून पैसा घ्यायचा नव्हता तर ते कार्य “फुकट” करायचे होते.—मत्तय १०:७, ८.

आज अधिकाधिक लोकांकडे स्वतःचे कम्प्युटर्स आहेत. शिवाय, कामाच्या ठिकाणीही पुष्कळांकडे कम्प्युटर्स आहेत. त्यामुळे सॉफ्टवेअरची गरज भासते. तसे पाहिल्यास सॉफ्टवेअर खरेदी करावे लागते. अर्थात, काहीजण आपण स्वतः तयार केलेले प्रोग्रॅम्स मोफत देतात आणि त्यांची कॉपी करून इतरांना देता येऊ शकते असेही सांगतात. परंतु, बहुतांश कम्प्युटर सॉफ्टवेअर बाजारात विकले जाते. मग स्वतःसाठी किंवा कामासाठी ते सॉफ्टवेअर घ्यायचे असल्यास ते खरेदी करावे लागते; त्यासाठी पैसे मोजावे लागतात. जसे एखाद्या पुस्तकाच्या अनेक झेरॉक्स कॉपी करून इतरांना देणे (मोफत देणेही) बेकायदेशीर आहे तसेच पैसे न देता एखादे सॉफ्टवेअर पॅकेज घेणे किंवा त्याची कॉपी करणे देखील बेकायदेशीर आहे.

बहुतेक कम्प्युटर प्रोग्रॅम्स (गेम्ससुद्धा) वापरण्यासाठी परवाना घ्यावा लागतो आणि ज्यांनी हे प्रोग्रॅम्स विकत घेतलेले असतात किंवा जे त्यांचा वापर करतात त्यांना त्याच्या ठराविक नियमांचे आणि मर्यादांचे पालन करावे लागते. पुष्कळशा परवान्यांनुसार केवळ एकाच व्यक्‍तीला प्रोग्रॅम्स आपल्या कम्प्युटरमध्ये घालण्यास आणि त्याचा वापर करण्यास परवानगी असते. आणि सहसा हे प्रोग्रॅम्स एकाच कम्प्युटरमध्ये घालण्याची परवानगी असते—मग तो आपल्या घरातला कम्प्युटर असो नाहीतर कामाच्या ठिकाणचा किंवा शाळेतला. काही परवान्यांनुसार, प्रोग्रॅम वापरणाऱ्‍या व्यक्‍तीला स्वतःकरता बॅकप कॉपी करण्याची परवानगी असते; पण त्याची कॉपी करून इतरांना देण्याची मात्र परवानगी नसते. ज्याने तो प्रोग्रॅम विकत घेतला आहे त्याला जर तो संपूर्ण प्रोग्रॅम आणि त्यासोबत त्याचा परवाना आणि कागदपत्रेही दुसऱ्‍या व्यक्‍तीला द्यायची असतील तर तो असे करू शकतो. पण, दुसऱ्‍या व्यक्‍तीला प्रोग्रॅम देऊन टाकल्यावर मात्र त्याला स्वतःला तो प्रोग्रॅम वापरण्याचा अधिकार राहत नाही. प्रत्येक प्रोग्रॅमचे परवाने वेगवेगळे असतात त्यामुळे एखादा प्रोग्रॅम खरेदी करणाऱ्‍या व्यक्‍तीने किंवा ज्याला तो प्रोग्रॅम दिला जात आहे त्याने त्या विशिष्ट परवान्याचे काय नियम आहेत हे माहीत करून घ्यावेत.

अनेक राष्ट्रे लेखाधिकार करारांमध्ये भागीदार असतात ज्यांकरवी कम्प्युटर प्रोग्रॅमसारख्या “बौद्धिक संपत्ती”चे संरक्षण करण्यात येते आणि ते लेखाधिकाराचे नियम लागू करण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ, जानेवारी १४, २००० च्या द न्यू यॉर्क टाईम्समध्ये असे वृत्त आले होते की, “जर्मन आणि डेनिश पोलिस अधिकाऱ्‍यांनी सॉफ्टवेअरची चोरी करणाऱ्‍या एका मोठ्या टोळीला अटक केली.” ही टोळी कम्प्युटर प्रोग्रॅम्स आणि गेम्सच्या नकला करून लोकांमध्ये त्या वाटत होती. इतकेच नव्हे तर, इंटरनेटवरही त्यांनी त्या विकल्या होत्या.

या मामल्यात ख्रिस्ती मंडळीचा काय दृष्टिकोन आहे? येशूने म्हटले: “कैसराचे ते कैसराला व देवाचे ते देवाला भरून द्या.” (मार्क १२:१७) या वचनानुसार, प्रत्येक ख्रिश्‍चनाने ते ज्या देशात राहतात त्या देशातील देवाच्या नियमाविरुद्ध नसलेल्या सर्व नियमांचे पालन करण्याची आवश्‍यकता आहे. सरकारांविषयी प्रेषित पौलाने लिहिले: “प्रत्येक जणाने वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या अधीन असावे; . . . जो अधिकाराला आड येतो; तो देवाच्या व्यवस्थेस आड येतो; आणि आड येणारे आपणावर दंड ओढवून घेतील.”—रोमकर १३:१, २.

इतरांचे कम्प्युटर तपासणे ही ख्रिस्ती मंडळीतल्या वडिलांची जबाबदारी नाही. लेखाधिकाराच्या नियमांचा अर्थ समजवण्याचा आणि लागू करण्याचा हक्क त्यांना मिळालेला नाही. परंतु, ख्रिश्‍चनांनी इतरांच्या मालकीच्या वस्तू घेऊ नयेत आणि कायद्याचे पालन करण्याचा प्रयत्न करावा अशी शिकवण ते देतात आणि स्वतःही तसा विश्‍वास करतात. असे केल्याने बेकायदेशीर कृत्ये करण्यासाठी ख्रिश्‍चनांना शिक्षा केली जाणार नाही तसेच देवासमोर ते चांगला विवेक राखू शकतील. पौलाने लिहिले: “क्रोधामुळे केवळ नव्हे, तर सदसद्‌विवेकबुद्धीमुळेहि अधीन राहणे अगत्याचे आहे.” (रोमकर १३:५) पौलाने खऱ्‍या ख्रिश्‍चनांची इच्छा या शब्दांतही व्यक्‍त केली: “सर्व बाबतीत चांगले वागण्याची आमची इच्छा असून आमचा विवेकभाव चांगला आहे अशी आमची खातरी आहे.”—इब्री लोकांस १३:१८.

[२९ पानांवरील चौकट]

काही कंपन्या आणि शाळा अनेक व्यक्‍तींना लागू होणारे परवाने काढतात; अशा परवान्यांमध्ये तो प्रोग्रॅम किती व्यक्‍ती वापरू शकतात हे स्पष्ट केलेले असते. १९९५ साली, यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांमध्ये एका लेखाची चर्चा करण्यात आली होती; त्यात असा सल्ला दिला होता:

‘संगणकाचे प्रोग्रॅम्स तयार करून विकणाऱ्‍या अनेक कंपन्यांकडे याचा लेखाधिकार असतो आणि हे प्रोग्रॅम्स कायदेशीररित्या कसे वापरले जाऊ शकतात त्याची माहिती देणारा एक परवाना ते देत असतात. त्या परवान्यात सामान्यतः असे म्हटलेले असते, की प्रोग्रॅम खरेदी करणाऱ्‍या व्यक्‍तीला त्या प्रोग्रॅमच्या प्रती इतरांना देता येऊ शकत नाहीत; खरे म्हणजे आंतरराष्ट्रीय हक्काच्या नियमानुसार तसे करणे अवैध आहे. . . . काही मोठ्या कंपन्या, कम्प्युटर्समध्ये परवाना असलेले प्रोग्रॅम घालून कम्प्युटर विकतात. परंतु, काही कम्प्युटरची दुकाने परवाने देत नाहीत कारण त्यांनी बेकायदेशीरपणे कम्प्युटरमध्ये प्रोग्रॅम घातलेले असतात. आणि म्हणून असे कम्प्युटर खरेदी करणारी व्यक्‍ती त्या प्रोग्रॅम्ससंबंधी असलेल्या नियमांचे उल्लंघन करत असते. हे लक्षात ठेवून, ख्रिश्‍चनांनी लेखाधिकार असलेले साहित्य (उदाहरणार्थ, संस्थेची प्रकाशने) तसेच मालकांकडून कायदेशीर परवानगी घेतल्याशिवाय कॉपी केले जाणारे साहित्य इलेक्ट्रॉनिक बुलेटिन बोर्डांवर घालू नये किंवा तेथून ते घेऊही नये.’