व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाच्या न्यायाचा दिवस जवळ आहे!

यहोवाच्या न्यायाचा दिवस जवळ आहे!

यहोवाच्या न्यायाचा दिवस जवळ आहे!

“परमेश्‍वराचा मोठा दिवस समीप आहे; तो येऊन ठेपला आहे; वेगाने येत आहे.”—सफन्या १:१४.

१. सफन्याच्या माध्यमाने देवाने कोणती इशारेवजा घोषणा केली?

 यहोवा देव लवकरच दुष्ट लोकांविरुद्ध कार्य करणार आहे. ऐका! तो बजावून सांगतो: “मी . . . भूपृष्ठावरून मानव नाहीतसे करीन.” (सफन्या १:३) सार्वभौम प्रभू यहोवाचे हे शब्द त्याने त्याचा संदेष्टा सफन्या याच्या माध्यमाने विदित केले. सफन्या हा कदाचित विश्‍वासू राजा हिज्किया याचा खापर पणतू असावा. त्याने ही इशारेवजा घोषणा केली तेव्हा यहुदावर योशिया नावाचा एक चांगला राजा राज्य करत होता आणि ही घोषणा म्हणजे यहुदात राहणाऱ्‍या दुष्ट लोकांच्या नाशाची सूचना होती.

२. योशियाने खोट्या धर्माविरुद्ध कार्य केले तरीसुद्धा यहोवाच्या न्यायाचा दिवस का टळला नाही?

सफन्याच्या भविष्यवाण्यांमुळे, यहुदातून अशुद्ध उपासनेचे नामोनिशाण मिटवून टाकणे किती महत्त्वाचे आहे याची योशियाला आणखीनच प्रकर्षाने जाणीव झाली असेल. पण योशियाने देशातून खोट्या धर्माचा नाश केला तरीसुद्धा दुष्टाईचा पूर्णपणे नाश झाला नाही. शिवाय, ज्याने “यरुशलेम निरपराध जनांच्या रक्‍ताने भरून टाकिले” त्या योशियाच्या आजोबाच्या अर्थात मनश्‍शेच्या पापांचेही यामुळे प्रायश्‍चित्त होऊ शकले नाही. (२ राजे २४:३, ४; २ इतिहास ३४:३) आणि म्हणून यहोवाच्या न्यायाचा दिवस निश्‍चित येणार होता.

३. “परमेश्‍वराच्या क्रोधदिनी” बचावणे शक्य आहे असे आपण खात्रीने का म्हणू शकतो?

पण या भयानक दिवसातूनही काही लोकांचा बचाव होणार होता. म्हणूनच देवाच्या भविष्यवक्‍त्‌याने लोकांना आर्जवून म्हटले: “निर्णय बाहेर पडेल, दिवस भुसाप्रमाणे उडून जाईल, परमेश्‍वराचा क्रोधदिन तुम्हावर येईल त्यापूर्वी ताळ्यावर या. देशांतील सर्व नम्र जनांनो, परमेश्‍वराच्या न्यायानुसार चालणाऱ्‍यांनो, त्याचा आश्रय करा, धार्मिकता व नम्रता यांचे अवलंबन करा, म्हणजे कदाचित परमेश्‍वराच्या क्रोधदिनी तुम्ही दृष्टीआड व्हाल.” (सफन्या २:२, ३) यहोवाच्या न्यायाच्या दिवशी आपलाही बचाव व्हावा ही आशा डोळ्यापुढे ठेवून आपण आता बायबलमधील सफन्या या पुस्तकाचा विचार करू. हे पुस्तक सा.यु.पू. ६४८ मध्ये लिहिण्यात आले होते; ते देवाच्या ‘संदेष्ट्याच्या भविष्यसूचक वचनाचा’ एक भाग असल्यामुळे आपण सर्वांनी त्याकडे काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे.—२ पेत्र १:१९.

यहोवा हात उचलतो

४, ५. यहुदातील दुर्जनांच्या बाबतीत सफन्या १:१-३ येथील शब्दांची कशाप्रकारे पूर्णता झाली?

सफन्याला “परमेश्‍वराचे वचन” प्राप्त होते, तेव्हा सर्वात आधी यहोवा त्याला एक ताकीद देतो. याआधी उल्लेख केल्याप्रमाणे परमेश्‍वर यहोवा घोषित करतो, “मी भूपृष्ठावरून सर्व काही निखालस नाहीसे करीन, असे परमेश्‍वर म्हणतो. मी मनुष्य व पशु नष्ट करीन; मी आकाशातले पक्षी, समुद्रातले मासे, दुर्जन व त्यांचे अडथळे नाहीतसे करीन; भूपृष्ठावरून मानव नाहीतसे करीन, असे परमेश्‍वर म्हणतो.”—सफन्या १:१-३.

होय, यहोवाने यहुदातील भयंकर दुष्टाईचा अंत करायचे ठरवले होते. पण “भूपृष्ठावरून सर्व काही निखालस नाहीसे” करण्यासाठी परमेश्‍वर कोणाचा उपयोग करणार होता? भविष्यवक्‍ता सफन्या, योशिया राजाच्या कारकीर्दीच्या सुरवातीला भविष्यवाणी घोषित करू लागला. योशियाचे राज्य सा.यु.पू. ६५९ साली सुरू झाले होते. त्याअर्थी सा.यु.पू. ६०७ साली बॅबिलोनी लोकांनी यहुदा आणि त्याच्या राजधानीचा अर्थात जेरुसलेमचा नाश केला तेव्हा सफन्याच्या भविष्यसूचक शब्दांची पूर्णता झाली. त्यावेळी यहुदातील दुर्जन “नाहीतसे” करण्यात आले.

६-८. सफन्या १:४-६ येथे काय भाकीत करण्यात आले होते आणि ही भविष्यवाणी प्राचीन यहुदात कशाप्रकारे पूर्ण झाली?

खोट्या देवतांची उपासना करणाऱ्‍यांविरुद्ध यहोवा कोणती कारवाई करेल हे सफन्या १:४-६ येथे भाकीत केले आहे: “मी आपला हात यहूदावर, यरुशलेमेच्या सर्व रहिवाश्‍यांवर चालवीन; या स्थलातून बआलमूर्तीचे शेष नाहीतसे करीन, आणि मूर्तींचे पुजारी व याजक यांचे नावहि नाहीसे करीन; जे धाब्यावर आकाशांतील सैन्याची पूजा करितात, जे उपासक परमेश्‍वराची शपथ वाहतात व मिलकोम मूर्तीचीहि शपथ वाहतात, जे परमेश्‍वरापासून पराङमुख झाले आहेत, ज्यांनी परमेश्‍वराचे चरण धरिले नाहीत व त्याचा शोध केला नाही, त्यांस मी नष्ट करीन.”

यहुदा व जेरुसलेमच्या लोकांविरुद्ध यहोवाने त्याचा हात उगारला होता. सुपीकतेचे कनानी दैवत बआल याच्या सर्व उपासकांना नष्ट करण्याचा यहोवाने संकल्प केला होता. त्याकाळात अनेक दैवतांना बआल असे संबोधले जायचे कारण त्यांच्या उपासकांची अशी समजूत होती की या दैवतांची काही विशिष्ट क्षेत्रांवर मालकी आणि प्रभाव होता. उदाहरणार्थ, पौर पर्वतावर एका बआल दैवताची मवाबी व मिद्यानी लोक उपासना करत होते. (गणना २५:१, ३, ६) सबंध यहुदातील सर्व बआल पुजाऱ्‍यांचा यहोवा नाश करणार होता तसेच यहोवाच्या नियमशास्त्राचे उल्लंघन करून या बआल उपासकांसोबत जाऊन मिळालेल्या अविश्‍वासू लेवीय याजकांचा देखील तो नाश करणार होता.—निर्गम २०:२, ३.

यहोवाने असेही घोषित केले की ‘जे आकाशांतील सैन्याची पूजा करितात’ त्यांचा तो नाश करील; हे त्याकाळी ज्योतिषशास्त्राचा वापर करणाऱ्‍यांच्या आणि सूर्याची उपासना करणाऱ्‍यांच्या संदर्भात म्हटले होते. (२ राजे २३:११; यिर्मया १९:१३; ३२:२९) शिवाय, खऱ्‍या उपासनेसोबत खोट्या धर्मांची भेसळ करण्याचा प्रयत्न करून “जे परमेश्‍वराची शपथ वाहतात व मिलकोम मूर्तीचीही शपथ वाहतात,” त्यांच्यावरही देवाचा क्रोध भडकणार होता. मिलकोम हे कदाचित अम्मोनी लोकांच्या मुख्य दैवताचे अर्थात मोलेखचेच दुसरे नाव असावे. मोलेखाच्या उपासनेत बालकांचा बली देण्याचा रिवाज होता.—१ राजे ११:५; यिर्मया ३२:३५.

ख्रिस्ती धर्मजगताचा नाश जवळ आहे!

९. (अ) ख्रिस्ती धर्मजगत कोणत्या कारणांमुळे दोषी आहे? (ब) यहुदातील अविश्‍वासू जनांप्रमाणे न होता आपण कोणता निर्धार केला पाहिजे?

यहुदातील लोकांविषयीची भविष्यवाणी वाचल्यावर खोटी उपासना व ज्योतिषविद्या यांत आकंठ बुडालेल्या ख्रिस्ती धर्मजगताची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. शिवाय, युद्धांना पाठिंबा देऊन त्यात कोट्यवधी लोकांचा बळी देणाऱ्‍या पाळक वर्गाचे हे काम खरोखरच किती घृणास्पद आहे! ‘यहोवापासून पराङमुख झालेल्या’ म्हणजेच यहोवाला शोधू न इच्छिणाऱ्‍या आणि त्याच्याकडे व त्याच्या मार्गदर्शनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणाऱ्‍या यहुदातील या अविश्‍वासू लोकांप्रमाणे आपण कधीही होऊ नये. उलट आपण शेवटपर्यंत यहोवाला एकनिष्ठ राहण्याचा निर्धार करू या.

१०. सफन्या १:७ या वचनाचा भविष्यसूचक अर्थ तुम्ही कसा स्पष्ट कराल?

१० संदेष्टा सफन्याचे पुढील शब्द यहुदाच्या काळातील आणि आपल्या काळातील दुष्ट लोकांना सारखेच लागू होतात. सफन्या १:७ येथे म्हटले आहे: “प्रभू परमेश्‍वरापुढे तुम्ही मौन धरून राहा, कारण परमेश्‍वराचा दिवस येऊन ठेपला आहे; परमेश्‍वराने यज्ञबलीची सिद्धता केली आहे, त्याने आपल्या आमंत्रितांस पवित्र केले आहे.” हे ‘आमंत्रित’ म्हणजे यहुदाचे बॅबिलोनी शत्रू होते. ‘यज्ञबली’ म्हणजे खुद्द यहुदाचे राष्ट्र आणि त्याचे राजधानी शहर होते. जेरुसलेमचा नाश करण्याचा यहोवाचा संकल्प सफन्याने जाहीर केला. ही भविष्यवाणी ख्रिस्ती धर्मजगताच्या नाशाला देखील सूचित करते. आज देवाच्या न्यायाचा दिवस अगदी जवळ येऊन ठेपला आहे. तेव्हा सबंध जगाने ‘प्रभू परमेश्‍वरापुढे मौन धरावे’ आणि येशूच्या अनुयायांच्या ‘लहान कळपाच्या’ व त्यांच्या सोबत्यांच्या अर्थात ‘दुसऱ्‍या मेंढरांच्या’ माध्यमाने यहोवा काय सांगत आहे ते ऐकावे. (लूक १२:३२; योहान १०:१६) जे ऐकणार नाहीत आणि देवाच्या राज्याच्या विरोधात उभे राहतील त्या सर्वांचा संपूर्ण विनाश ठरलेला आहे.—स्तोत्र २:१, २.

लवकरच आक्रंदनाचा दिवस

११. सफन्या १:८-११ या वचनाचा काय अर्थ होतो?

११ यहोवाच्या दिवसाविषयी सफन्या १:८-११ पुढे असे म्हणते: “परमेश्‍वराच्या यज्ञसमयी असे होईल की, सरदार, राजपुत्र व ज्या सर्वांनी परदेशी पोषाख चढविला आहे त्यांचा मी समाचार घेईन. त्या दिवशी जे उंबरठ्यावरून उडी मारून आपल्या प्रभूचा वाडा बलात्काराने व कपटाने भरून टाकितात त्या सर्वांचा समाचार मी घेईन. त्या दिवशी मासळीदरवाजातून ओरडण्याचा आवाज होईल, दुसऱ्‍या पेठेतून आक्रंदन होईल व टेकड्यांवरून मोठा धडाका उडेल, असे परमेश्‍वर म्हणतो. मक्‍तेशच्या रहिवाश्‍यांनो, आक्रंदन करा, कारण कनानाचे सर्व लोक नाश पावले आहेत, चांदीने लादलेले सर्व नाश पावले आहेत.”

१२. काही जणांनी कशाप्रकारे ‘परदेशी पोषाख चढविला’?

१२ राजा योशियानंतर यहोआज, यहोयाकिम आणि यहोयाचिन हे राजे येणार होते. त्यानंतर येणाऱ्‍या सिदकिया राजाच्या कारकीर्दित जेरुसलेमचा नाश होणार होता. एवढे मोठे संकट येऊन ठेपलेले असतानाही काहीजण अजूनही ‘परदेशी पोषाख चढवून’ शेजारच्या देशांची मर्जी संपादन करण्याच्या प्रयत्नात होते. त्याचप्रकारे, आजही बरेचजण आपल्या कृतींतून यहोवाच्या संघटनेचा भाग नसल्याचे शाबीत करतात. उलट, सैतानाच्या संघटनेत सामील असल्याचे त्यांनी दाखवल्यामुळे त्यांना शिक्षा भोगावी लागेल.

१३. सफन्याच्या भविष्यवाणीप्रमाणे, बॅबिलोनी लोक जेरुसलेमवर हल्ला करतील तेव्हा काय घडणार होते?

१३ भविष्यात यहोवा आपल्या शत्रूंवर न्यायदंड बजावेल, दुष्टाईचा नाश करेल आणि त्याची सर्वसत्ता शाबीत करील तो महान दिवस, यहुदाचा समाचार घेण्याच्या ‘त्या दिवसाप्रमाणेच’ असेल. बॅबिलोनी लोकांनी यरुशलेमवर हल्ला करताच मासळीदरवाजातून ओरडण्याचा आवाज ऐकू येईल असे भविष्यवाणीत म्हटले होते. मासळी बाजार या दरवाजाजवळ असल्यामुळे कदाचित या दरवाजाला हे नाव पडले असावे. (नहेम्या १३:१६) बॅबिलोनचे सैन्य दुसरी पेठ नावाच्या भागात प्रवेश करणार होते; ‘टेकड्यांवरून होणारा मोठा धडाका’ कदाचित खास्द्यांचे सैन्य चाल करून येत असताना होणाऱ्‍या मोठ्या आवाजाबद्दल म्हटले असावे. मक्‍तेशच्या म्हणजे कदाचित वरील टायरोपियोन खाडीच्या रहिवाशांच्या आक्रंदनाचा आवाज येईल. हे लोक आक्रंदन का करतील? कारण त्यांचे व्यवसाय तसेच तेथील ‘चांदीने लादलेल्या’ व्यापाऱ्‍यांचे व्यापार बंद पडतील.

१४. यहोवाचे उपासक असल्याचा दावा करणाऱ्‍यांचे तो कितपत परीक्षण करेल?

१४ यहोवाचे उपासक असल्याचा दावा करणाऱ्‍यांचे तो कितपत परीक्षण करेल? भविष्यवाणी पुढे म्हणते: “त्या समयी असे होईल की मी दिवट्या घेऊन यरुशलेमेची तपासणी करीन; व जे खाली गाळ असलेल्या द्राक्षारसासारखे मंदावले आहेत आणि आपल्या मनांत म्हणतात की परमेश्‍वर बरे करीत नाही व वाईटहि करीत नाही त्यांचा मी समाचार घेईन. त्यांचा माल लुटला जाईल, त्यांची घरे उजाड होतील; ते घरे बांधितील पण त्यांत वसणार नाहीत; द्राक्षीचे मळे लावितील पण त्याचा द्राक्षारस पिणार नाहीत.”—सफन्या १:१२, १३.

१५. (अ) जेरुसलेमच्या धर्मत्यागी याजकांचे काय होईल असे भविष्यवाणीत सांगितले आहे? (ब) आज खोट्या धर्मांचे अनुसरण करणाऱ्‍यांचे भविष्य कसे असेल?

१५ जेरुसलेमचे धर्मत्यागी याजक यहोवाच्या उपासनेत खोट्या धर्मांची भेसळ करत होते. ते स्वतःला अगदी सुरक्षित समजत असले तरी ज्या आध्यात्मिक अंधकाराचा त्यांनी आश्रय घेतला होता त्यातूनही देव त्यांना जणू दिवट्या घेऊन शोधून काढील. परमेश्‍वराच्या न्यायदंडाच्या घोषणेपासून आणि प्रत्यक्ष न्यायदंडापासून कोणीही सुटणार नव्हते. द्राक्षारसाच्या पिपात खाली गाळ जमतो त्याप्रमाणे यहुदाचे धर्मत्यागी लोक अगदी सुस्त झाले होते. आणि त्यांना अशाच स्थितीत राहायचे होते. परमेश्‍वर मानवांच्या कारभारांत लवकरच हस्तक्षेप करेल याची घोषणा ऐकण्याची त्यांना इच्छा नव्हती. पण परमेश्‍वराच्या न्यायदंडापासून त्यांची सुटका नव्हती. त्याचप्रमाणे, आज खोट्या धर्मांच्या अनुयायांची, ख्रिस्ती धर्मजगताच्या सदस्यांची व ज्यांनी यहोवाची खरी उपासना त्यागली आहे अशांची देखील परमेश्‍वराच्या नाशातून सुटका होणार नाही. आपण आज ‘शेवटल्या काळात’ जगत आहोत हे मानायला हे लोक तयार नाहीत; ते जणू मनातल्यामनात म्हणतात की “परमेश्‍वर बरे करत नाही व वाईटहि करीत नाही.” पण त्यांचा दृष्टिकोन किती चुकीचा आहे!—२ तीमथ्य ३:१-५; २ पेत्र ३:३, ४, १०.

१६. यहुदावर परमेश्‍वराचा न्यायदंड आल्यावर काय घडणार होते आणि या माहितीमुळे आज आपल्यावर कोणता परिणाम झाला पाहिजे?

१६ यहुदाच्या धर्मत्यागी लोकांना ताकीद देण्यात आली होती की बॅबिलोनी लोक त्यांची धनदौलत लुटतील, त्यांची घरे उजाड करतील आणि त्यांच्या द्राक्षमळ्यांतील उत्पन्‍न लुबाडतील. यहुदावर परमेश्‍वराचा न्यायदंड आल्यावर भौतिक धन कोणत्याच कामाचे राहणार नव्हते. आजच्या दुष्ट व्यवस्थेवर यहोवाचा न्यायाचा दिवस येईल तेव्हाही असेच घडेल. म्हणूनच आपण सदोदित आध्यात्मिक दृष्टिकोनातून सर्व गोष्टींकडे पाहावे आणि यहोवाच्या सेवेला जीवनात प्राधान्य देण्याद्वारे ‘स्वर्गात संपत्ती साठवावी.’—मत्तय ६:१९-२१, ३३.

“परमेश्‍वराचा मोठा दिवस समीप आहे”

१७. सफन्या १:१४-१६ या वचनांनुसार यहोवाचा न्यायाचा दिवस किती जवळ आला आहे?

१७ यहोवाचा न्यायाचा दिवस किती जवळ आला आहे? सफन्या १:१४-१६ या वचनांप्रमाणे यहोवा आपल्याला आश्‍वासन देतो की “परमेश्‍वराचा मोठा दिवस समीप आहे; तो येऊन ठेपला आहे; वेगाने येत आहे; ऐका! परमेश्‍वराचा दिवस! तेथे वीर दुःखाने ओरडत आहे. हा संतापाचा दिवस आहे, दुःखाचा व क्लेशाचा दिवस आहे, विध्वंसाचा व उजाडीचा दिवस आहे, अंधकाराचा व उदासीनतेचा दिवस आहे. अभ्रांचा व निबिड अंधकाराचा दिवस आहे. तटबंदीच्या नगरांविरुद्ध व उंच बुरूजांविरुद्ध रणशिंगाचा व रणशब्दाचा हा दिवस आहे.”

१८. यहोवाच्या न्यायाचा दिवस यायला अद्याप बराच अवकाश आहे असे आपण कधीही का समजू नये?

१८ “परमेश्‍वराचा मोठा दिवस समीप आहे” अशी यहुदाच्या पापी याजकांना, शासकांना आणि प्रजेला देखील ताकीद देण्यात आली. यहुदाच्या काळात ‘परमेश्‍वराचा दिवस वेगाने’ येणार होता. त्याचप्रकारे आपल्या काळातही कोणीही असे समजू नये की दुष्ट लोकांवर यहोवाचा न्यायदंड येण्यास अद्याप बराच काळ उरलेला आहे. उलट ज्याप्रकारे परमेश्‍वराने यहुदावर तडकाफडकी कारवाई केली त्याचप्रकारे त्याचा न्यायाचा दिवस “वेगाने” येईल. (प्रकटीकरण १६:१४, १६) आपल्या साक्षीदारांद्वारे यहोवाने दिलेल्या इशारेवजा सूचनांकडे ज्यांनी दुर्लक्ष केले आणि ज्यांनी खऱ्‍या उपासनेचा स्वीकार केला नाही त्यांच्याकरता तो दिवस किती भयंकर असेल!

१९, २०. (अ) यहुदा व जेरुसलेमवर यहोवाचा कोप भडकला तेव्हा कशी परिस्थिती होती? (ब) या दुष्ट व्यवस्थेतून दुष्टांचा नाश तर धार्मिकांचा बचाव होणार हे लक्षात घेता कोणते समर्पक प्रश्‍न उपस्थित होतात?

१९ यहुदा व जेरुसलेमवर परमेश्‍वराचा कोप भडकला तो ‘दुःखाचा व क्लेशाचा दिवस’ होता. बॅबिलोनी सैन्याने यहुदाच्या रहिवाशांवर भयंकर जुलूम केले; मृत्यू आणि सर्वनाशाला तोंड देताना त्यांना किती मानसिक क्लेश झाले असतील हे आपण समजू शकतो. तो दिवस “विध्वंसाचा व उजाडीचा” अंधकाराचा, उदासीनतेचा, अभ्रांचा व निबिड अंधकाराचा होता. हे वर्णन केवळ लाक्षणिकच नव्हे तर सर्वत्र पसरलेल्या धुरामुळे आणि रक्‍तपातामुळे शाब्दिक अर्थानेही अशीच परिस्थिती होती. तो दिवस “रणशिंगाचा व रणशब्दाचा” होता, तरीसुद्धा या सर्व इशाऱ्‍यांकडे दुर्लक्ष करण्यात आले.

२० बॅबिलोनी सैन्यांनी मोठमोठ्या लोलगदायंत्र नामक शस्त्राच्या साहाय्याने ‘उंच बुरूज’ पाडले तेव्हा जेरुसलेमचे पहारेकरी काहीही करू शकले नाहीत. आजच्या या जगाच्या दुष्ट व्यवस्थेचे आधारस्तंभ देखील परमेश्‍वराच्या स्वर्गीय सैन्याच्या शस्रास्रांपुढे टिकू शकणार नाही. दुष्टांचा वेचून वेचून नाश करण्यासाठी स्वर्गीय सैन्य सुसज्ज आहे. तुम्ही या नाशातून बचावण्याची आशा बाळगता का? “परमेश्‍वर आपल्यावर प्रेम करणाऱ्‍या सर्वांचे रक्षण करितो, पण सर्व दुर्जनांचा नाश करितो.” तेव्हा यहोवाच्या बाजूने असण्याचा पक्का निर्णय तुम्ही घेतला आहे का?—स्तोत्र १४५:२०.

२१, २२. सफन्या १:१७, १८ आपल्या काळात कशाप्रकारे पूर्ण होईल?

२१ सफन्या १:१७, १८ यात न्यायाच्या दिवसाचे भयंकर वर्णन केले आहे. यहोवा देव म्हणतो, “मी माणसांवर संकट आणीन, ते अंधळ्यासारखे चालतील, कारण त्यांनी परमेश्‍वराविरुद्ध पाप केले आहे; त्यांचे रक्‍त धुळीसारखे व त्यांचे मांस विष्ठेसारखे फेकितील. परमेश्‍वराच्या क्रोधदिवशी त्यांच्या सोन्यारुप्याने त्यांचा बचाव होणार नाही; त्याच्या ईर्ष्येच्या अग्नीने सर्व देश भस्म होईल, कारण तो देशातील सर्व रहिवाश्‍यांचा अंत करील आणि तोहि एकाएकी करील.”

२२ सफन्याच्या काळात घडले त्याप्रमाणे यहोवा लवकरच त्याच्या इशाऱ्‍यांकडे दुर्लक्ष करणाऱ्‍या पृथ्वीवरील “सर्व रहिवाशांवर” संकट आणेल. त्यांनी देवाविरुद्ध पाप केल्यामुळे ते आंधळ्यांप्रमाणे इकडेतिकडे फिरतील पण त्यांना बचावाचा मार्ग सापडणार नाही. यहोवाच्या न्यायाच्या दिवशी त्यांचे रक्‍त “धुळीसारखे,” अर्थात निरुपयोगी असल्यासारखे फेकले जाईल. त्यांचा अंत खरोखर अतिशय घृणास्पद असेल कारण परमेश्‍वर या दुष्टांची शरीरे—त्यांचे आतडे देखील “विष्ठेसारखे” फेकेल.

२३. “परमेश्‍वराच्या क्रोधदिवशी” दुष्टांचा बचाव होणार नसला तरीसुद्धा सफन्याच्या भविष्यवाणीतून कोणती आशा मिळते?

२३ परमेश्‍वराविरुद्ध व त्याच्या लोकांविरुद्ध लढणाऱ्‍यांना कोणीही बचावू शकत नाही. यहुदाच्या पातक्यांना त्यांचे चांदी व सोने बचावू शकले नाही; त्याचप्रकारे ख्रिस्ती धर्मजगताने व या दुष्ट जगाने साठवलेली बेईमानीची अमाप संपत्ती “परमेश्‍वराच्या क्रोधदिवशी” त्यांना बचावण्यासाठी कामी येणार नाही. त्या निर्णयाच्या दिवशी यहोवा दुष्टांचा कायमचा नाश करील, त्याअर्थी सबंध पृथ्वी यहोवाच्या ईर्ष्येच्या अग्नीने ‘भस्म होईल.’ परमेश्‍वराच्या भविष्यसूचक वचनावर आपला विश्‍वास असल्यामुळे आपल्याला खात्री आहे की आज आपण ‘अंतसमयात’ बऱ्‍याच दूर येऊन पोचलो आहोत. (दानीएल १२:४) यहोवाच्या न्यायाचा दिवस जवळ आहे आणि लवकरच तो आपल्या शत्रूंविरुद्ध सूड उगवेल. पण सफन्याच्या भविष्यवाणीतून आपल्याला बचावाची आशा मिळते. यहोवाच्या क्रोधदिनी बचावण्यासाठी आपण काय केले पाहिजे?

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• यहुदा व जेरुसलेमच्या बाबतीत सफन्याची भविष्यवाणी कशाप्रकारे पूर्ण झाली?

• ख्रिस्ती धर्मजगताचे आणि आपल्या काळातील सर्व दुष्टांचे भविष्य कसे असेल?

• यहोवाच्या न्यायाचा दिवस यायला अजून बराच अवकाश आहे असा विचार आपण का करू नये?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१३ पानांवरील चित्र]

यहोवाच्या न्यायाचा दिवस जवळ आला आहे असे सफन्याने निर्भयपणे घोषित केले

[चित्राचे श्रेय]

किंग जेम्स आणि रिव्हाईज्ड व्हर्शनचा समावेश असलेल्या सेल्फ-प्रोनाउन्सिंग एडिशन ऑफ द होली बायबल यातून

[१५ पानांवरील चित्र]

यहुदा व जेरुसलेमवर सा.यु.पू. ६०७ साली बॅबिलोनी लोकांच्या माध्यमाने यहोवाचा दिवस आला

[१६ पानांवरील चित्र]

यहोवा दुष्टांचा नाश करील तेव्हा बचाव होण्याची तुम्हाला आशा आहे का?