व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या भविष्यसूचक वचनाकडे लक्ष द्या

देवाच्या भविष्यसूचक वचनाकडे लक्ष द्या

देवाच्या भविष्यसूचक वचनाकडे लक्ष द्या

“अधिक निश्‍चित असे संदेष्ट्याचे वचन [भविष्यसूचक वचन] आम्हाजवळ आहे; . . . तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर बरे होईल.”२ पेत्र १:१९.

१, २. खोट्या मशिहाचे एखादे उदाहरण सांगा.

गेल्या अनेक शतकांत, स्वतःला मशिहा म्हणवून भविष्य वर्तवणारे कित्येकजण आले आणि गेले. सा.यु. पाचव्या शतकात स्वतःला मोशे म्हणवणाऱ्‍या एकाने क्रीट बेटावरील यहुद्यांना आपण मशिहा असल्याचे पटवून दिले; जुलूमापासून तुमची सुटका करण्यास मी आलो आहे असे त्याने सांगितले. त्यांच्या सुटकेच्या दिवशी, त्याने त्यांना एका उंच ठिकाणी नेले. समोर अफाट भूमध्य सागर होता. त्याने त्यांना सागरात उड्या टाकायला सांगितले; उड्या टाकताच समुद्र दुभंगेल असे तो म्हणाला. कित्येक लोकांनी त्याच्यावर विश्‍वास ठेवून समुद्रात उड्या टाकल्या आणि ते सर्व समुद्रात बुडून मेले. तो खोटा मशिहा मात्र तेथून फरार झाला.

बाराव्या शतकात आणखी एक “मशिहा” यमन येथे अवतरला होता. तेथल्या खलिफने किंवा राजाने त्याला मशिहा असल्याचा पुरावा दाखवायला सांगितले. तेव्हा त्या “मशिहाने,” आपला शिरच्छेद करण्यात यावा अशी खलिफला विनंती केली. त्याचा असा दावा होता की शिरच्छेद झाल्यावर लगेच त्याचे पुनरुत्थान होईल आणि हाच त्याचा मशिहा असण्याचा पुरावा असेल. खलिफने त्याची विनंती मान्य करून त्याचा शिरच्छेद केला—आणि त्या ‘मशिहाची’ गोष्ट तेथेच संपली.

३. खरा मशिहा कोण आहे आणि त्याच्या सेवाकार्यातून काय सिद्ध झाले?

खोटे मशिहा लोकांची फसवणूक करतात आणि त्यांची भाकिते कधीही खरी ठरत नाहीत. पण देवाच्या भविष्यसूचक वचनाकडे लक्ष देणाऱ्‍यांच्या पदरी निराशा कधीच पडत नाही. खरा मशिहा येशू ख्रिस्त स्वतः बायबलच्या कितीतरी भविष्यवाण्यांच्या पूर्णतेचा जिवंत पुरावा होता. उदाहरणार्थ, शुभवर्तमान लेखक मत्तय याने एका ठिकाणी यशयाची ही भविष्यवाणी उद्धृत केली: “जबुलून प्रांत व नफताली प्रांत, समुद्रकिनाऱ्‍यावरचा, यार्देनेच्या पलीकडचा, परराष्ट्रीयांचा गालील—अंधकारात बसलेल्यांवर प्रकाशाचा उदय झाला आहे आणि मृत्यूच्या प्रदेशात व छायेत बसलेल्यांवर ज्योति उगवली आहे. तेव्हापासून येशू घोषणा करीत सांगू लागला, की ‘पश्‍चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.’” (मत्तय ४:१५-१७; यशया ९:१, २) हा ‘उदय झालेला प्रकाश’ येशू होता; त्याच्या सेवाकार्यातून सिद्ध झाले की मोशेने ज्या संदेष्ट्याबद्दल भाकीत केले होते तो हाच होता. त्याअर्थी जे येशूचे ऐकणार नाहीत त्यांचा नाश ठरलेला होता.—अनुवाद १८:१८, १९; प्रेषितांची कृत्ये ३:२२, २३.

४. येशूने यशया ५३:१२ येथील भविष्यवाणी कशाप्रकारे पूर्ण केली?

येशूने यशया ५३:१२ येथील भविष्यसूचक शब्द देखील पूर्ण केले: “आपला प्राण वाहू देऊन तो मृत्यू पावला, त्याने आपणास अपराध्यांत गणू दिले; त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले व अपराध्यांसाठी मध्यस्थी केली.” लवकरच मानवजातीच्या पापाकरता खंडणी म्हणून आपले मानवी जीवन आपल्याला बलिदान करावे लागणार आहे हे माहीत असल्यामुळे येशूने त्याच्या शिष्यांचा विश्‍वास बळकट करण्याचा प्रयत्न केला. (मार्क १०:४५) खासकरून, रूपांतराच्या दृष्टान्ताकरवी त्याने अतिशय विलक्षणरित्या त्यांचा विश्‍वास मजबूत केला.

रूपांतरामुळे प्रेषितांचा विश्‍वास बळकट झाला

५. स्वतःच्या शब्दांत रूपांतराचे तुम्ही कसे वर्णन कराल?

रूपांतराविषयी येशूने स्वतः भाकीत केले होते. येशूने म्हटले होते: “मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या गौरवानिशी आपल्या दूतांसह येईल. . . . मी तुम्हास खचित सांगतो, येथे उभे असलेल्यांमध्ये काही असे आहेत की ते मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यात येताना पाहतील तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.” (मत्तय १६:२७, २८) प्रेषितांपैकी काहींनी खरोखरच येशूला राज्य गौरवात येताना पाहिले का? मत्तय १७:१-७ येथे असे सांगितले आहे: “सहा दिवसांनंतर येशूने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान ह्‍यांना आपणाबरोबर एका उंच डोंगरावर एकांती नेले. तेव्हा त्याचे रूप त्यांच्यादेखत पालटले.” खरोखर ती किती अद्‌भुत घटना असेल! “त्याचे मुख सूर्यासारखे तेजस्वी झाले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी शुभ्र झाली. तेव्हा पाहा, मोशे व एलीया हे त्याच्याबरोबर संभाषण करीत असलेले त्यांच्या दृष्टीस पडले.” तसेच, “तेजस्वी मेघाने त्यांच्यावर छाया केली” आणि त्यांनी खुद्द परमेश्‍वराचा आवाज ऐकला: “‘हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे. ह्‍याविषयी मी संतुष्ट आहे; ह्‍याचे तुम्ही ऐका.’ हे ऐकून शिष्य पालथे पडले व फार भयभीत झाले. तेव्हा येशूने जवळ येऊन त्यांना स्पर्श करून म्हटले ‘उठा, भिऊ नका.’”

६. (अ) येशूने रूपांतराला दृष्टान्त का म्हटले? (ब) रूपांतराच्या दृष्टान्तात कशाची झलक पाहायला मिळाली?

येशू व तीन प्रेषित रात्रभर हर्मोन पर्वताच्या एका शिखरावर होते, तेथेच ही अद्‌भुत घटना घडली असावी. रूपांतर रात्रीच्या वेळी घडले आणि त्यामुळे शिष्यांना ते अधिकच स्पष्टपणे आठवणीत राहिले असेल. येशूने रूपांतराला दृष्टान्त म्हटले; याचे एक कारण असे, की मोशे व एलीया तेथे खरोखर उपस्थित नव्हते. त्यांचा कितीतरी शतकांआधी मृत्यू झाला होता. प्रत्यक्षात फक्‍त ख्रिस्त तेथे उपस्थित होता. (मत्तय १७:८, ९) त्या नेत्रदीपक दृष्टान्तामुळे पेत्र, याकोब व योहान यांना येशूच्या भावी राज्यातील त्याच्या गौरवाची झलक पाहायला मिळाली. मोशे व एलिया येशूच्या अभिषिक्‍त सहशासकांना सूचित करतात. येशूने देवाच्या राज्याबद्दल आणि त्याच्या भावी राजपदाबद्दल जे काही सांगितले होते त्याला या दृष्टान्तामुळे जोरदार पुष्टी मिळाली.

७. रूपांतराचा दृष्टान्त पेत्राच्या आठवणीत जसाचा तसा राहिला होता हे कशावरून म्हणता येईल?

ख्रिस्ताचा तेजस्वी चेहरा व त्याचे चकाकणारे वस्त्र पाहिल्यावर, तसेच, येशू आपला प्रिय पुत्र असून सर्वांनी त्याचे ऐकावे अशी स्वतः देवाची वाणी ऐकल्यावर प्रेषितांवर याचा विलक्षण प्रभाव पडला. ख्रिस्ती मंडळीत पुढे चालून महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्‍या या तिन्ही प्रेषितांचा विश्‍वास हा दृष्टान्त पाहिल्यानंतर खूपच बळकट झाला. पण येशूचे पुनरुत्थान होईपर्यंत या दृष्टान्ताविषयी कोणालाही न सांगण्याची त्यांना ताकीद देण्यात आली होती. जवळजवळ ३२ वर्षे उलटल्यानंतर पेत्राने या दृष्टान्ताचा उल्लेख केला, त्यावेळी त्याच्या मनात तो अगदी कालच घडल्याप्रमाणे स्पष्ट होता. दृष्टान्ताविषयी आणि त्याच्या अर्थसूचकतेविषयी सांगताना पेत्राने असे लिहिले: “कारण चातुर्याने कल्पिलेल्या कथांस अनुसरून आम्ही आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचे सामर्थ्य व आगमन ह्‍यांसंबंधाने तुम्हांस कळविले असे नाही; तर आम्ही त्याचे ऐश्‍वर्य प्रत्यक्ष पाहणारे होतो. कारण त्याला देवपित्यापासून सन्मान व गौरव मिळाले; तेव्हा ऐश्‍वर्ययुक्‍त गौरवाच्या द्वारे अशी वाणी झाली की, ‘हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्‍याच्याविषयी मी संतुष्ट आहे’. त्याच्याबरोबर पवित्र डोंगरावर असताना आकाशातून आलेली ही वाणी आम्ही स्वतः ऐकली.”—२ पेत्र १:१६-१८.

८. (अ) देवाने आपल्या पुत्राविषयी जी आकाशवाणी केली त्यावरून खासकरून काय स्पष्ट झाले? (ब) रूपांतराच्या दृष्टान्ताच्या वेळी मेघाने छाया केली यावरून काय सूचित होते?

“हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्‍याविषयी मी संतुष्ट आहे; ह्‍याचे तुम्ही ऐका,” ही परमेश्‍वराने केलेली आकाशवाणी सर्वात महत्त्वाची होती. येशू हाच देवाने नियुक्‍त केलेला राजा असून सर्व सृष्टीला त्याला आज्ञांकित व्हावे लागेल हे खासकरून या विधानातून स्पष्ट झाले. दृष्टान्त होताना मेघाने छाया केली असे आपण वाचतो; यावरून, या दृष्टान्ताची पूर्णता अदृश्‍य रूपाने होईल हे सूचित होते. जे लोक सिंहासनावर विराजमान झालेल्या येशूच्या अदृश्‍य उपस्थितीचे “चिन्ह” ओळखतात, त्यांनाच केवळ या दृष्टान्ताची पूर्णता झाल्याचे आकलन होईल, जणू ज्ञानचक्षूंनी ते हे पाहू शकतील. (मत्तय २४:३) किंबहुना, येशूने आपले पुनरुत्थान होईपर्यंत कोणालाही दृष्टान्ताविषयी सांगू नये असे जे सांगितले होते, त्यावरूनच सिद्ध होते की त्याचे राजपदावर येणे आणि गौरवान्वित होणे त्याच्या पुनरुत्थानानंतरच घडणार होते.

९. रूपांतराच्या दृष्टान्तामुळे आपला विश्‍वास का बळकट झाला पाहिजे?

रूपांतराच्या दृष्टान्ताविषयी उल्लेख केल्यानंतर पेत्राने म्हटले: “शिवाय अधिक निश्‍चित असे संदेष्ट्याचे वचन [भविष्यसूचक वचन] आम्हांजवळ आहे; ते काळोख्या जागी प्रकाशणाऱ्‍या दिव्याप्रमाणे आहे; तुमच्या अंतःकरणांत दिवस उजाडेपर्यंत व पहाटचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर बरे होईल; प्रथम हे ध्यानात ठेवा की, शास्त्रांतील कोणत्याहि संदेशाचा उलगडा कोणाला स्वतःच्या कल्पनेने होत नाही. कारण संदेश मनुष्यांच्या इच्छेने कधी आलेला नाही; तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला आहे.” (२ पेत्र १:१९-२१) रूपांतराच्या दृष्टान्ताने देवाच्या भविष्यसूचक वचनाची सत्यता, विश्‍वासार्हता अधिकच पटवून दिली. तेव्हा, ज्यांना देवाची प्रेरणा व संमती नाही अशा कोणत्याही ‘चातुर्याने कल्पिलेल्या कथांपेक्षा’ आपण देवाच्या भविष्यसूचक वचनाकडे लक्ष दिले पाहिजे. रूपांतराच्या दृष्टान्तामुळे आपला देखील विश्‍वास बळकट झाला पाहिजे कारण त्या दृष्टान्तात येशूच्या ज्या गौरवाची आणि राज्यसत्तेची झलक मिळाली होती ते गौरव व ती राज्यसत्ता आता वास्तवात त्याला मिळाली आहे. होय ख्रिस्त आज एका शक्‍तिशाली स्वर्गीय राजाच्या भूमिकेत उपस्थित आहे यात काही शंका नाही. हे सिद्ध करणारा भरपूर पुरावा आपल्याकडे आहे.

पहाटचा तारा उगवतो

१०. पेत्राने उल्लेख केलेला “पहाटचा तारा” कोणाला किंवा कशाला सूचित करतो व का?

१० पेत्राने लिहिले: “तुमच्या अंतःकरणांत दिवस उजाडेपर्यंत व पहाटचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर बरे होईल.” हा “पहाटचा तारा” कोणाला किंवा कशाला सूचित करतो? “पहाटचा तारा” यासाठी वापरलेला मूळ ग्रीक शब्द बायबलमध्ये केवळ एकदाच वापरला आहे व त्या शब्दाशी मिळताजुळता ग्रीक शब्द प्रकटीकरण २२:१६ यात वापरलेला आढळतो. सदर वचनात येशू ख्रिस्ताला “पहाटचा तेजस्वी तारा” म्हटले आहे. वर्षाच्या काही विशिष्ट ऋतूंत हे तारे पूर्वेकडील क्षितिजावर सर्वात शेवटी, म्हणजे पहाटेपहाटे, सूर्योदयाआधी उगवतात; जणू ते एका नव्या दिवसाच्या आगमनाची सूचना देत असतात. पेत्राने राज्यसत्ता मिळालेल्या येशू ख्रिस्ताचे वर्णन करण्याकरता “पहाटचा तारा” हा शब्द उपयोगात आणला. येशूला राज्यसत्ता मिळाली तेव्हा तो जणू या पृथ्वीवर आणि सबंध विश्‍वात एका ताऱ्‍याप्रमाणे उगवला! मशिहाच्या भूमिकेत, पहाटच्या ताऱ्‍याप्रमाणे तो आज्ञाधारक मानवांकरता उजाडलेल्या एका नव्या दिवसाची, एका नव्या युगाची घोषणा करतो.

११. (अ) दुसरे पेत्र १:१९ यात “पहाटचा तारा” शाब्दिक अर्थाने लोकांच्या हृदयात उगवतो असे म्हणणे का योग्य नाही? (ब) दुसरे पेत्र १:१९ या वचनाचे स्पष्टीकरण तुम्ही कसे द्याल?

११ काही भाषांतरांत २ पेत्र १:१९ येथे “तुमच्या अंतःकरणात” याऐवजी “तुमच्या हृदयात” असे भाषांतर केले आहे. त्यामुळे यांपैकी बऱ्‍याच भाषांतरांतून असा विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे, की २ पेत्र १:१९ येथे प्रेषित पेत्राचे शब्द शब्दशः मनुष्याच्या हृदयाच्या संदर्भात आहेत. प्रौढ व्यक्‍तीचे हृदय जास्तीतजास्त २५० ते ३०० ग्रॅम वजनाचे असते. मग मनुष्याच्या शरीरातल्या इतक्या लहानशा अवयवात, स्वर्गात गौरवशाली राजा असणारा येशू ख्रिस्त पहाटच्या ताऱ्‍याप्रमाणे कसा उगवू शकेल? (१ तीमथ्य ६:१६) साहजिकच येथे आपल्या लाक्षणिक हृदयाबद्दल सांगितले आहे कारण लाक्षणिक हृदयानेच आपण देवाच्या भविष्यसूचक वचनाकडे लक्ष देतो. पण २ पेत्र १:१९ या वचनाकडे बारकाईने पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल की न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन या भाषांतरात “दिवस उजाडेपर्यंत व पहाटचा तारा उगवेपर्यंत” या वाक्यांशाच्या आधी व नंतर स्वल्पविराम आहेत; यामुळे हा वाक्यांश बाकीच्या वचनापासून व “तुमच्या अंतःकरणात” यापासून वेगळा मांडण्यात आला आहे. दुसऱ्‍या शब्दांत, हे वचन अशाप्रकारे वाचले जाऊ शकते: ‘अधिक निश्‍चित असे संदेष्ट्याचे वचन आम्हांजवळ आहे; ते काळोख्या जागी, अर्थात तुमच्या अंतःकरणांत प्रकाशणाऱ्‍या दिव्याप्रमाणे आहे; दिवस उजाडेपर्यंत व पहाटचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर बरे होईल.’

१२. सर्वसामान्यपणे मनुष्यांच्या हृदयांची काय दशा आहे, पण खऱ्‍या ख्रिश्‍चनांबद्दल काय म्हणता येईल?

१२ सर्वसामान्यपणे पाहिल्यास, पापी मनुष्यांच्या लाक्षणिक हृदयांची स्थिती कशी आहे? त्यांचे हृदय आध्यात्मिक अंधकारातच नाही का? पण, आपण खरे ख्रिस्ती असू तर आपल्या हृदयात एक प्रकाश आहे; तो प्रकाश नसता तर आपले हृदय देखील अंधकारात असते. पेत्राच्या शब्दांवरून हेच सूचित होते. देवाच्या भविष्यसूचक वचनातील प्रकाशाकडे लक्ष देण्याद्वारेच खरे ख्रिस्ती सदैव आठवणीत ठेवू शकतात की त्यांच्याकरता एक नवा दिवस उजाडला आहे. ते याची जाणीव ठेवू शकतात की पहाटचा तारा मनुष्याच्या शारीरिक हृदयात नव्हे तर सर्व सृष्टीपुढे उगवला आहे.

१३. (अ) पहाटचा तारा उगवला आहे हे आपण खातरीने का म्हणू शकतो? (ब) येशूने आपल्या काळाच्या संदर्भात भाकीत केलेल्या कठीण परिस्थितीला ख्रिस्ती का तोंड देऊ शकतात?

१३ पहाटचा तारा केव्हाच उगवला आहे! येशूने आपल्या उपस्थितीविषयी जी महान भविष्यवाणी केली होती तिचा लक्षपूर्वक अभ्यास केला तर याची आपल्याला खातरी पटेल. इतिहासात कधी झाली नव्हती इतकी भयंकर युद्धे, दुष्काळ, भूमिकंप आणि सबंध जगात सुवार्तेचा प्रचार हे त्या भविष्यवाणीचे काही पैलू आहेत आणि यांची पूर्णता आपण आज प्रत्यक्षात अनुभवत आहोत. (मत्तय २४:३-१४) येशूने भाकीत केलेल्या कठीण परिस्थितीची झळ आपल्यालाही लागते, पण आपण मनात शांती व आनंद बाळगून सर्व संकटांना तोंड देण्याचा प्रयत्न करतो. का? कारण आपण देवाच्या भविष्यसूचक वचनाकडे लक्ष देतो आणि देवाने भविष्याविषयी केलेल्या सर्व अभिवचनांवर आपल्याला पूर्ण विश्‍वास आहे. आपल्याला माहीत आहे की आज आपण ‘अंतसमयात’ बऱ्‍याच दूरपर्यंत आलो आहोत आणि त्याअर्थी, एका अत्यंत सुखदायक काळाच्या अगदी उंबरठ्यावर उभे आहोत! (दानीएल १२:४) यशया ६०:२ येथे सांगितल्याप्रमाणे या जगाची अतिशय दयनीय स्थिती झाली आहे: “पाहा! अंधकार पृथ्वीला झाकीत आहे, निबिड काळोख राष्ट्रांस झाकीत आहे.” अशा या निबिड काळोखात एखाद्याला योग्य मार्ग कसा सापडू शकतो? योग्य मार्ग शोधू इच्छिणाऱ्‍याने, खूप उशीर होण्याआधी देवाच्या भविष्यसूचक वचनाकडे नम्रपणे लक्ष दिले पाहिजे. प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांनी जीवनाचा व प्रकाशाचा उगम असणाऱ्‍या यहोवा देवाला शरण गेले पाहिजे. (स्तोत्र ३६:९; प्रेषितांची कृत्ये १७:२८) असे केले तरच एका व्यक्‍तीच्या जीवनातला आध्यात्मिक अंधकार दूर होऊ शकतो आणि देवाने आज्ञाधारक मानवजातीकरता राखून ठेवलेले अद्‌भुत भवितव्य उपभोगण्याची आशा देखील तिला मिळू शकते.—प्रकटीकरण २१:१-५.

“जगात प्रकाश आला आहे”

१४. बायबलच्या अद्‌भुत भविष्यवाण्यांची पूर्णता उपभोगण्यासाठी आपण काय केले पाहिजे?

१४ बायबल स्पष्टपणे दाखवून देते की येशू ख्रिस्त आज राजा असून स्वर्गात राज्य करत आहे. १९१४ साली त्याने राज्यसत्ता हाती घेतल्यामुळे भविष्यात अनेक अद्‌भुत भविष्यवाण्या पूर्ण होणार आहेत. या भविष्यवाण्यांची पूर्णता अनुभवण्यासाठी आपण नम्रपणे येशू ख्रिस्तावर विश्‍वास ठेवला पाहिजे, आपल्या पापांबद्दल आणि अज्ञानात आपल्याकडून घडलेल्या दुष्कृत्यांबद्दल पश्‍चात्ताप केला पाहिजे. अर्थात ज्यांना अंधकार हवाहवासा वाटतो त्यांना सार्वकालिक जीवन मिळणार नाही. येशूने म्हटले: “निवाडा हाच आहे की, जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली; कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती. कारण जो कोणी वाईट कृत्ये करितो तो प्रकाशाचा द्वेष करितो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही; परंतु जो सत्य आचरितो तो प्रकाशाकडे येतो ह्‍यासाठी की, आपली कृत्ये देवाच्या ठायी केलेली आहेत हे उघड व्हावे.”—योहान ३:१९-२१.

१५. देवाने आपल्या पुत्राकरवी आपल्याकरता तारणाचा मार्ग मोकळा केला आहे, पण आपण त्याकडे दुर्लक्ष केल्यास काय परिणाम होईल?

१५ येशूच्या रूपात या जगात आध्यात्मिक प्रकाश आला आहे आणि त्याअर्थी येशूच्या शिकवणीकडे लक्ष देणे अनिवार्य आहे. पौलाने लिहिले: “देव प्राचीन काळी अशाअशांनी व प्रकाराप्रकारांनी संदेष्ट्यांच्या द्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला. तो ह्‍या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे; त्याने त्याला सर्व गोष्टींचा वारीस करून ठेविले.” (इब्री लोकांस १:१, २) देवाने आपल्या पुत्राला पाठवून आपल्यासाठी तारणाचा मार्ग मोकळा केला आहे, पण जर आपण या तारणाला तुच्छ लेखले तर काय परिणाम होईल? पौल पुढे म्हणतो: “देवदूतांच्या द्वारे सांगितलेले वचन जर दृढ झाले आणि प्रत्येक उल्लंघनाचे व आज्ञाभंगाचे यथान्याय फळ मिळाले, तर आपण एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केल्यास आपला कसा निभाव लागेल? ते सांगण्याचा आरंभ प्रभूकडून झाला असून, ते ऐकणाऱ्‍यांनी त्याविषयी आपल्याला प्रमाण पटविले; त्यांच्याबरोबर देवानेहि चिन्हे, अद्‌भुते व नाना प्रकारचे पराक्रम करून आणि आपल्या इच्छेप्रमाणे पवित्र आत्म्याची दाने वाटून साक्ष दिली.” (इब्री लोकांस २:२-४) होय, देवाच्या भविष्यसूचक वचनाच्या घोषणेत सर्वात प्रमुख भूमिका येशूची आहे.—प्रकटीकरण १९:१०.

१६. यहोवा देवाच्या सर्व भविष्यवाण्यांवर आपण पूर्ण भरवसा का ठेवू शकतो?

१६ पेत्राच्या शब्दांकडे पुन्हा एकदा लक्ष देऊ: “शास्त्रांतील कोणत्याहि संदेशाचा उलगडा कोणाला स्वतःच्या कल्पनेने होत नाही.” मनुष्य स्वतःच्या शक्‍तीने कधीही खरी भविष्यवाणी करू शकत नाहीत. पण देवाच्या सर्व भविष्यवाण्यांवर आपण पूर्ण भरवसा ठेवू शकतो. कारण या भविष्यवाण्या स्वतः यहोवा देव करतो. पवित्र आत्म्याच्या साहाय्याने त्याने त्याच्या सेवकांना बायबलच्या भविष्यवाण्यांची पूर्णता कशी होत आहे हे समजून घ्यायला मदत केली आहे. खरोखर, आपण यहोवा देवाचे मनापासून आभार मानले पाहिजे की १९१४ या वर्षापासून आपण अशा कितीतरी भविष्यवाण्यांची पूर्णता पाहू शकलो. आणि या दुष्ट जगाच्या नाशाविषयीच्या उरलेल्या भविष्यवाण्या देखील सर्वच्या सर्व पूर्ण होतील याबद्दलही आपल्याला काहीच शंका नाही. देवाच्या भविष्यवाण्यांकडे लक्ष देणे अतिशय महत्त्वाचे आहे, आणि त्याच वेळेस आपला प्रकाश लोकांसमोर पडू देणेही महत्त्वाचे आहे. (मत्तय ५:१६) आपण यहोवाचे अत्यंत आभारी आहोत की आज जगात पसरलेल्या ‘अंधकारातही’ त्याच्या लोकांवर मात्र त्याचा ‘प्रकाश झळकत आहे.’—यशया ५८:१०.

१७. देवाकडून येणाऱ्‍या आध्यात्मिक प्रकाशाची आपल्याला का गरज आहे?

१७ प्रकाशामुळे आपल्याला सभोवतालच्या गोष्टी पाहणे शक्य होते. प्रकाशामुळेच शेतात पिके उत्पन्‍न होऊ शकतात आणि त्यामुळे आपल्याला निरनिराळ्या प्रकारचे अन्‍नधान्य उपलब्ध होते. प्रकाश नसता तर आपण जिवंतच राहू शकलो नसतो. आध्यात्मिक प्रकाशाबद्दलही हेच खरे नाही का? आध्यात्मिक प्रकाशामुळेच आपल्याला जीवनात मार्गदर्शन मिळते तसेच देवाचे वचन बायबल याच्या आधारावर भविष्यात काय होणार आहे हे देखील आपल्याला कळते. (स्तोत्र ११९:१०५) यहोवा देव प्रेमळपणे ‘त्याचा प्रकाश व त्याचे सत्य प्रगट’ करतो. (स्तोत्र ४३:३) या त्याच्या कृपेबद्दल आपण नक्कीच कृतज्ञ असले पाहिजे. आपल्या लाक्षणिक हृदयातला अंधकार दूर व्हावा म्हणून “देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश” ग्रहण करण्याचा हर तऱ्‍हेने प्रयत्न करण्याद्वारे आपण ही कृतज्ञता दाखवू शकतो.—२ करिंथकर ४:६; इफिसकर १:१८.

१८. यहोवाने निवडलेला पहाटचा तारा काय करण्यास सुसज्ज आहे?

१८ येशू ख्रिस्त, पहाटचा तारा १९१४ साली सबंध सृष्टीत उगवला आणि तेव्हापासून रूपांतराच्या दृष्टान्ताची पूर्णता करू लागला हे यहोवाने आपल्याला समजू दिले हा त्याचा किती मोठा आशीर्वाद आहे. रूपांतराच्या दृष्टान्ताचा उर्वरित भाग पूर्ण करण्याकरता यहोवाने निवडलेला पहाटचा तारा आता त्याचा उद्देश पूर्ण करण्यासाठी—“देवाच्या त्या मोठ्या दिवसाच्या लढाईसाठी” सुसज्ज आहे. (प्रकटीकरण १६:१४, १६) या जुन्या व्यवस्थीकरणाचा नाश केल्यानंतर, यहोवा “नवे आकाश व नवी पृथ्वी” निर्माण करण्याचे आपले अभिवचन पूर्ण करेल; त्यानंतर आपण या विश्‍वाचा सर्वसत्ताधारी प्रभू व खऱ्‍या भविष्यवाणीचा देव यहोवा याची सदासर्वदा उपकारस्तुती करू. (२ पेत्र ३:१३) तो महान दिवस येईपर्यंत आपण देवाच्या भविष्यसूचक वचनाकडे लक्ष देत राहू व त्याच्या प्रकाशात वाटचाल करत राहू.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• येशूच्या रूपांतराचे तुम्ही कसे वर्णन कराल?

• रूपांतराच्या दृष्टान्तामुळे कशाप्रकारे विश्‍वास बळकट होतो?

• यहोवाने निवडलेला पहाटचा तारा कोणास किंवा कशास सूचित करतो आणि हा तारा केव्हा उगवला?

• देवाच्या भविष्यसूचक वचनाकडे आपण का लक्ष दिले पाहिजे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१३ पानांवरील चित्र]

रूपांतराची अर्थसूचकता तुम्ही स्पष्ट करू शकता का?

[१५ पानांवरील चित्र]

पहाटचा तारा केव्हाच उगवला आहे. कसा आणि केव्हा ते तुम्हाला माहीत आहे का?