व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जादूटोणा याविषयी तुम्हाला काय माहीत असावे?

जादूटोणा याविषयी तुम्हाला काय माहीत असावे?

जादूटोणा याविषयी तुम्हाला काय माहीत असावे?

हल्ली जादूटोण्याची व्याख्या करणे कठीण झाले आहे. कारण जादूटोणा करणारे विविध प्रकारचे लोक आहेत. त्यांचा एकच विश्‍वास नाही; कारण त्यांचा कोणताही एक अधिकार, सिद्धान्त किंवा पवित्र ग्रंथ नाही. शिवाय, कोणत्या देवाला मानावे याबद्दल त्यांच्या परंपरा, व्यवस्था, रीतीरिवाज आणि मतेही वेगवेगळी आहेत. एक लेखिका म्हणते: “भूतविद्येच्या जगात प्रत्येकाला वाटेल ते आचार-विचार निवडता येतात.” आणखी एक लेखिका म्हणते की, “जादूटोणा करणाऱ्‍या बहुतेकांमध्येच अनेक मतभेद असतात.”

पण पुष्कळांवर अशा मतभेदांचा काहीच फरक पडत नाही. चेटूक शिकण्याची इच्छा असलेल्यांना एका मार्गदर्शक पुस्तकात असे म्हटले आहे: “तुम्हाला विरोधाभास आढळलाच तर ती माहिती पडताळा आणि तुम्हाला काय निवडायचे आहे ते निवडा. तुमच्या अंतर्मनाचे ऐका. म्हणजेच, कोणत्याही पुस्तकातून तुम्हाला योग्य वाटतील तेच रीतीरिवाज निवडा.”

परंतु सत्य माहीत असलेल्यांसाठी या मतभेदांमुळे समस्या निर्माण होते. सत्य म्हणजे वस्तुस्थिती अर्थात जे खरे आहे ते. एखाद्या व्यक्‍तीला वाटते किंवा तिला विश्‍वास आहे किंवा तिला तशी इच्छा आहे म्हणून कोणतीही गोष्ट खरी नसते. जसे की, एकेकाळी डॉक्टरांचा विश्‍वास होता की, न्यूमोनिया झालेल्या रुग्णाच्या छातीवर जिवंत कोंबडीचे दोन तुकडे करून ठेवले तर त्याचा रोग बरा होऊ शकतो. अनेकांनी यावर विश्‍वासही ठेवला. परंतु, त्यांचा विश्‍वास आणि त्यांची इच्छा वस्तुस्थितीच्या एकमतात नव्हती; कारण अशा कोणत्याही प्रकाराने न्यूमोनियाचा रोग बरा होत नाही. सत्य हे निर्माण करता येत नाही; तर सत्य समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो.

आध्यात्मिक बाबींमध्ये बायबल, सत्य असल्याचा दावा करते. पृथ्वीवर असताना येशू ख्रिस्ताने आपल्या पित्याला अशी प्रार्थना केली: “तुझे वचन हेच सत्य आहे.” (योहान १७:१७) प्रेषित पौलाने लिहिले: ‘प्रत्येक शास्त्रलेख परमेश्‍वरप्रेरित आहे.’ (२ तीमथ्य ३:१६) मात्र जादूटोणा करणाऱ्‍या अनेकांचा यावर विश्‍वास नाही. त्याउलट, दंतकथा, प्राचीन धर्म आणि विज्ञान कथा अशा गोष्टींमधून ते प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळवण्याचा प्रयत्न करतात. परंतु, बायबलबद्दल निदान एकदा तरी विचार करणे रास्त नाही का? शेवटी, संपूर्ण जगात बायबलला पवित्र ग्रंथ मानले जाते. धार्मिक पुस्तकांमध्येही ते सर्वात जुने व आजपर्यंत टिकून राहिलेले पुस्तक आहे. बायबलचे लिखाण पूर्ण करायला सुमारे १,६०० वर्षे लागली तरीही त्याच्या शिकवणुकींमध्ये विसंगती दिसून येत नाही. आता आपण बायबलमधल्या शिकवणुकी आणि जादूटोणा करणाऱ्‍या काहींचे सर्वसाधारण विश्‍वास यांच्यात तुलना करून पाहू या.

आत्मिक क्षेत्रात कोणाचे वास्तव्य?

आध्यात्मिक ज्ञानातील एक मूलभूत प्रश्‍न असा आहे की: आत्मिक क्षेत्रात कोण राहतात? अलीकडे, चेटूक करणारे बहुतेक लोक निसर्गाची उपासना व अनेक देवदेवतांची पूजा करणारा धर्म अनुसरतात. पण काहीजण एका महान देवीची पूजा करतात. तिला कुमारिका, माता आणि वृद्धा अशा तिहेरी भूमिकेत प्रदर्शित केले आहे; तिची ही तिहेरी भूमिका जीवनातल्या मूलभूत टप्प्यांचे सूचक आहे. तिचा प्रियकर शिंगे असलेला देव आहे. चेटूक करणारे इतरजण देव-देवींची पूजा करतात. एक लेखक लिहितो: “हे देव-देवी निसर्गातील पुरुषत्वाच्या आणि स्त्रीत्वाच्या शक्‍तींचे प्रदर्शन आहेत असे म्हटले जाते. प्रत्येकाच्या अनोख्या गुणधर्मांच्या मिलनातून जीवसृष्टीची सुसंगत निर्मिती होते.” या विषयावरील आणखी एक जाणकार व्यक्‍ती लिहिते: “जादूटोण्यामध्ये आपापल्या आवडीनुसार दैवतांची (देव-देवी) निवड करणे ही आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे. . . . अशाप्रकारे आपल्याला हवे असलेले देवदेवता निवडणे आणि त्यांची पूजा करणे ही सवलत जादूटोणा करणाऱ्‍यांना मिळते.”

मात्र बायबल या गोष्टींना आधार देत नाही. येशू ख्रिस्ताने आपल्या सेवाकार्यात केवळ “एकच खरा देव” अर्थात यहोवा याच्याविषयी इतरांना शिकवले. (योहान १७:३) बायबल म्हणते: “परमेश्‍वर थोर व परमस्तुत्य आहे; सर्व दैवताहून त्याचेच भय धरणे योग्य आहे. कारण राष्ट्रांची सर्व दैवते निरुपयोगी आहेत; परमेश्‍वर आकाशाचा निर्माणकर्ता आहे.”—१ इतिहास १६:२५, २६.

सैतानाबद्दल काय? वेबस्टर्स नाईंथ न्यू कॉलीजिएट डिक्शनरी यात जादूटोण्याची व्याख्या “सैतानाशी दळणवळण करणे” अशी केली आहे. परंतु आज जादूटोणा करणारे कोणीही हे मान्य करणार नाही; पुष्कळजण तर सैतानावर विश्‍वासही ठेवत नाहीत. द आयरिश टाईम्स यात “आयर्लंडमधील जादूटोणा करणाऱ्‍यांच्या एका सुप्रसिद्ध गटातली श्रेष्ठ चेटकीण” असे वर्णन केलेल्या एका तरुण स्त्रीने असा वाद मांडला: “सैतानावर विश्‍वास करणे म्हणजे ख्रिस्ती धर्म मानणे . . . ज्या विश्‍वात देवच नाही तेथे [सैतान] असूच शकत नाही.”

सैतान अस्तित्वात आहे आणि तोच पृथ्वीवरील हालअपेष्टेसाठी कारणीभूत आहे याला बायबल पुष्टी देते. (प्रकटीकरण १२:१२) येशूने फक्‍त सैतान अस्तित्वात आहे एवढेच शिकवले नाही तर एखादी व्यक्‍ती नकळत त्याची इच्छा पूर्ण करू शकते असेही तो म्हणाला होता. पहिल्या शतकातल्या धार्मिक नेत्यांचीच गोष्ट घ्या. ते देवाचे पुत्र आहेत आणि त्याची इच्छा करत आहेत असे त्यांना ठामपणे वाटायचे. परंतु, त्यांचे मन ओळखणाऱ्‍या येशूला खरी परिस्थिती ठाऊक होती. त्याने त्यांना धडधडीतपणे म्हटले: “तुम्ही आपला बाप सैतान ह्‍यापासून झाला आहा आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करावयास इच्छिता.” (योहान ८:४४) बायबलमधील प्रकटीकरणाच्या पुस्तकात असे म्हटले आहे की, सैतान ‘सर्व जगाला ठकवत’ आहे.—प्रकटीकरण १२:९.

विशिष्ट प्रकारची जादू लाभाची असते का?

जादूचा संबंध नेहमी गूढ शक्‍तींशी लावला गेला आहे. * प्राचीन तसेच आधुनिक काळातही अनेकजण हे मानतात की, जादूटोणा करणाऱ्‍यांच्या जादूने लोकांना नुकसान पोहंचते. जादूटोणा करणाऱ्‍यांकडे लोकांना त्रास देण्याची किंवा लोकांना ठार मारण्याचीही शक्‍ती असते असे म्हटले जाते. आजारपण, मृत्यू किंवा चांगले पीक न येणे अशा अरिष्टांसाठी जादूटोणा करणारे जबाबदार आहेत असा दोष त्यांच्यावर आधीपासूनच लावला गेला आहे.

परंतु, जादूटोणा करणाऱ्‍यांना हे मान्य नाही. दुष्ट चेटक्या किंवा चेटकिणीच असल्याप्रकारची हानीकारक जादू करतात असे ते कबूल करत असले तरी बहुतेकदा जादूचा उपयोग फायद्यासाठीच केला जातो असे पुष्कळांचे म्हणणे आहे. ते असे शिकवतात की, जादू करणाऱ्‍यांवर केलेल्या जादूचा तिप्पट परिणाम होत असतो आणि म्हणूनच ते कोणाला शाप देत नाहीत. स्वतःच्या संरक्षणासाठी केलेले मंत्र, घरातल्या आधीच्या रहिवाशांमुळे तेथे राहिलेल्या अनिष्ट शक्‍तींचे शुद्धीकरण, एखाद्या व्यक्‍तीला आपल्या प्रेमात पाडणे, रोग बरे करणे, नोकरी कायम राखणे आणि पैसे मिळवणे अशा काही कार्यांसाठी त्या तथाकथित फायदेकारक जादूचा उपयोग केला जातो. जादुई शक्‍तीने हे सर्व करता येत असल्यामुळेच जादूटोणा इतका लोकप्रिय बनला आहे.

परंतु, बायबलमध्ये फायदेकारक जादू आणि हानीकारक जादू असा काही फरक केलेला आढळत नाही. मोशेला दिलेल्या नियमशास्त्रात देवाने अगदी स्पष्टपणे म्हटले होते: “तुम्ही काही मंत्रतंत्र करू नका.” (लेवीय १९:२६) बायबलमध्ये असेही म्हटले आहे की, “चेटूक करणारा, शकुनमुहूर्त पाहणारा, मंत्रतंत्र करणारा, जादूगार, वशीकरण करणारा, पंचाक्षरी . . . असा तुमच्यापैकी कोणी नसावा.”—अनुवाद १८:१०, ११.

देव असे का म्हणाला? आपला फायदा होऊच नये असे देवाला वाटते म्हणून नव्हे तर त्याचे त्याच्या लोकांवर प्रेम होते आणि त्यांनी भीतीदायक गोष्टींचे किंवा अंधविश्‍वासाचे दास होऊ नये म्हणून त्याने हे नियम त्यांना दिले. तो तर त्याच्या सेवकांना हव्या त्या गोष्टी मागायला सांगतो. तो “प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान” यांचा दाता आहे. (याकोब १:१७) प्रेषित योहानाने आपल्या सह-उपासकांना अशी हमी दिली: “आपण जे काही मागतो ते [देवापासून] आपल्याला मिळते, कारण आपण त्याच्या आज्ञा पाळतो व त्याला जे आवडते ते करितो.”—१ योहान ३:२२.

दुष्टात्म्यांबद्दल काय?

बायबलमध्ये दुष्टात्मे अस्तित्वात आहेत असे म्हटले आहे आणि जादूटोणा करणारे पुष्कळसे लोकही याला सहमत आहेत. एका निबंधात जादूटोण्याला प्रोत्साहन देणाऱ्‍या एका व्यक्‍तीने म्हटले: “भूतं आहेत; त्यांचंही आपल्यासारखंच एक विश्‍व आहे जे अदृश्‍य आहे. . . . ‘दुष्ट आत्मा’, ‘सैतान’ ही नावं उचित आहेत. हे आत्मे फार शक्‍तिशाली असतात. . . . त्यांच्यातले सर्वात बुद्धिमान आत्मे तर आपल्या विश्‍वातही प्रवेश करू शकतात (अर्थात, तसे करण्यासाठी कोणी त्यांना साहाय्य करू शकले तर). . . . ते आपल्या शरीरात प्रवेश करू शकतात . . . आणि आपल्याला वशसुद्धा करू शकतात. होय, जुन्या कथांमध्ये जसं भुतानं पछाडल्याचं सांगितलं जातं तसंच हे आहे.”

बायबलच्या काळात, भुताने पछाडल्यामुळे लोकांना अनेक प्रकारे त्रास व्हायचा. त्यांच्यापैकी काहीजण मुके झाले होते तर काहीजण आंधळे, काहीजण वेडे तर काहींना असाधारण शक्‍ती प्राप्त झाली होती. (मत्तय ९:३२; १२:२२; १७:१५, १८; मार्क ५:२-५; लूक ८:२९; ९:४२; ११:१४; प्रेषितांची कृत्ये १९:१६) काहीवेळा, अनेक भुतांनी पछाडलेल्या व्यक्‍तीला अतिशय यातना होत असत. (लूक ८:२, ३०) म्हणूनच, आपण जादूटोणा आणि इतर गूढ शक्‍तींशी संबंधित असलेल्या रीतीरिवाजांपासून दूर राहावे असा इशारा ज्याअर्थी यहोवा आपल्याला देतो त्याअर्थी ते योग्यच असावे.

सत्यावर आधारित धर्म

अनेकजण आज जादूटोणा करू लागले आहेत कारण त्यांना वाटते की हा अनपायकारक, फायदेशीर आणि निसर्गाची उपासना करणारा धर्म आहे. काही समाजांमध्येही जादूटोण्याला मान्यता मिळाली आहे. लोकांना त्याच्याबद्दल काहीच भीती वाटत नाही. ती सर्वसाधारण गोष्ट बनली आहे. धार्मिक सहिष्णुतेच्या वातावरणात जेथे बऱ्‍याच विचित्र गोष्टींचा स्वीकार केला जातो तेथे जादूटोण्याला सन्मानाचे स्थान लाभले आहे.

आजकाल, विविध धर्म जणू बाजारात जाऊन बूट खरेदी करण्यासारखेच झाले आहेत कारण प्रत्येकाला आपल्या गरजांनुसार धर्म निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. पण येशूने फक्‍त दोनच पर्यायांचा उल्लेख केला. तो म्हणाला: “अरुंद दरवाजाने आत जा; कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत; परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकोचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत.” (मत्तय ७:१३, १४) साहजिकच, आपण कोणता मार्ग निवडावा हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. परंतु, याच निवडीवर आपले अनंतकाळचे भविष्य अवलंबून असल्यामुळे आपली ही निवड अत्यंत महत्त्वाची आहे. आध्यात्मिक ज्ञानप्राप्ती मिळवण्याकरता आपण सत्याचा मार्ग धरला पाहिजे म्हणजेच केवळ देवाच्या वचनामध्ये अर्थात बायबलमध्ये दिलेला मार्ग अवलंबला पाहिजे.

[तळटीपा]

^ परि. 12 gbr-MR १३-४, पृष्ठ २८ वरील “जादूटोणा करण्यात धोका आहे का?” हा लेख पाहा.

[५ पानांवरील चित्र]

जादूटोणा हा निसर्गाची उपासना करणारा एक अनपायकारक धर्म आहे अशी आज अनेकांची विचारधारा आहे

[६ पानांवरील चित्र]

आधीपासूनच जादूचा संबंध गूढ शक्‍तींशी लावण्यात आला आहे

[६ पानांवरील चित्र]

जादूटोणा करणारे नकळत सैतानाची इच्छा पूर्ण करत आहेत का?

[७ पानांवरील चित्रे]

बायबलमध्ये सत्याचा मार्ग प्रकट केला आहे