व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सुप्रसिद्ध आणि कुप्रसिद्ध यांचे रेखाचित्रण

सुप्रसिद्ध आणि कुप्रसिद्ध यांचे रेखाचित्रण

सुप्रसिद्ध आणि कुप्रसिद्ध यांचे रेखाचित्रण

ब्रिटनमधील सावध राहा! नियत कालिकाच्या लेखका द्वारे

तुम्ही कधी मानवी चेहऱ्‍याचे रेखाचित्र बनवण्याचा प्रयत्न केला आहे का? ते इतके सोपे नाही. पण समजा, पहिल्यांदाच आणि तेही केवळ काही मिनिटांसाठी पाहिलेल्या व्यक्‍तीचे चित्र तुम्हाला काढायचे आहे. आणि केवळ स्मरणशक्‍तीच्या साहाय्याने तो चेहरा रेखाटायचा आहे. शिवाय, रंगीत खडूने रेखाटलेले ते चित्र ३० मिनिटांच्या आत टीव्हीसमोर जाण्यास तयार असलेल्या एका गटाला सादर करायचे आहे!

हे काम आपल्याला एकदम अशक्य वाटेल. परंतु, ब्रिटनमध्ये काही पुरुष आणि स्त्रिया हे काम करण्यात तरबेज आहेत. ते कोण आहेत? कोर्ट कलाकार.

कायदेशीर बंधने

कोर्ट खटले जनतेकरता उत्सुकता निर्माण करणारे असतात आणि पुष्कळ देशांमध्ये असे खटले सहसा टीव्हीवर दाखवले जातात किंवा त्यांची चित्रे प्रदर्शित केली जातात. परंतु, ब्रिटनमध्ये हे वेगळ्या पद्धतीने केले जाते. लोकांना “कोर्टात कोणत्याही व्यक्‍तीचे चित्र किंवा रेखाचित्र काढण्याचा प्रयत्न करण्याची” सक्‍त मनाई आहे; न्यायाधीश, न्याय देणारी मंडळी किंवा साक्षीदार त्याचप्रमाणे प्रतिवादी किंवा कैदी यांचेही चित्र काढण्याची मनाई आहे. * कोर्ट कलाकारांचे कौशल्य येथेच महत्त्वाचे ठरते; कोर्टात चाललेल्या घटना प्रसारमाध्यमाकरता नोंदण्याचे ते काम करतात.

या चित्तवेधक कार्याविषयी अधिक जाणून घेण्याकरता, मी लंडनमध्ये भरवलेल्या कलाकृतीच्या एका प्रदर्शनाला गेलो. त्या प्रदर्शनात एका ठिकाणी जेथे पुष्कळ लोक जात होते तेथे मीही गेलो तेव्हा या विशेष कलाकारांमधील एका स्त्री कलाकाराशी माझी गाठ पडली; तिचे नाव होते बेथ. “कोर्टात प्रतिवाद्याला न्याहाळायला तुम्हाला किती वेळ मिळतो?” हा माझा पहिला प्रश्‍न होता.

वेळ आणि उद्देश

“आरोपीच्या पिंजऱ्‍यात एखादा कैदी पहिल्या सुनावणीच्या वेळी उभा असतो तेव्हा तो सुमारे दोन मिनिटांसाठी तेथे उभा असतो; पण हा वेळ पुरेसा असतो,” असे बेथ म्हणाली. “त्याच्या डोक्याचे वैशिष्ट्य आणि केशरचना त्याचप्रमाणे नाकाची, डोळ्यांची, ओठांची आणि तोंडाची घडण कशी आहे ते न्याहाळायला मला वेळ मिळतो. याशिवाय, त्याचा चेहरा किती रुंद आहे, कपाळ किती पसरट आहे, कान किती मोठे आहेत आणि त्याला दाढी किंवा चष्मा आहे का, या सर्व गोष्टींचीही मला मनात नोंद करावी लागते. हे सगळे पाहिल्यावरच अचूक चित्र रेखाटायला माझ्याजवळ मूलभूत गोष्टींची माहिती असते.

“पण काही वेळा, माझे काम अधिक कठीण असते. जसे की, अलीकडच्याच एका खटल्यात, एका पिंजऱ्‍यात १२ पुरुष उभे होते. ते सगळे सुमारे १५ मिनिटांसाठी उभे होते हे खरे आहे पण एकाच चित्रात १२ चेहरे काढण्यासाठी फार बारकाईने निरीक्षण करावे लागते. पाहिलेल्या गोष्टी लक्षात ठेवण्याची माझी स्मरणशक्‍ती फार उत्तम असली तरी मला ही स्मरणशक्‍ती हळूहळू वाढवावी लागली. कोर्टातून बाहेर पडल्यावर मी डोळे बंद केले तर सगळे चेहरे जसेच्या तसे मला स्पष्ट आठवावे लागतात.”

“कोर्टात भेटणाऱ्‍या लोकांविषयी माहिती काढण्यासाठी तुला किती वेळ खर्च करावा लागतो?” असा मी पुढचा प्रश्‍न विचारला. बेथचे उत्तर ऐकून मला आश्‍चर्य वाटले.

“मी पत्रकारासारखी काहीच माहिती काढत नाही. मी कोर्टात येते तेव्हा माझ्या मनात कसल्याही कल्पना नसतात आणि माझ्या कार्यात कशाचाही व्यत्यय पडू नये असे मनाशी ठरवूनच मी येत असते. कोर्टात घडणाऱ्‍या घटनांची नोंद करण्याचा मी प्रयत्न करते ज्यात दररोज वेगवेगळ्या चेहऱ्‍याचे हावभाव दिसून येतात. मला हे लक्षात ठेवावे लागते की, न्याय देणारी मंडळी एकतर टीव्हीवर किंवा राष्ट्रीय वृत्तपत्रात माझी चित्रे पाहू शकतात व त्यांनी माझी चित्रे पाहून, ‘हा आरोपी किती दोषी दिसतोय!’ असे म्हणण्यास प्रवृत्त व्हावे अशी माझी इच्छा नाही. या महत्त्वाच्या बाबतीत, कोर्टातली कला ही हुबेहूब चित्र काढण्याच्या कलेपेक्षा वेगळी आहे.”

“तो क्षण”

बेथच्या यशामागे काय रहस्य आहे असे मी विचारल्यावर ती म्हणाली: “मी एका विशिष्ट क्षणाची वाट पाहते—मी त्याला ‘तो क्षण’ म्हणते—ज्यामध्ये कोर्ट चालू असतानाचे वातावरण कैद करता येते. जसे की, एका आरोपीने आपल्या हातांनी आपले डोके धरले तेव्हा त्याच्या या हावभावाने कोर्टाची सुनावणी त्याच्याविरुद्ध होत असल्याचे उत्तमरित्या दर्शवले. दुसऱ्‍या एका प्रसंगी, ‘तुम्ही एक चांगली माता आहात का?’ या प्रश्‍नाला एका स्त्रीने दिलेल्या उत्तरापेक्षा तिच्या चेहऱ्‍यावरील अविर्भावाने उत्तम उत्तर दिले. त्याचप्रमाणे, अश्रूचा एक थेंब रुमालाने पुसण्याचे चित्र गहिऱ्‍या भावना प्रकट करू शकते.

“कोर्ट कलाकाराला कोर्टाचे उचित चित्रणही करावे लागते अर्थात त्याला न्यायाधीश, वकील, कोर्टाचे अधिकारी त्याचप्रमाणे पुस्तके, प्रकाशयोजना आणि सामानसुमान यांचे चित्र काढावे लागते. असे पूर्ण चित्र बहुतेक लोकांना प्रत्यक्षात पाहायला मिळणार नाही म्हणून त्यांना ते पाहण्याची उत्सुकता असते. माझी चित्रे मी कोठे काढते? काही वेळा कोर्टात पत्रकारांसाठी असलेल्या खोलीत मी ती काढते पण बहुतेक वेळा मी एखाद्या निवांत ठिकाणी पायऱ्‍यांवर बसून ती काढत असते. पण, नवीन साक्षीदार बोलावला जातो किंवा प्रतिवाद्याचा वकील जेव्हा कोर्टात बोलू लागतो तेव्हा त्यांचे चेहरे पाहायला मला घाईघाईने पुन्हा कोर्टात जावे लागते.” स्मितहास्य करीत बेथ म्हणाली: “माझी पुष्कळ चित्रे वकीलांच्या कार्यालयांमध्ये अडकवलेली आहेत.”

प्रदर्शनातील तिची चित्रे मी कौतुकाने पाहिली. ती पाहून, अलीकडील वर्षांमध्ये, प्रसिद्ध आणि कुप्रसिद्ध लोकांच्या ज्या खटल्यांविषयी मी वाचले होते ते माझ्या डोळ्यांसमोर हुबेहूब उभे राहिले. दहा मिनिटांनंतर मी जायला निघालो तेव्हा बेथने मला एक चित्र दिले. ते चक्क माझेच चित्र होते! (g०३ ४/८)

[तळटीप]

^ हे स्कॉटलंडमध्ये लागू होत नाही.

[२४, २५ पानांवरील चित्रे]

कोर्टाचे एक चित्र आणि वृत्तपत्रात छापलेले ते चित्र (डावीकडे)

[चित्राचे श्रेय]

© The Guardian