व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

एका अपघाताने माझे जीवन बदलले

एका अपघाताने माझे जीवन बदलले

एका अपघाताने माझे जीवन बदलले

स्टॅनली ओम्बेवा यांच्याद्वारा कथित

१९८२ साली जलद गतीने जाणाऱ्‍या एका वाहनाने मला धडक दिली. माझ्यावर उपचार करण्यात आले; परंतु, माझी मान आणि माझी छाती यांच्यामध्ये स्लीप डीस्क झाल्यामुळे मला अधूनमधून खूप दुखायचे तरीसुद्धा मी माझी दररोजची कामे चालूच ठेवली. पण, १५ वर्षांनंतर, माझ्यासमोर सर्वात मोठी विश्‍वासाची परीक्षा आली.

अपघातापूर्वी आणि अपघातानंतरही काहीप्रमाणात मी अगदी उत्साही होतो. मला व्यायामाची चांगली सवय होती; शनिवार-रविवारी मी १० ते १३ किलोमीटर धावायचो, स्क्वॉश खेळायचो आणि कष्टाचे काम करायचो. यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहांच्या बांधकामात आणि आम्ही जिथे राहतो त्या केनियातील नैरोबीत एका मोठ्या संमेलन गृहाच्या बांधकामात देखील मी मदत केली.

मग, १९९७ साली, माझ्या छातीत नेहमी आणि खूपच दुखू लागले. वैद्यकीय तपासणीत दिसून आले, की अंतराकशेरूक बिंब सरकून माझ्या मेरुरज्जुला दाबत होते. सुरवातीला मी उल्लेख केल्याप्रमाणे हे माझ्या अपघातामुळे झाले होते.

माझी तब्येत खराब होण्यापूर्वी मला सेल्समन म्हणून नोकरी मिळाली होती. यामुळे मला, कौटुंबिक आरोग्य विम्याची सवलत मिळाली. व्यापारी जगातील माझे भविष्य उज्जवल दिसत होते. पण, १९९८ सालच्या मध्यात, माझ्या छातीपासून पायांपर्यंतचा भाग पूर्णपणे बधीर झाला. माझी तब्येत हळूहळू खालावत गेली.

काही दिवसानंतर माझी नोकरीसुद्धा गेली; नोकरीमुळे मला ज्या सवलती मिळाल्या होत्या त्याही गेल्या. आमच्या दोन मुली, सिल्वीया आणि विलहेलमिना तेव्हा १३ आणि १० वर्षांच्या होत्या. माझी नोकरी गेल्यामुळे माझी पत्नी जॉईस जे कमवून आणायची त्यातच आम्हाला भागवावे लागायचे. आमच्यासमोर आलेल्या या नवीन परिस्थितीमुळे आम्ही अनावश्‍यक गोष्टींवर पैसा खर्च करण्याचे थांबवले. आम्ही कसेबसे आमच्या मूलभूत गरजा भागवत होतो.

नकारात्मक भावना

मला कबूल केले पाहिजे, की माझी तब्येत जसजशी खालावत गेली तसतशा माझ्या मनात नकारात्मक, स्वार्थी भावना येऊ लागल्या, मी चिडचिडा होऊ लागलो. कधीकधी, मला खूप संताप यायचा, लहानसहान गोष्टींवरून माझे डोके फिरायचे. मी नैराश्‍यच्या खाईच्या अगदी जवळ आलो होतो. घरातील सर्वांनाच माझ्या वागण्याचा त्रास सहन करावा लागला. माझ्या बायकोसमोर आणि मुलींसमोर अशी एक परिस्थिती आली होती जिच्याविषयी त्यांना कसलीच माहिती नव्हती.

मला वाटायचे, की माझ्या मनात येणाऱ्‍या भावना बरोबरच आहेत. माझे वजन झपाट्याने वाढले. माझ्या पचनाच्या व लघवीच्या समस्या गंभीर झाल्या. पुष्कळदा मला स्वतःची खूप लाज वाटायची. कितींदा तरी मी एखाद्या कोपऱ्‍यात जाऊन रडायचो. कधीकधी तर रागाच्या भरात केलेल्या माझ्या कृती हास्यास्पद वाटायच्या. मी माझी परिस्थिती व्यवस्थितरीत्या हाताळत नाही, हे मला समजत होते.

यहोवाच्या साक्षीदारांच्या ख्रिस्ती मंडळीत वडील या नात्याने मी सहख्रिश्‍चनांना, आपल्यावर येणाऱ्‍या कोणत्याही संकटाबद्दल आपण यहोवाला जबाबदार धरू नये असा कित्येकदा सल्ला दिला होता. तरीपण, आता मीच एकदा नव्हे अनेकदा म्हणायचो—‘यहोवानं माझ्यावर हे सर्व का येऊ दिलं?’ इतरांचे मनोबल वाढवण्यासाठी व त्यांना उत्तेजन देण्यासाठी मी १ करिंथकर १०:१३ सारख्या वचनांचा उपयोग केला होता पण आता मला असे वाटू लागले होते, की मी जे काही सहन करतोय ते माझ्या सहनशक्‍तीच्या पलीकड आहे!

वैद्यकीय आव्हान

उत्तम वैद्यकीय उपचार मिळणे जरा कठीणच होते. एकाच दिवशी मी, फिजियोथेरपीस्ट, कायरोप्रॅक्टर आणि ॲक्यूपंक्चरीस्टकडे जायचो. मला मिळणारा आराम (आणि तो ही मिळालाच तर) तात्पुरता असायचा. मी अनेक डॉक्टरांचे सल्ले घेतले, एका ऑर्थोपेडीक सर्जनला आणि न्युरोसर्जनलाही जाऊन भेटलो. सर्वांनी मला एकच गोष्ट सांगितली: दुखणे कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागेल आणि स्लीप्ड डिस्क काढावी लागेल. माझ्या बायबल आधारित विश्‍वासांमुळे मी या वैद्यकीय तज्ज्ञांना स्पष्टपणे सांगितले, की कोणत्याही परिस्थितीत मला रक्‍त दिले जाऊ नये.—प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९.

पहिल्या सर्जनने म्हटले, की माझ्या पाठीवर छेद करून तो शस्त्रक्रिया करेल. ही पद्धत जरा जिकरीची होती, असे मला समजावून सांगण्यात आले. तरीपण, शस्त्रक्रियेच्या वेळी रक्‍त मुळीच लागणार नाही याची शाश्‍वती हे सर्जन देऊ शकत नव्हते. मी पुन्हा त्यांच्याकडे गेलो नाही.

दुसऱ्‍या सर्जनने मला सांगितले, की माझ्या मानेच्या बाजूकडून ते माझ्या मेरुरज्जावर शस्त्रक्रिया करतील. ही पद्धत ऐकूनच माझा थरकाप उडाला. मी रक्‍त घेणार नाही, याबद्दल त्यांनी कसलाही विरोध केला नाही, पण ते म्हणू लागले, की मी होता होईल तितक्या लवकर शस्त्रक्रियेस तयार व्हावे आणि त्यांनी मला त्यासंबंधाने खूप कमी माहिती दिली. पण मी त्यांच्याकडेही पुन्हा गेलो नाही.

मग, आमच्या स्थानीय इस्पितळ सहकार्य समितीत कार्य करणाऱ्‍या यहोवाच्या साक्षीदारांच्या साहाय्याने मला एक चांगले डॉक्टर भेटले जे आम्हाला सहकार्य द्यायला तयार होते. या तिसऱ्‍या डॉक्टरांनी मला, दुसऱ्‍या डॉक्टरांनी सांगितलेल्या पद्धतीविषयी म्हणजे मानेजवळ छेद करून शस्त्रक्रिया करण्याविषयी सांगितले. ते म्हणाले, की यात कमी धोके असतील.

ही शस्त्रक्रिया कशी केली जाईल त्याचे त्यांनी मला सविस्तर वर्णन करून सांगितले तेव्हा मी खूप घाबरलो. अशाप्रकारची शस्त्रक्रिया, हृदय आणि फुफ्फुस यांसारख्या नाजूक अंगांजवळ केली जाईल या विचारानेच खरे तर मी जास्त घाबरलो होतो. शस्त्रक्रियेतून मी जिवंत बचावेन का? अशा नकारात्मक विचारांनी माझी भीती अधिकच वाढली.

नोव्हेंबर २५, १९९८ रोजी, नैरोबीतील एका इस्पितळात माझ्यावर यशस्वीपणे चार तासांची शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेत माझ्या ओटीच्या हाडाचा एक तुकडा बाहेर काढण्यात आला. आणि मग, त्याला आकार देऊन धातूची एक तबकडी आणि स्क्रू यांनी तो तुकडा मला त्रास होणाऱ्‍या ठिकाणी जोडण्यात आला. यामुळे मला थोडेसे बरे वाटले. पण माझ्या सर्वच समस्या सुटल्या नाहीत. मला चालताना खूपच त्रास व्हायचा. अजूनही मला बधीरपणा जाणवतो.

सकारात्मक मनोवृत्ती

पूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे, मी माझ्या दयनीय अवस्थेवर पुष्कळ चिंता आणि विचार करायचो. पण, आश्‍चर्य म्हणजे, पुष्कळ वैद्यकीय कर्मचारी माझ्या शांत स्वभावाबद्दल आणि आशावादी मनोवृत्तीबद्दल माझी स्तुती करायचे. त्यांना माझ्याबद्दल असे का वाटले होते? कारण, मला इतके दुखत असूनही मी त्यांना देवावर माझा किती विश्‍वास आहे हे सांगत राहायचो.

माझ्यावर गुदरणाऱ्‍या परिस्थितीमुळे मला कधीकधी राग यायचा, मनात कटू भावना यायच्या तरीपण मी यहोवावर माझा भरवसा ठेवला. त्याने मला माझ्या सर्वात कठीण परिस्थितीतही इतके सांभाळले, की मला स्वतःची लाज वाटायची. मला सांत्वन मिळेल अशी वचने वाचून त्यावर मनन करण्याचा मी निश्‍चयच केला. यांपैकी काही वचने पुढीलप्रमाणे आहेत:

प्रकटीकरण २१:४: [देव] त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत.” अश्रू आणि दुख कायमचे नाहीसे होईल अशा नवीन जगाविषयी असलेल्या बायबलमधील वचनाने मला खरोखरच खूप सांत्वन दिले.

इब्री लोकांस ६:१०: “तुमचे कार्य . . . आणि तुम्ही देवावर दाखविलेली प्रीति, ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही.” शारीरिकरीत्या मी मर्यादित सेवा करू शकत असलो तरी, पूर्वी यहोवाच्या सेवेसाठी मी करत असलेल्या प्रयत्नांचे फळ तो मला जरूर देईल, हे मला माहीत होते.

याकोब १:१३: “कोणाची परीक्षा होत असता, देवाने मला मोहांत घातले, असे त्याने म्हणू नये; कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहांत पाडीत नाही.” किती खरे आहेत हे शब्द! यहोवाने माझ्यावर या गोष्टी येऊ दिल्या आहेत, पण तो माझ्या त्रासाला मुळीच जबाबदार नाही.

फिलिप्पैकर ४:६, ७: “कशाविषयीहि चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा; म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांति तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.” प्रार्थनेने, मला ज्याची अत्यंत गरज होती ती मानसिक शांती दिली, सुज्ञपणे माझी परिस्थिती हाताळण्यास मला मदत केली.

संकटात असलेल्या इतरांना उत्तेजन देण्याकरता मी या वचनांचा उपयोग केला होता—आणि त्यांना खरोखरच यांच्याद्वारे सांत्वन मिळाले होते! परंतु, माझ्यावर ही परिस्थिती आली नव्हती तोपर्यंत मला या वचनांची किंमत पूर्णपणे समजली नव्हती! या अवस्थेत आल्यावरच मी नम्रता शिकलो होतो, यहोवावर पूर्ण भरवसा ठेवायला शिकलो होतो.

सांत्वनाचे इतर स्रोत

ख्रिस्ती बंधूवर्ग हा संकट समयी एखाद्या स्तंभासारखा व पायासारखा असतो, असे पुष्कळ जण म्हणतात. तरीपण, आपल्या ख्रिस्ती बंधूभगिनींना क्षुल्लक समजणे किती सोपे आहे! आपल्याला ते देत असलेली मदत ही मर्यादित असली तरीदेखील ते आपल्यासाठी नेहमी तयार असतात. माझ्याबाबतीत ही गोष्ट खरी ठरली. मी इस्पितळात होतो तेव्हा बंधूभगिनी नेहमी माझ्या बिछान्याशेजारी असायचे, कधीकधी तर ते अगदी पहाटेच यायचे. इतकेच नव्हे तर ते माझ्या औषधांचा खर्चही देण्यास तयार झाले. माझी अवस्था पाहून जे माझ्या मदतीला धावून आले त्या सर्वांचे मी अगदी मनापासून आभार मानतो.

आमच्या स्थानीय मंडळीत, साक्षीदारांना माहीत आहे की मी जास्त करू शकत नाही. सध्या मी मंडळीत अध्यक्षीय पर्यवेक्षक म्हणून सेवा करत आहे आणि खूप सहकार्य करणाऱ्‍या ख्रिस्ती वडिलांबरोबर मी काम करतो. मी प्रचार कार्यात केव्हाच अनियमीत झालो नाही. मी जेव्हा खूपच त्रासात होतो तेव्हा देखील, दोन जणांना यहोवाला आपले जीवन समर्पित करण्यास मदत केली. त्यांपैकी एक सध्या नैरोबीतील एका यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळीत सेवा सेवक म्हणून कार्य करीत आहे.

माझ्या सर्व दुखण्यात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या माझ्या पत्नीचे आभार मानण्यासाठी माझ्याजवळ शब्द अपुरे आहेत. माझा राग, माझा बदलता स्वभाव, माझा अविचारीपणा, माझी निराशा, हे सर्वकाही तिने मुकाट्याने सहन केले. मी जेव्हा रडायचो, मला खूप दुखायचे तेव्हा ती मला सांत्वन द्यायची, मला धीर द्यायची. या बिकट परिस्थितीतही तिचे बळ आणि सावरण्याची शक्‍ती पाहून मला खूप आश्‍चर्य वाटते. ती खरोखरच एका मित्राप्रमाणे “सर्व प्रसंगी” माझ्याशेजारी उभी राहिली आहे.—नीतिसूत्रे १७:१७.

आमच्या मुली देखील परिस्थितीचा सामना करायला शिकल्या आहेत. त्यांच्या परीने त्या मला मदत करायचा प्रयत्न करतात. त्या माझ्या गरजा समजतात आणि मला मदत करायला लगेच धावून येतात—त्यांची आई नसते तेव्हा त्या माझी खूप चांगली काळजी घेतात. सिल्वीया जणू काय माझी “काठी” आहे; मला जेव्हा अशक्‍तपणा जाणवतो तेव्हा तीच मला घरात इकडे-तिकडे जायला मदत करते.

आणि माझी धाकटी मीना कशी आहे? मला आठवते, एकदा मी घरात पडलो तेव्हा मला उठता येत नव्हते. तीच तेवढी घरात होती. आपली सर्व शक्‍ती एकटवून तिने मला उचलले आणि हळूहळू मला माझ्या खोलीत नेले. हे तिने कसे केले होते, हे तिला अजूनही समजत नाही. तिचे हे एक धैर्याचे काम माझ्या मनात जणू कोरले गेले आहे.

अपघातामुळे माझ्यावर आलेली ही परिस्थिती माझ्या जीवनातील सर्वात कठीण संघर्ष आहे ज्याच्याविरुद्ध मला लढावे लागत आहे. मला आताही लढावे लागत आहे. माझ्या जीवनाची व माझ्या विश्‍वासाची ही सर्वात मोठी परीक्षा आहे. नम्रतेविषयी, विचारशील असण्याविषयी आणि सहानुभूतीविषयी मी पुष्कळ काही शिकलो आहे. यहोवावरील माझ्या पूर्ण भरवशाने व विश्‍वासाने मला माझ्या समस्येशी यशस्वीरीत्या झुंजण्यास मदत केली आहे.

प्रेषित पौलाच्या पुढील शब्दांची सत्यता मला पटली आहे: “आमची संपत्ति मातीच्या भांड्यात आहे, अशा हेतूने की, सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमच्यापासून होत नाही.” (२ करिंथकर ४:७) “नवे आकाश व नवी पृथ्वी” याबद्दल देवाने दिलेल्या अभिवचनामुळे मला फार सांत्वन मिळाले आहे. (२ पेत्र ३:१३) त्या नवीन जगापर्यंत यहोवाने मला उचलून न्यावे अशी मी त्याच्या चरणी प्रार्थना करतो कारण मी अजूनही खूप अशक्‍त आहे आणि माझ्या बळावर मी काही करू शकत नाही. (g०३ ४/२२)

[२२ पानांवरील चित्रे]

माझ्या कुटुंबाबरोबर मी ख्रिस्ती कार्य करत असल्यामुळे मला खूप सहनशक्‍ती मिळाली आहे