व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मारहाण सहन करणाऱ्‍या स्त्रियांना साहाय्य

मारहाण सहन करणाऱ्‍या स्त्रियांना साहाय्य

मारहाण सहन करणाऱ्‍या स्त्रियांना साहाय्य

हिंसक वागणुकीला बळी पडणाऱ्‍या स्त्रियांना कशाप्रकारे साहाय्य केले जाऊ शकते? सर्वप्रथम, त्यांना काय सहन करावे लागते हे समजून घेणे गरजेचे आहे. मारहाण करणारे केवळ शारीरिक दुखापत करत नाहीत. ते सहसा धमक्या देतात, धाक दाखवतात आणि त्यामुळे अशा वागणुकीला तोंड देणाऱ्‍या व्यक्‍तीला आपण अगदी कवडीमोल असल्यासारखे आणि असहाय वाटते.

सुरवातीच्या लेखात जिची कहाणी आपण वाचली त्या रोक्सानाचेच उदाहरण घ्या. कधीकधी तिचा पती कोणत्या हत्याराऐवजी त्याच्या जिभेचा वापर करतो. “धड शाळा शिकली नाहीस, मी नसतो तर मुलांना घेऊन कुठे गेली असतीस? आळशी आहेस, काही कामाची नाहीस. मला सोडून जायच्या गोष्टी करतेस, तुला काय वाटते ते मुलांना तुझ्या ताब्यात देतील का?” असे अनेक टोमणे देऊन तो सतत तिला हिणवत असतो.

रोक्सानाचा पती पैशाचे सर्व व्यवहार आपल्या हातात ठेवून तिच्यावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतो. तो तिला कार वापरू देत नाही, आणि दिवसभर ती काय काय करते हे जाणून घेण्याकरता सतत फोन करत असतो. तिने कधी चुकून आपली आवड नावड सांगितली की तो रागाने जणू वेडा होतो. त्यामुळे, कधीही आपले विचार बोलून दाखवायचे नाहीत अशी रोक्सानाने खुणगाठच बांधली आहे.

वैवाहिक दुर्व्यवहाराचा विषय गुंतागुंतीचा आहे हे यावरून दिसते. या दुर्व्यवहाराला बळी पडलेल्या व्यक्‍तीला दिलासा देण्याकरता त्यांचे सहानुभूतीने ऐकून घ्या. अशा स्त्रीला आपल्याला काय सहन करावे लागते याविषयी बोलून दाखवणे फार कठीण जाते हे विसरू नका. ती आपल्या परीने आपल्या समस्येला तोंड देत असताना तुम्ही तिची हिंमत वाढवण्याच्या दिशेने प्रयत्न केला पाहिजे.

मारहाण सहन करणाऱ्‍या काही स्त्रियांना कदाचित अधिकाऱ्‍यांची मदत घ्यावी लागू शकते. कधीकधी परिस्थिती विकोपाला जाते तेव्हा पोलीस मध्ये पडल्यास मारहाण करणाऱ्‍या पुरुषाला आपली चूक किती गंभीर आहे हे लक्षात येते. अर्थात, त्याने बदलण्याचा कितीही निश्‍चय केला तरीसुद्धा परिस्थिती थोडी निवळताच पुन्हा येरे माझ्या मागल्या असे होते.

मारहाण सहन करणाऱ्‍या स्त्रीने तिच्या पतीला सोडून द्यावे का? वैवाहिक सोबत्यांनी विभक्‍त होणे बायबलमध्ये क्षुल्लक लेखलेले नाही. पण त्याच वेळेस, मारहाण करणाऱ्‍या पुरुषामुळे एखाद्या स्त्रीचे आरोग्य आणि तिचा जीव देखील धोक्यात असला तरीसुद्धा तिने त्याच्यासोबतच राहावे असेही ते सांगत नाही. ख्रिस्ती प्रेषित पौल याने लिहिले: “ती वेगळी झालीच तर तिने लग्न केल्यावाचून राहावे किंवा पतीबरोबर समेट करावा.” (तिरपे वळण आमचे.) (१ करिंथकर ७:१०-१६) टोकाच्या परिस्थितीत विभक्‍त होण्यास बायबलमध्ये मनाई केली नसल्यामुळे याबाबतीत प्रत्येक स्त्री वैयक्‍तिक निर्णय घेऊ शकते. (गलतीकर ६:५) कोणीही एका स्त्रीला तिच्या पतीला सोडून देण्याचा आग्रह करू नये आणि मारहाण होत असलेल्या स्त्रीचे आरोग्य, जीवन आणि आध्यात्मिक कल्याण धोक्यात असताना तिला त्या अत्याचारी पुरुषासोबतच राहण्यासाठी देखील कोणी भाग पाडण्याचा प्रयत्न करू नये.

मारहाण करणाऱ्‍यांसाठी कोणती आशा?

वैवाहिक सोबत्यावर अत्याचार करणे हे बायबलच्या तत्त्वांच्या धडधडीत विरोधात आहे. इफिसकर ४:२९, ३१ येथे आपण वाचतो: “तुमच्या मुखातून कसलेच कुजके भाषण न निघो, . . . सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा ही, अवघ्या दुष्टपणासह तुम्हापासून दूर करण्यात येवोत.”

ख्रिस्ताचा अनुयायी असण्याचा दावा करणारा कोणताही पुरुष आपल्या पत्नीशी दुर्व्यवहार करत असेल तर आपले तिच्यावर प्रेम आहे असे तो म्हणूच शकत नाही. तो जर आपल्या पत्नीशी नीट वागत नसेल, तर त्याच्या इतर सर्व चांगल्या कामांना काय अर्थ? “मारका” पुरुष ख्रिस्ती मंडळीतील विशेषाधिकार मिळवण्यास लायक समजला जात नाही. (१ तीमथ्य ३:३; १ करिंथकर १३:१-३) किंबहुना स्वतःला ख्रिस्ती म्हणवणारा पुरुष जर वारंवार रागाच्या भरात आपले नियंत्रण गमवत असेल आणि याविषयी पश्‍चात्तापी नसेल तर त्याला ख्रिस्ती मंडळीतून बहिष्कृत देखील केले जाऊ शकते.—गलतीकर ५:१९-२१; २ योहान ९, १०.

हिंसक प्रवृत्तीचे पुरुष आपली वागणूक बदलू शकतात का? काहींनी असे केले आहे. पण मारहाण करण्याची सवय असलेला जोपर्यंत (१) आपली वागणूक चुकीची आहे असे कबूल करत नाही, (२) आपली वागणूक बदलू इच्छित नाही, आणि (३) जोपर्यंत तो कोणाची मदत मागत नाही तोपर्यंत त्याच्यात बदल होणे शक्य नाही. यहोवाच्या साक्षीदारांना असे आढळले आहे की एका व्यक्‍तीला बदलण्यास प्रवृत्त करण्यासाठी बायबल अतिशय प्रभावशाली ठरू शकते. त्यांच्यासोबत अभ्यास करणाऱ्‍या बऱ्‍याच आस्थेवाईक जणांनी देवाला संतुष्ट करण्याची मनस्वी इच्छा उत्पन्‍न केली आहे. यहोवा देवाबद्दल शिकल्यावर या नवीन बायबल विद्यार्थ्यांना कळून येते की परमेश्‍वराला “आततायी माणसाचा वीट येतो.” (स्तोत्र ११:५) अर्थात, अशा व्यक्‍तीत बदल होणे, केवळ मारहाण करण्याचे सोडून देण्यापर्यंतच मर्यादित नाही. त्या व्यक्‍तीला आपल्या पत्नीकडे एका अगदीच वेगळ्या व नवीन दृष्टिकोनातून पाहण्यास शिकावे लागते.

एक पुरुष देवाचे ज्ञान आत्मसात करतो तेव्हा तो आपल्या पत्नीस नोकर म्हणून नव्हे तर “साहाय्यक” म्हणून पाहू लागतो आणि ती आपल्यापेक्षा खालच्या दर्जाची आहे असे न समजता तिला “मान” दिला पाहिजे हे ओळखतो. (उत्पत्ति २:१८; १ पेत्र ३:७) तो तिच्याशी सहानुभूतीने वागायला शिकतो आणि आपल्या पत्नीची मते ऐकून घेणे किती महत्त्वाचे आहे याची देखील त्याला जाणीव होते. (उत्पत्ति २१:१२; उपदेशक ४:१) यहोवाच्या साक्षीदारांच्या बायबल अभ्यास कार्यक्रमाद्वारे अनेक जोडप्यांना मदत झाली आहे. ख्रिस्ती कुटुंबात अधिकार गाजवणाऱ्‍या, जुलमी बेबंदशहाला थारा नाही.—इफिसकर ५:२५, २८, २९.

‘देवाचे वचन सजीव व सक्रिय आहे.’ (इब्री लोकांस ४:१२) त्यामुळे बायबलमधील ज्ञानाच्या साहाय्याने वैवाहिक सोबती आपल्या समस्या नीट समजून घेऊ शकतात आणि या समस्यांना तोंड देण्याचे धैर्य त्यांना प्राप्त होते. यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे, बायबलमध्ये एक असे जग पाहण्याची खात्रीशीर व सांत्वनदायक आशा मिळते जेथे हिंसा नसेल आणि यहोवाचा स्वर्गीय राजा आज्ञाधारक मानवजातीवर राज्य करेल. बायबल म्हणते: “धावा करणारा दरिद्री, दीन व अनाथ, ह्‍यांना तो सोडवील. जुलूम व जबरदस्ती ह्‍यांपासून त्यांचे जीव तो मुक्‍त करील; आणि त्याच्या दृष्टीने त्यांचे रक्‍त अमोल ठरेल.”—स्तोत्र ७२:१२, १४. (g०१ ११/८)

[१२ पानांवरील संक्षिप्त आशय]

ख्रिस्ती कुटुंबात अधिकार गाजवणाऱ्‍या, जुलमी बेबंदशहाला थारा नाही

[८ पानांवरील चौकट]

काही सामान्य गैरसमज

पती काही उगाच मारत नाहीत, यासाठी स्त्रिया स्वतःच जबाबदार असतात.

मारहाण करणारे बरेच पती आपल्या चुकांची जबाबदारी न स्वीकारता पत्नीच आपल्याला भडकवते असा दोष लावतात. कुटुंबाच्या ओळखीचे काही जवळचे लोक देखील असे समजू लागतात की बायकोचा स्वभाव चांगला नसल्यामुळेच अधूनमधून नवरा आपले नियंत्रण गमावून बसतो. पण हे एखाद्या बळी पडणाऱ्‍या व्यक्‍तीला दोष देऊन खऱ्‍या अपराध्याचा बचाव करण्यासारखे आहे. वास्तविकतः मारहाण सहन करणाऱ्‍या स्त्रिया सहसा आपल्या पतींची समजूत काढण्याचा, त्यांचा क्रोध शांत करण्याचा खूप प्रयत्न करतात. शिवाय, आपल्या सोबत्याला मारण्याकरता खरे पाहता कोणतीच सबब नाही. मारहाण करणाऱ्‍या पुरुषाची मानसशास्त्रीय गुणलक्षणे (इंग्रजी) या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे, “पत्नींना मारहाण करणाऱ्‍या ज्या पुरुषांना उपचारकेंद्रात पाठवण्याचा न्यायालयाकडून आदेश दिला जातो, ते असे पुरुष असतात ज्यांना हिंसाचाराची सवय झालेली असते. हे पुरुष पत्नीला मारणे म्हणजे राग आणि निराशा दूर करण्याचा, आपला हक्क सांगण्याचा, भांडणे मिटवण्याचा आणि तणाव दूर करण्याचा सोपा मार्ग समजतात. . . . आपले काहीतरी चुकत आहे किंवा ही समस्या खरोखरच गंभीर आहे हे देखील कबूल करण्यास ते सहसा तयार नसतात.”

प्यायल्यावर पुरुष स्त्रियांना मारतात.

काही पुरुष प्यायल्यावर अधिक हिंसक होतात हे कबूल आहे पण मादक पेयाचे निमित्त सांगणे खरोखर योग्य आहे का? घरात सुरू होणारा हिंसाचार (इंग्रजी) या पुस्तकात लेखिका जे. विल्सन म्हणतात: “नशेत मारहाण करणाऱ्‍याला, स्वतःच्या वागणुकीचा दोष दुसऱ्‍या कशावर तरी टाकण्याचे एक निमित्त सापडते.” त्या पुढे म्हणतात: “असे दिसते, की आपल्या समाजात दारूच्या नशेत बायकोला मारहाण करण्याची कल्पना पचवणे तितके कठीण जात नाही. मारहाण सहन करणारी स्त्री देखील आपल्या पतीला अत्याचार करणारा या दृष्टीने पाहण्याचे टाळून दारूडा या दृष्टीने पाहते.” अशा विचारसरणीमुळे, पत्नीच्या मनात एक खोटी आशा उत्पन्‍न होते, की “त्याने पिण्याची सवय सोडून दिली की मारहाणही आपोआपच थांबेल.”

या विषयावर संशोधन करणाऱ्‍यांपैकी बऱ्‍याच तज्ज्ञांचे सध्या असे मत बनू लागले आहे की दारूडेपणा आणि पत्नीला मारहाण करणे या दोन वेगवेगळ्या समस्या आहेत. कारण व्यसनी पुरुषांपैकी बहुतेक पुरुष आपल्या पत्नीला मारत नाहीत. स्त्रियांना मारणारे पुरुष या पुस्तकाचे लेखक असे सांगतात: “मारहाण करणाऱ्‍या पुरुषांचा आपल्या बायकोवर वर्चस्व मिळवण्याचा, तिला धास्तावण्याचा आणि खालच्या पायरीवर ठेवण्याचा उद्देश साध्य होतो म्हणूनच मारण्याचे दुष्टचक्र सुरूच राहते. . . . दारूडेपणा आणि मादक पदार्थांचे व्यसन, मारणाऱ्‍या पुरुषाच्या जीवनशैलीचे अभिन्‍न अंग बनलेले असतात हे खरे आहे. पण व्यसनामुळे तो हिंसाचार करतो असे मानणे चुकीचे ठरेल.”

पत्नीला मारहाण करणारे सर्वांसोबत हिंसक वृत्तीने वागतात.

वास्तविक पाहता, पत्नीला मारणारा पुरुष इतर सर्वांशी मात्र अतिशय गोड वागतो. तो एखाद्या बहुरुप्यासारखा असतो. त्यामुळे तो पत्नीला मारत असेल यावर त्याच्या मित्रमंडळीचा किंवा नातलगांचा विश्‍वासच बसत नाही. पण पत्नीवर वर्चस्व गाजवण्यासाठी त्याने तिला मारण्याचा क्रूर मार्ग निवडलेला असतो हेच सत्य आहे.

नवऱ्‍याने मारल्याचे स्त्रिया फार मनावर घेत नाहीत.

आपल्या परिस्थितीपासून कोणतीच पळवाट नसलेल्या असहाय स्त्रीची अवस्था न समजू शकणारे कदाचित असा विचार करत असावेत. तिला एक किंवा जास्तीत जास्त दोन आठवडे आश्रय देणारे जवळचे लोक असतीलही, पण त्यानंतर तिने काय करायचे? नोकरी शोधणे, घरभाडे, मुलांची जबाबदारी या सर्वांचा विचार करून साहजिकच ती हतबल होते. शिवाय, मुलांना घेऊन पळून जाणे हा काही ठिकाणी कायद्याने गुन्हा आहे. काही स्त्रियांनी पळून जाण्याचा प्रयत्न करून पाहिला. पण त्यांना फार काळ लपून राहता आले नाही, एकतर जबरदस्तीने किंवा गोड बोलून त्यांना पुन्हा घरी नेण्यात आले. हे सर्व न समजू शकणाऱ्‍यांचा असा चुकीचा ग्रह होतो की स्त्रिया पतीने मारल्याचे मनावर घेत नाहीत.