काळा मृत्यू मध्ययुगीन युरोपातील साथ

काळा मृत्यू मध्ययुगीन युरोपातील साथ

काळा मृत्यू मध्ययुगीन युरोपातील साथ

फ्रान्समधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

वर्ष १३४७. दूरच्या पौर्वात्य देशांमध्ये या साथीने आधीच धुमाकूळ घातला होता. आता ती युरोपच्या पूर्वेकडील सीमेकडे वाटचाल करत होती.

मंगोल सैन्याने काफा (जे सध्या क्रिमियातील फीओडोशिया या नावाने ओळखले जाते) येथील तटबंदी असलेल्या जेनोआच्या व्यापार क्षेत्राला घेरा घातला होता. पण, एका विलक्षण रोगाने पीडित झाल्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली. जाण्याआधी मात्र त्यांनी जेनोआ लोकांवर एक जीवघेणा हल्ला केला. त्यांनी, साथीमुळे नुकत्याच मेलेल्या लोकांचे देह मोठमोठ्या गलोल्यांच्या साहाय्याने शहराच्या तटावरून आत फेकले. त्यामुळे संपूर्ण जेनोआ शहर या रोगाने बाधीत झाले आणि तिथले रहिवाशी आपापल्या बोटींमध्ये बसून शहर सोडून जाऊ लागले. पण, याचा परिणाम असा झाला की ज्या ज्या बंदरांवर ते गेले त्या त्या ठिकाणी ते ही साथ आपल्यासोबत घेऊन गेले.

काही महिन्यांच्या अवधीतच सबंध युरोप मृत्यूच्या घेऱ्‍यात अडकले. बघता बघता उत्तर आफ्रिका, इटली, स्पेन, इंग्लंड, फ्रान्स, ऑस्ट्रिया, हंगेरी, स्वित्झर्लंड, जर्मनी, स्कॅन्डिनेव्हिया आणि बाल्टिक राष्ट्रांमध्ये देखील ही साथ पसरली. अडीच वर्षांच्या आत युरोपातील एक चतुर्थांश लोक या साथीचे बळी ठरले; “मानवजातीने आजवर अनुभवलेली महाभयंकर पीडा” अर्थात काळा मृत्यू या नावाने ही साथ महशूर झाली. *

अरिष्टाची सुरवात

काळा मृत्यू म्हणजे केवळ रोगाची एक महाभयंकर साथ नव्हती; तर या साथीला भीषण स्वरूप देणारी अनेक कारणे होती; एक कारण होते धार्मिक खळबळ. परगेटरीची शिकवण याचे एक उदाहरण आहे. फ्रेंच इतिहासकार झॉक ल गॉफ म्हणतात की, “१३ व्या शतकाच्या शेवटी परगेटरीची शिकवण सगळीकडे पसरली होती.” १४ व्या शतकाच्या सुरवातीला, डान्टे यांनी द डिव्हाईन कॉमेडी नावाचा ग्रंथ लिहिला; त्यात नरक आणि परगेटरी यांचे हुबेहूब वर्णन केले होते आणि बऱ्‍याच लोकांच्या विचारांवर याचा प्रभाव पडला. अशाने निर्माण झालेल्या धार्मिक वातावरणामुळे लोकांमध्ये उदासीनता निर्माण झाली आणि त्यांनी साथीपुढे अक्षरशः हात टेकले. देवाकडून ही शिक्षा आहे असे ते मानू लागले. पण या नकारात्मक वृत्तीमुळे साथीचा फैलाव अधिकच वाढला. ते कसे याविषयी आपण पुढे पाहणारच आहोत. “यामुळे प्लेगच्या प्रसाराला अधिकच हातभार लागला,” असे फिलिप्प झिग्लर यांच्या काळा मृत्यू (इंग्रजी) या पुस्तकात म्हटले आहे.

या भरीत भर म्हणून युरोपमधील पीकांच्या उत्पन्‍नात एकसारखी घट होत गेली. परिणामस्वरूप, युरोपातली वाढती लोकसंख्या कुपोषणाला बळी पडू लागली; कुपोषणामुळे दुर्बल, अशक्‍त झालेल्या लोकांमध्ये साथीचा प्रतिकार करण्याची कुवतच राहिली नव्हती.

साथीचा प्रसार

पोप क्लेमेंट सहावे यांचे खासगी डॉक्टर, गी द शोल्यॅक यांच्या मते, युरोपमध्ये साथीचे दोन प्रकार होते: फुफ्फुसदाहक आणि गाठीचा प्लेग. त्यांनी या विकृतींचे असे वर्णन केले: “पहिल्या प्रकारचा प्लेग दोन महिने टिकला; रोग्याला सतत ताप आणि रक्‍तमिश्रित थुंकी येत होती आणि तीन दिवसांच्या आत रोगी दगावत होता. नंतरच्या काळात लोक दुसऱ्‍या प्रकारच्या प्लेगने ग्रस्त होते; यातही रोग्याला सतत ताप यायचा, पण त्याच्या शरीरावर खासकरून काखेत आणि जांघेत वेदनामय गाठी येत. याने पाच दिवसांमध्ये रोगी दगावत असे.” प्लेगला आळा घालण्याच्या डॉक्टरांच्या सर्व प्रयत्नांवर पाणी पडले.

पुष्कळ लोक, आपले सगळेकाही सोडून इतकेच काय तर रोगाने बाधीत झालेल्या हजारोजणांना तसेच सोडून तेथून पळून गेले. श्रीमंत उमराव आणि व्यापारी हे पळून जाणाऱ्‍यांमध्ये सर्वात पहिले होते. यात काही ख्रिस्ती पाळकांचासुद्धा समावेश होता; पुष्कळसे धार्मिक पुढारी संसर्ग होऊ नये म्हणून आपापल्या मठांमध्ये लपून बसले.

अशाच गोंधळाच्या वातावरणात पोपने १३५० हे साल पवित्र वर्ष असल्याचे घोषित केले. रोमला भेट देणाऱ्‍या यात्रेकरूंना परगेटरीतून न जाताच स्वर्गात थेट प्रवेश मिळेल असे सांगण्यात आले. हजारो यात्रेकरू मग रोमला जाऊ लागले—याद्वारे नकळत त्यांनी प्लेगचाही प्रसार केला.

निष्फळ प्रयत्न

काळ्या मृत्यूला आळा घालण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरले, कारण रोगाचा संसर्ग नेमका कसा होतो हेच कोणाला कळत नव्हते. परंतु पुष्कळांना कळाले की, रोग्याशी किंवा त्याच्या कपड्यांशी देखील संपर्क येणे घातक आहे. काहींना तर रोग्यांनी त्यांच्याकडे नुसते पाहिले तरी भीती वाटायची! ईटलीतल्या फ्लोरेन्स येथील रहिवाशांनी प्लेगचे खापर त्यांच्या कुत्र्या-मांजरांवर फोडले. ते या प्राण्यांची कत्तल करू लागले; पण, या प्राण्यांना ठार मारून त्यांनी उलट प्लेगच्या प्रसाराचे मुख्य कारण असलेल्या उंदरांसाठी मार्ग मोकळा केला.

पटापट लोक मरू लागले तेव्हा लोकांनी देवाचा धावा केला. देव रोगापासून आपला बचाव करील, नाहीतर मेल्यावर निदान स्वर्गात तरी जागा देईल असे समजून लोकांनी आपले होते नव्हते ते सगळे चर्चला दान केले. बघता बघता चर्चकडे अमाप संपत्ती जमली. तावीज, ख्रिस्ताच्या मूर्ती इत्यादी वस्तू जवळ बाळगल्यामुळे रोग बरा होईल असे लोक मानू लागले. इतरजण अंधविश्‍वास, जादूटोणा आणि बोगस औषधोपचाराकडे वळाले. अत्तर, विनेगर आणि विशिष्ट औषधांमुळे रोगाचा संसर्ग होत नाही अशी लोकांची समजूत झाली. रक्‍त वाहू देणे हा आणखी एक लोकप्रिय उपचार होता. पॅरिस विद्यापीठातील सुशिक्षित वैद्यकीय सूत्रांनी तर ग्रहांच्या विशिष्ट स्थितीमुळे प्लेगची साथ आली असे स्पष्टीकरण दिले! तथापि, अशा या खोट्या स्पष्टीकरणांनी आणि “उपचारांनी” जीवघेणा प्लेग आटोक्यात आला नाही.

कायमचे परिणाम

शेवटी, पाच वर्षांनंतर हा काळा मृत्यू संपुष्टात आला. पण, त्या शतकात ती साथ आणखी चार वेळा तरी पुन्हा येणार होती. काळ्या मृत्यूच्या परिणामांची तुलना पहिल्या महायुद्धाच्या परिणामांशी करण्यात आली आहे. “सर्व आधुनिक इतिहासकारांचे यास सहमत आहे की, विशिष्ट भागांमधील या साथीमुळे १३४८ नंतर आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या दूरगामी परिणाम घडले,” असे इंग्लंडमधील काळा मृत्यू (इंग्रजी) १९९६ चे पुस्तक म्हणते. प्लेगच्या साथीत अर्धी अधिक लोकसंख्या खलास झाली; काही ठिकाणांहून तर प्लेगच्या दुष्परिणामांतून संपूर्णतः सावरायला कित्येक शतके उलटली. कामगार वर्गाची संख्या घटल्याने साहजिकच मजुरीचे मोल वाढले. एके काळी श्रीमंत असलेले जमीनदार अक्षरशः रस्त्यावर आले; मध्ययुगातली प्रसिद्ध सरंजामशाही व्यवस्था एकदम कोसळली.

अशारितीने, प्लेगच्या साथीने राजकीय, धार्मिक आणि सामाजिक बदल घडवून आणले. प्लेगची साथ येण्याआधी इंग्लंडच्या सुशिक्षित लोकांमध्ये फ्रेंच भाषेचा सर्रास वापर होत असे. परंतु, असंख्य फ्रेंच शिक्षकांचा मृत्यू झाल्यामुळे ब्रिटनमध्ये फ्रेंच भाषेऐवजी इंग्रजी भाषेचे वर्चस्व आले. धार्मिक क्षेत्रातही बरेच परिवर्तन झाले. फ्रेंच इतिहासकार झॉकलीन ब्रॉसॉले यांच्या मते, पाळक वर्गासाठी उमेदवाराची कमतरता भासत असल्यामुळे “चर्चने अज्ञानी व धार्मिक गोष्टींबद्दल काहीच रस नसलेल्या लोकांची भरती करायला सुरवात केली.” ब्रॉसॉले असे म्हणतात की, “[चर्चच्या] शिक्षण केंद्रांची आणि विश्‍वासाची अवनती धर्मसुधारणेच्या चळवळीला प्रेरक ठरली.”

काळ्या मृत्यूचा परिणाम कला क्षेत्रावरही झाला; त्यामुळे जवळजवळ सगळ्या कलाप्रकारांतून मृत्यू हा विषय सादर केला जाऊ लागला. दॉन्स मॅकॅब्र (मृत्यूचे नृत्य) हा कलाप्रकार त्याकाळी बराच प्रसिद्ध झाला; यात सहसा हाडांचे सापळे आणि मृतदेह चित्रित केले जायचे. दॉन्स मॅकॅब्र मृत्यूच्या शक्‍तीचे रूपक बनले. भविष्याची शाश्‍वती नसल्याने प्लेगच्या साथीतून वाचलेल्या अनेकांनी सर्व नैतिक बंधने झुगारली. नैतिकता रसातळाला पोहंचली. चर्चला काळा मृत्यू आटोक्यात आणता आला नाही म्हणून “मध्ययुगीन जनतेचा चर्चवरचा भरवसा उडाला.” (काळा मृत्यू, इंग्रजीतील एक पुस्तक) काही इतिहासकारांचे असेही म्हणणे आहे की, काळा मृत्यू यामुळे घडलेल्या सामाजिक बदलांनी व्यक्‍तिस्वातंत्र्यवाद आणि उद्योग यांना चालना मिळाली, त्याचप्रमाणे सामाजिक आणि आर्थिक कार्य वाढले—याच गोष्टी भांडवलशाहीची पूर्वचिन्हे होती.

काळा मृत्यू यामुळे आरोग्य नियंत्रण व्यवस्था सुरू करण्यासही सरकारांना उत्तेजन मिळाले. प्लेग आटोक्यात आल्यानंतर व्हेनिस शहरात रस्ते स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. त्याचप्रमाणे, फ्रान्सचा दुसरा राजा जॉन (ज्याला गुड असेही म्हणतात) यानेसुद्धा साथीपासून संरक्षण म्हणून रस्ते स्वच्छ करण्याची आज्ञा दिली. राजाने हे पाऊल याकरता उचलले कारण एका प्राचीन ग्रीक डॉक्टराने अथेन्सचे रस्ते धुऊन स्वच्छ केल्यामुळे अथेन्सचा साथीपासून बचाव झाला असे त्याला कळाले होते. उघड्या गटारींसमान असलेले मध्ययुगातले रस्ते सरतेशेवटी स्वच्छ करण्यात आले.

इतिहासजमा?

काळा मृत्यू याला कारणीभूत असलेल्या सूक्ष्मजंतूंचा शोध लागला १८९४ साली; हा शोध फ्रेंच सूक्ष्मजंतूशास्त्रज्ञ एलेक्सॉन्द्रे यर्सिन यांनी लावला. त्यामुळे त्याला यर्सिनिया पेस्टिस असे नाव पडले. आणखी चार वर्षांनंतर एक फ्रेंच वैज्ञानिक पॉल-लुई सीमोन याने या रोगाचा संसर्ग होण्यामध्ये पिसवांची (कृंतकांवर आढळतात) काय भूमिका आहे त्याचा शोध लावला. लवकरच एक लस तयार करण्यात आली; पण ती इतकी काही यशस्वी ठरली नाही.

प्लेगची साथ पुन्हा कधीच डोके वर काढणार नाही का? असे मुळीच म्हणता येणार नाही. मंचुरियात, १९१० च्या हिवाळ्यात सुमारे ५०,००० लोक प्लेगमुळे मृत्यूमुखी पडले. शिवाय प्रत्येक वर्षी, जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात हजारो संसर्गित रोग्यांची नोंदणी केली जाते—ही संख्यासुद्धा वाढत चालली आहे. या रोगाला कारणीभूत असलेल्या सूक्ष्मजंतूचे नवीन प्रकार देखील आढळले आहेत. त्यांच्यावर उपचाराचा काहीच फायदा होत नाही. होय, जोपर्यंत स्वच्छता पाळली जात नाही तोपर्यंत मानवजातीवर प्लेगची टांगती तलवार राहील. जॅकलीन ब्रॉसॉले आणि हेन्री मॉलारे यांनी संपादन केलेले पुरक्वा ला पेस्ट? ल रा, ल पुइस ए ल ब्युबॉ (प्लेगचे कारण? उंदीर, पिसू आणि जांघेतील गाठ) हे पुस्तक म्हणते की, “प्लेगची साथ मध्ययुगातल्या प्राचीन युरोपातीलच रोग नव्हता . . . दुःखाची गोष्ट म्हणजे, प्लेगची साथ बहुतेक भविष्याचा रोग आहे.”

[तळटीपा]

^ त्या काळातल्या लोकांनी या विकृतीला मरी किंवा साथ अशीही नावे दिली.

[१७ पानांवरील संक्षिप्त आशय]

देव रोगापासून आपला बचाव करील असे समजून लोकांनी आपले होते नव्हते ते सगळे चर्चला दान केले

[१८ पानांवरील चौकट/चित्र]

कोडे मारणाऱ्‍यांचा पंथ

देवाने शिक्षा केल्यामुळे प्लेग आला आहे असा विचार करून काहींनी देवाचा क्रोध शांत करण्यासाठी स्वतःलाच चाबकाने किंवा कोड्याने फटके मारून घेतले. ब्रदरहुड ऑफ द फ्लॅजलंट्‌स नावाची ही (जवळजवळ ८,००,००० सदस्य असल्याचे म्हटले जात होते) चळवळ काळा मृत्यू या दरम्यान फार लोकप्रिय बनली होती. त्या पंथाच्या नियमानुसार स्त्रियांशी बोलणे, कपडे धुणे किंवा बदलणे यांना मनाई होती. दिवसातून दोन वेळा सार्वजनिक ठिकाणी कोडे मारून घेतले जात होते.

मध्ययुगीन पाखंडमत (इंग्रजी) या पुस्तकानुसार, “तेव्हाच्या भयग्रस्त लोकांना आपल्या मनाचे समाधान मिळविण्याचे फार कमी मार्ग होते; स्वतःला कोडे मारून घेणे हा त्यातलाच एक मार्ग होता.” कोडे मारून घेणारे हे लोक चर्चमधील धार्मिक पुढाऱ्‍यांची टीका करण्यात आणि पापक्षालनाच्या फायदेशीर प्रथेच्याही विरुद्ध बोलण्यात पहिले होते. म्हणूनच १३४९ साली पोपने त्या पंथाची निंदा केली. परंतु, काळा मृत्यू याची साथ निघून गेल्यावर ही चळवळ आपोआपच नाहीशी झाली.

[चित्र]

कोडे मारणाऱ्‍यांनी देवाला प्रसन्‍न करायचा प्रयत्न केला

[चित्राचे श्रेय]

© Bibliothèque Royale de Belgique, Bruxelles

[१९ पानांवरील चित्र]

फ्रान्समधील मार्सेल्स येथील प्लेग

[चित्राचे श्रेय]

© Cliché Bibliothèque Nationale de France, Paris

[१९ पानांवरील चित्र]

एलेक्सान्द्रे येर्सिन यांनी प्लेगसाठी कारणीभूत असलेल्या सूक्ष्मजंतूचा शोध लावला

[चित्राचे श्रेय]

Culver Pictures