व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

एक शाश्‍वत आशा

एक शाश्‍वत आशा

एक शाश्‍वत आशा

जवळ जवळ २००० वर्षांपूर्वी पृथ्वीवर होऊन गेलेल्या सगळ्यात महान व्यक्‍तीला अर्थात येशूला अन्यायाने मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. यातना स्तंभावर असताना त्याच्या शेजारी वधस्तंभावर खिळलेला एक अपराधी उपरोधिकपणे त्याला म्हणाला: “तू ख्रिस्त आहेस ना? तर स्वतःला व आम्हाला वाचीव.”—लूक २३:३९.

त्यावर, तिथे वधस्तंभावर असलेला दुसरा एक अपराधी त्याला खडसावून म्हणाला: “तुलाहि तीच शिक्षा झाली असता तू देवाला सुद्धा भीत नाहीस काय? आपली शिक्षा तर यथान्याय आहे; कारण आपण आपल्या कृत्यांचे योग्य फळ भोगीत आहो; परंतु ह्‍याने काही अयोग्य केले नाही.” मग तो येशूकडे वळून म्हणाला: “आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा.”—लूक २३:४०-४२.

येशूने त्याला म्हटले: “आज, मी तुला खचित सांगतो, तू माझ्यासोबत परादीसमध्ये असशील.”—लूक २३:४३, NW.

येशूपुढे एक अद्‌भुत आशा होती आणि त्या आशेचा येशूवर काय परिणाम झाला याविषयी बोलताना प्रेषित पौलाने म्हटले: “जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला, आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे.”—इब्री लोकांस १२:२.

येशूपुढे “जो आनंद” होता त्यात आपल्या पित्यासोबत स्वर्गात राहण्याची आणि सरतेशेवटी देवाच्या राज्याचा राजा या नात्याने सेवा करण्याची आशा समाविष्ट होती. या शिवाय, त्याच्यासोबत राजे म्हणून राज्य करणाऱ्‍या त्याच्या पारखलेल्या, भरवशालायक अनुयायांचे स्वर्गात स्वागत करण्याचा अनोखा आनंदही त्याला लाभणार होता. (योहान १४:२, ३; फिलिप्पैकर २:७-११; प्रकटीकरण २०:५, ६) तर, येशूने त्या पश्‍चात्तापी अपराध्याला तो त्याच्यासोबत परादीसमध्ये अर्थात नवीन जगात असेल असे म्हटले त्याचा काय अर्थ होतो?

त्या अपराध्याला कोणती आशा आहे

तो अपराधी मनुष्य येशूसोबत स्वर्गात राज्य करण्यास पात्र नव्हता. कारण “माझ्या परीक्षांमध्ये माझ्याबरोबर टिकून राहिलेले तुम्हीच आहा. जसे माझ्या पित्याने मला राज्य नेमून दिले तसे मीहि तुम्हास नेमून देतो,” असे ज्यांच्याविषयी येशूने म्हटले होते त्यांत हा अपराधी मनुष्य सामील नव्हता. (लूक २२:२८, २९) तरीसुद्धा, तो अपराधी परादीसमध्ये किंवा नवीन जगात असेल असे वचन येशूने त्याला दिले होते. मग, येशू हे वचन कसे पूर्ण करणार होता?

आदाम आणि हव्वा या पहिल्या दांपत्याला यहोवा परमेश्‍वराने एका परादीसमध्ये अर्थात एदेन नावाच्या एका आनंदवनात ठेवले होते. (उत्पत्ति २:८, १५) ती एदेन बाग पृथ्वीवर होती आणि हळूहळू सबंध पृथ्वीचेच एका आनंदवनात रुपांतर व्हावे अशी देवाची इच्छा होती. पण, देवाची अवज्ञा केल्यामुळे आदाम आणि हव्वेला घरासमान असलेल्या या नयनरम्य बागेतून हाकलून लावण्यात आले. (उत्पत्ति ३:२३, २४) परंतु, हरवलेल्या त्या आनंदवनाची पुन्हा एकदा निर्मिती होईल; शिवाय, सबंध पृथ्वीच एक आनंदवन होईल असेही येशूने म्हटले.

येशूचे अनुयायी बनल्यामुळे आपल्याला आणि इतर प्रेषितांना काय प्रतिफळ मिळेल असा प्रश्‍न पेत्राने येशूला विचारला तेव्हा येशूने असे वचन दिले: “मी तुम्हास खचित सांगतो, पुनरुत्पत्तीत मनुष्याचा पुत्र आपल्या गौरवाच्या राजासनावर बसेल तेव्हा माझ्यामागे आलेले तुम्हीहि बारा राजासनांवर बसून इस्राएलाच्या बारा वंशाचा न्यायनिवाडा कराल.” (मत्तय १९:२७, २८) विशेष म्हणजे, लूकच्या अहवालात नमूद केलेल्या याच संभाषणात, “पुनरुत्पत्तीत” याऐवजी “येणाऱ्‍या युगात” असे येशूने म्हटल्याचे नमूद केले आहे.—लूक १८:२८-३०.

त्यामुळे, स्वर्गामध्ये येशू ख्रिस्त त्याच्या सह-राजांसोबत आपल्या वैभवी सिंहासनावर बसेल तेव्हा तो एका धार्मिक नवीन युगाची स्थापना करील. (२ तीमथ्य २:११, १२; प्रकटीकरण ५:१०; १४:१, ३) येशूच्या या स्वर्गीय राज्यामार्फत, सबंध पृथ्वीचे एका विश्‍वव्यापी बागेत रूपांतर करण्याचा देवाचा मनोदय शेवटी पूर्ण होईल!

आणि येशूने त्या अपराध्याला दिलेले वचनही तो याच शासन काळात पूर्ण करील. ते कसे? प्रथम येशू ख्रिस्त त्याचे पुनरुत्थान करील आणि त्याला आपल्या पृथ्वीवरील प्रजेचा एक हिस्सा बनवील. मग, त्याला देवाच्या अपेक्षा, देवाच्या मागण्या पूर्ण करण्याची आणि सदासर्वदासाठी देवाच्या राज्याधीन राहण्याची बहुमोल संधी देईल. होय, एका विश्‍वव्यापी बागेत अनंत काळ जीवन जगण्याच्या बायबलमधील आशेविषयी आनंदी होण्यासाठी आपल्याकडे अनेक सबळ कारणे आहेत!

जीवन अर्थपूर्ण होऊ शकते

अशा या अद्‌भुत आशेमुळे तुमचे जीवन किती अर्थपूर्ण होऊ शकते याची अंमळ कल्पना करा! प्राणघातक कृत्य करण्यास उद्युक्‍त करणारे नकारात्मक विचार आपल्या मनातून काढून टाकण्यास आपल्याला ही आशा मदत करते. प्रेषित पौलाने त्या अद्‌भुत आशेची तुलना आध्यात्मिक शस्त्रसामग्रीच्या एका महत्त्वपूर्ण शस्त्राशी केली आहे. त्याने म्हटले, की आपण “तारणाची आशा हे शिरस्त्राण घालावे.”—१ थेस्सलनीकाकर ५:८; स्तोत्र ३७:२९: प्रकटीकरण २१:३, ४.

होय, आशेमुळे मनुष्याला जीवन जगण्याची नवीन उमेद मिळते. येणाऱ्‍या नवीन जगात, ‘मृतांना सजीव करणारा देव’ आपल्या मृत प्रिय जनांना जीवदान देईल तेव्हा एकाकीपणा, एकलकोंडेपणा नाहीसा होईल आणि आपल्या डोळ्यांत फक्‍त आनंदाश्रू तरळतील. (२ करिंथकर १:९) त्यावेळी शारीरिक दुर्बलता, दुखणे आणि जायबंदी झाल्यामुळे येणाऱ्‍या निराशेचे विस्मरण होईल. कारण तेव्हा, “लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील.” आपले ‘शरीर बालकाच्या शरीरापेक्षा टवटवीत होईल’ आणि ‘आपल्याला आपल्या तारुण्याचे दिवस पुन्हा प्राप्त होतील.’—यशया ३५:६; ईयोब ३३:२५.

त्यावेळी, “मी रोगी आहे असे एकहि रहिवासी म्हणणार नाही.” किंबहुना, रेंगाळणाऱ्‍या आजाराच्या कटू आठवणी देखील आठवेनाशा होतील. (यशया ३३:२४) तीव्र औदासिन्यामुळे वाटणाऱ्‍या रितेपणाचे आणि आयुष्याच्या भकासपणाचे रुपांतर “अक्षय आनंदात” होईल. (यशया ३५:१०) प्राणघातक आजारामुळे येणारे भयंकर नैराश्‍य मानवाच्या सर्वांत मोठ्या शत्रूसोबत अर्थात मृत्यूसोबत नाहीसे होईल.—१ करिंथकर १५:२६.

[८, ९ पानांवरील चित्रे]

देवाच्या नवीन जगाची अद्‌भुत आशा सदैव उराशी बाळगा