व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

इलेक्ट्रॉनिक साधनांमुळे होणारा परिणाम—तुमच्या शिकण्याच्या क्षमतेवर

इलेक्ट्रॉनिक साधनांमुळे होणारा परिणाम—तुमच्या शिकण्याच्या क्षमतेवर

आपण सतत शिकत असतो—मग ते शाळेसाठी असो, नोकरीसंबंधी असो किंवा इतर कारणांसाठी. आणि यासाठी इलेक्ट्रॉनिक साधनांमुळे खूप मदत होते. घरबसल्या हवी ती माहिती मिळवणं कधी नव्हतं इतकं आज सोपं झालंय.

असं असलं तरी, जे प्रमाणाबाहेर इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करतात त्यांना सहसा . . .

  • लक्ष देऊन वाचायला कठीण जातं.

  • एका वेळी एकाच कामावर लक्ष लावायला जमत नाही.

  • एकटं असताना लगेच कंटाळा येतो.

लक्षात ठेवण्यासारखं काही . . .

वाचन

कोणतीही माहिती वाचताना काही जण फक्‍त वरवर नजर फिरवतात. लेखकाने मांडलेले विचार सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचायचा त्यांना कंटाळा येतो.

एखाद्या प्रश्‍नाचं चटकन उत्तर शोधायचं असतं, तेव्हा वरवर वाचायला काही हरकत नाही. पण, एखादा विषय नीट समजून घ्यायचा असतो, तेव्हा अशा प्रकारे वाचलं तर आपल्याला तो व्यवस्थित समजून घेता येणार नाही.

जरा विचार करा: तुम्हाला सविस्तर माहिती वाचायला जमतं का? जर तुम्हाला हे जमलं, तर तुमची शिकण्याची क्षमता वाढायला मदत होईल असं तुम्हाला वाटतं का?—नीतिवचनं १८:१५.

लक्ष लावणं

काही लोकांना वाटतं की इलेक्ट्रॉनिक साधनांमुळे आपण एकाच वेळी दोन कामं करू शकतो. जसं की, अभ्यास करता करता मित्रांना मेसेजसुद्धा पाठवू शकतो. पण दोन्ही गोष्टींकडे लक्ष असल्यामुळे एकही  काम नीट करता येत नाही.

लक्ष विचलित न होऊ देता एखादी गोष्ट करणं सोपं नसलं, तरी असं केल्यामुळे तुमची शिकण्याची क्षमता वाढेल. ग्रेस नावाची मुलगी म्हणते, “यामुळे चुका कमी होतात आणि जास्त ताणही येत नाही. एकाच वेळी भरपूर कामं केली तर गोंधळ होऊ शकतो. त्यापेक्षा एका वेळी एका कामावरच लक्ष लावणं जास्त चांगलं.”

जरा विचार करा: एकाच वेळी खूप साऱ्‍या गोष्टी करायचा प्रयत्न करत असल्यामुळे तुम्ही जे वाचत आहात ते समजून घेणं आणि लक्षात ठेवणं तुम्हाला कठीण जातं का?​—नीतिवचनं १७:२४.

एकटं असताना

काही जणांना एकटं राहायला अजिबात आवडत नाही आणि अशा वेळी काय करावं हे त्यांना सुचत नाही. त्यामुळे मन रमवण्यासाठी ते इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करतात. ऑलिव्हिया नावाची स्त्री म्हणते, “मी फक्‍त १५ मिनिटं जरी फोन, टॅब किंवा टीव्ही नाही पाहिला तर मला बोअर व्हायला लागतं.”

पण खरं पाहिलं तर जेव्हा तुम्ही एकटे असता, तेव्हा तुमच्याकडे एखाद्या विषयावर खोलवर विचार करण्याची खूप चांगली संधी असते. शिकून घेण्याची क्षमता वाढवण्यासाठी असा खोल विचार करणं खूप महत्त्वाचंय, फक्‍त मुलांसाठीच नाही तर मोठ्यांसाठीसुद्धा.

जरा विचार करा: तुम्ही एकटे असता तेव्हा तुम्ही त्या वेळेचा चांगला उपयोग करता का?—१ तीमथ्य ४:१५.

हे करा

उपकरणांचा तुम्ही कसा वापर करता हे तपासा

शिकून घेण्याची क्षमता वाढवण्यासाठी तुम्ही इलेक्ट्रॉनिक साधनांचा कसा वापर करू शकता? एखाद्या गोष्टीवर लक्ष लावताना किंवा ती शिकून घेत असताना इलेक्ट्रॉनिक साधनांमुळे कोणता अडथळा येऊ शकतो?

बायबलचं तत्त्व: “व्यावहारिक बुद्धीचं आणि विचारशक्‍तीचं रक्षण कर.”—नीतिवचनं ३:२१.