व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाने दिलेलं सुंदर जीवनाचं वचन

देवाने दिलेलं सुंदर जीवनाचं वचन

देवाने वचन दिलं आहे, की भविष्यात लवकरच तो काही चांगले बदल घडवून आणणार आहे; जसं की, तो सगळ्या दुःखांचा अंत करणार आहे आणि माणसांना या पृथ्वीवर सुखाचं जीवन देणार आहे. (स्तोत्र ३७:११) देवाच्या या वचनावर आपण भरवसा का ठेवू शकतो? कारण, “देव काही माणूस नाही, की तो खोटं बोलेल.” (गणना २३:१९) तर मग, देव पृथ्वीवर जे चांगले बदल करणार आहे त्यांतले काही आता आपण पाहू.

देव दुष्ट लोकांचा नाश करेल

“जेव्हा दुष्ट लोक जंगली गवतासारखे वाढतात आणि वाईट कृत्यं करणाऱ्‍यांची भरभराट होते, तेव्हा त्यांचा कायमचा सर्वनाश ठरलेला असतो!”—स्तोत्र ९२:७.

पवित्र शास्त्रात खूप आधीच सांगितलं होतं, की शेवटच्या दिवसांत लोक फार वाईट वागतील. आणि आज अगदी असंच होत आहे. याबद्दल मागच्या लेखात आपण पाहिलं होतं. वाईट कामं दिवसेंदिवस वाढतच चालली आहेत. पण देव लवकरच जगातल्या सगळ्या वाईट लोकांचा नाश करणार आहे. त्यानंतर फक्‍त चांगले लोक, म्हणजे जे देवाच्या आज्ञांप्रमाणे वागतात ते या पृथ्वीवर कायम राहतील. त्याबद्दल पवित्र शास्त्र असं म्हणतं: “नीतिमान लोकांना पृथ्वीचा वारसा मिळेल, आणि ते तिच्यावर सर्वकाळ राहतील.”—स्तोत्र ३७:२९.

देव सैतानाचा नाश करेल

‘शांती देणारा देव लवकरच सैतानाला चिरडून टाकेल.’—रोमकर १६:२०.

सैतानाचा, दुष्ट स्वर्गदूतांचा आणि सगळ्या वाईट लोकांचा नाश झाल्यावर या पृथ्वीवर शांती असेल. देव असं वचन देतो, की त्यानंतर “कोणीही [तुम्हाला] घाबरवणार नाही.”—मीखा ४:४.

देव आजारपण आणि मृत्यू काढून टाकेल

“देवाचा तंबू माणसांजवळ आहे, . . . तो त्यांच्या डोळ्यांतून प्रत्येक अश्रू पुसून टाकेल. यापुढे कोणीही मरणार नाही, कोणीही शोक करणार नाही किंवा रडणार नाही आणि कोणतंच दुःख राहणार नाही.”—प्रकटीकरण २१:३, ४.

सैतानामुळे, तसंच आदाम आणि हव्वामुळे आपल्याला जो त्रास सहन करावा लागतो तो देव लवकरच दूर करणार आहे. त्यानंतर कोणीही आजारी पडणार नाही आणि “कोणीही मरणार नाही.” जे देवावर प्रेम करतील आणि त्याच्या आज्ञांचं पालन करतील ते कायम जगतील. पण प्रश्‍न असा येतो, की ते कुठे जगतील?

देव या पृथ्वीला एका सुंदर बागेसारखं बनवेल

“ओसाड प्रदेश आणि कोरडी भूमी आनंदित होईल, वाळवंट हर्ष करेल आणि केशराच्या फुलांसारखा फुलेल.” —यशया ३५:१.

जगातून सगळ्या दुष्ट लोकांचा नाश केल्यावर देव या पृथ्वीचं रूपच बदलून टाकेल. ठिकठिकाणी बाग-बागिचे असतील आणि भरपूर अन्‍नपाणी असेल. (स्तोत्र ७२:१६) समुद्राचं आणि नद्यांचं पाणी खूप स्वच्छ असेल आणि त्यात राहणाऱ्‍या जिवांना कोणताही धोका नसेल. त्या वेळी “प्रदूषण” हा शब्दसुद्धा ऐकायला मिळणार नाही. लोक स्वतः आपली घरं बांधतील आणि त्यांत राहतील. मग पुन्हा कधीच कोणी बेघर होणार नाही, उपाशी झोपणार नाही किंवा गरीब असणार नाही.—यशया ६५:२१, २२.

देव मेलेल्या लोकांना पुन्हा जिवंत करेल

“सगळ्या लोकांना मेलेल्यांतून उठवलं जाणार आहे.” —प्रेषितांची कार्यं २४:१५.

तुम्हाला तुमच्या जवळच्या लोकांना पुन्हा जिवंत झालेलं पाहायचं आहे का? नवीन जगात आपला सर्वशक्‍तिशाली देव हे नक्कीच करणार आहे. तो तुमच्या जवळच्या माणसांना पुन्हा जिवंत करणार आहे. तेव्हा तुम्ही त्यांना ओळखाल आणि तेही तुम्हाला ओळखतील. तो क्षण खरंच किती आनंदाचा असेल याची कल्पना करा! पण असं घडेल हे आपण इतकं खातरीने कसं म्हणू शकतो? कारण बायबलमध्ये अशा कितीतरी लोकांबद्दल सांगितलं आहे ज्यांना पुन्हा जिवंत करण्यात आलं आणि ते आपापल्या कुटुंबाला पुन्हा भेटू शकले. शिवाय, येशूने बऱ्‍याचदा सगळ्यांसमोर मेलेल्या लोकांना पुन्हा जिवंत केलं.—लूक ८:४९-५६; योहान ११:११-१४, ३८-४४.