व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मुख्य विषय | तुम्हाला सांत्वन कुठून मिळू शकतं?

समस्यांचा सामना करत असताना मिळणारं सांत्वन

समस्यांचा सामना करत असताना मिळणारं सांत्वन

जीवनात समस्या कुठल्याही रूपात येऊ शकतात. आपण सर्व प्रकारच्या समस्यांची इथं चर्चा करू शकत नसलो, तरी आधी उल्लेख केलेल्या चार उदाहरणांचं जवळून परीक्षण करू या. वेगवेगळ्या समस्यांना तोंड देताना या लोकांना देवाकडून खरं सांत्वन कसं मिळालं ते पाहूयात.

बेरोजगारीचा सामना करताना

“मी मिळेल ते काम करायला शिकलो आणि आम्ही सर्व अनावश्यक खर्च कमी केले.”—जोनातन

“माझी आणि माझ्या पत्नीची नोकरी एकाच वेळी गेली. त्यानंतर आम्ही लोकांच्या मदतीने आणि लहान-सहान कामं करून कशीतरी दोन वर्षं काढली. पण यामुळे माझी पत्नी प्रिसीला, हिला डिप्रेशनचा त्रास झाला. तसंच, मला वाटू लागलं की मी काहीच कामाचा नाही.” असं सेथ * म्हणतो.

“आम्हाला सावरायला कशी मदत मिळाली? प्रिसीला नेहमी बायबलमधील मत्तय ६:३४ या वचनात दिलेल्या येशूच्या शब्दांवर मनन करायची. तिथं येशूने म्हटलं आहे की आपण उद्याची चिंता करू नये, कारण प्रत्येक दिवसाच्या वेगवेगळ्या चिंता असतात. त्यासोबतच तिला मनापासून प्रार्थना केल्यामुळे सहनशक्ती मिळाली. माझ्याबाबतीत सांगायचं तर मला स्तोत्र ५५:२२ या वचनातून सांत्वन मिळालं. स्तोत्रकर्त्याप्रमाणे मीसुद्धा आपला भार परमेश्वरावर टाकला आणि त्याने मला खरोखर सांभाळलं. आता मला नवीन नोकरी मिळाली आहे. पण आम्ही मत्तय ६:२०-२२ या वचनांत दिलेल्या येशूच्या सल्ल्याप्रमाणे आमची जीवनशैली साधी ठेवली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही देवाच्या आणि एकमेकांच्या देखील जवळ आलो आहोत.”

अशाच परिस्थितीचा सामना करणारा जोनातन म्हणतो, “आमच्या कुटुंबाचा छोटासा व्यवसाय जेव्हा बंद पडला तेव्हा भविष्यात काय होणार, या विचारामुळे मी खूप घाबरलो. देशात आर्थिक समस्या आल्यामुळे २० वर्षांच्या आमच्या मेहनतीवर पाणी फिरलं. माझ्यात आणि माझ्या पत्नीमध्ये पैशांवरून सतत वाद होऊ लागले. आम्ही आमचं क्रेडिटकार्डदेखील वापरायला घाबरत होतो, कारण आम्हाला वाटायचं ते कुठल्याही दुकानात चालणार नाही.”

तो पुढे म्हणतो: “पण बायबल आणि देवाच्या पवित्र आत्म्यामुळे आम्हाला जीवनात योग्य निर्णय घ्यायला मदत मिळाली. मी मिळेल ते काम करायला शिकलो आणि आम्ही सर्व अनावश्यक खर्च कमी केले. आम्ही यहोवाचे साक्षीदार असल्यामुळे आमच्या ख्रिस्ती बांधवांनीसुद्धा आम्हाला मदत केली. त्यांनी आमचा आत्मविश्वास वाढवला आणि वाईट प्रसंगात सावरण्यासाठी मदतीचा हात पुढे केला.”

विवाहसोबत्याने सोडून दिल्यावर

“माझ्या पतीने मला अचानक सोडलं, या गोष्टीमुळे मी खूप दुःखी आणि रागावलेले होते. त्या दुःखात मी पार बुडून गेले. अशा वेळी देवाशी घनिष्ठ नातेसंबंध जोडल्याने मला सांत्वन मिळालं. त्याला रोज प्रार्थना केल्याने मला शांती मिळायची आणि मला सुरक्षित वाटायचं. असं वाटलं जणू त्याने माझं तुटलेलं हृदय पुन्हा जोडलं.” असं रॅक्वेल म्हणते.

ती पुढे म्हणते: “माझ्या रागावर नियंत्रण करण्यासाठी देवाच्या वचनातून म्हणजे बायबलमधून मला मदत मिळाली. रोमकर १२:२१ मध्ये पौलाने लिहिलेल्या शब्दांना मी आपल्या जीवनात लागू केलं, ‘वाइटाने जिंकला जाऊ नको, तर बऱ्याने वाइटाला जिंक.’”

“काही वेळा आपण जे गमावलं ते विसरून जावं लागतं . . . आता मी जीवनात नवीन ध्येयं ठेवली आहेत.”—रॅक्वेल

“माझ्या एका जवळच्या व्यक्तीने मला हे समजण्यास मदत केली की, झालेल्या गोष्टी विसरून पुढे गेलं पाहिजे. तिने मला बायबलमधून उपदेशक ३:६ हे वचन दाखवून, प्रेमळपणे समजावलं की काही वेळा आपण जे गमावलं ते विसरून जावं लागतं. हा सल्ला जरी कठीण वाटत असला तरी तो माझ्यासाठी योग्य होता. आता मी जीवनात नवीन ध्येयं ठेवली आहेत.”

एलीजाबेथ नावाची स्त्री म्हणते, “जेव्हा तुमचा विवाह तुटतो तेव्हा तुम्हाला आधाराची गरज असते. माझ्या मैत्रिणीने मला सतत आधार दिला. माझे अश्रू पाहून तिचेही डोळे भरून यायचे, व ती माझं सांत्वन करायची. मी सर्वांना नकोशी आहे, यापेक्षा माझ्यावर अजूनही कोणीतरी प्रेम करतं याची तिने मला जाणीव करून दिली. माझी खातरी आहे की यहोवानेच तिला माझ्या मनावरील जखमांना बरं करण्यासाठी पाठवलं होतं.”

आजारी असताना किंवा वृद्धावस्थेत

“प्रार्थना केल्यावर मला जाणवतं की पवित्र आत्म्यामुळे मला बळ मिळतं.”—लुईस

सुरुवातीच्या लेखात उल्लेख केलेल्या लुईसला हृदयविकार आहे आणि दोन वेळा त्यांची प्रकृती खूपच गंभीर झाली होती. आता दिवसाचे १६ तास त्यांना ऑक्सीजनच्या आधारावर राहावं लागतं. ते म्हणतात, “मी यहोवाला सतत प्रार्थना करतो. प्रार्थना केल्यावर मला जाणवतं की पवित्र आत्म्यामुळे मला बळ मिळतं. प्रार्थनेमुळे मला सहन करण्याचं धैर्य मिळतं कारण माझा देवावर विश्वास आहे आणि तो माझी काळजी करतो हे मला माहीत आहे.”

८० वर्षांच्या पेट्रा म्हणतात, “मला खूप काही करावसं वाटतं पण मी करू शकत नाही. माझी शक्ती कमी होत चालली आहे याचं मला दुःख होतं. मला खूप थकल्यासारखं वाटतं आणि औषधांवर अवलंबून राहावं लागतं. मी एका गोष्टीवर नेहमी विचार करते की, शक्य असल्यास एक गोष्ट येशूला करावी लागू नये म्हणून त्याने आपल्या पित्याकडे कशी विनंती केली होती. पण यहोवाने येशूला ती गोष्ट करण्याचं बळ दिलं, तसंच तो मलाही देतो. रोज प्रार्थना करणं माझ्यासाठी एका उपाचारासारखं आहे. देवाशी बोलल्यावर मला खूप बरं वाटतं.”—मत्तय २६:३९.

जूलियनला ३० वर्षांपासून मल्टिपल सक्‌लेरोसिसचा आजार आहे. तो म्हणतो “असं वाटतं की, मला ऑफिसमधील खुर्ची ऐवजी व्हीलचेयर मिळाली आहे. पण असं असलं तरी, मी दुसऱ्यांची मदत करतो आणि त्यामुळे माझ्या जीवनाला अर्थ आहे. देण्याच्या वृत्तीमुळे आपलं दुःख कमी होतं. तसंच आपल्याला गरज असते त्या वेळी यहोवाने बळ देण्याचं जे वचन दिलं आहे, तो ते नेहमी पाळतो. पौलाप्रमाणे मलाही वाटतं, “मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे.”—फिलिप्पैकर ४:१३.

प्रियजनांचा मृत्यू होतो तेव्हा

अॅन्टोनीयो म्हणतो, “जेव्हा माझ्या बाबांचा एका अपघातात मृत्यू झाला तेव्हा वाटलं की, त्यात त्यांची काहीच चूक नव्हती. ते तर फक्त रस्त्याच्या बाजूने चालत होते. ते कोमामध्ये होते पण मी त्यांच्यासाठी काहीच करू शकत नव्हतो. पाच दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. आईसमोर असताना मी माझे अश्रू आवरले, पण त्यानंतर जेव्हा एकटा होतो तेव्हा खूप रडलो. मी सतत स्वतःला एकच प्रश्न विचारायचो, का?”

तो पुढे असंही म्हणतो, “त्या कठीण काळात मी माझ्या भावनांवर ताबा मिळवण्यासाठी आणि शांत राहण्यासाठी यहोवाकडे मदत मागितली. हळूहळू माझं मन शांत झालं. वाईट प्रसंग कुणावरही येऊ शकतात हे मी बायबलमध्ये वाचल्याचं मला आठवलं.” अॅन्टोनीयोची अशी खातरी आहे की देवाने वचन दिल्याप्रमाणे तो त्याच्या बाबांना पुन्हा जिवंत झाल्याचं पाहणार आहे. तो म्हणतो, “देव खोटं बोलत नाही.”—उपदेशक ९:११; योहान ११:२५; तीत १:२.

“विमान अपघातामुळे आम्ही आमच्या मुलाला गमावलं असलं, तरी त्याच्यासोबतच्या अनेक गोड आठवणी आमच्याजवळ आहेत.”—रॉबर्ट

पहिल्या लेखात उल्लेख केलेल्या रॉबर्टचंही हेच मत आहे. तो म्हणतो: “मला आणि माझी पत्नी मॅरीबेल हिला फिलिप्पैकर ४:६, ७ या वचनात उल्लेख केलेली शांती अनुभवायला मिळाली. यहोवाकडे प्रार्थना केल्यामुळे आम्ही ही शांती अनुभवू शकलो. आमचं मन शांत असल्यामुळे, आम्ही न्यूज रिपोरटर्सना मृतजन पुन्हा जिवंत होणार या आमच्या आशेबद्दल सांगू शकलो. विमान अपघातामुळे आम्ही आमच्या मुलाला गमावलं असलं, तरी त्याच्यासोबतच्या अनेक गोड आठवणी आमच्याजवळ आहेत. आम्ही त्याच आठवणींवर नेहमी लक्ष केंद्रित करतो.”

ते असंही म्हणतात की, “आमचे साक्षीदार मित्र म्हणाले की आम्ही टीव्हीवर आपल्या विश्वासाबद्दल अगदी शांतपणे समजावलं. तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की, हे सगळं त्यांनी आमच्यासाठी केलेल्या प्रार्थनांमुळेच शक्य झालं. त्यांच्या अनेक सांत्वनदायक शब्दांद्वारे यहोवाच आमची मदत करत होता याची मला खातरी आहे.”

लोकांच्या जीवनात जरी वेगवेगळ्या समस्या असल्या, तरी देव त्यांचं सांत्वन करू शकतो हे आपल्याला वरील अनुभवांवरून कळतं. तुम्हालाही असं सांत्वन मिळू शकतं का? तुम्ही कुठल्याही समस्यांचा सामना करत असलात तरी त्या कठीण काळात तुम्हाला सांत्वन मिळू शकतं. * पण यासाठी तुम्हाला यहोवाकडे मदत मागितली पाहिजे. कारण तो “सर्व सांत्वनदाता देव” आहे.—२ करिंथकर १:३. (wp16-E No. 5)

^ परि. 5 या लेखातील काही नावं बदलण्यात आली आहेत.

^ परि. 23 तुम्ही देवासोबत घनिष्ठ नातेसंबंध कसा जोडू शकता आणि त्याच्याकडून मिळणारं सांत्वन कसं अनुभवू शकता, हे जाणून घेण्यासाठी कृपया तुमच्या जवळ राहत असणाऱ्या यहोवाच्या साक्षीदारांशी संपर्क करा किंवा जवळच्या शाखा कार्यालयाला लिहून कळवा.