व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबलने बदललं जीवन

यशस्वी होण्याआधी मी बऱ्याचदा हरलो

यशस्वी होण्याआधी मी बऱ्याचदा हरलो
  • जन्म: १९५३

  • देश: ऑस्ट्रेलिया

  • पार्श्‍वभूमी: पोर्नोग्राफीचं व्यसन असलेला

माझं आधीचं जीवन:

माझे बाबा १९४९ साली जर्मनीतून ऑस्ट्रेलियाला राहायला आले. ते इथं खाणीत किंवा वीज निर्मिती कंपनीत कामाच्या शोधात आले. ते व्हिक्टोरियातील एका गावात राहू लागले. इथं त्यांचं लग्न झालं आणि १९५३ साली माझा जन्म झाला.

थोड्याच वर्षांनी माझ्या आईने यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास सुरू केला. यामुळे बायबलच्या शिकवणी फार लहानपणापासूनच माझ्या जीवनाचा भाग बनल्या. पण माझ्या बाबांना कुठल्याही धर्माबद्दल आवड नव्हती. ते आईवर या गोष्टीसाठी खूप रागवायचे आणि आम्हाला त्यांची भीती वाटायची. माझी आई त्यांना फार घाबरायची. तिने त्यांना न सांगता बायबलचा अभ्यास सुरू ठेवला आणि तिला बायबलच्या शिकवणी फार आवडू लागल्या. बाबा जेव्हा घरी नसायचे तेव्हा ती मला आणि माझ्या लहान बहिणीला बायबलमधून शिकलेल्या गोष्टी सांगायची. तिने आम्हाला सांगितलं की भविष्यात पृथ्वीचं नंदनवनात रूपांतर होणार आहे. तसंच, हेही सांगितलं की जर आम्ही बायबलच्या स्तरांनुसार जगलो तर जीवनात नेहमी आनंदी राहू.—स्तोत्र ३७:१०, २९; यशया ४८:१७.

बाबांच्या हिंसक स्वभावामुळे मला वयाच्या १८ व्या वर्षी घर सोडावं लागलं. माझ्या आईने बायबलमधून जे काही शिकवलं त्यावर माझा विश्वास होता पण त्याची मी कधीच कदर केली नाही. म्हणून मी बायबलच्या शिकवणींनुसार जीवन जगू शकलो नाही. मला कोळशाच्या खाणीत इलेक्ट्रिशियन म्हणून काम मिळालं. २० वर्षांचा असताना मी लग्न केलं. लग्नाच्या तीन वर्षांनंतर आमच्या पहिल्या मुलीचा जन्म झाला. त्या वेळी माझ्या जीवनात कोणत्या गोष्टी जास्त महत्त्वपूर्ण आहेत यावर मी विचार करू लागलो. बायबलमुळे माझ्या कुटुंबाला मदत मिळू शकते हे मला माहीत होतं. त्यामुळे मी एका यहोवाच्या साक्षीदारासोबत बायबल अभ्यासाला सुरुवात केली. पण माझ्या पत्नीला साक्षीदार पसंत नव्हते. एकदा मी त्यांच्या सभेला गेलो तेव्हा तिने मला बजावलं की एकतर बायबल अभ्यास सोडून द्या नाहीतर हे घर सोडून निघून जा. नाइलाजाने मला तिचं ऐकावं लागलं आणि मी साक्षीदारांना भेटायचं थांबवलं. पण नंतर मला या गोष्टीचा पस्तावा झाला की, मी जे योग्य होतं ते करण्याचं थांबवलं.

एके दिवशी माझ्या कामावरच्या सोबत्याने मला अश्‍लील चित्र दाखवली. ती माझ्यासाठी मोह घालणारी आणि किळसवाणीदेखील होती. त्यानंतर मी दोषीपणाच्या भावनेत बुडून गेलो. मला बायबलमधून शिकलेल्या गोष्टी आठवल्या की देव यासाठी नक्कीच मला शिक्षा करणार. पण जसजसं मी अश्‍लील चित्र पाहू लागलो तसतसं पोर्नोग्राफी पाहण्यात काहीच चूक नाही असं मला वाटू लागलं. आणि हळूहळू मला त्याचं व्यसन लागलं.

त्यानंतरच्या २० वर्षांत, माझ्या आईने मला जे स्तर शिकवण्याचा प्रयत्न केला होता, त्यांपासून मी फार-फार लांब गेलो. मी ज्या गोष्टींचा जास्त विचार करायचो त्यांचा माझ्या रोजच्या वागण्यावर परिणाम दिसू लागला. मी अश्‍लाील बोलू लागलो आणि घाणेरडे विनोद करू लागलो. माझ्या मनात सेक्सबद्दल चुकीचा दृष्टिकोन निर्माण झाला. मी माझ्या पत्नीसोबत राहत असलो तरी माझे दुसऱ्या अनेक स्त्रियांसोबत अनैतिक संबंध होते. एके दिवशी मी स्वतःला आरशात पाहून म्हटलं, “मला तू जराही आवडत नाहीस.” मी माझा आत्मसन्मान हरवला होता आणि त्याऐवजी स्वतःचा तिरस्कार करू लागलो होतो.

जेव्हा आमचा घटस्फोट झाला तेव्हा माझं संपूर्ण जीवन उद्ध्वस्त झालं. त्यानंतर मी यहोवाला कळकळून प्रार्थना केली. मी २० वर्षांनंतर परत बायबलचा अभ्यास सुरू केला. आता माझे बाबा जिवंत नव्हते. माझ्या आईचा बाप्तिस्मा झाला होता आणि आता ती एक यहोवाची साक्षीदार बनली होती.

बायबलने जीवन कसं बदललं?

बायबलच्या उच्च स्तरांपासून मी फार लांब गेलो होतो. पण या वेळी मी ठाम निर्धार केला होता की, बायबलमध्ये ज्या मनःशांतीविषयी अभिवचन दिलं आहे ती मी मिळवणारच. मी माझं अश्‍लाील बोलणं सोडण्याचं आणि रागावर नियंत्रण मिळवण्याचं ठरवलं. तसंच मी अनैतिक जीवन, जुगार, अती प्रमाणात दारू पिणं आणि कामावर चोरी करणं हेसुद्धा सोडून द्यायचं ठरवलं.

माझ्या कामावरच्या सोबत्यांना कळत नव्हतं की मी एवढे बदल का करत आहे. तीन वर्षं त्यांनी मला सतत त्याच वाईट सवयींकडे वळवण्याचा प्रयत्न केला. मी चुकून रागाच्या भरात ओरडलो किंवा माझ्या तोंडातून एखादी शिवी निघाली तर ते सर्व लगेच जिंकल्यासारखे ओरडायचे: “वा! आधीचा ज्यो परत आला.” त्यांचं असं टोचून बोलणं मला खूप लागायचं. माझ्या प्रयत्नात मी पुन्हा हरलो असं मला वाटायचं.

माझ्या कामाच्या ठिकाणी लोक कंप्युटरवर आणि मासिकांमधून खूप पोर्नोग्राफी पाहायचे. मला आधी जशी सवय होती तसंच माझे सोबतीही सर्वांना कंप्युटरद्वारे अश्‍लाील चित्र पाठवायचे. मी या सवयीपासून लांब पळण्याचा प्रयत्न करत होतो पण ते नेहमी माझा निर्धार मोडण्याचा प्रयत्न करायचे. मी मदतीसाठी आणि प्रोत्साहनासाठी माझा बायबल अभ्यास घेणाऱ्या बांधवाशी बोललो. मी त्यांच्या पुढे माझं मन हलकं केलं आणि त्यांनी माझं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं. त्यांनी मला बायबलमधील काही वचनं दाखवून, समजावलं की मी हे व्यसन कसं सोडू शकतो. तसंच सतत प्रार्थना करून यहोवाकडे मदत मागण्यासाठी देखील त्यांनी मला प्रोत्साहन दिलं.—स्तोत्र ११९:३७.

एके दिवशी माझ्यासोबत काम करणाऱ्यांना मी एकत्र बोलावलं. जेव्हा ते सर्व जमले तेव्हा मी त्यांना दारू पिण्याचं व्यसन असणाऱ्या दोघांना बियर द्यायला सांगितली. तेव्हा सर्व जण माझ्यावर ओरडू लागले: “तू हे कसं करू शकतोस? ही माणसं हे व्यसन सोडण्याचा किती प्रयत्न करत आहेत माहीत आहे ना!” मी म्हणालो: “हो, आणि मीही तसाच प्रयत्न करत आहे.” त्या दिवशी त्यांना कळलं की मी पोर्नोग्राफीच्या व्यसनाशी लढत आहे आणि त्यांनी माझ्यावर दबाव टाकणं बंद केलं.

यहोवाच्या मदतीने मी हळू-हळू पोर्नोग्राफीच्या व्यसनावर मात करू शकलो. १९९९ मध्ये माझा बाप्तिस्मा झाला आणि मी एक यहोवाचा साक्षीदार बनलो. मला चांगलं जीवन जगण्याची दुसरी संधी मिळाली यासाठी मी यहोवाचा खूप आभारी आहे.

मला ज्या गोष्टी आवडायच्या त्यांचा यहोवाला द्वेष का आहे हे मला समजलं. एका प्रेमळ पित्याप्रमाणे, त्याला पोर्नोग्राफीमुळे होणाऱ्या नुकसानापासून माझं संरक्षण करायचं होतं. बायबलमधील नीतिसूत्रे ३:५, ६ या वचनात जे म्हटलं आहे ते शंभर टक्के बरोबर आहे. तिथं असं म्हटलं आहे: “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको; तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.” खरंच बायबलमध्ये दिलेल्या स्तरांमुळे आपलं संरक्षण तर होतच पण आपण यशस्वी होऊ असा भरवसाही मिळतो.—स्तोत्र १:१-३.

मला झालेला फायदा:

जीवनात मागे पाहिलं तर मला स्वतःचीच लाज वाटते, पण आता माझ्याकडे आत्मसन्मान आणि मनःशांती आहे. आज मी नैतिक स्तरांनुसार जीवन जगतो. यहोवाने मला क्षमा केलं आहे तसंच तो मला साहाय्य करतो याची मला जाणीव होते. २००० साली माझं एका सुंदर ख्रिस्ती स्त्रीशी, करॉलीनशी लग्न झालं. तिचंदेखील यहोवावर तितकंच प्रेम आहे. आमच्या घरात शांतीचं वातावरण आहे. पूर्ण जगभरात पसरलेल्या शुद्ध आणि प्रेमळ ख्रिस्ती बांधवांच्या कुटुंबाचा भाग असणं हा आमच्यासाठी खरोखर एक विशेषाधिकार आहे. (wp16-E No. 4)