व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मानसिक आजाराचा सामना करणाऱ्‍यांना आपण कशी मदत करू शकतो?

मानसिक आजाराचा सामना करणाऱ्‍यांना आपण कशी मदत करू शकतो?

बायबल म्हणतं: “खरा मित्र नेहमी प्रेम करतो; दुःखाच्या प्रसंगी तो भावासारखा होतो.”​—नीतिवचनं १७:१७.

याचा काय अर्थ होतो?

आपला एखादा मित्र किंवा मैत्रिण, किंवा मग जवळची व्यक्‍ती एखाद्या मानसिक आजाराचा सामना करत असेल, तर आपल्यालाही कधीकधी हतबल झाल्यासारखं वाटू शकतं. पण त्या आजाराचा सामना करण्यासाठी जेव्हा आपण त्यांना मदत करत असतो, तेव्हा आपल्याला त्यांची किती काळजी आहे हे दिसून येतं. मग आपण त्यांना कशी मदत करू शकतो?

यामुळे कशी मदत होऊ शकते?

“ऐकायला उत्सुक” असा.​—याकोब १:१९.

अशांना मदत करायचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे जेव्हा त्यांना बोलावंसं वाटतं तेव्हा त्यांचं शांतपणे ऐकणं. त्यांनी बोललेल्या प्रत्येक गोष्टीवर आपण प्रतिक्रिया दिलीच पाहिजे असं नाही. त्यांच्या बोलण्याकडे तुमचं लक्ष आहे आणि त्यांच्याबद्दल तुम्हाला काळजी आहे हे त्यांना कळू द्या. मनात कोणताही पूर्वग्रह ठेवू नका आणि त्यांच्या बोलण्याचा हाच अर्थ असेल असा लगेच निष्कर्ष काढू नका. शिवाय, हेही लक्षात घ्या की भावनेच्या भरात ते असं काहीतरी बोलून जातील ज्याबद्दल त्यांना नंतर वाईट वाटेल. पण तुम्ही त्यांच्या भावना समजून घ्यायचा प्रयत्न करा.​—ईयोब ६:२, ३.

“सांत्वन करा.”​—१ थेस्सलनीकाकर ५:१४.

तुमचा मित्र किंवा मैत्रिण कदाचित चिंतेशी झगडत असेल किंवा त्यांना कमीपणाची भावना सतावत असेल. अशा वेळी त्यांना काय बोलावं हे जरी कळत नसलं, तरी तुम्हाला त्यांची काळजी वाटते याची त्यांना खात्री करून द्या. त्यामुळे त्यांना हायसं वाटेल आणि उभारी मिळेल.

“खरा मित्र नेहमी प्रेम करतो.”​—नीतिवचनं १७:१७.

वेगवेगळ्या मार्गांनी मदत करा. त्यांना कशी मदत हवी आहे याचा अंदाज बांधण्याऐवजी त्यांना विचारा. तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला ते सांगायला अवघड जात असेल, तर काही गोष्टी सोबत मिळून करण्यासाठी तुम्ही त्यांना सुचवू शकता. मग ते सोबत मिळून फेरफटका मारायला जाणं असो, घराची स्वच्छता किंवा इतर कामं करणं असो.​—गलतीकर ६:२.

“सहनशीलतेने वागा.”​—१ थेस्सलनीकाकर ५:१४.

कधीकधी तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला बोलावंसं वाटणार नाही. पण त्यांना जेव्हा बोलावंसं वाटेल तेव्हा त्यांचं ऐकायला तुम्ही नेहमी तयार असाल हे त्यांना सांगा. लक्षात असू द्या, की मानसिक आजारामुळे ते असं काहीतरी बोलतील किंवा करतील ज्यामुळे तुम्हाला वाईट वाटेल. जसं की तुम्ही काहीतरी करायचं ठरवलं असेल आणि ते अचानक तुम्हाला नाही म्हणतील किंवा तुमच्यावर चिडतील. अशा वेळी त्यांना मदत करत असताना त्यांच्याशी सहनशीलतेने वागा आणि त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करा.​—नीतिवचनं १८:२४.

तुमच्या मदतीने फरक पडू शकतो

“मी नेहमी माझ्या मैत्रिणीचं ऐकायला तयार असते. तिच्या समस्येचा माझ्याजवळ काही तोडगा नसला, तरी मी तिचं नेहमी लक्ष देऊन ऐकायचा प्रयत्न करते. कधीकधी तिला फक्‍त ऐकणारं कोणीतरी हवं असतं आणि त्यामुळे तिचं मन हलकं होतं.”​—ईटिंग आणि अँग्झायटी डिसऑर्डर, तसंच क्लिनीकल डिप्रेशन असलेल्या एका रुग्णाची मैत्रीण, फराह. a

“माझी एक मैत्रिण खूप चांगली आहे. तिने मला घरी जेवायला बोलवलं होतं आणि खूप सुंदर जेवण केलं होतं. मला तिथे गेल्यानंतर खूप बरं वाटलं आणि त्यामुळे तिच्याशी मनमोकळेपणाने बोलता आलं. मला काय वाटतंय ते मी तिला सांगू शकले. खरंच माझं मन खूप हलकं झालं आणि त्यामुळे मला खूप छान वाटलं!”​—क्लिनीकल डिप्रेशन या आजाराचा सामना करणारी हायून.

“सहनशील असणं खूप महत्त्वाचंय. कधीकधी माझी बायको असं काहीतरी करते ज्यामुळे मला राग येतो. पण मी ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवतो, की तिचा मूळ स्वभाव तसा नाही, तर ती तिच्या आजारपणामुळे असं करत आहे. त्यामुळे मला शांत राहायला आणि तिला समजून घ्यायला मदत होते.”​—क्लिनीकल डिप्रेशनचा सामना करणाऱ्‍या एका स्त्रीचा पती, जेकब.

“माझ्या बायकोने मला खूप चांगली साथ दिली. तिच्यामुळे मला खूप आधार मिळाला. जेव्हा चिंतेमुळे मी खूप अस्वस्थ होतो तेव्हा ती मला असं काहीही करायला सांगत नाही जे करायची माझी इच्छा नसते. आणि त्यामुळे कधीकधी तिला तिच्या आवडीच्या काही गोष्टी करता येत नाहीत. तिचा हा त्याग खूप मोठा आहे. तिने मोठ्या मनाने मला जी साथ दिली त्याची तुलना कशाशीच करता येणार नाही.”​—नैराश्‍याचा (अँग्झायटी डिसऑर्डरचा) सामना करणारा एनरिको.

a काही नावं बदलण्यात आली आहेत.