व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

१ | प्रार्थना—“आपल्या सगळ्या चिंता त्याच्यावर टाकून द्या”

१ | प्रार्थना—“आपल्या सगळ्या चिंता त्याच्यावर टाकून द्या”

बायबल म्हणतं: “आपल्या सगळ्या चिंता [देवावर] टाकून द्या, कारण त्याला तुमची काळजी आहे.”​—१ पेत्र ५:७.

याचा काय अर्थ होतो?

यहोवा आपल्याला सांगतो की आपल्या मनावर कोणतंही ओझं असलं तरी आपण त्याबद्दल त्याच्याशी बोलू शकतो. (स्तोत्र ५५:२२) कोणत्याही लहान-मोठ्या समस्येबद्दल आपण त्याला प्रार्थना करू शकतो. जर आपल्याला एखादी गोष्ट महत्त्वाची वाटते, तर यहोवालाही ती महत्त्वाची वाटते कारण त्याला आपली काळजी आहे. मनाची शांती मिळण्यासाठी यहोवाला प्रार्थना करणं खूप महत्त्वाचंय.​—फिलिप्पैकर ४:६, ७.

यामुळे कशी मदत होऊ शकते?

जर आपण मानसिक आरोग्याच्या एखाद्या समस्येचा सामना करत असलो, तर आपल्याला खूप एकटं वाटू शकतं. सहसा आपल्याला जो त्रास होतोय तो इतर जण पूर्णपणे समजू शकत नाहीत. (नीतिवचनं १४:१०) पण जेव्हा आपण देवाजवळ आपलं मन मोकळं करतो आणि आपल्याला नेमकं कसं वाटतंय हे त्याला सांगतो, तेव्हा तो आपलं ऐकतो आणि आपल्या भावना समजून घेतो. यहोवा आपल्याकडे लक्ष देतो. आपल्याला जो त्रास होतोय, आपल्या भावनांशी आपल्याला जो संघर्ष करावा लागतोय त्याची त्याला पूर्णपणे जाणीव आहे. आपल्याला कोणत्याही गोष्टीची चिंता वाटत असली तरी आपण त्याबद्दल त्याला प्रार्थना करावी अशी त्याची इच्छा आहे.​—२ इतिहास ६:२९, ३०.

जेव्हा आपण प्रार्थना करून यहोवाशी बोलतो, तेव्हा त्याला आपली काळजी आहे यावरचा आपला भरवसा आणखीनच वाढतो. बायबलच्या एका लेखकाने म्हटलं: “तू माझं दुःख पाहिलं आहेस; मला होणाऱ्‍या यातना तू जाणतोस.” (स्तोत्र ३१:७) प्रार्थना केल्यामुळे आपल्यालाही असंच वाटू शकतं. यहोवाला आपलं दुःख कळतं, या नुसत्या जाणिवेमुळेही आपल्याला कठीण परिस्थितीत खूप आधार मिळतो. तो फक्‍त आपलं दुःख पाहतच नाही तर इतर कोणत्याही व्यक्‍तीपेक्षा तो आपली परिस्थिती जास्त चांगल्या प्रकारे समजू शकतो. तसंच, बायबलमधून सांत्वन आणि प्रोत्साहन मिळवायलाही तो आपल्याला मदत करतो.