व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

विश्वासू राहिल्यास देवाची स्वीकृती मिळते

विश्वासू राहिल्यास देवाची स्वीकृती मिळते

“विश्वासाच्या व धीराच्या योगे जे अभिवचनांचा वारसा उपभोगणारे होतात त्यांचे तुम्ही अनुकारी व्हावे.”—इब्री ६:१२.

गीत क्रमांक: ३, ५४

१, २. इफ्ताह आणि त्याच्या मुलीसमोर कोणता कठीण प्रसंग निर्माण झाला?

एक तरुण स्त्री आपल्या वडिलांना भेटण्यासाठी धावत येत आहे. लढाईतून यशस्वीपणे सुखरूप परतलेल्या आपल्या वडिलांना पाहून ती खूप खूश आहे. आनंदाच्या भरात ती नाचत आणि गाणी गात बाहेर येते. पण, इतक्यात असं काहीतरी घडतं ज्यामुळे तिला कदाचित खूप आश्चर्य वाटलं असेल. तिचे वडील आपली वस्त्रे फाडतात आणि तिला अगदी विव्हळ होऊन म्हणतात: “हाय, हाय! मुली, तू माझे मन खचवले आहे.” आपण यहोवाला दिलेल्या वचनामुळे आता आपल्या मुलीचं पूर्ण आयुष्यच बदलून जाईल हे त्यांना माहीत होतं आणि हीच गोष्ट ते आपल्या मुलीला सांगतात. त्यांनी दिलेल्या वचनामुळे आता तिला लग्न करणं आणि मुलांना जन्म देणं शक्य नव्हतं. पण, यावर तिची प्रतिक्रिया काय होती? तिनं आपल्या वडिलांना जे उत्तर दिलं त्यामुळे त्यांना यहोवाला दिलेल्या वचनानुसार करण्याचं उत्तेजन मिळालं. यासोबतच, यहोवाच्या तिच्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या चांगल्याच आहेत, याची तिला पूर्ण खात्री असल्याचं तिच्या उत्तरावरून दिसून आलं. (शास्ते ११:३४-३७) तिचा विश्वास पाहून तिच्या वडिलांना नक्कीच तिचा अभिमान वाटला असेल. ती स्वखुशीनं त्याग करण्यास तयार असल्यामुळे यहोवाचं मन आनंदित होईल हेदेखील त्यांना माहीत होतं.

इफ्ताह आणि त्याच्या मुलीचा यहोवावर आणि त्याच्या मार्गांवर पूर्ण भरवसा होता. ते त्याला अगदी कठीण परिस्थितीतही विश्वासू राहिले. त्यांच्यासाठी यहोवाची पसंती मिळवणं सर्वात जास्त महत्त्वाचं होतं आणि त्यासाठी कोणताही त्याग करण्यास ते तयार होते.

३. इफ्ताह आणि त्याच्या मुलीच्या उदाहरणामुळे आपल्याला कशी मदत होऊ शकते?

यहोवाला विश्वासू राहणं नेहमीच सोपं नसतं. बायबल म्हणतं, की आपल्याला आपला “विश्वास टिकवण्यासाठी लढत” राहण्याची गरज आहे. (यहू. ३, ईझी-टू-रीड व्हर्शन) असं करण्यासाठी आपल्याला इफ्ताह आणि त्याच्या मुलीच्या उदाहरणातून मदत मिळेल. तेव्हा, त्यांनी कशा प्रकारे त्यांच्या जीवनात आलेल्या परीक्षांचा धीरानं सामना केला याबद्दल थोडी चर्चा करू या. ते यहोवाला कशा प्रकारे विश्वासू राहिले?

जगाच्या प्रभावाखाली असूनही विश्वासू राहणं

४, ५. (क) यहोवानं इस्राएली लोकांना कोणती आज्ञा दिली होती? (ख) स्तोत्र १०६ मध्ये सांगितल्यानुसार, इस्राएली लोकांनी केलेल्या बंडामुळे त्यांना कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागला?

इस्राएली लोकांनी यहोवाची आज्ञा मोडल्यामुळे जे परिणाम घडून आले, याची दररोज इफ्ताहाला आणि त्याच्या मुलीला आठवण होत असावी. जवळजवळ ३०० वर्षांआधी यहोवानं इस्राएली लोकांना, वचन दिलेल्या देशात असलेल्या सर्व खोट्या उपासकांना ठार मारण्याची आज्ञा दिली होती. पण, त्यांनी त्याच्या आज्ञेचं पालन केलं नाही. (अनु. ७:१-४) अनेक इस्राएली लोक खोट्या देवतांची उपासना करणाऱ्या आणि अनैतिक जीवन जगणाऱ्या कनानी लोकांचं अनुकरण करू लागले होते.—स्तोत्र १०६:३४-३९ वाचा.

इस्राएली लोक अविश्वासू होते. म्हणून, यहोवानं शत्रूंपासून त्यांचा बचाव केला नाही. (शास्ते २:१-३, ११-१५; स्तो. १०६:४०-४३) या कठीण काळात यहोवावर प्रेम करणाऱ्या कुटुंबांना त्याला विश्वासू राहणं कठीण गेलं असेल. असं असलं, तरी त्या काळातही विश्वासू लोक होते असं बायबलमध्ये सांगण्यात आलं आहे. उदाहरणार्थ, इफ्ताह, त्याची मुलगी, एलकाना, हन्ना आणि शमुवेल यांच्यासारख्या विश्वासू जणांचा उल्लेख बायबलमध्ये करण्यात आला आहे. या सर्वांनी यहोवाचं मन आनंदित करण्याचा निर्धार केला होता.—१ शमु. १:२०-२८; २:२६.

६. आज जगात कोणती प्रवृत्ती दिसून येते आणि आपण काय करण्याची गरज आहे?

आज आपल्या काळातील लोकांचीही विचारसरणी आणि वागणूक कनानी लोकांसारखी आहे. त्यांचं जीवन पैसा, हिंसा आणि अनैतिकता यांवरच केंद्रित आहे. पण यहोवा आपल्याला स्पष्ट ताकीद देतो. ज्या प्रकारे इस्राएली लोकांना अशा वाईट प्रभावापासून वाचवण्याची त्याची इच्छा होती, त्याच प्रकारे आपलंही संरक्षण करण्याची त्याची इच्छा आहे. त्यामुळे, इस्राएली लोकांकडून ज्या चुका झाल्या त्या आपल्या हातून होऊ नयेत म्हणून आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. (१ करिंथ. १०:६-११) जगाच्या विचारसरणीचा विरोध करण्यासाठी जे काही करता येईल ते आपण केलंच पाहिजे. (रोम. १२:२) असं करण्यासाठी तुम्ही कसोशीनं प्रयत्न करण्यास तयार आहात का?

निराशेचा सामना करूनही इफ्ताह विश्वासू राहिला

७. (क) इफ्ताहाला त्याच्या स्वतःच्या लोकांकडून कशा प्रकारची वागणूक मिळाली? (ख) इफ्ताहानं कशी प्रतिक्रिया दाखवली?

इफ्ताहाच्या काळात इस्राएली लोक यहोवाला अविश्वासू होते. त्यामुळे, पलिष्टी आणि अम्मोनी लोकांच्या छळाचा त्यांना सामना करावा लागला. (शास्ते १०:७, ८) यासोबतच, इफ्ताहाला त्याच्या स्वतःच्या भावांकडून आणि इस्राएलचं नेतृत्व करणाऱ्या लोकांकडून विरोध झाला. इफ्ताहाचे भाऊ त्याचा द्वेष करायचे आणि त्यांना त्याचा हेवा वाटायचा. याच कारणामुळे त्यांनी इफ्ताहाला त्याच्या हक्काच्या जागेतून घालवून दिलं. (शास्ते ११:१-३) पण, त्यांच्या या वाईट वागणुकीचा इफ्ताहानं स्वतःवर परिणाम होऊ दिला नाही. आपण हे कशावरून म्हणू शकतो? जेव्हा इस्राएलचे वडीलजन त्याच्याजवळ मदत मागण्याकरता आले, तेव्हा तो ताबडतोब त्यांची मदत करण्यासाठी तयार झाला. (शास्ते ११:४-११) अशा प्रकारची प्रतिक्रिया दाखवण्यासाठी इफ्ताहाला कशामुळे प्रेरणा मिळाली असावी?

८, ९. (क) मोशेच्या नियमशास्त्रातील कोणत्या तत्त्वांमुळे इफ्ताहाला मदत झाली असावी? (ख) इफ्ताहासाठी कोणती गोष्ट सर्वात जास्त महत्त्वाची होती?

इफ्ताह एक शूर योद्धा होता. त्याला इस्राएली लोकांचा इतिहास आणि मोशेचं नियमशास्त्र चांगल्या प्रकारे माहीत होतं. यहोवा आपल्या लोकांशी ज्या प्रकारे वागला त्यावरून बऱ्या-वाईटाबद्दलचे त्याचे स्तर काय आहेत ते इफ्ताहाला समजले होते. (शास्ते ११:१२-२७) आणि या माहितीच्या आधारावरच इफ्ताहानं आपल्या जीवनात निर्णय घेतले. द्वेष बाळगण्याच्या आणि बदला घेण्याच्या वृत्तीबद्दल यहोवाला कसं वाटतं हे इफ्ताहाला अगदी चांगल्या प्रकारे माहीत होतं. तसंच, आपण एकमेकांवर प्रेम केलं पाहिजे अशी देवाची इच्छा आहे हेदेखील त्याला माहीत होतं. यासोबतच, आपण इतरांशी, खासकरून जे आपला द्वेष करतात त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे हे त्याला नियमशास्त्रामुळे समजलं होतं.—निर्गम २३:५; लेवीय १९:१७, १८ वाचा.

इफ्ताहाला योसेफाच्या उदाहरणावरूनही बरीच मदत झाली असावी. योसेफाचे भाऊ त्याचा द्वेष करत असले तरी तो त्यांच्याशी दयाळूपणे कसा वागला हे त्याला शिकायला मिळालं असेल. (उत्प. ३७:४; ४५:४, ५) या उदाहरणावर विचार केल्यामुळे, यहोवाचं मन आनंदित होईल अशा प्रकारे वागण्यास इफ्ताहाला मदत झाली असेल. आपल्या भावांच्या वागणुकीमुळे इफ्ताहाला नक्कीच खूप दुःख झालं असेल. पण, स्वतःच्या भावनांपेक्षा यहोवाच्या नावाकरता आणि त्याच्या लोकांच्या वतीनं लढणं इफ्ताहासाठी जास्त महत्त्वाचं होतं. (शास्ते ११:९) यहोवाला विश्वासू राहण्याचा त्याचा पक्का निर्धार होता. त्यामुळेच, त्याला आणि इस्राएली लोकांना यहोवाकडून आशीर्वाद प्राप्त करणं शक्य झालं.—इब्री ११:३२, ३३.

१०. ईश्वरी तत्त्वं आपल्याला एक ख्रिस्ती या नात्यानं जगण्यास कशा प्रकारे मदत करू शकतात?

१० मग, इफ्ताहाच्या उदाहरणाचं तुम्हालासुद्धा अनुकरण करावंसं वाटतं का? एखाद्या ख्रिस्ती बांधवानं तुमचं मन दुखावलं असेल, तेव्हा काय? किंवा, ते तुमच्याशी चांगल्या प्रकारे वागत नाहीत असं तुम्हाला वाटत असेल, तर काय? अशा वेळी नक्कीच तुम्हाला वाईट वाटेल. पण, त्यामुळे यहोवाची सेवा करण्याचं थांबवू नका. ख्रिस्ती सभांना जाण्याचं आणि मंडळीत एकमेकांसोबत वेळ घालवण्याचं सोडू नका. याउलट, इफ्ताहाच्या उदाहरणाचं अनुकरण करून यहोवाच्या आज्ञांचं पालन करा. यामुळे, कठीण प्रसंगांचा सामना करण्यास तुम्हाला मदत होईल आणि इतरांसमोर तुमचं चांगलं उदाहरण असेल.—रोम. १२:२०, २१; कलस्सै. ३:१३.

मनापासून केलेले त्याग आपल्या विश्वासाचा पुरावा देतात

११, १२. इफ्ताहानं कोणतं वचन दिलं, आणि त्याचा काय अर्थ होता?

११ यहोवाच्या मदतीशिवाय इस्राएलांना अम्मोनी लोकांच्या हातून सोडवणं शक्य नाही हे इफ्ताहाला माहीत होतं. त्यामुळे त्यानं यहोवाकडे मदत मागितली. शिवाय, त्यानं यहोवाला असं वचनदेखील दिलं की जर त्याला विजय मिळाला तर घरी गेल्यावर जी व्यक्ती सर्वात प्रथम बाहेर येईल, तिला तो यहोवाकरता “हवन” किंवा होमार्पण म्हणून देईल. (शास्ते ११:३०, ३१) याचा काय अर्थ होतो?

१२ मानवांचं बलिदान देणं यहोवाला मुळीच मान्य नाही. यावरून हे तर स्पष्ट आहे की इफ्ताह खरोखर त्या व्यक्तीचं होमार्पण करणार नव्हता. (अनु. १८:९, १०) मोशेच्या नियमशास्त्रानुसार, होमार्पण ही एक अशी खास भेट होती जी पूर्णपणे यहोवाला दिली जायची. तेव्हा, इफ्ताह ज्या व्यक्तीला अर्पण म्हणून देणार होता ती व्यक्ती संपूर्ण आयुष्य निवासमंडपात यहोवाची सेवा करणार होती. यहोवानं इफ्ताहाचं ऐकलं आणि त्याला लढाईत पूर्णपणे विजय मिळवून दिला. (शास्ते ११:३२, ३३) मग आता इफ्ताह कोणाला अर्पण म्हणून देणार होता?

१३, १४. शास्ते ११:३५ मधील इफ्ताहाच्या शब्दांवरून त्याचा विश्वास कसा दिसून येतो?

१३ या लेखाच्या सुरवातीला दिलेल्या दृश्याचा विचार करा. इफ्ताह लढाईतून परत आला तेव्हा जी व्यक्ती सर्वात प्रथम त्याला भेटायला आली, ती त्याची लाडकी आणि त्याची एकुलती एक मुलगी होती! तर मग अशा परिस्थितीत इफ्ताह, त्यानं दिलेलं वचन पाळणार होता का? यहोवाची आयुष्यभर सेवा करण्यासाठी तो आपल्या मुलीला निवासमंडपात पाठवणार होता का?

१४ या वेळीही देवाच्या नियमशास्त्रातील तत्त्वांमुळेच त्याला योग्य निर्णय घेण्यासाठी मदत झाली असेल. त्याला कदाचित निर्गम २३:१९ मधील शब्दांची आठवण झाली असेल. देवाच्या सेवकांनी आपल्याजवळ असणारी सर्वोत्तम गोष्ट त्याला दिली पाहिजे, असं त्यात सांगितलं होतं. शिवाय, एखाद्यानं यहोवाला वचन दिल्यास त्यानं “आपली शपथ मोडू नये; जे काही तो बोलला असेल त्याप्रमाणे त्याने करावे,” असंही नियमशास्त्रात सांगण्यात आलं होतं. (गण. ३०:२) इफ्ताहानं कदाचित त्याच्याच काळात हयात असलेल्या विश्वासू हन्नाप्रमाणे आपलं वचन पाळलं. त्याला आणि त्याच्या मुलीला कोणते त्याग करावे लागतील याची पूर्ण जाणीव असूनही तो मागे हटला नाही. त्याची मुलगी निवासमंडपात सेवा करणार होती यामुळे तिला मुलं असणार नव्हती. याचा अर्थ, इफ्ताहाचा वंश पुढे चालणार नव्हता आणि त्याला कोणीच वारस उरणार नव्हता. (शास्ते ११:३४) असं असूनही इफ्ताहानं अगदी विश्वासूपणे म्हटलं: “परमेश्वराला मी शब्द दिला आहे; आता मला माघार घेता येत नाही.” (शास्ते ११:३५) इफ्ताहानं दिलेल्या या मोठ्या बलिदानाचा यहोवानं स्वीकार केला आणि त्याला आशीर्वाद दिला. तुम्ही इफ्ताहाच्या जागी असता तर तुम्हीसुद्धा त्याच्याप्रमाणेच विश्वासू राहिला असता का?

१५. आपल्यापैकी बहुतेकांनी कोणतं वचन दिलं आहे, आणि आपणही विश्वासू असल्याचं कसं दाखवू शकतो?

१५ यहोवाला आपलं जीवन समर्पित करताना, नेहमी त्याची इच्छा पूर्ण करत राहण्याचं वचन आपण त्याला दिलं होतं. आणि हे वचन पूर्ण करणं नेहमीच सोपं असणार नाही याची जाणीवही आपल्याला होती. तर मग, आपल्याला न आवडणारं असं एखादं काम दिलं जातं, तेव्हा आपली प्रतिक्रिया कशी असते? अशा वेळी जर आपण आपल्या भावनांवर मात केली आणि देवाची आज्ञा पाळली, तर आपण दिलेल्या वचनानुसार वागत आहोत हे दिसून येईल. काही त्याग करणं कदाचित आपल्यासाठी कठीण असेल. पण, त्याच्या तुलनेत यहोवाकडून मिळणारे आशीर्वाद आपल्यासाठी जास्त मोलाचे असतात. (मला. ३:१०) इफ्ताहाच्या मुलीबद्दल काय? आपल्या वडिलांनी दिलेल्या वचनाबद्दल तिची काय प्रतिक्रिया होती?

इफ्ताह आणि त्याच्या मुलीप्रमाणे आपण विश्वास असल्याचं कसं दाखवू शकतो? (परिच्छेद १६, १७ पाहा)

१६. इफ्ताहानं दिलेल्या वचनाबद्दल त्याच्या मुलीनं कशी प्रतिक्रिया दाखवली? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

१६ इफ्ताहानं दिलेलं वचन हन्नानं दिलेल्या वचनापेक्षा वेगळं होतं. तिनं असं वचन दिलं होतं, की शमुवेलाला ती नाजीर म्हणून निवासमंडपात सेवा करण्यासाठी पाठवेल. (१ शमु. १:११) नाजीर लग्न करू शकत होते आणि पुढे कुटुंबही वाढवू शकत होते. पण, इफ्ताहाच्या मुलीबद्दल असं नव्हतं. तिला ‘होमार्पण’ म्हणून देण्यात आलं होतं. म्हणजे ती पूर्णपणे दिलेलं अर्पण होती. यामुळे पत्नी आणि आई बनण्याच्या आनंदाचा तिला त्याग करावा लागणार होता. (शास्ते ११:३७-४०) तिचे वडील इस्राएलचं नेतृत्व करत असल्यामुळे ती सर्वात चांगल्या पुरुषासोबत लग्न करू शकली असती. पण, आता तिला निवासमंडपात एक दासी म्हणून राहायचं होतं. मग, या तरुण स्त्रीनं कशी प्रतिक्रिया दाखवली? तिनं आपल्या वडिलांना म्हटलं: “तुमच्या तोंडातून निघालेल्या शब्दाप्रमाणे माझ्या बाबतीत करा.” तिच्या या शब्दांवरून, यहोवाची सेवा तिच्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाची होती हे दिसून आलं. (शास्ते ११:३६) यहोवाची सेवा करता यावी म्हणून, पती आणि मुलं असण्याच्या आपल्या नैसर्गिक इच्छेचा तिनं त्याग केला. तिच्या या स्वार्थत्यागी मनोवृत्तीचं आपण कशा प्रकारे अनुकरण करू शकतो?

१७. (क) इफ्ताह आणि त्याच्या मुलीनं दाखवलेल्या विश्वासाचं आपण कसं अनुकरण करू शकतो? (ख) इब्री लोकांस ६:१०-१२ या वचनांतून स्वार्थत्यागी वृत्ती दाखवण्याची प्रेरणा आपल्याला कशी मिळते?

१७ आजदेखील असे हजारो स्त्री पुरुष आहेत जे तरुण असतानाही अविवाहित राहण्याचं निवडतात किंवा काही अशी जोडपी आहेत जी आपलं कुटुंब वाढवत नाही. का बरं? कारण, यहोवाची सेवा करण्यापासून आपलं लक्ष विचलित होऊ नये अशी त्यांची इच्छा आहे. तसंच, असे बरेच बंधुभगिनी आहेत जे आपल्या मुलांमागं किंवा नातवंडांमागं आपला वेळ आणि शक्ती घालवण्याऐवजी यहोवाच्या सेवेत ती खर्च करतात. त्यांच्यापैकी काही जण बांधकाम प्रकल्पात काम करतात. तर काही सुवार्तिकांसाठी असलेल्या प्रशालेला उपस्थित राहून प्रचारकांची जास्त गरज असलेल्या मंडळीत जाऊन सेवा करतात. इतर काही जण स्मारकविधीच्या काळात आपलं सेवाकार्य वाढवण्याचा प्रयत्न करतात. यहोवाची सेवा करण्यासाठी हे विश्वासू जण मनापासून जे त्याग करत आहेत ते तो कधीच विसरणार नाही. (इब्री लोकांस ६:१०-१२ वाचा.) तुमच्याबाबतीत काय? यहोवाची आणखी जास्त सेवा करता यावी म्हणून तुम्हीही काही त्याग करण्यासाठी तयार आहात का?

आपण काय शिकलो?

१८, १९. इफ्ताह आणि त्याच्या मुलीच्या अहवालातून आपल्याला काय शिकायला मिळालं, आणि आपण त्यांचं अनुकरण कसं करू शकतो?

१८ परीक्षांचा सामना करण्यासाठी इफ्ताहाला कशी मदत झाली? त्यानं नेहमी यहोवाच्या मार्गदर्शनानुसार निर्णय घेतले. त्याच्या आजूबाजूला असलेल्या लोकांचा त्यानं स्वतःवर प्रभाव पडू दिला नाही. इतरांनी इफ्ताहाचं मन दुखावलं तरीसुद्धा तो विश्वासू राहिला. इफ्ताह आणि त्याच्या मुलीनं मनापासून जे त्याग केले होते त्यासाठी यहोवानं त्यांना आशीर्वादित केलं. शिवाय, खऱ्या उपासनेसाठी त्यानं त्या दोघांचा उपयोग केला. इतरांनी योग्य ते करण्याचं सोडून दिलं असलं तरीही इफ्ताह आणि त्याची मुलगी यहोवाला विश्वासू राहिले.

१९ बायबल म्हणतं की “विश्वासाच्या व धीराच्या योगे जे अभिवचनांचा वारसा उपभोगणारे होतात त्यांचे तुम्ही अनुकारी व्हावे.” (इब्री ६:१२) तेव्हा, आपण इफ्ताह आणि त्याच्या मुलीचं अनुकरण करत राहू या. आणि विश्वासू राहिल्यास यहोवा आपल्याला आशीर्वाद देईल अशी खात्री बाळगू या.