व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जीवन कथा

पूर्वीच्या नन्स आज खऱ्या आध्यात्मिक बहिणी बनल्या

पूर्वीच्या नन्स आज खऱ्या आध्यात्मिक बहिणी बनल्या

“एक शब्द बोलू नकोस, तुझ्या धर्माबद्दल मला काहीएक ऐकायचं नाहीए. वीट आलाय मला तुझं ऐकून!” माझी लहान बहीण अॅरासेली माझ्यावर खेकसली. हे शब्द मला किती बोचले होते, ते आज मला ९१ वर्षांची असतानाही आठवतंय. पण उपदेशक ७:८ मध्ये म्हटलं आहे, की “एखाद्या गोष्टीच्या आरंभापेक्षा तिचा शेवट बरा.” आणि आमच्या बाबतीत हे अगदी खरं ठरलं!—फेलीसा.

फेलीसा: मी स्पेनमधल्या एका धार्मिक कुटुंबात लहानाची मोठी झाले. माझ्या घरची परिस्थिती बेताची होती. आम्ही कॅथलिक होतो. खरंतर माझ्या नातेवाइकांमधील १३ जण एकतर पाळक किंवा चर्चसाठी काम करणारे होते. पोप जॉन पॉल दुसरे, यांनी तर माझ्या चुलत मामाला त्याच्या मृत्यूनंतर संत म्हणून घोषित केलं होतं. माझा मामा एक पाळक होता आणि एका कॅथलिक शाळेत शिकवण्याचं काम करायचा. माझे वडील लोहार काम करायचे आणि माझी आई शेतावर काम करायची. आम्हा आठ मुलांमध्ये मी सर्वात मोठी होते.

मी बारा वर्षांची होते तेव्हा स्पेनमध्ये एक देशांतर्गत युद्ध भडकलं. या युद्धानंतर माझ्या वडिलांना तुरुंगात टाकण्यात आलं. कारण त्यांचं राजकारणी धोरण हुकूमशाही सरकारला मान्य नव्हतं. त्यामुळे पुढे कुटुंबाचा भार माझ्या आईलाच वाहावा लागला. कुटुंबाच्या पोटापाण्यासाठी तिलाच झटावं लागलं. तेव्हा अॅरासेली, लॉरी आणि रॅमोनी या माझ्या तीन लहान बहिणींना, स्पेनमधील बिल्बाओ इथल्या कॉनव्हेंटमध्ये पाठवावं असं एका मैत्रिणीनं तिला सुचवलं. त्या तिथं उपाशी तर नक्कीच राहणार नाहीत, असं तिचं म्हणणं होतं.

अॅरासेली: त्या वेळी मी १४ वर्षांची, लॉरी १२ वर्षांची आणि रॅमोनी १० वर्षांची होती. कुटुंबापासून वेगळं होणं आमच्याकरता खूप कठीण होतं. बिल्बाओ इथं आम्हाला स्वच्छतेचं काम करावं लागायचं. दोन वर्षांनंतर, तिथल्या नन्सनी झारागोझामधील एका मोठ्या कॉनव्हेंटमध्ये आमची बदली केली. वृद्धांची काळजी घेतल्या जाणाऱ्या त्या कॉनव्हेंटमध्ये आम्हाला किचन स्वच्छ करायचं काम होतं. वयाच्या मानानं आमच्यासाठी हे काम खूपच कष्टाचं होतं.

फेलीसा: जेव्हा माझ्या बहिणी झारागोझामध्ये गेल्या, तेव्हा माझ्या आईनं आणि आमच्या भागातच पाळकाचं काम करणाऱ्या माझ्या मामानं मलाही त्याच कॉनव्हेंटमध्ये पाठवायचं ठरवलं. त्यामुळे जवळीक साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका मुलापासूनही मला दूर राहता येईल, असं त्यांचं मत होतं. मीही धार्मिक वृत्तीची होते, त्यामुळे थोड्या काळासाठी कॉनव्हेंटमध्ये राहण्याची कल्पना मलाही आवडली. मी दररोज मासला जायचे, आणि आफ्रिकेत असणाऱ्या माझ्या एका मावस भावाप्रमाणेच मिशनरी बनायचा माझा विचार होता.

डावीकडे: स्पेनमधील झारागोझा कॉनव्हेंट; उजवीकडे: बायबलचं नकार-कोलुंगा भाषांतर

पण दुसऱ्या देशात जाऊन सेवा करण्याच्या माझ्या कल्पनेला तिथल्या नन्सचा काहीच प्रतिसाद नव्हता. त्यामुळे तिथल्या वातावरणात मला कोंडल्यासारखं वाटू लागलं. म्हणून एक वर्ष झाल्यावर, पाळक असलेल्या माझ्या मामाची काळजी घेण्यासाठी मी घरी परतायचं ठरवलं. घरकामासोबतच, मी दररोज संध्याकाळी त्यांच्यासोबत रोजरी (जपमाळेची प्रार्थना) म्हणायचे. चर्चमधील मरीयेच्या आणि इतर “संतांच्या” मूर्तींना सुशोभित करायला आणि फुलांची सजावट करायलाही मला आवडायचं.

अॅरासेली: झारागोझामध्ये असताना नन बनण्यासाठी लागणाऱ्या पहिल्या शपथा मी घेतल्या. मग तिथल्या नन्सनी मला माझ्या बहिणींपासून वेगळं करायचं ठरवलं. त्यामुळे त्यांनी मला माद्रीदमधल्या कॉनव्हेंटमध्ये आणि लॉरीला वॅलेन्सीया इथल्या कॉनव्हेंटमध्ये पाठवलं. रॅमोनी मात्र झारागोझामध्येच होती. माद्रीदमध्ये नन बनण्यासाठी मी पुढच्या शपथा घेतल्या. तिथं कोनव्हेंटमध्ये राहण्यासाठी बरेच विद्यार्थी आणि वृद्ध लोक यायचे. त्यामुळे तिथं पुष्कळ काम होतं. मी कॉनव्हेंट हॉस्पिटलमध्ये काम करायचे.

मी आता एक नन म्हणून माझ्या जीवनाकडे पाहात होते. आता आमचा बहुतेक वेळ बायबलचं वाचन करण्यात आणि त्यातून बऱ्याच गोष्टी शिकण्यात जाईल, असं मला वाटलं. पण, माझा अपेक्षाभंग झाला. कारण तिथं कोणालाच बायबल वाचण्यात आणि देवाबद्दल किंवा येशूबद्दल बोलण्यात रस नव्हता. मी थोडी लॅटीन भाषा शिकून घेतली आणि कॅथलिक “संतांच्या” जीवनाचाही थोडा अभ्यास केला. मी मरीयेचीही उपासना करायचे. पण आमचा जास्तीतजास्त वेळ तिथलं कष्टाचं काम करण्यातच जायचा.

लवकरच मला घरची चिंता सतावू लागली. कॉनव्हेंटमध्ये काम करून इतर लोकांना आर्थिक फायदा करून देण्यापेक्षा, खरंतर मी माझ्या कुटुंबासाठी पैसे कमवले पाहिजेत असं मला वाटू लागलं. म्हणून मग मी मुख्य ननला याबद्दल सांगितलं आणि घरी जायची माझी इच्छा असल्याचं बोलून दाखवलं. पण तिनं मला एका खोलीत कोंडून ठेवलं. यामुळे मी शेवटी इथंच राहायला तयार होईन असं तिला वाटलं.

नन्सनी मला खोलीतून बाहेर काढलं, पण माझा विचार अजूनही बदललेला नाही हे पाहून त्यांनी मला पुन्हा खोलीत कोंडून टाकलं. असं तीनदा केल्यानंतर, मी केवळ एका अटीवरच जाऊ शकते असं त्यांनी मला सांगितलं. ती अट म्हणजे, “देवाची सेवा करण्याऐवजी मी सैतानाची सेवा करण्याचं निवडते, आणि त्यामुळे मी जात आहे,” असं लिहून देण्यास त्यांनी मला सांगितलं. या गोष्टीमुळे मला धक्काच बसला! मला खरंच जायचं होतं, पण अशी कोणतीही गोष्ट करून नाही. शेवटी, मला पाळकांशी बोलायचं आहे असं मी त्यांना सांगितलं. आणि जे काही झालं ते मी पाळकांना भेटून सांगितलं. तेव्हा त्यांनी बिशपकडून परवानगी घेतली आणि परत झारागोझा इथल्या कॉनव्हेंटमध्ये मला पाठवलं. काही महिने तिथं काढल्यानंतर, त्यांनी मला जाण्याची परवानगी दिली. यानंतर लगेचच, रॅमोनी आणि लॉरीनंही कॉनव्हेंट सोडलं.

मतभेदाचं कारण ठरलेलं पुस्तक

फेलीसा

फेलीसा: काही काळानंतर, माझं लग्न झालं आणि मी स्पेनचाच भाग असलेल्या कॅन्टाब्रीया इथं स्थायिक झाले. तेव्हासुद्धा मी न चुकता चर्चला जायचे. एके दिवशी रविवारी, चर्चमध्ये पाळकांनी एक पुस्तक सर्वांना दाखवलं आणि रागाने ते मोठ्या आवाजात म्हणाले, “या पुस्तकाकडे लक्ष द्या! जर कोणीही या पुस्तकाची प्रत तुम्हाला दिली असेल, तर लगेच माझ्याकडे आणून द्या नाहीतर फेकून द्या!” ते पुस्तक होतं, सत्य जे चिरकालिक जीवनाप्रत निरविते.

ते पुस्तक माझ्याकडे नव्हतं, पण आता ते मला हवं होतं. काही दिवसांतच, दोन स्त्रिया माझ्या घरी आल्या. त्या यहोवाच्या साक्षीदार होत्या आणि त्यांनी अगदी तेच पुस्तक मला दिलं. मी त्याच रात्री ते पुस्तक वाचून काढलं. त्या दोघी मला पुन्हा भेटायला आल्या आणि त्यांनी मला बायबल अभ्यास करायला आवडेल का, असं विचारलं. मी लगेच होकार दिला.

सत्य पुस्तक

देवाला खूश करण्याची इच्छा तर मला आधीपासूनच होती. त्यामुळे मी यहोवाबद्दलचं सत्य शिकून घेतलं आणि त्याच्याप्रती माझ्या मनात गाढ प्रेम निर्माण झालं. मला यहोवाविषयी प्रत्येकाला सांगायचं होतं. १९७३ मध्ये मी बाप्तिस्मा घेतला. जेव्हा जेव्हा मला संधी मिळायची तेव्हा तेव्हा मी माझ्या कुटुंबातल्या सदस्यांना सत्याबद्दल सांगण्याचा प्रयत्न करायचे. पण माझ्या कुटुंबानं आणि खासकरून माझी बहीण अॅरासेली हिनं माझा विरोध केला.

अॅरासेली: कॉनव्हेंटमध्ये आलेल्या वाईट अनुभवांमुळे, माझ्या धर्माबद्दल माझा दृष्टिकोन नकारात्मक बनला होता. तरीही, मी दर रविवारी चर्चला जायचे आणि दररोज रोजरी म्हणायचे. पण बायबल समजून घेण्याची इच्छा माझ्या मनात अजून तशीच होती. मी देवाला मदतीसाठी प्रार्थना केली. तेव्हा फेलीसानं शिकलेल्या सर्व गोष्टी मला सांगितल्या. तिच्या नवीन विश्वासाबद्दल ती इतकी उत्तेजित झाली होती, की तिला वेड लागलंय की काय असं मला वाटलं. ती जे काही सांगत होती, ते मला मुळीच पटण्यासारखं नव्हतं.

अॅरासेली

नंतर, मी कामाच्या निमित्तानं पुन्हा माद्रीदला गेले आणि लग्नही केलं. काही वर्षांच्या माझ्या अनुभवातून मला असं दिसलं, की नियमितपणे चर्चला जाणारे लोक खरंतर येशूच्या शिकवणींप्रमाणे मुळीच चालत नव्हते. त्यामुळे मी चर्चला जायचं सोडून दिलं. “संत” आणि नरकाग्नी यांसारख्या गोष्टींवरही मी विश्वास ठेवायचं सोडून दिलं. पाळक माझ्या पापांची क्षमा करू शकतात, असंही मला मुळीच वाटत नव्हतं. माझ्याजवळ असणाऱ्या सर्व धार्मिक चित्रांचीही मी विल्हेवाट लावली. मी योग्य तेच करत आहे का, याची मला काहीच कल्पना नव्हती. मी खूप निराश झाले, पण “हे देवा, मला तुला जाणून घ्यायचं आहे. मला कृपाकरून मदत कर!” अशी प्रार्थना मी नेहमी करत राहिले. मला आठवतंय, की बऱ्याच वेळा यहोवाचे साक्षीदार माझ्या दारावर आले, पण मी त्यांच्यासाठी कधीच दार उघडलं नाही. कारण कोणत्याच धर्मावर आता माझा विश्वास उरला नव्हता.

लॉरी फ्रान्समध्ये आणि रॅमोनी स्पेनमध्ये राहत होती. १९८० च्या आसपास, त्यांनी यहोवाच्या साक्षीदारांसोबत अभ्यास करण्यास सुरवात केली. फेलीसाप्रमाणेच तेही आता नकळतपणे खोट्या गोष्टींच्या जाळ्यात अडकत आहेत, अशी मला खात्री होती. नंतर, माझ्या शेजारीच राहणाऱ्या अॅन्जलीन्ससोबत माझी ओळख झाली आणि आमची चांगली गट्टी जमली. तीदेखील एक यहोवाची साक्षीदार होती. अॅन्जलीन्स आणि तिचा पती मला बऱ्याच वेळा बायबल अभ्यासाकरता विचारायचे. तेव्हा मला कोणत्याही धर्मात आस्था राहिली नाही असं मी त्यांना सांगायचे. पण माझ्या मनात कुठेतरी बायबलला समजून घेण्याची इच्छा दडली आहे, हे त्यांना जाणवलं. शेवटी, मी त्यांना सांगून टाकलं: “ठीक आहे! पण तुम्ही मला माझं स्वतःचं बायबल वापरू दिलं तरच मी अभ्यास करेन.” माझ्याकडे बायबलचं नकार-कोलुंगा भाषांतर होतं.

शेवटी बायबलनंच आम्हाला एकत्र आणलं

फेलीसा: १९७३ मध्ये जेव्हा माझा बाप्तिस्मा झाला, तेव्हा कॅन्टाब्रीयाची राजधानी असलेल्या सांतांडरमध्ये जवळपास ७० साक्षीदार होते. आसपासच्या शेकडो खेड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना प्रचार करण्यासाठी आम्ही खूप दूरपर्यंत प्रवास करायचो. त्यासाठी आम्ही एका गावातून दुसऱ्या गावात काही अंतर बसनं आणि नंतर कारनं प्रवास करायचो.

काही वर्षांमध्येच, मला बऱ्याच लोकांसोबत बायबल अभ्यास करता आला आणि त्यांपैकी ११ जणांनी बाप्तिस्मा घेतला. अभ्यास करणाऱ्यांपैकी बरेच जण कॅथलिक होते. त्यामुळे त्यांच्यासोबत मला खूप धीरानं वागावं लागलं. त्यांचा विश्वास चुकीचा आहे हे समजून घ्यायला, माझ्याप्रमाणेच त्यांनाही वेळ लागणार होता. केवळ बायबल आणि यहोवाचा पवित्र आत्माच एखाद्याला त्याची विचारसरणी बदलण्यास आणि सत्य शिकून घेण्यास मदत करू शकतो, हे मला माहीत आहे. (इब्री ४:१२) माझे पती, बियेनवेनिदो एक पोलीस कर्मचारी होते. १९७९ मध्ये त्यांचा बाप्तिस्मा झाला. आणि माझ्या आईनंही तिचा मृत्यू होण्याच्या काही काळाआधीच बायबल अभ्यास करण्यास सुरवात केली होती.

अॅरासेली: जेव्हा मी साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास करण्यास सुरवात केली, तेव्हा त्यांच्यावर विश्वास ठेवणं माझ्यासाठी कठीण आहे असं मला वाटलं. पण काळाच्या ओघात माझ्या मनातील ही भावनादेखील निघून गेली. साक्षीदार केवळ बायबल शिकवत नाहीत, तर त्यानुसार चालण्याचा प्रयत्नदेखील करतात, या गोष्टीनं मला जास्त प्रभावित केलं. यहोवावरील आणि बायबलवरील माझा विश्वास हळूहळू वाढू लागला आणि त्यात मला आणखी समाधान मिळत गेलं. माझ्यात होत असलेला बदल माझ्या शेजाऱ्यांच्याही लक्षात आला. ते मला म्हणाले, “अॅरासेली, तू जो मार्ग निवडला आहेस, त्यातच चालत राहा!”

एकदा मी यहोवाला अशी प्रार्थना केली होती: “हे यहोवा तू माझ्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहिलास आणि ज्याच्या शोधात मी होते ते बायबलचं खरं ज्ञान समजून घेण्यास तू मला इतक्या साऱ्या संधी देत राहिलास, म्हणून मी तुझे खूप आभार मानते.” मी फेलीसाला जे काही वाईट बोलले त्याबद्दल मी तिचीही माफी मागितली. तेव्हापासून एकमेकांसोबत वाद घालण्याऐवजी, बायबलमधून चर्चा करण्यात आम्हाला खूप आनंद मिळतो. १९८९ मध्ये ६१ वर्षांची असताना माझा बाप्तिस्मा झाला.

फेलीसा: आता मी ९१ वर्षांची आहे. माझे पती आज हयात नाहीत आणि मला आता पहिल्यासारखी हालचाल करायलाही जमत नाही. पण मी दररोज न चुकता बायबल वाचते आणि जमेल तसं सभांना आणि प्रचारकार्याला जाण्याचा प्रयत्न करते.

अॅरासेली: मी एक नन होते म्हणून कदाचित कॅथलिक पाळकांना आणि नन्सना यहोवाबद्दल सांगण्यास मला खूप आवडतं. त्यांच्यापैकी काहींसोबत मला खूप छान चर्चा करता आल्या, आणि बऱ्याच जणांनी आपली पुस्तकं आणि मासिकंदेखील घेतली आहेत. खासकरून एका पाळकासोबत झालेली चर्चा मला आठवते. त्यांच्यासोबत काही वेळा चर्चा केल्यानंतर, मी जे सांगत होते ते त्यांनी मान्य केलं. ते म्हणाले: “पण या वयात आता मी कुठं जाऊ? माझं कुटुंब आणि माझे लोक मला काय म्हणतील?” यावर मी म्हणाले: “पण याविषयी देव काय म्हणेल?” मला काय म्हणायचं होतं हे त्यांना कळलं. पण त्यांचा चेहरा कोमेजला होता. असं दिसत होतं, की त्यांच्यात स्वतःमध्ये बदल करण्याचं धाडस नव्हतं.

एकदा माझ्या पतीनं मलाही सभेला यायचं आहे, असं सांगितलं. तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही. ते पहिल्यांदा सभेला आले तेव्हा त्यांचं वय ८० पेक्षा जास्त होतं. त्यानंतर त्यांनी एकही सभा चुकवली नाही. त्यांनी बायबल अभ्यास घेतला आणि प्रचारकार्यात सहभाग घेण्यास सुरवात केली. क्षेत्रात सोबत मिळून काम करण्याच्या बऱ्याच सुखद आठवणी माझ्या मनात आहेत. बाप्तिस्मा होण्याच्या दोन महिन्यांआधीच त्यांचा मृत्यू झाला.

फेलीसा: यहोवाची सेवा करण्यास मी सुरवात केली तेव्हा माझ्या तिन्ही बहिणी माझ्या विरोधात होत्या. पण नंतर, त्यांनीही सत्य स्वीकारलं. ही खरंच माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती. त्यामुळे, आता एकमेकींसोबत यहोवाबद्दल आणि त्याच्या वचनाबद्दल बोलण्यात वेळ घालवायला आम्हाला खूप आवडतं. सरतेशेवटी आम्ही सर्व बहिणी यहोवाच्या उपासक बनलो! *

^ परि. 29 आज अॅरासेली ८७ वर्षांची, फेलीसा ९१ वर्षांची आणि रॅमोनी ८३ वर्षांची आहे. आजही त्या विश्वासूपणे यहोवाची सेवा करत आहेत. लॉरीचा १९९० साली मृत्यू झाला. तीदेखील शेवटपर्यंत यहोवाला विश्वासू होती.