व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

लोकांमधला फरक ओळखा

लोकांमधला फरक ओळखा

“धार्मिक व दुष्ट यांच्यातला . . . भेद तुम्हाला कळेल.”—मला. ३:१८.

गीत क्रमांक: २९, ५३

१, २. यहोवाच्या सेवकांना आजच्या काळात जीवन जगणं सोपं का नाही? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)

बरेच डॉक्टर आणि नर्स संसर्गजन्य रोग झालेल्या रुग्णांवर उपचार करतात. त्या रुग्णांना मदत करण्याची इच्छा असल्यामुळे ते त्यांची काळजी घेतात. पण अशा रुग्णांवर उपचार करत असताना त्यांना स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. ती न घेतल्यास त्यांनाही तो रोग होऊ शकतो. यहोवाचे सेवक या नात्याने आज आपली स्थितीही काहीशी सारखीच आहे. आपल्यापैकी बरेच जण अशा लोकांसोबत काम करतात आणि राहतात, ज्यांची मनोवृत्ती, गुण देवाला आवडणारे नाहीत. अशा लोकांमध्ये राहून त्यांच्या प्रभावापासून दूर राहणं इतकं सोपं नाही.

शेवटल्या दिवसांत देवावर प्रेम न करणारे लोक, त्याचे बऱ्‍यावाईटाचे स्तरदेखील पाळत नाहीत. प्रेषित पौलने तीमथ्यला जे पत्र लिहिलं त्यात त्याने लोकांमध्ये असलेल्या या नकारात्मक गुणांचा उल्लेख केला. पौलने सांगितलं की या दुष्ट व्यवस्थेचा अंत जसजसा जवळ येईल तसतसे हे वाईट गुण लोकांमध्ये वाढतील. (२ तीमथ्य ३:१-५, १३ वाचा.) सहसा या वाईट गुणांबद्दल ऐकून आपल्याला धक्का बसतो. असं असलं तरी, आपण खबरदारी बाळगली नाही, तर आपल्यावर अशा लोकांच्या विचारांचा, त्यांच्या वागण्या-बोलण्याचा प्रभाव पडू शकतो. (नीति. १३:२०) हे वाईट गुण देवाच्या लोकांमध्ये असणाऱ्‍या चांगल्या गुणांपासून किती वेगळे आहेत हे आपण या लेखात पाहू या. आपण हेदेखील पाहू की लोकांना यहोवाबद्दल शिकण्यासाठी मदत करत असताना, आपण त्यांच्या वाईट प्रभावापासून दूर कसं राहू शकतो.

३. दुसरे तीमथ्य ३:२-५ या वचनांत कोणत्या प्रकारच्या लोकांबद्दल सांगितलं आहे?

पौलने म्हटलं की “शेवटल्या दिवसांत अतिशय कठीण काळ येईल.” यानंतर त्याने १९ नकारात्मक गुणांचा उल्लेख केला जे आज लोकांमध्ये सर्रासपणे पाहायला मिळतात. हे वाईट गुण रोमकर १:२९-३१ मध्ये पौलने सांगितलेल्या गुणांसारखेच आहेत. पण तीमथ्यला लिहिलेल्या पत्रात पौलने सांगितलेल्या गुणांचा उल्लेख ख्रिस्ती ग्रीक शास्त्रात दुसरीकडे कुठेच आढळत नाही. पौलने वचनाची सुरुवात “कारण लोक” या शब्दांनी केली. इथे लोक या शब्दांत स्त्री आणि पुरुष दोघांचाही समावेश होतो, कारण वाईट गुण दोघांमध्येही असू शकतात. पण पौलने सांगितलेले वाईट गुण सर्वच मानवांमध्ये आहेत असं म्हणता येणार नाही. खऱ्‍या ख्रिश्‍चनांमध्ये चांगले गुण असतात.—मलाखी ३:१८ वाचा.

स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन

४. गर्वाने फुगलेले याचा काय अर्थ होतो?

स्वतःवर आणि पैशावर प्रेम करणाऱ्‍या लोकांचा उल्लेख केल्यानंतर पौलने बढाई मारणारे, गर्विष्ठ आणि गर्वाने फुगलेले यांचा उल्लेख केला. असे गुण दाखवणारे लोक स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजतात. मग त्याचं कारण त्यांचं रूप, क्षमता, संपत्ती किंवा समाजातलं स्तर असू शकतं. अशा लोकांना वाटतं की इतरांनी नेहमी त्यांचं कौतुक करावं. या लोकांबद्दल एका विद्वानाने म्हटलं: “अशा लोकांच्या मनात जणू एक देव्हारा असतो आणि त्यात ते स्वतःसमोरच झुकतात.” दुसऱ्‍या शब्दात ते स्वतःचीच पूजा करतात. काही लोकांचं असं म्हणणं आहे, की गर्व इतका वाईट आहे की गर्विष्ठ लोकांनासुद्धा इतरांमध्ये गर्व पाहून चीड येते.

५. यहोवाचे विश्‍वासू सेवकही गर्विष्ठ कसे बनले?

यहोवा गर्वाचा द्वेष करतो. बायबलमध्ये गर्वाला “उन्मत्त दृष्टि” असं म्हणण्यात आलं आहे. (नीति. ६:१६, १७) खरंतर गर्व असल्यामुळे एक व्यक्‍ती कधीच देवाजवळ येऊ शकत नाही. (स्तो. १०:४) गर्व हा सैतानाचा गुण आहे. (१ तीम. ३:६) पण दुःखाची गोष्ट म्हणजे यहोवाचे काही विश्‍वासू सेवकही गर्विष्ठ बनले. उदाहरणार्थ, यहूदाचा राजा उज्जीया बरीच वर्षं यहोवाला विश्‍वासू राहिला. पण त्याच्याबद्दल बायबल सांगतं: “तो समर्थ झाला तेव्हा त्याचे हृदय उन्मत्त होऊन तो बिघडला, आणि आपला देव परमेश्‍वर याच्या आज्ञेचे त्याने उल्लंघन केले.” तो मंदिरात गेला आणि अधिकार नसतानाही त्याने धूप जाळला. पुढे देवाला विश्‍वासू राहणारा हिज्कीया राजादेखील काही काळासाठी गर्विष्ठ बनला.—२ इति. २६:१६; ३२:२५, २६.

६. दावीदकडे अशा कोणत्या गोष्टी होत्या ज्यामुळे तो गर्विष्ठ बनू शकला असता? पण तो कशामुळे नम्र बनून राहिला?

सौंदर्य, लोकप्रियता, संगीताचं कौशल्य, ताकदवान असणं किंवा इतरांनी केलेलं कौतुक यांमुळे काही लोकांमध्ये गर्व येतो. दावीदकडे या सर्व गोष्टी होत्या, पण तरी तो आयुष्यभर नम्र राहिला. उदाहरणार्थ, गल्याथला मारल्यानंतर शौल राजाने दावीदला म्हटलं की त्याच्या मुलीसोबत तो लग्न करू शकतो. त्यावर त्याने म्हटलं: “राजाचा जावई व्हावे असा मी कोण? माझे जीवित ते काय? आणि इस्राएलात माझ्या बापाचे कूळ ते काय?” (१ शमु. १८:१८) दावीदला नम्र राहण्यास कशामुळे मदत झाली? त्याला माहीत होतं की त्याच्या क्षमता, गुण आणि त्याला मिळालेली कामगिरी ही खरंतर देवाकडून आहे. तसंच, देव स्वतः नम्र असल्यामुळे आणि देवाची कृपादृष्टी असल्यामुळेच त्याला हे शक्य झालं आहे याची जाणीव त्याला होती. (स्तो. ११३:५-८) दावीदला माहीत होतं की त्याच्या जीवनात ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या यहोवानेच पुरवल्या आहेत.—१ करिंथकर ४:७ पडताळून पाहा.

७. नम्र राहायला आपल्याला कशामुळे मदत होईल?

आज यहोवाचे सेवकसुद्धा दावीदसारखं नम्र बनण्याचा प्रयत्न करतात. यहोवा इतका महान असूनही इतका नम्र आहे, या गोष्टीने आपलं मन भरून येतं. (स्तो. १८:३५) बायबल सांगतं: “करुणा, दयाळूपणा, प्रेमळपणा, नम्रता, सौम्यता आणि सहनशीलता परिधान करा.” हा सल्ला आपण लागू करण्याचा प्रयत्न करतो. (कलस्सै. ३:१२) आपल्याला हेदेखील माहीत आहे, की प्रेम “बढाई मारत नाही, गर्वाने फुगत नाही.” (१ करिंथ. १३:४) आपली नम्रता पाहून इतरांनाही यहोवाबद्दल जाणून घ्यायची इच्छा होऊ शकते. ज्या प्रकारे एक अविश्‍वासू पती आपल्या ख्रिस्ती पत्नीच्या चांगल्या वागण्यामुळे यहोवाकडे येऊ शकतो, त्या प्रकारे यहोवाच्या सेवकांमध्ये नम्रता पाहून लोकदेखील यहोवाजवळ येऊ शकतात.—१ पेत्र ३:१, २.

इतरांशी आपली वागणूक

८. (क) आईवडिलांची आज्ञा मोडण्याबद्दल आज काही लोकांचा काय दृष्टिकोन आहे? (ख) बायबल मुलांना काय करायला सांगते?

शेवटल्या दिवसांत लोक इतरांशी कसं वागतील याबद्दल पौलने सांगितलं. त्याने म्हटलं की मुलं आईवडिलांचं न ऐकणारे बनतील. आज बरीच पुस्तकं, चित्रपट आणि टिव्हीवरील कार्यक्रम हे दाखवतात की मुलांनी आईवडिलांचं ऐकलं नाही, तर यात काहीच गैर नाही. उलट ते योग्य आहे असं पटवून देण्याचा ते प्रयत्न करतात. पण आईवडिलांचं न ऐकल्यामुळे कुटुंबातील नाती कमकुवत होतात आणि त्याचा समाजावर वाईट परिणाम होतो. ही संकल्पना काही नवीन नाही. अनेक शतकांपासून मानवांना या सत्याबद्दल माहीत आहे. उदाहरणार्थ, प्राचीन ग्रीस राष्ट्रात असा नियम होता की जर एखाद्या व्यक्‍तीने आपल्या आईवडिलांवर हात उचलला, तर त्याचे समाजातले अधिकार काढून घेतले जायचे. तसंच, रोमी कायद्यानुसार आपल्या वडिलांवर हात उचलण्याचा गुन्हा, खून करण्याइतका गंभीर मानला जायचा. इब्री आणि ग्रीक दोन्ही शास्त्रवचनांत मुलांना आपल्या आईवडिलांच्या अधीन राहण्यासाठी आज्ञा दिली आहे.—निर्ग. २०:१२; इफिस. ६:१-३.

९. आईवडिलांचं ऐकण्यासाठी मुलांना कशामुळे मदत होईल?

मुलांना आपल्या आईवडिलांचं ऐकण्यासाठी मग त्यांचे सोबती तसं करत नसले तरी, कोणत्या गोष्टीमुळे मदत होईल? आईवडिलांनी आपल्यासाठी काय-काय केलं आहे याचा विचार मुलं करतील, तेव्हा त्यांची आईवडिलांप्रती कदर वाढेल आणि त्यांचं ऐकण्याची प्रेरणादेखील मिळेल. तसंच मुलांनी हेदेखील लक्षात ठेवलं पाहिजे की सर्वांचा पिता यहोवा देव, त्यांच्याकडून अपेक्षा करतो की त्यांनी आईवडिलांचं ऐकावं. आपल्या मित्रांशी बोलताना मुलं जेव्हा आपल्या आईवडिलांबद्दल चांगलं बोलतात, तेव्हा ते इतरांनाही त्यांच्या आईवडिलांचा आदर करायला मदत करतात. काही मुलांचे आईवडील त्यांच्याशी वागताना माया-ममता दाखवत नाहीत. अशा परिस्थितीत त्यांच्या अधीन राहणं मुलांना कठीण जाऊ शकतं. पण आपले आईवडील आपल्यावर खूप प्रेम करतात हे जेव्हा मुलं अनुभवतात, तेव्हा सोपं नसतानाही त्यांच्या अधीन राहणं मुलांना शक्य होतं. ऑस्टिन नावाचा एक तरुण बांधव म्हणतो: “आईवडील जे सांगतात त्याच्या अगदी उलट करण्याचा मला सहसा मोह होतो. पण माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी काही नियम घालून दिले आहेत आणि त्यांचं कारणदेखील मला समजावून सांगितलं आहे. मी त्यांच्याशी मनमोकळेपणे बोलू शकतो. यामुळे मला त्यांच्या अधीन राहणं सोपं गेलं आहे. त्यांना माझी काळजी आहे याची जाणीव मला झाली आहे आणि म्हणून त्यांना दुखावण्याची माझी इच्छा नाही.”

१०, ११. (क) कोणत्या वाईट गुणांवरून दिसून येतं की लोकांचं एकमेकांवर प्रेम नाही? (ख) खरे ख्रिस्ती इतरांवर कितपत प्रेम करतात?

१० पौलने इतर गुणांचाही उल्लेख केला ज्यांवरून आपल्याला कळतं की लोकांचं एकमेकांवर प्रेम नाही. “आईवडिलांचे न ऐकणारे” यानंतर पौलने उपकारांची जाण न ठेवणारे यांचा उल्लेख केला. हे समजण्यासारखं आहे कारण ज्या लोकांना उपकारांची जाण नसते, ते इतरांनी त्यांच्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टींचा कधीच विचार करत नाही. पुढे पौलने म्हटलं की लोक बेइमान होतील. हे लोक कोणत्याही गोष्टीशी सहमत न होणारे असतील, म्हणजेच शांती टिकवून ठेवण्याचा ते मुळीच प्रयत्न करणार नाही. तसंच, ते निंदा करणारे आणि विश्‍वासघात करणारे असतील. याचा अर्थ हे लोक इतरांबद्दल आणि देवाबद्दल वाईट, द्वेषपूर्ण गोष्टी बोलतील. ते इतरांची बदनामी करणारे असतील असंदेखील पौलने सांगितलं. म्हणजेच ते इतरांबद्दल खोट्या अफवा पसरवतील आणि त्यांचं नाव खराब करतील. *

११ यहोवाचे सेवक इतरांवर मनापासून प्रेम करतात. त्यामुळे ते जगातल्या लोकांपासून अगदी वेगळे आहेत. प्राचीन काळापासूनच यहोवाच्या सेवकांच्या बाबतीत ही गोष्ट खरी ठरली आहे. येशूने सांगितलं की मोशेच्या नियमशास्त्रानुसार इतरांवर प्रेम करणं, यापेक्षा फक्‍त एकच आज्ञा मोठी आहे. ती म्हणजे देवावर प्रेम करणं. (मत्त. २२:३८, ३९) येशूने हेदेखील सांगितलं की खऱ्‍या ख्रिश्‍चनांना, एकमेकांप्रती दाखवत असलेल्या प्रेमामुळेच ओळखलं जाईल. (योहान १३:३४, ३५ वाचा.) बायबल सांगतं की खरे ख्रिस्ती फक्‍त एकमेकांवरच नाही, तर आपल्या शत्रूंवरही प्रेम करतील.—मत्त. ५:४३, ४४.

१२. येशूने इतरांप्रती प्रेम कसं दाखवलं?

१२ येशूने दाखवलं की त्याचं लोकांवर मनापासून प्रेम आहे. तो देवाच्या राज्याची आनंदाची बातमी सांगण्यासाठी गावोगावी फिरला. त्याने आंधळ्यांना, लंगड्यांना, बहिऱ्‍यांना आणि कुष्ठरोग असलेल्यांना बरं केलं. त्याने मृतांचंही पुनरुत्थान केलं. (लूक ७:२२) लोकांनी येशूचा द्वेष केला, तरी त्याने लोकांसाठी आपलं जीवन दिलं. येशूने आपल्या पित्याच्या प्रेमाचं अगदी हुबेहूब अनुकरण केलं. जगभरातले यहोवाचे साक्षी येशूचं अनुकरण करून इतरांवर प्रेम करतात.

१३. इतरांना दाखवत असलेल्या प्रेमामुळे त्यांना यहोवाबद्दल जाणून घ्यायला कशी मदत होऊ शकते?

१३ आपण इतरांवर प्रेम करतो तेव्हा त्यांच्या मनात यहोवाबद्दल जाणून घेण्याची इच्छा जागृत होऊ शकते. उदाहरणार्थ, थायलंडमध्ये एक माणूस प्रांतीय अधिवेशनाला गेला. बंधुभगिनी एकमेकांवर किती प्रेम करतात हे पाहून तो खूप प्रभावीत झाला. घरी परतल्यावर त्याने आठवड्यातून दोनदा बायबल अभ्यास करण्याची इच्छा दाखवली. अभ्यास सुरू झाल्यावर त्याने त्याच्या सर्व नातेवाइकांना साक्ष दिली. अभ्यास सुरू झाल्याच्या सहा महिन्यांनंतर त्याने सभेत त्याचा पहिला विद्यार्थी भाग सादर केला. आपणही इतरांप्रती प्रेम दाखवतो का? हे जाणून घेण्यासाठी स्वतःला विचारा: ‘मी माझ्या कुटुंबात, मंडळीत आणि प्रचारकार्यात इतरांना मदत करण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करत आहे का? इतरांबद्दल यहोवासारखाच दृष्टिकोन ठेवण्याचा मी प्रयत्न करतो का?’

लांडगे आणि कोकरे

१४, १५. आज बऱ्‍याच लोकांमध्ये कोणते वाईट गुण आहेत? काही लोकांनी स्वतःत कसे बदल केले आहेत?

१४ शेवटल्या दिवसांत राहत असताना लोक इतर काही वाईट गुणही दाखवतात जे आपण टाळले पाहिजेत. जसं की, बऱ्‍याच लोकांना चांगल्याबद्दल प्रेम नसतं. अशा लोकांना चांगल्या गोष्टी आवडत नाहीत आणि ते त्यांचा विरोधही करतात. असे लोक संयम नसलेले आणि क्रूर असतात. काही तर अडेल वृत्तीचे असतात. ते अविचारीपणे वागतात आणि इतरांवर याचा कसा परिणाम होईल याची त्यांना मुळीच काळजी नसते.

१५ क्रूर प्राण्यांसारखे वागणाऱ्‍या बऱ्‍याच लोकांनी स्वतःत बदल केला आहे. याबद्दल बायबलमध्ये आधीच भाकीत करण्यात आलं होतं. (यशया ११:६, ७ वाचा.) या भविष्यवाणीत आपण लांडगे, सिंह यांसारख्या जंगली प्राण्यांबद्दल वाचतो. हे प्राणी कोकरू आणि वासरू यांसारख्या पाळीव प्राण्यांसोबत शांतीने राहतील. हे कशामुळे शक्य होईल? बायबल सांगतं: “परमेश्‍वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल.” (यश. ११:९) प्राणी यहोवाबद्दल शिकू शकत नाही, म्हणून आपण म्हणू शकतो की या वचनाची आध्यात्मिक पूर्णता अशा लोकांवर होत आहे जे आपलं व्यक्‍तिमत्त्व बदलतात.

बायबलची तत्त्वं लागू केल्यामुळे जीवन बदलतं! (परिच्छेद १६ पाहा)

१६. व्यक्‍तिमत्त्वात बदल करण्यासाठी बायबलने लोकांना कशी मदत केली आहे?

१६ सत्य शिकण्याआधी आपले बरेच बंधुभगिनी क्रूर लांडग्यांसारखे होते. पण त्यांनी स्वतःत बरेच बदल केले आहेत. “बायबलने बदललं जीवन” असं शीर्षक असलेल्या लेखांमध्ये आपण अशा बांधवांबद्दल वाचू शकतो. हे लेख टेहळणी बुरूजच्या सार्वजनिक आवृत्तीत प्रकाशित होतात. यहोवाचे सेवक देवाची भक्‍ती करण्याचा केवळ दिखावा करून आपल्या जीवनावर तिचा प्रभाव न होऊ देणाऱ्‍या लोकांसारखे नाहीत. असे लोक देवाची भक्‍ती करण्याचा फक्‍त दिखावा करतात, पण मुळात ते त्यानुसार वागत नाहीत. याच्या अगदी उलट, क्रूर लांडग्यांप्रमाणे वागणाऱ्‍या बऱ्‍याच लोकांनी “देवाच्या इच्छेनुसार निर्माण करण्यात आलेले, तसेच खरे नीतिमत्त्व आणि एकनिष्ठता यांवर आधारित असलेले नवे व्यक्‍तिमत्त्व” धारण केले आहे. (इफिस. ४:२३, २४) असं करण्याद्वारे ते देवाचे सेवक बनले आहेत. लोक जेव्हा यहोवाबद्दल शिकतात, तेव्हा त्यांना जाणीव होते की त्यांना त्याच्या स्तरांनुसार जीवन जगणं गरजेचं आहे. यामुळे मग ते आपल्या विश्‍वासांत, विचारांत आणि कार्यांत बदल करतात. बदल करणं सोपं नसलं तरी देवाला खूश करण्याची मनापासून इच्छा असल्यामुळे देवाचा आत्मा अशा लोकांना मदत करतो.

“यांच्यापासून दूर राहा”

१७. लोकांचा वाईट प्रभाव आपल्यावर पडू नये म्हणून आपण काय केलं पाहिजे?

१७ देवाची सेवा करणारे आणि न करणारे यांच्यामध्ये फरक करणं आज सोपं झालं आहे. देवाची सेवा न करणाऱ्‍या लोकांमध्ये वाईट गुण आहेत. त्यांचा वाईट प्रभाव आपल्यावर पडू नये म्हणून आपण सावध असलं पाहिजे. २ तीमथ्य ३:२-५ या वचनांत सांगण्यात आलेल्या लोकांपासून दूर राहा अशी ताकीद यहोवाने आपल्याला दिली आहे. हे खरं आहे की अशा लोकांना पूर्णपणे टाळणं शक्य नाही. कारण आपल्या कामाच्या ठिकाणी, शाळेमध्ये, किंवा आपण ज्यांच्यासोबत राहतो तिथे असे लोक असणारच. असं असलं तरी, आपल्याला त्यांच्यासारखा विचार करण्याची किंवा वागण्याची गरज नाही. त्यांचा वाईट प्रभाव टाळण्यासाठी आपण काय करू शकतो? आपण बायबलचं वाचन केलं पाहिजे आणि यहोवावर प्रेम करणाऱ्‍या लोकांसोबतच घनिष्ठ मैत्री केली पाहिजे. असं केल्यामुळे आपल्याला यहोवासोबत नातेसंबंध आणखी मजबूत करण्यासाठी मदत होईल.

१८. आपण जे बोलतो आणि करतो त्यामुळे इतरांना यहोवाबद्दल शिकण्यासाठी कशी मदत होऊ शकते?

१८ इतरांना यहोवाबद्दल शिकवण्याची आपली इच्छा आहे. आपण प्रचार करण्याच्या संधी शोधल्या पाहिजेत आणि एखाद्या प्रसंगात प्रभावीपणे साक्ष देता यावी म्हणून यहोवाला मदत मागितली पाहिजे. आपण यहोवाचे साक्षीदार आहोत हे आपण इतरांना सांगितलं पाहिजे. असं केल्यामुळे आपली चांगली वागणूक पाहून इतर जण आपली नाही, तर देवाची स्तुती करतील. आपण यहोवाच्या “इच्छेविरुद्ध असलेल्या सर्व गोष्टींचा व जगाच्या वासनांचा धिक्कार करावा, या जगाच्या व्यवस्थेत समंजसपणे, नीतीने आणि सुभक्‍तीने जीवन जगावे” अशी त्याची इच्छा आहे. (तीत २:११-१४) आपण यहोवाचं अनुकरण करून त्याच्या इच्छेनुसार वागलो तर इतर जण ते पाहतील. त्यांपैकी काही कदाचित असं म्हणतील: “आम्ही तुम्हाबरोबर येतो, कारण देव तुम्हाबरोबर आहे असे आम्ही ऐकले आहे.”—जख. ८:२३.

^ परि. 10 “निंदा करणारा” किंवा “दोष लावणारा” यासाठी मूळ ग्रीक शब्द डायाबोलोस आहे. बायबलमध्ये हा शब्द सैतानाला उद्देशून वापरण्यात आला आहे. देवावर दोष लावणारा दुष्ट आत्मिक प्राणी.