व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती विवाह यशस्वी कसा बनवाल?

ख्रिस्ती विवाह यशस्वी कसा बनवाल?

“तुम्हांपैकी प्रत्येकाने जशी स्वतःवर तशी आपल्या पत्नीवर प्रीती करावी, आणि पत्नीने आपल्या पतीची भीड राखावी.”—इफिस. ५:३३.

गीत क्रमांक: ३६, 

१. विवाहाची सुरवात आनंदाने होत असली, तरी नंतर जोडप्यांना जीवनात कोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

लग्नाच्या दिवशी जेव्हा नवरा मुलगा आपल्या सुंदर सजलेल्या नवरीला पाहतो, तेव्हा त्या दोघांचा आनंद गगनात मावेनासा होतो. लग्नाअगोदरच्या गाठीभेटींदरम्यान त्या दोघांचं एकमेकांवरील प्रेम वाढलं. आणि आता ते एकमेकांना आयुष्यभर साथ देण्यासाठी आणि विश्वासू राहण्यासाठी विवाहबंधनात बांधले जाण्यास तयार आहेत. लग्नानंतर त्या दोघांना जीवनात बरेच बदल करावे लागतील. वैवाहिक जीवनातील प्रेम आणि एकोपा टिकवून ठेवण्यासाठी त्यांना बरीच मेहनतदेखील घ्यावी लागेल. विवाह व्यवस्थेची सुरवात करणारा यहोवा देव आहे. आणि त्याची अशी इच्छा आहे की प्रत्येक जोडप्यानं आनंदी राहावं आणि त्यांचा विवाह यशस्वी व्हावा. त्यामुळे बायबलमध्ये त्याने जोडप्यांसाठी बरेच सल्ले दिले आहेत. (नीति. १८:२२) पण यासोबतच बायबल हेदेखील सांगतं, की पती-पत्नी अपरिपूर्ण असल्यामुळे त्यांना वैवाहिक जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावं लागेल. दुसऱ्या शब्दांत, त्यांना वैवाहिक जीवनात “हालअपेष्टा भोगाव्या लागतील.” (१ करिंथ. ७:२८) तर मग, ख्रिस्ती जोडपी विवाहात येणाऱ्या बऱ्याच समस्यांना कसं टाळू शकतात आणि आपला विवाह यशस्वी कसा बनवू शकतात, याबद्दल आपण या लेखात पाहणार आहोत.

२. प्रेम दाखवण्यात काय सामील आहे?

वैवाहिक जीवनात प्रेम असणं फार गरजेचं आहे, असं बायबल आपल्याला सांगतं. प्रेमात बऱ्याच गोष्टी सामील आहेत. जसं की, पती-पत्नींनी एकमेकांशी वागताना करुणा दाखवणं गरजेचं आहे. तसंच, विवाहात एकमेकांप्रती जे शारीरिक आकर्षण असतं, तेदेखील या प्रेमाचाच एक भाग आहे. कारण त्यामुळे जोडप्यांना विवाहात आनंद मिळतो. शिवाय, जर त्यांना मुलं असतील तर कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांवर प्रेम दाखवणं आणखी जास्त महत्त्वाचं आहे. पण जर जोडप्यांना आपला विवाह यशस्वी बनवायचा असेल, तर बायबल तत्त्वांवर आधारित असलेलं प्रेम सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. या प्रेमाबद्दल बोलताना पौलाने म्हटलं: “तुम्हापैकी प्रत्येकाने जशी स्वतःवर तशी आपल्या पत्नीवर प्रीती करावी, आणि पत्नीने आपल्या पतीची भीड राखावी.”—इफिस. ५:३३.

वैवाहिक जीवनातील जबाबदाऱ्या

३. जोडप्यांमधील प्रेम कसं असलं पाहिजे?

पौलाने म्हटलं: “पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपआपल्या पत्नीवर प्रीती करा, ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःस तिच्यासाठी समर्पण केले.” (इफिस. ५:२५) आज खरे ख्रिस्तीदेखील येशूचं अनुकरण करतात आणि जसं येशूने आपल्या शिष्यांवर प्रेम केलं, तसंच प्रेम तेही एकमेकांवर करतात. (योहान १३:३४, ३५; १५:१२, १३ वाचा.) ख्रिस्ती पती-पत्नींचं एकमेकांवर इतकं प्रेम असलं पाहिजे, की प्रसंग आल्यास ते एकमेकांसाठी आपला जीव द्यायलाही तयार असले पाहिजेत. पण जेव्हा विवाहात गंभीर समस्या येतात, तेव्हा काही जणांना असं वाटू शकतं की त्यांच्यातील प्रेम कमी झालं आहे. मग अशा वेळी त्यांना कोणत्या गोष्टीमुळे मदत होऊ शकते? पती-पत्नींमध्ये बायबल तत्त्वांवर आधारित प्रेम असेल तर त्यांना समस्या सोडवण्यास मदत होईल. कारण हे प्रेम “सर्व काही सहन करते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्वांसंबंधाने धीर धरते.” अशा प्रकारचं प्रेम कधीही संपत नाही. (१ करिंथ. १३:७, ८) जोडप्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे, की त्यांनी एकमेकांवर प्रेम करण्याची आणि एकमेकांना विश्वासू राहण्याची शपथ घेतली आहे. ही गोष्ट जर त्यांनी नेहमी लक्षात ठेवली, तर ते मदतीसाठी यहोवाकडे वळतील आणि कोणतीही समस्या आली तर ती एकत्र मिळून सोडवण्याचा प्रयत्न करतील.

४, ५. (क) कुटुंबप्रमुख या नात्यानं पतीची जबाबदारी काय आहे? (ख) मस्तकपदाबद्दल पत्नीचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे? (ग) एका जोडप्याला लग्नानंतर कोणते बदल करावे लागले?

पती आणि पत्नीच्या जबाबदाऱ्यांबद्दल बोलताना पौलाने म्हटलं: “स्त्रियांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपआपल्या पतीच्या अधीन असा. कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा पती पत्नीचे मस्तक आहे.” (इफिस. ५:२२, २३) पण याचा अर्थ असा होत नाही की, पती हा आपल्या पत्नीपेक्षा श्रेष्ठ आहे. यहोवाने म्हटलं: “मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याच्यासाठी अनुरूप साहाय्यक मी करेन.” (उत्प. २:१८) यावरून दिसून येतं की विवाहात पत्नीचीदेखील महत्त्वाची भूमिका आहे. पत्नीने आपल्या पतीला कुटुंबप्रमुखाची जबाबदारी चांगल्या रीतीने पार पाडण्यास मदत केली पाहिजे. आणि जसं येशू ‘मंडळीचे मस्तकपद’ प्रेमळपणे हाताळतो, तसंच पतीनेदेखील कुटुंबप्रमुखाची जबाबदारी प्रेमळपणे हाताळली पाहिजे. असं केल्यामुळे पत्नीला वैवाहिक जीवनात सुरक्षित वाटेल. तसंच, तिला आपल्या पतीचा आदर करणं व त्याला साथ देणं सोपं जाईल.

लग्नानंतर जे बदल करावे लागतात त्याबद्दल कॅथी [1] नावाची बहीण म्हणते: “लग्नाआधी मी कोणावरही निर्भर नव्हते, सर्व गोष्टी मी स्वतःच करायचे. पण लग्न झाल्यावर मला बरेच बदल करावे लागले. मला माझ्या पतीवर बऱ्याच गोष्टींसाठी अवलंबून राहायला शिकावं लागलं. आणि असं करणं नेहमीच सोपं नव्हतं. पण यहोवाच्या मार्गदर्शनानुसार जीवन जगल्यामुळे आम्ही दोघं एकमेकांच्या आणखी जवळ आलो आहोत.” तिचा पती फ्रेड म्हणतो: “निर्णय घेणं मला आधीपासूनच कठीण जायचं. आणि लग्न झाल्यावर तर दोघांची मतं विचारात घेऊन निर्णय घेणं आणखीच कठीण जातं. पण प्रार्थनेत यहोवाला मदत मागितल्यामुळे आणि कॅथीचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकल्यामुळे मला आता निर्णय घेणं सोपं जातं. मला असं वाटतं की आम्ही दोघं एका ‘टिम’सारखे काम करतो.”

६. विवाहात समस्या येतात तेव्हा प्रेमामुळे समस्या सोडवण्यास आणि एकमेकांशी जडून राहण्यास कशी मदत होते?

बायबल सांगतं की “एकमेकांचे सहन करा, आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास आपसात क्षमा करा.” हा सल्ला जर पती-पत्नी आपल्या जीवनात लागू करत राहिले, तर त्यांचं नातं आणखी मजबूत होईल. दोघंही अपरिपूर्ण असल्यामुळे त्यांच्या हातून चुका या होतीलच. पण अशा वेळी त्यांनी एकमेकांना क्षमा केली पाहिजे, स्वतःच्या चुकांपासून धडा घेतला पाहिजे आणि बायबल तत्त्वांवर आधारित प्रेम दाखवलं पाहिजे. असं प्रेम “पूर्णता करणारे बंधन” आहे. (कलस्सै. ३:१३, १४) या प्रेमात एकमेकांशी धीरानं व दयाळूपणे वागणं सामील आहे. तसंच, असं प्रेम असल्यास पती-पत्नी एकमेकांकडून झालेल्या चुकांची आठवण ठेवणार नाहीत. कारण प्रीती कधीही “अपकार स्मरत नाही.” (१ करिंथ. १३:४, ५) जर त्यांच्यात मतभेद झाले, तर ते त्यांनी लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बायबल म्हणतं की झालेले मतभेद आपण त्याच दिवशी सोडवले पाहिजेत. (इफिस. ४:२६, २७) “माझं चुकलं, मी तुझं मन दुखावलं, मला माफ कर” असं म्हणणं सोपं नाही, तर यासाठी धैर्य व नम्रता लागते. असं केल्यामुळे बऱ्याच समस्या सुटतात आणि पती-पत्नी एकमेकांच्या आणखी जवळ येतात.

विवाहात करुणेनं वागण्याची खास गरज

७, ८. (क) विवाहात शारीरिक संबंधांबाबतीत योग्य दृष्टिकोन बाळगण्याबद्दल बायबल काय सल्ला देतं? (ख) जोडप्यांनी एकमेकांशी करुणेनं वागणं का गरजेचं आहे?

विवाहात शारीरिक संबंधांबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगण्यास बायबल आपल्याला मदत करतं. (१ करिंथकर ७:३-५ वाचा.) पती-पत्नीने एकमेकांच्या भावना आणि गरजा समजून घेणं खूप गरजेचं आहे. पतीने आपल्या पत्नीच्या इच्छा आणि भावना समजून घेतल्या नाहीत, तर शारीरिक संबंधातून मिळणारा आनंद कदाचित ती घेऊ शकणार नाही. पतीने आपल्या पत्नीशी व्यवहार करताना “सुज्ञतेने” वागलं पाहिजे. (१ पेत्र ३:७) विवाहात शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आपल्या जोडीदारावर कधीही जबरदस्ती करू नये किंवा त्याची मागणी करू नये. शरीर संबंध ठेवण्यासाठी पुरुष सहसा लगेच तयार होऊ शकतात, पण भावनिक रीत्या पती आणि पत्नी या दोघांचीही त्यासाठी तयारी असली पाहिजे.

पती आणि पत्नीमध्ये असलेलं प्रेम कसं आणि कोणत्या प्रकारे प्रदर्शित केलं जावं, याविषयी बायबल कोणतेही विशिष्ट नियम किंवा सीमा घालून देत नाही. पण बायबलमध्ये काही ठिकाणी प्रेम व्यक्त करण्याबद्दल उल्लेख आढळतो. (गीत. १:२; २:६) ख्रिस्ती जोडप्यांनी एकमेकांप्रती आपलं प्रेम व्यक्त करताना नेहमी करुणेनं वागलं पाहिजे.

९. आपल्या जोडीदाराऐवजी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीबद्दल शारीरिक आकर्षण असणं चुकीचं का आहे?

देवावर आणि आपल्या शेजाऱ्यावर आपलं मनापासून प्रेम असेल, तर आपण दुसऱ्या कोणालाही किंवा कोणत्याही गोष्टीला आपल्या वैवाहिक जीवनाच्या आड येऊ देणार नाही. पोर्नोग्राफी (अश्लील साहित्यं) पाहण्याच्या सवयीमुळे काही लोकांचा विवाह कमकुवत झाला आहे, तर काहींचा विवाह मोडलादेखील आहे. आपण पोर्नोग्राफी पाहण्याच्या कोणत्याही पाशाला बळी पडू नये. तसंच, विवाहाबाहेर शारीरिक इच्छा पूर्ण करण्याच्या कोणत्याही मोहापासून आपण स्वतःला दूर ठेवलं पाहिजे. आपण अशी कोणतीही गोष्ट करण्यापासून दूर राहिलं पाहिजे, ज्यामुळे इतरांना असं वाटेल की आपण आपल्या जोडीदाराऐवजी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडे शारीरिक रीत्या आकर्षित होत आहोत. याबाबतीत सावध न राहिल्यास आपलं आपल्या जोडीदारावर प्रेम नाही असं दिसून येईल. आपल्या मनात येणारे विचार आणि आपली कृत्यं यहोवा पाहतो ही गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. यामुळे त्याच्या इच्छेनुसार वागण्याची आणि आपल्या जोडीदाराला विश्वासू राहण्याची आपल्याला नेहमी प्रेरणा मिळेल.—मत्तय ५:२७, २८; इब्री लोकांस ४:१३ वाचा.

विवाहात समस्या येतात तेव्हा

१०, ११. (क) आज जगामध्ये होत असलेल्या घटस्फोटांबद्दल काय म्हणता येईल? (ख) विभक्त होण्याबद्दल बायबल काय सांगतं? (ग) विभक्त न होता नेहमी सोबत राहण्यास कोणती गोष्ट जोडप्यांना मदत करेल?

१० वैवाहिक जीवनात येणाऱ्या गंभीर समस्या जेव्हा सुटत नाहीत, तेव्हा काही जोडपी विभक्त होण्याचा किंवा घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतात. काही देशांमध्ये तर असं पाहण्यात आलं आहे की, ५० टक्के विवाहांचा शेवट घटस्फोटात होतो. हे खरं आहे की ख्रिस्ती मंडळीमध्ये अशा गोष्टी फार क्वचितच घडतात. पण आजच्या काळात बऱ्याच ख्रिस्ती जोडप्यांनाही वैवाहिक जीवनात गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे.

११ बायबल आपल्याला पुढील सल्ला देतं: “पत्नीने पतीपासून वेगळे होऊ नये; परंतु ती वेगळी झालीच तर तिने लग्न केल्यावाचून राहावे किंवा पतीबरोबर समेट करावा आणि पतीनेही पत्नीला सोडू नये.” (१ करिंथ. ७:१०, ११) काही जोडप्यांना असं वाटू शकतं की त्यांच्या वैवाहिक जीवनातील समस्या इतक्या मोठ्या आहेत, की आता विभक्त होण्याशिवाय त्यांच्याजवळ दुसरा पर्यायच नाही. पण विभक्त होणं ही खूप गंभीर गोष्ट आहे असं येशूने सांगितलं. यहोवाने विवाहाबद्दल जे अगदी सुरवातीला सांगितलं होतं, त्या गोष्टीची आठवण करून दिल्यावर त्याने म्हटलं: “देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये.” (मत्त. १९:३-६; उत्प. २:२४) यावरून आपल्याला कळतं की पती-पत्नीने विभक्त होऊ नये, तर नेहमी एकमेकांसोबत राहावं अशी यहोवाची इच्छा आहे. (१ करिंथ. ७:३९) आपण जे काही करतो त्यासाठी आपल्याला यहोवाला जाब द्यावा लागेल, ही गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. यामुळे एखाद्या समस्येनं गंभीर स्वरूप घेण्याआधीच ती सोडवण्यास आपल्याला मदत होईल.

१२. कोणत्या समस्यांमुळे एखादी व्यक्ती विभक्त होण्याचा विचार करते?

१२ काही जोडप्यांना जीवनात गंभीर समस्यांचा सामना का करावा लागतो? वैवाहिक जीवनातून अनेकांना बऱ्याच अपेक्षा असतात. पण त्या पूर्ण न झाल्यामुळे काही लोक निराश होतात, तर काहींच्या मनात राग असतो. पती-पत्नी ज्या वातावरणात लहानाचे मोठे होतात त्यातही सहसा फरक असतो. तसंच, एखाद्या गोष्टीबद्दल त्यांची मतंदेखील वेगवेगळी असू शकतात. सासरच्या लोकांसोबत पटत नसल्यामुळे, पैसे कसे खर्च करायचे किंवा मुलांचं संगोपन कसं करायचं, यांबद्दल मतभेद असल्यामुळेही विवाहात समस्या उद्‌भवू शकतात. पण आज बरीच ख्रिस्ती जोडपी, यहोवा पुरवत असलेल्या मार्गदर्शनाच्या मदतीनं समस्या सोडवत आहेत. ही खरंच किती चांगली गोष्ट आहे!

१३. कोणती काही कारणं आहेत, ज्यांमुळे एक ख्रिस्ती व्यक्ती विभक्त होण्याचा निर्णय घेऊ शकते?

१३ काही टोकाच्या परिस्थितींत आपल्या जोडीदारापासून विभक्त होणं चुकीचं ठरणार नाही. जसं की, जोडीदाराला आणि मुलांना सांभाळण्यास नकार देणं, खूप मारहाण करणं किंवा यहोवाची उपासना करण्यापासून पूर्णपणे रोखणं. काही ख्रिस्ती या कारणांमुळे आपल्या जोडीदारापासून विभक्त झाले आहेत. पण, विवाहात जेव्हा गंभीर समस्या निर्माण होतात तेव्हा मंडळीतील वडिलांची मदत घेतली पाहिजे. वडिलांना बराच अनुभव असतो आणि देवाचं मार्गदर्शन जीवनात लागू करण्यासाठी ते जोडप्यांना मदत करू शकतात. जोडप्यांनी यहोवाकडे त्याच्या पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. यामुळे त्यांना बायबलची तत्त्वं लागू करण्यास आणि ख्रिस्ती गुण प्रदर्शित करण्यास मदत होईल.—गलती. ५:२२, २३. [2]

१४. ज्या ख्रिस्ती व्यक्तीचा जोडीदार सत्यात नाही तिला बायबल कोणता सल्ला देतं?

१४ बायबल आपल्याला सांगतं की आपला जोडीदार यहोवाचा उपासक नसला, तरीदेखील आपण त्याच्यासोबत राहिलं पाहिजे; आपण त्याच्यापासून विभक्त होऊ नये. (१ करिंथकर ७:१२-१४ वाचा.) देवाच्या सेवकाशी विवाह झाल्यामुळे सत्यात नसलेला जोडीदार एका अर्थी “पवित्र” ठरतो असं बायबल सांगतं. त्यांची मुलंदेखील “पवित्र” ठरतात आणि त्यामुळे देवाचा आशीर्वाद त्यांच्यावर असतो. पौलाने सत्यात असलेल्या जोडीदारांना सल्ला दिला: “हे पत्नी, तू आपल्या पतीला तारशील किंवा नाही हे तुला काय ठाऊक? हे पती, तू आपल्या पत्नीला तारशील किंवा नाही हे तुलाही काय ठाऊक?” (१ करिंथ. ७:१६) असे बरेच ख्रिस्ती बंधुभगिनी आहेत ज्यांनी आपल्या जोडीदाराला यहोवाचा सेवक बनण्यास मदत केली आहे.

१५, १६. (क) ज्यांचे पती सत्यात नाहीत अशांना बायबल कोणता सल्ला देतं? (ख) सत्यात नसलेल्या जोडीदाराने विभक्त होण्याचा निर्णय घेतला, तर एका ख्रिश्चनाची भूमिका काय असली पाहिजे?

१५ प्रेषित पौलाने ख्रिस्ती पत्नींना आपआपल्या पतीच्या अधीन राहण्याचा सल्ला दिला. “यासाठी की, कोणी वचनाला अमान्य असले, तरी तुमचे भीडस्तपणाचे निर्मल वर्तन पाहून ते वचनावाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळवून घेतले जावे.” नेहमीच आपल्या विश्वासाबद्दल बोलत राहण्याऐवजी एक बहीण “सौम्य व शांत आत्मा” दाखवून, आपल्या पतीला सत्य स्वीकारण्यास आणखी चांगल्या प्रकारे मदत करू शकते. असा आत्मा दाखवणं हे देवाच्या नजरेत खूप मौल्यवान आहे.—१ पेत्र ३:१-४.

१६ पण जर सत्यात नसलेल्या जोडीदाराने विभक्त होण्याचा निर्णय घेतला, तर काय? बायबल म्हणतं: “जर ख्रिस्तीतर व्यक्ती वेगळी होऊ पाहते तर ती वेगळी होवो; अशा प्रसंगी भाऊ किंवा बहीण बांधलेली नाही; देवाने आपल्याला शांतीत राहण्याकरता पाचारण केले आहे.” (१ करिंथ. ७:१५) विभक्त झाल्यामुळे कदाचित काही प्रमाणात शांती मिळू शकते हे खरं आहे. पण त्या ख्रिस्ती व्यक्तीला पुन्हा लग्न करण्याची मोकळीक नाही. पण याचा अर्थ असाही होत नाही की, तिने आपल्या सत्यात नसलेल्या जोडीदारावर सोबत राहण्याचा दबाव आणावा. अशा वेळी सत्यात नसलेल्या जोडीदारासोबत राहण्यास ती बांधील नाही. कदाचित काही काळानंतर तो जोडीदार परत एकत्र येण्याचा निर्णय घेऊ शकतो. आणि भविष्यात कदाचित तो एक यहोवाचा साक्षीदारदेखील बनू शकतो.

विवाहात कोणत्या गोष्टीला सर्वात जास्त महत्त्व असलं पाहिजे?

यहोवाच्या उपासनेला जीवनात प्राधान्य दिल्यामुळे वैवाहिक जीवनातील आनंद आणखी वाढतो (परिच्छेद १७ पाहा)

१७. जोडप्यांनी जीवनात कोणत्या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे?

१७ आज आपण ‘शेवटल्या दिवसांच्या’ अगदी अंतास आलो आहोत. त्यामुळे आपल्याला कठीण परिस्थितींचा सामना करावा लागतो. (२ तीम. ३:१-५) म्हणूनच आध्यात्मिक रीत्या मजबूत राहणं आज आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. यामुळे जगातील नकारात्मक प्रभावांचा यशस्वी रीत्या सामना करणं आपल्याला शक्य होईल. पौलाने म्हटलं: “काळाचा संक्षेप करण्यात आला आहे,” त्यामुळे त्याने असा सल्ला दिला की, “ज्याला ज्याला पत्नी आहे त्याने त्याने यापुढे ती नसल्यासारखे असावे; . . . आणि जे या जगाचा उपयोग करतात त्यांनी त्याचा उपयोग पूर्णपणे करत नसल्यासारखे असावे.” (१ करिंथ. ७:२९-३१) पण जोडप्यांनी एकमेकांच्या गरजांकडे दुर्लक्ष करावं, असा त्याच्या बोलण्याचा अर्थ नव्हता. आपण शेवटल्या दिवसांत राहत असल्यामुळे जोडप्यांनी आध्यात्मिक गोष्टींना जीवनात पहिलं स्थान दिलं पाहिजे, असं तो सुचवत होता.—मत्त. ६:३३.

१८. ख्रिश्चनांना वैवाहिक जीवन आनंदी आणि यशस्वी बनवणं कशामुळे शक्य आहे?

१८ आजच्या कठीण काळात बरेच विवाह तुटत आहेत. मग अशा परिस्थितीत एक आनंदी आणि यशस्वी वैवाहिक जीवन शक्य आहे का? आपण जर यहोवाच्या आणि त्याच्या लोकांच्या जवळ राहिलो, जीवनात बायबलची तत्त्वं लागू केली आणि यहोवाच्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन स्वीकारलं, तर हे नक्कीच शक्य आहे. आपण या गोष्टी करत राहिल्यानं, “देवाने जे जोडले आहे” त्याची आपण कदर करत आहोत हे दिसून येईल.—मार्क १०:९.

^ [१] (परिच्छेद ५) नावं बदलण्यात आली आहेत.

^ [२] (परिच्छेद १३) देवाच्या प्रेमात टिकून राहा या पुस्तकातील “घटस्फोट आणि विभक्ती याविषयी बायबलचा दृष्टिकोन” हे परिशिष्ट पाहा.