व्हिडिओ पाहण्यासाठी

बाप्तिस्मा म्हणजे काय?

बाप्तिस्मा म्हणजे काय?

बायबलचं उत्तर

 बाप्तिस्मा देण्यासाठी एखाद्याला पाण्यात पूर्णपणे बुडवून बाहेर काढलं जातं. a बायबलमध्ये बऱ्‍याच जणांच्या बाप्तिस्म्याचा उल्लेख आहे. (प्रेषितांची कार्यं २:४१) त्यांपैकी एक म्हणजे येशूचा बाप्तिस्मा. त्याला यार्देन नदीत पूर्णपणे बुडवून बाप्तिस्मा देण्यात आला. (मत्तय ३:१३, १६) पुढे बऱ्‍याच वर्षांनी इथियोपियाचा एक माणूस प्रवास करत होता तेव्हा वाटेत एका ‘तळ्यात’ त्याचा बाप्तिस्मा झाला.—प्रेषितांची कार्यं ८:३६-४०.

 येशूने शिकवलं की त्याच्या शिष्यांनी बाप्तिस्मा घेणं गरजेचं आहे. (मत्तय २८:१९, २०) आणि या गोष्टीला प्रेषित पेत्रनेसुद्धा दुजोरा दिला.—१ पेत्र ३:२१.

या लेखात आपण पाहू

 बाप्तिस्म्याचा काय अर्थ होतो?

 एक व्यक्‍ती बाप्तिस्मा घेऊन जाहीरपणे दाखवून देते, की तिने तिच्या पापांबद्दल पश्‍चात्ताप केलाय आणि यापुढे कायम देवाच्या इच्छेप्रमाणे जगण्याचं त्याला वचन दिलंय. तसंच ती प्रत्येक गोष्टीत देवाची आणि येशूची आज्ञा पाळते. जे बाप्तिस्मा घेऊन देवाच्या इच्छेप्रमाणे जगतात त्यांना सर्वकाळाच्या जीवनाची आशा आहे.

 एका व्यक्‍तीने आपल्या जीवनात योग्य बदल केलाय, हे दाखवून देण्यासाठी तिला पाण्यात पूर्णपणे बुडवून बाप्तिस्मा देणं एक योग्य पद्धत आहे. असं का म्हणता येईल? कारण बायबल बाप्तिस्म्याची तुलना पुरण्याशी करतं. (रोमकर ६:४; कलस्सैकर २:१२) एखाद्या व्यक्‍तीचा पाण्यात बाप्तिस्मा होतो, तेव्हा एका अर्थाने तिचा मृत्यू होतो किंवा तिचं पूर्वीचं जीवन संपतं. आणि जेव्हा ती पाण्यातून वर येते तेव्हा ती एक समर्पित ख्रिस्ती म्हणून नव्याने जीवन सुरू करते.

 लहान बाळांच्या बाप्तिस्म्याबद्दल बायबलमध्ये काय सांगितलंय?

 बायबलमध्ये लहान बाळांना बाप्तिस्मा देण्याबद्दल काहीही सांगितलेलं नाही. एखाद्या व्यक्‍तीला बाप्तिस्मा घ्यायचा असेल, तर तिने काही गोष्टी केल्या पाहिजेत असं बायबल सांगतं. उदाहरणार्थ, आधी तिने देवाच्या वचनातल्या कमीतकमी मूलभूत शिकवणी समजून घेतल्या पाहिजेत आणि त्यांप्रमाणे जीवन जगलं पाहिजे. आपल्या पापांबद्दल तिने पश्‍चात्ताप केला पाहिजे. तसंच प्रार्थना करून तिने आपलं जीवन देवाला समर्पित केलं पाहिजे. (प्रेषितांची कार्यं २:३८, ४१; ८:१२) आणि एक लहान बाळ या सगळ्या गोष्टी करू शकत नाही.

 ‘पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा घेणं’ याचा काय अर्थ होतो?

 येशूने त्याच्या शिष्यांना अशी आज्ञा दिली: “लोकांना शिष्य करा आणि त्यांना पित्याच्या, मुलाच्या आणि पवित्र शक्‍तीच्या नावाने बाप्तिस्मा द्या, आणि मी तुम्हाला आज्ञा दिलेल्या सगळ्या गोष्टी त्यांना पाळायला शिकवा.” (मत्तय २८:१९, २०) “नावाने” याचा अर्थ असा होतो, की बाप्तिस्मा घेणारी व्यक्‍ती पिता आणि पुत्र यांचा अधिकार व स्थान समजून ते मान्य करते. तसंच ती देवाच्या पवित्र शक्‍तीची भूमिकाही समजून ती मान्य करते. उदाहरणार्थ, जन्मापासून पांगळा असलेल्या एका माणसाला प्रेषित पेत्रने म्हटलं: “नासरेथचा येशू ख्रिस्त याच्या नावाने मी तुला सांगतो, ऊठ आणि चालायला लाग!” (प्रेषितांची कार्यं ३:६) पेत्रला काय म्हणायचं होतं ते स्पष्टच आहे. त्याने ख्रिस्ताचा अधिकार ओळखला आणि स्वीकारला. तसंच तो ख्रिस्ताच्या अधिकाराने हा चमत्कार करून त्या माणसाला बरं करत आहे हे मान्य केलं.

  •   “पिता” म्हणजे यहोवा b देव. तोच सृष्टीकर्ता, जीवनदाता आणि सर्वशक्‍तिमान देव असल्यामुळे त्याचा अधिकार सगळ्यात मोठा आहे.—उत्पत्ती १७:१; प्रकटीकरण ४:११.

  •   ‘पुत्र’ किंवा “मुलगा” म्हणजे येशू ख्रिस्त, ज्याने सगळ्यांसाठी आपलं जीवन दिलं. (रोमकर ६:२३) मानवजातीसाठी असलेल्या देवाच्या उद्देशात येशूची महत्त्वाची भूमिका आहे. ती आपण समजून मान्य केली तरच आपलं तारण शक्य आहे.—योहान १४:६; २०:३१; प्रेषितांची कार्यं ४:८-१२.

  •   ‘पवित्र आत्मा’ किंवा “पवित्र शक्‍ती” ही देवाची कार्य करणारी शक्‍ती किंवा सामर्थ्य आहे. c पवित्र शक्‍तीचा वापर करून देवाने सगळं काही निर्माण केलं, जीवनाची सुरुवात केली, संदेष्ट्यांना आणि इतरांना संदेश कळवला; तसंच त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने त्यांना ताकद दिली. (उत्पत्ती १:२; ईयोब ३३:४; रोमकर १५:१८, १९) इतकंच नाही, तर देवाने पवित्र शक्‍तीचा वापर करून बायबलच्या लेखकांना त्याचे विचार लिहायचीही प्रेरणा दिली.—२ पेत्र १:२१.

 पुन्हा बाप्तिस्मा घेणं पाप आहे का?

 लोकांनी त्यांचा धर्म बदलणं काही नवीन गोष्ट नाही. पण एखादी व्यक्‍ती आधी ज्या चर्चला जात होती तिथे तिचा बाप्तिस्मा झाला असेल तर काय? तिने जर पुन्हा बाप्तिस्मा घेतला तर ते पाप ठरेल का? काही जण हो म्हणतील. इफिसकर ४:५ मध्ये “एकच प्रभू, एकच विश्‍वास, एकच बाप्तिस्मा” असं जे सांगितलंय त्यामुळे कदाचित ते असं म्हणत असतील. पण एखाद्या व्यक्‍तीचा पुन्हा बाप्तिस्मा होऊ शकत नाही असा या वचनाचा अर्थ होत नाही. असं का म्हणता येईल?

 संदर्भ. इफिसकर ४:५ ची मागची-पुढची वचनं पाहिली तर लक्षात येतं, की विश्‍वासाच्या बाबतीत खऱ्‍या ख्रिश्‍चनांचं एकमत असावं या गोष्टीवर प्रेषित पौल भर देत होता. (इफिसकर ४:१-३, १६) पौलला इथे असं म्हणायचं होतं, की जर त्यांनी एकाच प्रभूचं, येशू ख्रिस्ताचं अनुकरण केलं, त्यांचा एकच विश्‍वास असला किंवा बायबल शिकवणींबद्दल एकच समज असली; तसंच बाप्तिस्म्यासाठी आवश्‍यक असलेल्या बायबल-आधारित गोष्टीही सारख्या असल्या, तरच त्यांच्यात एकी असणार होती.

 ज्यांचा बाप्तिस्मा झाला होता त्यांच्यापैकी काहींना पौलने परत बाप्तिस्मा घ्यायचं प्रोत्साहन दिलं. कारण ख्रिस्ती शिकवणींची पूर्ण समज मिळण्याआधीच त्यांचा बाप्तिस्मा झाला होता.—प्रेषितांची कार्यं १९:१-५.

 बाप्तिस्मा घेण्यासाठी योग्य आधार. आपला बाप्तिस्मा जर बायबलमधल्या अचूक ज्ञानावर आधारित असला, तरच तो देवाच्या दृष्टीने योग्य असेल. (१ तीमथ्य २:३, ४) जर बायबलच्या विरोधात असलेल्या धार्मिक शिकवणींच्या आधारावर एखाद्याने बाप्तिस्मा घेतला तर देवाला तो मान्य नसेल. (योहान ४:२३, २४) बाप्तिस्मा घेणारा कदाचित खूप प्रामाणिक असेल, पण सत्याच्या “अचूक ज्ञानाप्रमाणे” त्याने बाप्तिस्मा घेतला नसेल. (रोमकर १०:२) म्हणून मग आता त्याने देवाला खूश करण्यासाठी बायबलचं सत्य शिकलं पाहिजे, शिकलेल्या गोष्टींप्रमाणे वागलं पाहिजे, देवाला आपलं जीवन समर्पित केलं पाहिजे आणि पुन्हा बाप्तिस्मा घेतला पाहिजे. या परिस्थितीत त्याने पुन्हा बाप्तिस्मा घेतला तर ते पाप ठरणार नाही. उलट, ते योग्यच असेल.

 बायबलमध्ये इतर बाप्तिस्म्यांचा उल्लेख

 बायबलमध्ये इतर बाप्तिस्म्यांचा उल्लेख केलाय. ख्रिस्ताचे शिष्य पाण्यात जो बाप्तिस्मा घेतात त्यापेक्षा या बाप्तिस्म्यांचा अर्थ वेगळा आहे. काही उदाहरणं पाहू या.

 बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानने दिलेला बाप्तिस्मा. d देवाने इस्राएली लोकांना मोशेद्वारे नियमशास्त्र दिलं होतं. मोशेच्या या नियमशास्त्राविरुद्ध केलेल्या पापांबद्दल यहुदी आणि यहुदी धर्म स्वीकारलेल्यांनी पश्‍चात्ताप केला. हे दाखवण्यासाठी योहानने त्यांना बाप्तिस्मा दिला. या बाप्तिस्म्याने लोकांना नासरेथच्या येशूला मसीहा म्हणून ओळखायला आणि स्वीकारायला तयार केलं.—लूक १:१३-१७; ३:२, ३; प्रेषितांची कार्यं १९:४.

 येशूचा बाप्तिस्मा. बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानने येशूला दिलेला बाप्तिस्मा खूप खास होता. येशू परिपूर्ण माणूस होता आणि त्याने कोणतंही पाप केलं नव्हतं. (१ पेत्र २:२१, २२) त्यामुळे त्याचा बाप्तिस्मा पश्‍चात्तापासाठी किंवा “देवाला एका शुद्ध विवेकाची विनंती” करण्यासाठी नव्हता. (१ पेत्र ३:२१) उलट भविष्यवाणीत सांगितलेला मसीहा किंवा ख्रिस्त म्हणून देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो तयार आहे हे त्याच्या बाप्तिस्म्यावरून दिसून आलं. त्यात त्याने मानवजातीसाठी स्वतःचं जीवन बलिदान करणंही सामील होतं.—इब्री लोकांना १०:७-१०.

 पवित्र शक्‍तीने बाप्तिस्मा. बाप्तिस्मा देणारा योहान आणि येशू हे दोघंही पवित्र शक्‍तीने होणाऱ्‍या बाप्तिस्म्याबद्दल बोलले. (मत्तय ३:११; लूक ३:१६; प्रेषितांची कार्यं १:१-५) पण हा बाप्तिस्मा पवित्र शक्‍तीच्या नावाने दिल्या जाणाऱ्‍या बाप्तिस्म्यापेक्षा वेगळा आहे. (मत्तय २८:१९) असं का?

 येशूच्या शिष्यांपैकी फक्‍त काही जणांचा पवित्र शक्‍तीने बाप्तिस्मा होतो. त्यांना पवित्र शक्‍तीने अभिषिक्‍त केलं जातं. कारण त्यांना स्वर्गात ख्रिस्तासोबत याजक आणि राजे म्हणून पृथ्वीवर राज्य करण्यासाठी निवडलं जातं. e (१ पेत्र १:३, ४; प्रकटीकरण ५:९, १०) नंदनवन झालेल्या पृथ्वीवर सर्वकाळाचं जीवन जगण्याची आशा असलेल्या येशूच्या लाखो-करोडो शिष्यांवर ते राज्य करतील.—मत्तय ५:५; लूक २३:४३.

 ख्रिस्त येशूमध्ये आणि त्याच्या मरणात बाप्तिस्मा. पवित्र शक्‍तीने ज्यांचा बाप्तिस्मा होतो त्यांचा ‘ख्रिस्त येशूमध्येसुद्धा बाप्तिस्मा’ होतो. (रोमकर ६:३) त्यामुळे हा बाप्तिस्मा स्वर्गातून येशूसोबत राज्य करणाऱ्‍या त्याच्या अभिषिक्‍त शिष्यांना लागू होतो. येशूमध्ये बाप्तिस्मा घेतल्यामुळे ते त्याच्या अभिषिक्‍त मंडळीचे भाग बनतात. येशू त्यांचा मस्तक आहे आणि ते शरीर आहेत.—१ करिंथकर १२:१२, १३, २७; कलस्सैकर १:१८.

 अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचा येशूच्या “मरणातही बाप्तिस्मा” होतो. (रोमकर ६:३, ४) येशूसारखंच ते स्वतःला खूश करण्याऐवजी देवाची आज्ञा पाळण्यावर लक्ष केंद्रित करतात. येशूप्रमाणेच त्यांना माहीत असतं, की पृथ्वीवर सर्वकाळ जगण्याची आशा त्यांच्याकडे नाहीये. जेव्हा त्यांचा मृत्यू होतो आणि स्वर्गातल्या जीवनासाठी त्यांचं पुनरुत्थान होतं तेव्हा लाक्षणिक अर्थाने त्यांचा हा बाप्तिस्मा पूर्ण होतो.—रोमकर ६:५; १ करिंथकर १५:४२-४४.

 अग्नीने बाप्तिस्मा. बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानने असं म्हटलं: “[येशू] तुम्हाला पवित्र शक्‍तीने आणि अग्नीने बाप्तिस्मा देईल. त्याच्या हातात धान्यापासून भुसा वेगळा करायचं फावडं आहे आणि तो त्याचं खळं पूर्णपणे स्वच्छ करेल. तो गहू कोठारांत जमा करेल, तर भुसा अशा आगीत जाळून टाकेल जी विझवता येत नाही.” (मत्तय ३:११, १२) लक्ष द्या की अग्नीने होणारा बाप्तिस्मा आणि पवित्र शक्‍तीने होणारा बाप्तिस्मा यांत फरक आहे. या उदाहरणातून योहानला काय सांगायचं होतं?

 ‘गहू’ येशूचं ऐकणाऱ्‍या आणि त्याच्या आज्ञा पाळणाऱ्‍या लोकांना सूचित करतो. पवित्र शक्‍तीने बाप्तिस्मा होण्याची त्यांच्याकडे आशा आहे. ‘भुसा’ अशा लोकांना सूचित करतो जे येशूचं ऐकत नाहीत. त्यांचा अग्नीने बाप्तिस्मा होईल, म्हणजेच कायमचा नाश होईल.—मत्तय ३:७-१२; लूक ३:१६, १७.

a “बाप्तिस्मा” हा शब्द ”‏पाण्यात उतरणं, पूर्णपणे पाण्याखाली जाणं आणि मग पाण्यातून बाहेर येणं”‏ या अर्थाच्या ग्रीक शब्दापासून आला आहे, असं वाइन्स कम्पलीट एक्सपोझिटरी डिक्शनरी ऑफ ओल्ड ॲण्ड न्यू टेस्टमेंट वर्ड्‌स  यात सांगितलंय.

b यहोवा हे देवाचं वैयक्‍तिक नाव आहे. (स्तोत्र ८३:१८) “यहोवा कौन है?” हा लेख पाहा

dबाप्तिस्मा देणारा योहान कोण होता?” हा इंग्रजीतला लेख पाहा

eस्वर्गात कोण जातात?” हा लेख पाहा

f बायबलमध्ये “बाप्तिस्मा” हा शब्द शुद्धीकरणाच्या विधीलाही, जसं की भांडी पाण्यात बुडवून काढणं यालाही सूचित करतो. (मार्क ७:४; इब्री लोकांना ९:१०) पण येशू आणि त्याच्या शिष्यांचा बाप्तिस्मा पाण्यात बुडवून झाला त्यापेक्षा हे पूर्णपणे वेगळं आहे.