व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय १९

“जिथे-जिथे नदीचं हे पाणी वाहील तिथे-तिथे जीवन असेल”

“जिथे-जिथे नदीचं हे पाणी वाहील तिथे-तिथे जीवन असेल”

यहेज्केल ४७:९

अध्याय कशाबद्दल आहे: मंदिरातून वाहणाऱ्‍या नदीबद्दलची भविष्यवाणी प्राचीन काळात कशी पूर्ण झाली, आज कशी पूर्ण होत आहे आणि भविष्यात कशी पूर्ण होईल

१, २. यहेज्केल ४७:१-१२ या वचनांनुसार यहेज्केल काय पाहतो? आणि स्वर्गदूत त्याला नदीबद्दल काय सांगतो? (सुरुवातीचं चित्र पाहा.)

 मंदिराच्या दृष्टान्तात यहेज्केल आणखी एक रोमांचक दृश्‍य पाहतो. त्याला पवित्र मंदिरातून पाण्याचा एक छोटासा प्रवाह वाहताना दिसतो. कल्पना करा नदीच्या पाण्याचा तो स्वच्छ प्रवाह जिथे कुठे वाहतो तिथे यहेज्केल त्याच्यासोबत चालत आहे. (यहेज्केल ४७:१-१२ वाचा.) तो पाहतो, की हा प्रवाह मंदिराच्या उंबरठ्याखालून वाहत आहे. मग तो मंदिराच्या पूर्वेकडच्या प्रवेश-इमारतीच्या बाजूने बाहेर पडतो. मंदिर फिरवून दाखवणारा स्वर्गदूत यहेज्केलला पाण्याच्या त्या प्रवाहासोबत पुढे-पुढे घेऊन जातो. मंदिरापासून जसजसं ते दूर जातात तसतसं स्वर्गदूत अंतर मोजतो आणि प्रत्येक वेळी यहेज्केलला त्या पाण्यातून चालायला सांगतो. पाण्यातून चालताना यहेज्केलला जाणवतं, की प्रवाह आणखी खोल होत जात आहे आणि काही वेळातच त्याची खळखळून वाहणारी नदी बनते. ती इतकी खोल होत जाते की त्यात चालणं अशक्य होतं. ती पार करण्यासाठी एखाद्याला त्यातून पोहूनच जावं लागणार होतं.

स्वर्गदूत यहेज्केलला सांगतो, की ही नदी मृत समुद्राला जाऊन मिळते आणि ती जिथे कुठे वाहते तिथलं खारं, निर्जीव पाणी निरोगी होतं. तसं पाहायला गेलं तर, मृत समुद्रात कोणताही जीव जिवंत राहू शकत नाही. पण त्या नदीचं पाणी त्या समुद्रामध्ये मिळाल्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणात मासे आढळतात. तसंच, नदीच्या दोन्ही किनाऱ्‍यांवर सर्व प्रकारची भरपूर झाडं आहेत. त्यांना दर महिन्याला रसरशीत, पौष्टिक फळं येतात आणि त्यांना नवीन पानंही येतात. त्या पानांमुळे रोग बरे होतात. यहेज्केलला हे सगळं पाहून खरंच खूप आनंद झाला असेल. तसंच, त्याला आशा आणि हिंमतही मिळाली असेल. मग या नदीच्या दृष्टान्ताचा यहेज्केलसाठी आणि इतर बंदिवानांसाठी काय अर्थ होता? आणि आज आपल्यासाठी त्याचा काय अर्थ आहे?

नदीच्या दृष्टान्ताचा बंदिवासात असलेल्या लोकांसाठी काय अर्थ होता?

३. दृष्टान्तातली नदी खरी नसावी हे बंदिवासातल्या यहुद्यांना कशावरून समजलं असेल?

दृष्टान्तातली ही नदी खरोखरची आहे असं प्राचीन काळातल्या यहुद्यांना नक्कीच वाटलं नसेल. असं आपण का म्हणू शकतो? कारण २०० हून जास्त वर्षांपूर्वी योएल संदेष्ट्यानेसुद्धा शुद्ध उपासना पुन्हा सुरू होण्याबद्दल अशीच एक भविष्यवाणी केली होती. (योएल ३:१८ वाचा.) त्याने म्हटलं होतं, की “पर्वतांवरून गोड द्राक्षारस पाझरेल,” “टेकड्यांवरून दूध वाहील” आणि “यहोवाच्या मंदिरातून एक झरा वाहील.” बंदिवासात असलेल्या यहुद्यांना माहीत होतं, की योएल खरोखरच्या पर्वतांबद्दल, टेकड्यांबद्दल किंवा झऱ्‍याबद्दल बोलत नव्हता. त्यामुळे यहेज्केलने दृष्टान्तात पाहिलेली नदीसुद्धा खरोखरची असू शकत नाही हे त्यांना समजलं असेल. a मग नदीचा हा दृष्टान्त दाखवून यहोवा त्यांना काय सांगायचा प्रयत्न करत होता? त्यासाठी आपल्याला दृष्टान्तातल्या काही भागांचा काय अर्थ होतो हे बायबलमधून समजून घ्यावं लागेल. तर चला, आपण अशा तीन गोष्टींवर चर्चा करू या ज्यांमुळे आपल्याला यहोवाकडून प्रेमळ आश्‍वासन आणि हिंमत मिळू शकते.

४. (क) बायबलमध्ये सहसा “पाणी” आणि “नदी” यांची उदाहरणं का दिली आहेत? (ख) नदीचा दृष्टान्त ऐकल्यावर यहुद्यांनी कोणत्या आशीर्वादांची अपेक्षा केली असेल? (ग) यहोवा आपल्या लोकांना भविष्यात आशीर्वाद देईल याची खातरी आपल्याला कशी मिळते? (“यहोवाकडून मिळणाऱ्‍या आशीर्वादांच्या नद्या,” ही चौकट पाहा.)

आशीर्वादांची नदी. बायबलमध्ये यहोवाच्या आशीर्वादांचं वर्णन करण्यासाठी बऱ्‍याचदा नद्यांची आणि पाण्याची उदाहरणं दिली आहेत. दृष्टान्तात यहेज्केलला दिसलं, की नदी मंदिरातून वाहते. त्यावरून लोकांना हे समजलं असेल, की जोपर्यंत ते शुद्ध उपासना करत राहतील तोपर्यंत यहोवाकडून त्यांना भरभरून आशीर्वाद मिळत राहतील. मग त्यांना कोणते आशीर्वाद मिळणार होते? एक म्हणजे, याजक त्यांना पुन्हा देवाच्या वचनातून शिकवणार होते. आणि दुसरा म्हणजे, यरुशलेममध्ये जाऊन पुन्हा मंदिरात बलिदानं दिल्यावर त्यांना याची खातरी मिळणार होती, की यहोवा त्यांची पापं माफ करेल. (यहे. ४४:१५, २३; ४५:१७) अशा प्रकारे, यहोवाच्या नजरेत ते लोक पुन्हा शुद्ध होणार होते; जणू काय मंदिरातून वाहणाऱ्‍या शुद्ध पाण्यामुळे ते स्वच्छ होणार होते.

५. यहुद्यांना वाटत असलेली चिंता नदीच्या दृष्टान्तामुळे कशी दूर झाली असेल?

मायदेशात परत आल्यावर आपल्याला नेहमीच भरभरून आशीर्वाद मिळतील का अशी शंका जर यहुद्यांच्या मनात आली असेल, तर नदीच्या या दृष्टान्तामुळे ती दूर झाली असेल. कारण सुरुवातीला दिसलेला पाण्याचा छोटासा प्रवाह पुढे वाढत जातो आणि फक्‍त दोन किलोमीटरच्या अंतरावर त्याची एक खळखळून वाहणारी नदी बनते. (यहे. ४७:३-५) यावरून कळतं, की यहुदी लोक आपल्या मायदेशात परत आल्यावर त्यांची संख्या कितीही वाढली, तरी यहोवाचे आशीर्वाद त्यांना कधीच कमी पडणार नव्हते. नदीच्या दृष्टान्तावरून त्यांना याची खातरी मिळाली, की यहोवाकडून त्यांना नेहमीच भरभरून आशीर्वाद मिळत राहतील!

६. (क) नदीच्या दृष्टान्तातून यहुद्यांना कोणती खातरी मिळाली? (ख) पण त्यासोबतच त्यांना कोणता इशारा मिळाला? (तळटीप पाहा.)

जीवन देणारं पाणी. दृष्टान्तातली नदी मृत समुद्राला जाऊन मिळते आणि समुद्राचं खारं पाणी निरोगी होतं. त्यामुळे महासागरासारखं, म्हणजेच भूमध्य समुद्रासारखं आता मृत समुद्रातही भरमसाठ मासे मिळू लागतात. इतकंच काय, तर मृत समुद्राच्या किनाऱ्‍यावर असलेल्या दोन नगरांमध्ये मासेमारीचा एक मोठा व्यवसायही सुरू होतो. ही दोन नगरं खरंतर एकमेकांपासून फार दूर होती. यावरून दिसतं, की मासेमारीचा व्यवसाय किती दूरपर्यंत पसरला होता. स्वर्गदूत यहेज्केलला म्हणतो: “जिथे-जिथे नदीचं हे पाणी वाहील तिथे-तिथे जीवन असेल.” मग याचा अर्थ असा होतो का, की नदीतून वाहणारं पाणी संपूर्ण मृत समुद्राला निरोगी बनवणार होतं का? नाही. स्वर्गदूत समजवतो, की काही जागा अशा आहेत जिथे दलदल आणि चिखल आहे. आणि तिथे जीवन देणारं नदीचं पाणी पोहोचत नाही. त्यामुळे त्या जागा ‘खाऱ्‍याच राहतात.’ b (यहे. ४७:८-११) बंदिवासातल्या यहुद्यांना नदीच्या या दृष्टान्तामुळे खातरी मिळाली असेल, की शुद्ध उपासना पुन्हा सुरू होईल आणि यामुळे एका अर्थी ते जिवंत होतील; म्हणजे यहोवासोबत पुन्हा त्यांचं एक चांगलं नातं तयार होईल. पण या दृष्टान्तातून त्यांना असा इशाराही मिळाला, की यहोवाच्या आशीर्वादांची सगळेच कदर करणार नाहीत आणि सगळेच बरे होणार नाहीत.

७. नदीच्या किनाऱ्‍यांवर असलेल्या झाडांवरून यहुद्यांना कोणती खातरी मिळाली?

फळं देणारी आणि रोग बरे करणारी झाडं. दृष्टान्तात नदीच्या दोन्ही किनाऱ्‍यांवर असलेल्या झाडांमुळे आसपासचं दृश्‍य अतिशय सुंदर दिसत होतं. यहेज्केलसाठी आणि बाकीच्या यहुद्यांसाठी या झाडांचा काय अर्थ होता? दृष्टान्तात सांगितलं होतं, की या झाडांना दर महिन्याला भरपूर रसरशीत फळं येतील. यामुळे यहुद्यांना खातरी मिळाली असेल, की यहोवा त्याच्या वचनातून त्यांना भरपूर आध्यात्मिक अन्‍न देत राहील. दृष्टान्तात पानांचाही उल्लेख केला होता. त्यात सांगितलं होतं, की झाडांची पानं “औषध म्हणून वापरली जातील.” (यहे. ४७:१२) यहोवाला माहीत होतं, की यहुदी लोक आपल्या मायदेशात परत येतील तेव्हा त्यांना लाक्षणिक अर्थाने बरं करावं लागेल; म्हणजेच त्याच्यासोबतचं त्यांचं नातं घट्ट करण्यासाठी त्यांना मदत पुरवावी लागेल. आणि यहोवाने ती पुरवायचं त्यांना अभिवचन दिलं. त्याने हे कसं केलं याबद्दल आपण या पुस्तकाच्या ९ व्या अध्यायात पहिलं होतं. त्या अध्यायात आपण शुद्ध उपासना पुन्हा सुरू होण्याबद्दलच्या काही इतर भविष्यवाण्यांवर चर्चा केली होती.

८. यहेज्केलच्या दृष्टान्ताची भविष्यात मोठी पूर्णता होणार होती हे कशावरून कळतं?

पण अध्याय ९ मध्ये आपण हेही पाहिलं होतं, की यहुदी लोक आपल्या मायदेशात परत आले तेव्हा त्यांनी शुद्ध उपासना पुन्हा सुरू होण्याबद्दलच्या भविष्यवाण्यांची फक्‍त काही प्रमाणातच पूर्णता अनुभवली. आणि यासाठी ते स्वतःच जबाबदार होते. कारण मायदेशात परत आल्यावर काही काळाने ते पुन्हा यहोवापासून भरकटू लागले, त्याच्या आज्ञांच्या विरोधात वागू लागले आणि शुद्ध उपासनेकडे दुर्लक्ष करू लागले. मग यहोवा कसा काय त्यांना आशीर्वाद देणार होता! पण त्यांच्यामध्ये काही विश्‍वासू लोकही होते. आपले यहुदी भाऊबंद पुन्हा वाईट मार्गाला लागले हे पाहून त्यांना खूप वाईट वाटलं. पण यहोवाची सगळी अभिवचनं नक्की पूर्ण होतील याचा त्यांना भरवसा होता. कारण ती अभिवचनं कधीच निष्फळ ठरत नाहीत हे त्यांना माहीत होतं. (यहोशवा २३:१४ वाचा.) याचाच अर्थ, यहेज्केलच्या दृष्टान्ताची एक ना एक दिवस मोठी पूर्णता होणार होती. पण नेमकी केव्हा?

नदी आजही वाहत आहे!

९. नदीबद्दलची भविष्यवाणी मोठ्या प्रमाणात केव्हा पूर्ण होणार होती?

या पुस्तकाच्या १४ व्या अध्यायात आपण पाहिलं होतं, की मंदिरातल्या दृष्टान्ताची भविष्यवाणी “शेवटच्या दिवसांत” मोठ्या प्रमाणावर पूर्ण होत आहे. आज शुद्ध उपासना पूर्वी कधीच नव्हती इतक्या उच्च स्थानावर आहे. (यश. २:२) दृष्टान्तातल्या नदीबद्दलची भविष्यवाणी आज आपल्या काळात कशी पूर्ण होत आहे?

१०, ११. (क) आज आपल्याला कोणते आशीर्वाद मिळत आहेत? (ख) शेवटच्या दिवसांत आशीर्वादांची नदी खळखळून कशी वाहत आहे?

१० आशीर्वादांची नदी. यहोवाच्या मंदिरातून जसा पाण्याचा प्रवाह सतत वाहत होता, तसंच आज यहोवाकडून आपल्याला सतत आशीर्वाद मिळत आहेत. आज यहोवा आपल्याला भरपूर आध्यात्मिक अन्‍न पुरवत असल्यामुळे त्याच्यासोबत आपलं नातं टिकून राहतं. आणि यासाठी त्याने बऱ्‍याच तरतुदी केल्या आहेत. त्यांपैकी सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची तरतूद म्हणजे, ख्रिस्ताचं खंडणी बलिदान. या बलिदानामुळे आपली पापं धुतली जातात, म्हणजे ती माफ केली जातात. तसंच, देवाच्या वचनातली सत्यंसुद्धा जीवन देणाऱ्‍या पाण्यासारखी आहेत. त्यांमुळे आपण देवाच्या नजरेत शुद्ध होतो. (इफिस. ५:२५-२७) मग आशीर्वादांची ही नदी आज आपल्या दिवसांत खळखळून कशी वाहत आहे?

११ १९१९ मध्ये यहोवाच्या सेवकांची संख्या फक्‍त काही हजारांमध्ये होती. यहोवासोबत एक चांगलं नातं टिकवून ठेवण्यासाठी त्यांना ज्या आध्यात्मिक अन्‍नाची गरज होती ते त्यांना मिळत होतं. आणि त्यामुळे ते खूप आनंदी होते. मग नंतरच्या दशकांमध्ये त्यांची संख्या वाढतच गेली. आणि आज ती ८५ लाखांपेक्षाही जास्त आहे. मग जितक्या वेगाने त्यांची संख्या वाढत आहे, तितक्याच वेगाने आशीर्वादांची नदी वाहत आहे का? हो, ती अगदी खळखळून वाहत आहे! आज आपल्याला भरपूर आध्यात्मिक अन्‍न मिळत आहे. गेल्या शंभर वर्षांच्या काळात देवाच्या लोकांसाठी अक्षरशः अब्जावधी बायबल, पुस्तकं, मासिकं, माहितीपत्रकं आणि पत्रिका तयार करण्यात आल्या आहेत. खळखळून वाहणाऱ्‍या नदीप्रमाणेच देवाच्या वचनाचं ज्ञानही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागलं. यामुळे जगभरात देवाच्या ज्ञानासाठी तहानलेले लोक तृप्त झाले. बायबलवर आधारित छापील साहित्य तर फार आधीपासूनच उपलब्ध होतं. पण आता ते आपल्याला ऑनलाईनही वाचायला मिळतं. आज jw.org वेबसाईटवर १,००० पेक्षा जास्त भाषांमध्ये ते उपलब्ध आहे. सत्याच्या या पाण्यामुळे प्रामाणिक मनाच्या लोकांवर कसा परिणाम होत आहे?

१२. (क) सत्य जाणून घेतल्यामुळे आज लोकांना कसा फायदा होत आहे? (ख) या दृष्टान्तातून आज आपल्याला कोणता इशारा मिळतो? (तळटीपसुद्धा पाहा.)

१२ जीवन देणारं पाणी. स्वर्गदूताने यहेज्केलला म्हटलं, “जिथे-जिथे नदीचं हे पाणी वाहील तिथे-तिथे जीवन असेल.” ही गोष्ट आज कशी पूर्ण होत आहे? आज लाखो लोकांपर्यंत सत्याचं पाणी पोहोचत आहे आणि ते हे पाणी स्वीकारून आध्यात्मिक नंदनवनात राहत आहेत. अशा लोकांच्या जीवनावर या पाण्याचा खूप चांगला प्रभाव पडत आहे. बायबलची सत्यं जाणून घेतल्यामुळे जणू काय त्यांच्यात पुन्हा जीव आला आहे आणि यहोवावरचा त्यांचा विश्‍वास आणखी वाढला आहे. पण तुम्हाला आठवत असेल, दृष्टान्तात असंही सांगितलं होतं, की मृत समुद्रातल्या काही जागा दलदलीच्या आणि चिखलाच्याच राहतील. अगदी तसंच, काही जण पुढे बायबलच्या सत्यांबद्दल कदर दाखवणार नाहीत आणि त्यांनुसार जीवन जगायचं सोडून देतील. c असं आपल्या बाबतीत कधी घडू नये म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे.—अनुवाद १०:१६-१८ वाचा.

१३. नदीच्या किनाऱ्‍यांवर असलेल्या झाडांवरून आपल्याला काय कळतं?

१३ फळं देणारी आणि रोग बरे करणारी झाडं. नदीच्या किनाऱ्‍यांवर असलेल्या झाडांवर दर महिन्याला नवीन पौष्टिक फळं येतात आणि त्यांची पानं रोग बरे करण्यासाठी वापरली जातात. (यहे. ४७:१२) यांवरून आपल्याला कळतं, की यहोवा आपल्याला भरपूर आध्यात्मिक अन्‍न पुरवत आहे आणि तो आपल्याला आध्यात्मिक रितीने बरं व्हायलासुद्धा मदत करत आहे. जगात एकीकडे खऱ्‍या ज्ञानाचा दुष्काळ पडला आहे, पण दुसरीकडे यहोवा आपल्याला ते भरपूर प्रमाणात पुरवत आहे. एखादा लेख वाचून झाल्यावर किंवा अधिवेशनात शेवटचं गाणं गायल्यावर किंवा एखादा व्हिडिओ अथवा ब्रॉडकास्ट पाहिल्यावर तुम्हाला कसं वाटतं? तुम्हाला नक्कीच खूप आनंद होतो, नाही का? कारण आध्यात्मिक रितीने आपण अगदी तृप्त होतो! (यश. ६५:१३, १४) पण या अन्‍नामुळे आपण सुदृढही राहतो का? नक्कीच. देवाच्या वचनातून जे चांगले सल्ले मिळतात त्यांमुळे आपल्याला अनैतिक कामं आणि लोभ या गोष्टींपासून दूर राहायला मदत होते. तसंच, आपल्याला आपला विश्‍वास आणखी वाढवायला मदत मिळते. आणि समजा आपल्याकडून एखादं मोठं पाप झालं, म्हणजे एका अर्थी जर आपण आजारी पडलो तर आपल्याला बरं करण्यासाठीही यहोवाने तरतूद केली आहे. (याकोब ५:१४ वाचा.) खरंच, नदीच्या किनाऱ्‍यांवर असलेल्या झाडांबद्दलच्या भविष्यवाणीत सांगितल्याप्रमाणे आपल्याला आज भरपूर आशीर्वाद मिळत आहेत.

१४, १५. (क) दलदलीच्या आणि चिखलाच्या जागांवरून आपण कोणता धडा घेऊ शकतो? (ख) दृष्टान्तातल्या नदीमुळे आज आपल्याला कोणते आशीर्वाद मिळत आहेत?

१४ या दृष्टान्तातून आपल्याला एक इशाराही मिळतो. हे आठवा, की मृत समुद्रात काही जागा चिखलाच्या आणि दलदलीच्या होत्या. त्या जागा खाऱ्‍याच राहिल्या, तिथलं पाणी निरोगी झालं नाही. यावरून आपण शिकतो, की आपण अशी मनोवृत्ती कधीच विकसित करू नये ज्यामुळे यहोवाच्या आशीर्वादाची नदी आपल्यापर्यंत पोहोचणार नाही. जर असं झालं तर आपणही जगातल्या लोकांसारखं एका अर्थाने आजारी पडू. (मत्त. १३:१५) त्याऐवजी आपण आशीर्वादांच्या नदीचा पुरेपूर लाभ घेतला पाहिजे. आज आपल्याला वेगवेगळ्या मार्गांनी हे आशीर्वाद मिळत आहेत. जसं की, देवाच्या वचनातल्या मौल्यवान सत्यांची आपल्याला समज मिळत आहे. आणि ती इतरांना शिकवण्याची संधीही आपल्याकडे आहे. तसंच, आपल्याला योग्य मार्गदर्शन, सल्ला आणि सांत्वन देण्यासाठी विश्‍वासू दास वडिलांना प्रशिक्षणही देत आहे. आपण या सर्व आशीर्वादांची कदर करतो तेव्हा जणू काय आपण नदीचं शुद्ध पाणी पिऊन तृप्त होत असतो! खरंच, ही आशीर्वादांची नदी जिथे कुठे वाहते तिथे रोग बरे करते आणि जीवन देते.

१५ दृष्टान्तातली नदीची भविष्यवाणी पुढे नवीन जगात आणखी मोठ्या प्रमाणावर पूर्ण होईल. ती कशी ते आता आपण जाणून घेऊ या.

ही भविष्यवाणी नवीन जगात कशी पूर्ण होईल?

१६, १७. (क) नवीन जगात नदीमुळे आपल्याला कसा फायदा होईल? काही आशीर्वादांबद्दल सांगा.

१६ नवीन जगात तुमचं जीवन कसं असेल याची तुम्ही कधीकधी कल्पना करता का? तुम्ही नक्कीच तुमच्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत जीवनाचा मनसोक्‍त आनंद घेत असल्याची कल्पना करत असाल. पण नदीबद्दलच्या दृष्टान्तावर मनन केल्यामुळे नवीन जगाचं चित्र आपल्याला आणखी चांगल्या प्रकारे डोळ्यांसमोर उभं करता येईल. तर चला, आपण पुन्हा एकदा नदीबद्दलच्या त्या भविष्यवाणीवर विचार करू या आणि त्यातले ते तीन आशीर्वाद आपल्याला नवीन जगात कसे मिळतील ते पाहू या. त्यांवरून यहोवाचं आपल्यावर किती प्रेम आहे हे दिसून येईल.

१७ आशीर्वादांची नदी. ही लाक्षणिक नदी, नवीन जगात आजच्यापेक्षा आणखी खोल आणि मोठी होत जाईल. ती कशी? त्या वेळी यहोवासोबत तर आपलं नातं चांगलं होईलच, पण त्यासोबतच आपल्या सगळ्या शारीरिक कमतरताही दूर होतील. येशूच्या हजार वर्षांच्या शासनकाळात विश्‍वासू लोकांना खंडणी बलिदानाचा पुरेपूर फायदा होईल. हळूहळू ते सर्व परिपूर्ण होतील! कोणतेही आजार नसतील. तसंच डॉक्टरची, हॉस्पिटलची किंवा आरोग्य विम्याचीही आपल्याला गरज नसेल. ‘मोठ्या लोकसमुदायातले’ जे लाखो-करोडो लोक “मोठ्या संकटातून” वाचतील त्यांच्यापर्यंत जीवन देणाऱ्‍या पाण्याचा प्रवाह पोहोचेल. (प्रकटी. ७:९, १४) पण पुढे मिळणाऱ्‍या भरपूर आशीर्वादांची ही फक्‍त सुरुवात असेल; जणू काय पाण्याचा छोटासा प्रवाह वाढून नंतर आशीर्वादांची नदी खळखळून वाहू लागेल.

नवीन जगात प्रत्येक जण आशीर्वादांच्या नदीमुळे तरुण आणि निरोगी होईल (परिच्छेद १७ पाहा)

१८. “जीवनाच्या पाण्याची नदी” नवीन जगात आणखी खळखळून कशी वाहील?

१८ जीवन देणारं पाणी. हजार वर्षांच्या शासनकाळात “जीवनाच्या पाण्याची नदी” खळखळून वाहू लागेल. (प्रकटी. २२:१) यहोवा त्याच्या राज्यात लाखो-करोडो मृत लोकांना पुन्हा जिवंत करेल आणि त्यांना नवीन जगात सर्वकाळाच्या जीवनाची आशा देईल! खरंच, जीवन देणाऱ्‍या पाण्यामुळे बऱ्‍याच काळापासून कबरेत निर्जीव अवस्थेत असलेल्या लोकांमध्ये पुन्हा जीव येईल. (यश. २६:१९) पण जिवंत झालेले सगळे लोक सर्वकाळ जिवंत राहतील का?

१९. (क) आपल्याला नवीन जगात नवनवीन सत्यं शिकायला मिळतील असं आपण का म्हणू शकतो? (ख) भविष्यात काही जण कोणत्या अर्थाने ‘खाऱ्‍या पाण्यासारखे’ असतील?

१९ प्रत्येकाला एक निवड करावी लागेल. नवीन जगातही आपल्याला ‘सत्याचं पाणी’ मिळत राहील. बायबल म्हणतं, की हजार वर्षांच्या शासनकाळात नवीन गुंडाळ्या उघडल्या जातील. याचा अर्थ, आपल्याला आणखीन नवीन सत्यं आणि नवीन सूचना मिळतील. या आशीर्वादांची फक्‍त कल्पना करून आपल्याला किती आनंद होतो! पण दुःखाची गोष्ट म्हणजे काही जण या आशीर्वादांची कदर करणार नाहीत. ते जाणूनबुजून यहोवाच्या आज्ञांच्या विरोधात वागतील. पण हजार वर्षांच्या काळादरम्यान बंड करणाऱ्‍यांना यहोवा खपवून घेणार नाही. तो त्यांना नवीन जगातली शांती नष्ट करू देणार नाही. (यश. ६५:२०) एका अर्थी, ते यहेज्केलच्या दृष्टान्तातल्या त्या दलदलीच्या जागांसारखे असतील ज्या निरोगी होत नाहीत, तर ‘खाऱ्‍याच राहतात.’ जीवन देणारं मौल्यवान पाणी नाकारून ते लोक खरंच किती मूर्खपणा करत असतील! हजार वर्षांच्या नंतरही काही लोक बंड करून सैतानाच्या बाजूने होतील. पण यहोवाच्या नीतिमान शासनाविरुद्ध जाणाऱ्‍या सगळ्यांचा शेवट एकच असेल; तो म्हणजे कायमचा नाश!—प्रकटी. २०:७-१२.

२०. नवीन जगात यहोवा आपल्यासाठी काय तरतूद करेल?

२० फळं देणारी आणि रोग बरे करणारी झाडं. आपल्यापैकी कोणीही सर्वकाळाचं जीवन गमावावं असं यहोवाला वाटत नाही. ते सुंदर जीवन सगळ्यांना मिळावं म्हणून यहोवा दृष्टान्तातल्या झाडांसारखीच तरतूद करेल. त्यामुळे आपण शारीरिक रितीने सुदृढ होऊ आणि यहोवासोबत आपलं एक चांगलं नातं असेल. येशू ख्रिस्त आणि त्याचे १,४४,००० सहराजे हजार वर्षांपर्यंत स्वर्गातून राज्य करतील. यासोबतच हे सहराजे, याजक म्हणूनही सेवा करतील. आणि विश्‍वासू मानवांना खंडणी बलिदानापासून फायदा होण्यासाठी ते त्यांना मदत करतील. त्यामुळे सर्व मानव परिपूर्ण होतील. (प्रकटी. २०:६) पौष्टिक फळं आणि औषधी पानं असलेल्या झाडांच्या दृष्टान्तासारखाच एक दृष्टान्त प्रेषित योहाननेसुद्धा पाहिला होता. (प्रकटीकरण २२:१, २ वाचा.) योहानने पाहिलं, की झाडांची पानं “राष्ट्रांच्या आरोग्यासाठी उपयोगी” आहेत. खरंच, नवीन जगात १,४४,००० याजकांच्या सेवेमुळे असंख्य विश्‍वासू लोकांना भरपूर फायदा होईल.

२१. (क) दृष्टान्तातल्या नदीबद्दल विचार करून तुम्हाला कसं वाटतं? (ख) पुढच्या अध्यायात आपण कशावर चर्चा करणार आहोत? (“छोट्याशा प्रवाहाची पुढे खळखळणारी नदी बनते!” ही चौकट पाहा.)

२१ यहेज्केलने नदीचा जो दृष्टान्त पाहिला त्यावर मनन केल्यामुळे तुमचं मन आनंदाने भरून जात नाही का? तुमच्या मनात आशा निर्माण होत नाही का? नक्कीच! यहोवाने आपल्यासाठी खरंच खूप सुंदर भविष्य राखून ठेवलं आहे! नवीन जगातल्या गोष्टींची झलक देण्यासाठी यहोवाने हजारो वर्षांआधी भविष्यवाण्यांमध्ये कायम लक्षात राहणारी चित्रं वापरली आहेत. तसंच, तो कित्येक वर्षांपासून लोकांना नवीन जगातले आशीर्वाद अनुभवण्याचं धीराने आमंत्रण देत आहे. मग ते आशीर्वाद अनुभवण्यासाठी तुम्ही तिथे असाल का? कदाचित तुम्हाला प्रश्‍न पडेल, की नवीन जगात राहण्यासाठी मला जागा मिळेल का? या प्रश्‍नाचं उत्तर आपल्याला पुढच्या अध्यायात मिळेल. त्यात यहेज्केलच्या पुस्तकातल्या शेवटच्या काही अध्यायांवर आपण चर्चा करणार आहोत.

a शिवाय, बंदिवासातल्या काही यहुद्यांना आपल्या मायदेशात पर्वत आणि नद्या कुठे आहेत हे माहीत होतं. त्यामुळे त्यांना कळलं असेल, की ही नदी खरी असू शकत नाही. याची फक्‍त दोन कारणं पाहा: एक म्हणजे, दृष्टान्तात दाखवलं होतं, की ही नदी एका अतिशय उंच डोंगरावर असलेल्या मंदिरातून बाहेर पडत आहे. पण इतक्या उंच डोंगरावर असलेलं मंदिर त्यांच्या मायदेशात नव्हतं. दुसरं म्हणजे, दृष्टान्तात असं दिसतं, की नदी कोणत्याही अडथळ्याशिवाय थेट मृत समुद्रात जाऊन मिळते. पण असं प्रत्यक्षात होणं शक्य नव्हतं, कारण त्यांच्या देशात सगळीकडे डोंगर होते.

b बायबलबद्दल माहिती देणाऱ्‍या काहींचं असं म्हणणं आहे, की ही वचनं एका चांगल्या गोष्टीला सूचित करतात. कारण मृत समुद्रातलं मीठ गोळा करण्याचा व्यवसाय फार पूर्वीपासून चालत आला आहे. पण भविष्यवाणी स्पष्टपणे सांगते, की काही जागा अशा आहेत जिथे दलदल आणि चिखल आहे. आणि तिथलं पाणी ‘निरोगी होणार नाही,’ ते खारंच किंवा निर्जीव राहील. कारण यहोवाच्या मंदिरातलं जीवन देणारं पाणी तिथे पोहोचत नाही. त्यामुळे असं दिसतं, की या भागांमध्ये असलेलं खारं पाणी वाईट गोष्टींना सूचित करतं.—स्तो. १०७:३३, ३४; यिर्म. १७:६.

c येशूने माशांच्या जाळ्याचं जे उदाहरण दिलं त्यात असाच मुद्दा मांडला होता. जाळ्यात बरेच मासे येत असले, तरी सर्वच मासे “चांगले” असतात असं नाही. त्यातले खराब मासे फेकून दिले जातात. या उदाहरणातून येशू हे सांगायचा प्रयत्न करत होता, की यहोवाच्या संघटनेत येणाऱ्‍यांपैकी काही जण विश्‍वासू राहणार नाहीत.—मत्त. १३:४७-५०; २ तीम. २:२०, २१.