व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपण देवाबरोबर ओळख वाढवू शकतो का?

आपण देवाबरोबर ओळख वाढवू शकतो का?

“देव ही संकल्पना आपल्या आकलन शक्तीच्या पलीकडची आहे.”—अॅलेक्झांड्रियाचा फिलो, १,९०० वर्षांपूर्वीचा तत्त्वज्ञानी.

“[देव] आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही.”—तार्ससचा शौल, १,९०० वर्षांपूर्वी अथेन्समधील तत्त्वज्ञान्यांना उद्देशून बोलत होता.

या दोन मतांपैकी तुम्हाला कोणतं मत पटतं? अनेकांना तार्ससचा शौल ज्याला प्रेषित पौलदेखील म्हणतात, त्याचे शब्द पटतात. यामुळं त्यांना सांत्वनदेखील मिळतं. (प्रेषितांची कृत्ये १७:२६,२७) बायबलमध्ये अशा प्रकारची अनेक खातरीलायक वचनं दिली आहेत. उदाहरणार्थ, येशूनं केलेल्या प्रार्थनेत आपल्या शिष्यांना असं आश्वासन दिलं, की ते देवाला जाणून घेऊ शकतात आणि त्याचा आशीर्वाद मिळवू शकतात.—योहान १७:३.

पण, फिलोसारख्या अनेक तत्त्वज्ञान्यांचं मत वेगळं होतं. त्यांच्या मते आपण देवाला ओळखू शकत नाही, कारण आपण त्याला कधीच पूर्णपणे समजू शकत नाही. पण सत्य काय आहे?

देवाबद्दल सर्वच गोष्टी आपण समजू शकत नाही, असं बायबलमध्ये स्पष्टपणे कबूल करण्यात आलं आहे. जसं की, देवाचं अस्तित्व, त्याची अमर्याद बुद्धी यांसारख्या गोष्टी आपण मोजू शकत नाही, त्यांचा हिशोब लावू शकत नाही किंवा अंदाजही बांधू शकत नाही. कारण या गोष्टी आपल्या समजबुद्धीच्या पलीकडे आहेत. याचा अर्थ असा होत नाही, की आपण देवाला ओळखू शकत नाही. उलट अशा गोष्टींवर मनन केल्यानं आपण “देवाजवळ” जाऊ शकतो. (याकोब ४:८) आता आपण, देवाविषयी आपल्या समजबुद्धीच्या पलीकडे असलेल्या काही गोष्टींवर विचार करू या. त्यानंतर, देवाविषयी आपण समजू शकत असलेल्या गोष्टींवरही चर्चा करू या.

देवाविषयी आपण समजू शकत नसलेल्या गोष्टी

देवाचं अनंतकाळचं अस्तित्व: “अनादिकालापासून अनंतकालापर्यंत” देवाचं अस्तित्व आहे अशी शिकवण बायबलमध्ये देण्यात आली आहे. (स्तोत्र ९०:२) म्हणजेच देवाला सुरुवात नव्हती आणि शेवटही नाही. माणसाच्या दृष्टीनं “त्याच्या वर्षांची संख्या अगण्य आहे,” अर्थात तो केव्हापासून अस्तित्वात आहे हे आपल्यापैकी कुणीही समजू शकत नाही.—ईयोब ३६:२६.

तुम्हाला कशी मदत होईल: आपण देवाला चांगल्या प्रकारे ओळखलं तर तो आपल्याला सार्वकालिक जीवन देण्याचं वचन देतो. (योहान १७:३) देव स्वतः अनंतकाळ अस्तित्वात राहू शकत नसता, तर तो हे वचन आपल्याला देऊ शकला असता का? तो “सर्वकालचा राजा” आहे म्हणूनच तर तो आपल्याला हे वचन देऊ शकतो.—१ तीमथ्य १:१७, पं.र.भा.

देवाची बुद्धी: बायबल आपल्याला शिकवते की देवाची “बुद्धी अगम्य” आहे; अर्थात त्याच्या बुद्धीचा आपण थांगपत्ता लावू शकत नाही. शिवाय त्याचे विचार आपल्या विचारांपेक्षा खूपच श्रेष्ठ आहेत. (यशया ४०:२८; ५५:९) त्यामुळंच बायबलमध्ये विचारलेला प्रश्न योग्य आहे: “प्रभूचे मन असे कोणी ओळखले आहे की त्याने त्याला शिकवावे?”—१ करिंथकर २:१६.

तुम्हाला कशी मदत होईल: देव एकाच वेळी कोट्यवधी लोकांच्या प्रार्थना ऐकू शकतो. (स्तोत्र ६५:२) मग इतक्या सर्वांच्या प्रार्थना ऐकून त्याचं डोकं जड होतं का? किंवा प्रार्थनांचं उत्तर देण्यात तो इतका व्यस्त होऊन जातो, की आपल्याकडं लक्ष देण्यासाठी किंवा आपल्या प्रार्थनांचं उत्तर द्यायला त्याला वेळच उरत नाही? असं मुळीच होत नाही. देवाची बुद्धी अमर्याद आहे. त्याला सर्वांच्या प्रार्थना ऐकणं आणि त्यांना उत्तर देणं कधीच जड जात नाही. त्याला तर चिमण्यांचीसुद्धा काळजी असते. आणि त्याच्या नजरेत आपण तर चिमण्यांपेक्षा अधिक मौल्यवान आहोत.—मत्तय १०:२९, ३१.

देवाचे मार्ग: बायबलमध्ये असं शिकवलं आहे, की माणसाला आरंभापासून शेवटपर्यंतच्या देवाच्या कृत्यांचे आकलन कधीच होणार नाही. (उपदेशक ३:११) त्यामुळं, आपल्याला देवाबद्दलच्या सगळ्या गोष्टी कधीच कळणार नाहीत. कारण त्याची कार्य करण्यामागची बुद्धी “समजून घेणे . . . अशक्य आहे!” (रोमकर ११:३३, सुबोधभाषांतर) पण जे देवाच्या इच्छेप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतात त्यांना तो आपले मार्ग प्रकट करतो.—आमोस ३:७.

देवाचं अस्तित्व, त्याची अमर्याद बुद्धी यांसारख्या गोष्टी आपण मोजू शकत नाही, त्यांचा हिशोब लावू शकत नाही किंवा अंदाजही बांधू शकत नाही

तुम्हाला कशी मदत होईल: तुम्ही बायबलचं वाचन आणि अभ्यास केला तर देवाबद्दल आणि त्याच्या मार्गांबद्दल तुम्हाला सतत नवनवीन गोष्टी शिकायला मिळतील. आणि अशा प्रकारे आपण सर्वकाळ आपल्या स्वर्गीय पित्याच्या जवळ जाऊ शकू.

देवाविषयी आपण समजू शकतो अशा गोष्टी

आपण देवाबद्दल काही गोष्टी समजू शकत नाही याचा असा अर्थ होत नाही की आपण त्याला अजिबात ओळखू शकत नाही. देवाला चांगल्या प्रकारे ओळखण्यासाठी बायबलमध्ये भरपूर माहिती दिली आहे. याची काही उदाहरणं पुढं पाहा:

देवाचं नाव: बायबलमध्ये आपल्याला शिकवलं आहे, की देवानं स्वतःला एक नाव दिलं आहे. तो म्हणतो: “मी यहोवा आहे; हे माझे नाव आहे.” बायबलमध्ये हे नाव * इतर कुठल्याही नावांपेक्षा जास्त वेळा, म्हणजे जवळजवळ ७,००० वेळा आढळतं.—यशया ४२:८, पं.र.भा.

तुम्हाला कशी मदत होईल: येशूनं आपल्या आदर्श प्रार्थनेत म्हटलं: “हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो.” (मत्तय ६:९) देवाला प्रार्थना करताना तुम्हीसुद्धा त्याच्या नावाचा उल्लेख करू शकता. जे यहोवाच्या नावाचा योग्य रीतीने आदर करतात, त्यांना तो वाचवणार आहे.—रोमकर १०:१३.

देवाचं निवासस्थान: बायबलमध्ये शिकवलं आहे, की दोन प्रकारची निवासस्थानं आहेत. एक निवासस्थान म्हणजे स्वर्ग आणि दुसरं पृथ्वी. बायबलमध्ये जेव्हा “स्वर्ग” हा शब्द वापरला जातो तेव्हा तो देवाच्या निवासस्थानाला सूचित करतो. (योहान ८:२३; १ करिंथकर १५:४४) देव, येशू आणि देवदूत यांचं आत्मिक शरीर आहे आणि ते स्वर्गात वास करतात. दुसऱ्या निवासस्थानात म्हणजे पृथ्वीवर आपण राहतो.—१ राजे ८:४३.

तुम्हाला कशी मदत होईल: देवाला आपण चांगल्या प्रकारे जाणू शकतो. देव म्हणजे नुसतीच एक शक्ती नाही जी सगळीकडं आणि सर्व गोष्टींमध्ये वास करते. तर यहोवा देव एक खरी व्यक्ती आहे आणि त्याचं एक निवासस्थान आहे. तो स्वर्गात असला तरी, “कोणतीही अशी निर्मित गोष्ट नाही की जी त्याच्यापासून लपलेली आहे.”—इब्री लोकांस ४:१३, ईझी-टू-रीड व्हर्शन.

देवाचं व्यक्तिमत्त्व: यहोवा देवाच्या गुणांमुळं तो आपल्याला प्रिय वाटतो, असं बायबलमध्ये शिकवण्यात आलं आहे. तो “प्रीती आहे.” (१ योहान ४:८) तो “सत्यप्रतिज्ञ” आहे म्हणजे तो कधीच खोटं बोलत नाही. (तीत १:२) तो पक्षपाती नाही तर दयाळू, कृपाळू, मंदक्रोध आहे. (निर्गम ३४:६; प्रेषितांची कृत्ये १०:३५) जे त्याचा आदर करतात त्या सर्वांबरोबर आपला हा निर्माणकर्ता मैत्री करू इच्छितो, ही गोष्ट जाणल्यावर अनेकांना आश्चर्य वाटतं.—स्तोत्र २५:१४.

तुम्हाला कशी मदत होईल: तुम्ही यहोवाबरोबर मैत्री करू शकता. (याकोब २:२३) जसजसं तुम्हाला यहोवाचा स्वभाव समजू लागेल तसतसं तुम्हाला बायबलमधील अहवाल नीट समजू लागतील.

त्याचा शोध करा

बायबलमध्ये यहोवा देवाच्या व्यक्तिमत्त्वाचं सुरेख वर्णन करण्यात आलं आहे. लोक समजतात तसा तो मुळीच आपल्या समजशक्तीच्या पलीकडे नाही. उलट, आपण त्याच्याशी ओळख वाढवावी, अशी त्याची इच्छा आहे. बायबलमध्ये असं वचन देण्यात आलं आहे: “तू त्याचा शोध करशील तर तो तुला सापडेल.” (१ इतिहास २८:९, पं.र.भा.) बायबलमधील अहवाल वाचून व त्यांवर मनन करून आपण देवाबरोबर ओळख वाढवू शकतो. असं केल्यास “तो तुम्हांजवळ येईल,” असं वचन बायबलमध्ये देण्यात आलं आहे.—याकोब ४:८.

तुम्ही बायबलचं वाचन आणि अभ्यास केला तर देवाबद्दल आणि त्याच्या मार्गांबद्दल तुम्हाला सतत नवनवीन गोष्टी शिकायला मिळतील

पण मग तुमच्या मनात असा प्रश्न येईल, की ‘यहोवा देवाविषयी सगळ्याच गोष्टी मला जर समजणार नाहीत तर मी त्याच्याशी मैत्री कशी करू शकेन?’ तुमच्या प्रश्‍नाचं उत्तर हवं असेल तर पुढील उदाहरणावर जरा विचार करा. समजा, तुमचा जवळचा मित्र एक सर्जन (ऑपरेशन करणारा तज्ज्ञ डॉक्टर) आहे. त्याच्याशी ओळख वाढवण्यासाठी तुम्हालाही त्याच्याप्रमाणं वैद्यकीय क्षेत्रात डिग्री मिळवण्याची गरज होती का? नाही ना! तुमचा पेशा तुमच्या सर्जन असलेल्या मित्रापेक्षा अगदीच वेगळा होता. आणि तरीसुद्धा तुम्ही दोघं जिवलग मित्र झालात. सर्जनचा मित्र म्हणून तुम्हाला त्याच्या आवडी-निवडी, त्याचा स्वभाव हे जाणणं जास्त महत्त्वाचं होतं. तसंच, बायबलचं वाचन करून तुम्ही यहोवा देवाच्या गुणांविषयी शिकून घेऊ शकता. त्याच्याबरोबर मैत्री वाढवण्यासाठी हेच करणं महत्त्वाचं आहे.

बायबलमध्ये यहोवा देवाबद्दल, त्याच्या गुणांबद्दल भरपूर माहिती आहे. आणि यामुळं आपण त्याच्याशी ओळख वाढवू शकतो. तुम्हाला आवडेल का यहोवा देवाविषयी आणखी शिकून घ्यायला? यहोवाचे साक्षीदार एक मोफत गृह बायबल अभ्यास कार्यक्रम चालवतात. तुमच्या भागातील यहोवाच्या साक्षीदारांशी तुम्ही संपर्क साधू शकता किंवा www.jw.org/mr या आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता.▪ (w15-E 10/01)

^ परि. 16 काही बायबलमध्ये यहोवा या देवाच्या नावाऐवजी “प्रभू”, “परमेश्वर” आणि “देव” अशा पदव्या वापरण्यात आल्या आहेत. असं का करण्यात आलं त्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकाच्या पृष्ठ १९५ वरील माहिती पाहा. हे पुस्तक jw.org/mr या वेबसाईटवरही उपलब्ध आहे.