व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“मी तुला विसरणार नाही”

“मी तुला विसरणार नाही”

देवाच्या जवळ या

“मी तुला विसरणार नाही”

यहोवा खरोखरच आपल्या लोकांची काळजी करतो का? असल्यास त्याला त्यांच्याबद्दल किती काळजी वाटते? या प्रश्‍नांची उत्तरे जाणून घेण्याचा फक्‍त एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे देवाचे वचन. यहोवाला त्याच्या लोकांबद्दल कसे वाटते हे त्याने बायबलमध्ये स्वतः सांगितले आहे. यशया ४९:१५ मधील त्याचे शब्द पाहा.

यहोवाला आपल्या लोकांबद्दल किती काळजी वाटते हे दाखवण्यासाठी त्याने यशया संदेष्ट्याद्वारे एक हृदयस्पर्शी उदाहरण दिले. त्याने आधी एक विचारप्रवर्तक प्रश्‍न विचारला: “स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही एवढा तिला आपल्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल काय?” उत्तर अगदी स्पष्ट आहे. एक आई आपल्या पोटच्या मुलाला कधीच विसरू शकत नाही! तिचे बाळ दिवसरात्र तिच्यावर अवलंबून असते; त्याला आईच्या प्रेमाची गरज आहे हे ते आपल्या हावभावांवरून तिला कळवते. पण यहोवाने विचारलेला प्रश्‍न येथेच संपत नाही.

एक आई आपल्या बाळाची काळजी का करते व त्याच्या सर्व गरजा का पुरवते? फक्‍त बाळाचे रडणे थांबवण्यासाठी? नाही. तिच्या मनात उपजतच आपल्या “पोटच्या” मुलासाठी खूप करुणा असते. “करुणा” असे भाषांतरीत केलेल्या इब्री क्रियापदाचे भाषांतर “दया” असेही करण्यात आले आहे. (निर्गम ३३:१९; यशया ५४:१०) येथे वापरलेला इब्री शब्द, एखाद्या असहाय किंवा दुर्बल व्यक्‍तीबद्दल वाटणाऱ्‍या कोमल करुणेला सूचित होऊ शकतो. एका आईला तिच्या तान्ह्या बाळाप्रती वाटणारी कोमल करुणा ही जगातील सर्वात गाढ भावना आहे.

पण दुःखाची गोष्ट म्हणजे, प्रत्येकच आईला आपल्या बाळाप्रती अशी कोमल करुणा वाटते असे नाही. यहोवा म्हणतो: “कदाचित स्त्रियांना विसर पडेल.” आपण अशा जगात राहत आहोत जिथे अनेक स्त्री-पुरुष ममताहीन व विश्‍वासघातकी आहेत. (२ तीमथ्य ३:१-५) काही वेळा, आपल्या बाळाकडे दुर्लक्ष करणाऱ्‍या, त्याचा छळ करणाऱ्‍या किंवा त्याला जन्मतःच टाकून देणाऱ्‍या स्त्रियांच्या बातम्या आपल्या कानावर पडतात. यशया ४९:१५ या वचनावर बायबलच्या एका संदर्भग्रंथात लेखक असे म्हणतो: “आईही अपरिपूर्ण असते आणि त्यामुळे कधीकधी ती आपल्या बाळाशी खूप निष्ठूरपणे वागू शकते. अशा वेळी, जगातील सर्वात गाढ प्रेमालाही तडा जाऊ शकतो.”

याच्या अगदी उलट यहोवा आपल्याला आश्‍वासन देतो: “पण मी तुला विसरणार नाही.” यावरून, यशया ४९:१५ मध्ये यहोवाने उपस्थित केलेल्या प्रश्‍नाचा मुद्दा आपण समजू शकतो. तो म्हणजे, एका अपरिपूर्ण आईपेक्षा यहोवा कितीतरी पटीने अधिक करुणामय आहे. एक अपरिपूर्ण आई आपल्या असहाय बाळाला करुणा दाखवण्यास विसरू शकते, पण यहोवा आपल्या सेवकांना करुणा दाखवण्यास कधीच विसरणार नाही. म्हणूनच, वर उल्लेख केलेल्या संदर्भग्रंथात लेखकाने यशया ४९:१५ विषयी जे म्हटले आहे ते योग्यच आहे. तो म्हणतो: “माझ्या मते तरी जुन्या करारात देवाचे प्रेम दाखवणारे यापेक्षा जबरदस्त उदाहरण कोणतेच नाही.”

“देवाच्या परम” दयेविषयी शिकणे आपल्यासाठी सांत्वनदायक नाही का? (लूक १:७८) तर मग, यहोवाच्या जवळ कसे येता येईल हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. हा प्रेमळ देव आपल्या उपासकांना आश्‍वासन देतो: “मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही.”—इब्री लोकांस १३:५. (w१२-E ०२/०१)