व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गरिबांसाठी आनंदाची बातमी!

गरिबांसाठी आनंदाची बातमी!

गरिबांसाठी आनंदाची बातमी!

“कंगालाचे नेहमीच विस्मरण होणार नाही,” असे आश्‍वासन देवाचे वचन बायबल यात दिले आहे. (स्तोत्र ९:१८) आपल्या निर्माणकर्त्याबद्दल त्यात असेही म्हटले आहे: “तू आपली मूठ उघडून प्राणिमात्राची इच्छा पुरी करितोस.” (स्तोत्र १४५:१६) बायबलमधील ही आशा केवळ एक स्वप्न नाही. दारिद्र्‌याचे निर्मूलन करण्याकरता जे जे आवश्‍यक आहे ते ते सर्वसमर्थ देव पुरवू शकतो. काय हवे आहे गरिबांना?

अर्थशास्त्राचा अभ्यास करणाऱ्‍या आफ्रिकेतील एका महिलेने असे म्हटले, की गरीब देशांना खरे तर, “जनहिताचा विचार करणारा शासक” हवा आहे. तिला असे म्हणायचे आहे की, या शासकाकडे बदल करण्याची शक्‍ती असली पाहिजे म्हणजे दारिद्र्‌याचे निर्मूलन होईल आणि असे करण्यासाठी तो दयाळू असणे आवश्‍यक आहे. या महिलेच्या म्हणण्याला दुजोरा देत आपण असे म्हणू शकतो, की फक्‍त काही राष्ट्रांना लाभ किंवा फायदे मिळतात पण इतर राष्ट्रांना ते मिळत नसल्यामुळे त्यांच्यावर कमालीचे दारिद्र्‌य येते म्हणून दारिद्र्‌याचे निर्मूलन करण्यासाठी हा शासक विश्‍वावर राज्य करणारा हवा. तसेच, दारिद्र्‌याचे निर्मूलन करू शकणाऱ्‍या शासकाला, दारिद्र्‌याचे मूळ कारण अर्थात मानवाचा स्वार्थी स्वभाव बदलावा लागेल. पण असा सर्वगुणसंपन्‍न शासक आपल्याला कोठे मिळू शकेल?

देवाने येशूला गरिबांसाठी एक चांगली बातमी देऊन पाठवले. देवाकडून त्याला मिळालेल्या कामगिरीविषयी त्याने असे म्हटले: “परमेश्‍वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दीनांस सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला.”—लूक ४:१६-१८.

ही चांगली बातमी काय आहे?

देवाने येशूला राजा नियुक्‍त केले आहे. ही खरोखरच आनंदाची बातमी आहे. दारिद्र्‌याचे निर्मूलन करण्यासाठी तो सुयोग्य शासक आहे कारण, (१) तो मानवजातीवर राज्य करणार आहे आणि कार्य करण्याची शक्‍ती त्याच्याजवळ आहे; (२) त्याला गरिबांचा कळवळा येतो आणि गरिबांची काळजी घेण्यास तो आपल्या अनुयायांना शिकवतो; आणि (३) तो दारिद्र्‌याचे मूळ कारण असलेली, मानवांना वारशाने मिळालेली स्वार्थी प्रवृत्ती काढून टाकण्यास समर्थ आहे. सुवार्तेच्या या तिन्ही पैलूंचे आपण बारकाईने परीक्षण करूयात.

१. येशूचा सर्व राष्ट्रांवर अधिकार देवाच्या वचनात येशूबद्दल असे म्हटले आहे: ‘सर्व लोक, सर्व राष्ट्रे व सर्व भाषा बोलणारे लोक, यांनी त्याची सेवा करावी म्हणून त्यास प्रभुत्व देण्यात आले आहे.’ (दानीएल ७:१४) संपूर्ण मानवजातीवर एकच सरकार असले तर त्याचे किती फायदे असतील, याची तुम्ही कल्पना करू शकता का? नैसर्गिक संपत्तीवर राष्ट्रा-राष्ट्रांमध्ये झगडे होणार नाहीत. सर्वांना समप्रमाणात लाभ मिळेल. स्वतः येशूने अशी हमी दिली, की तो असा जागतिक शासक असेल ज्याच्याकडे कार्य करण्याची शक्‍ती असेल. याविषयी त्याने म्हटले: “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे.”—मत्तय २८:१८.

२. गरिबांचा येशूला कळवळा पृथ्वीवरील त्याच्या सेवेदरम्यान त्याला गरीब लोकांचा कळवळा आला. जसे की, १२ वर्षांपासून रक्‍तस्राव होणाऱ्‍या एका स्त्रीने, बरे होण्यासाठी तिच्याकडे असलेला सर्व पैसा औषधोपचारात खर्च केला होता. तिच्या या आजारपणामुळे तिला खूपच अशक्‍तपणा आला होता त्यामुळे बरे होण्यासाठी तिने येशूच्या अंगरख्याला स्पर्श केला. नियमशास्त्रानुसार ती ज्या कोणाला स्पर्श करेल ती व्यक्‍ती किंवा वस्तू अशुद्ध होत होती. पण येशूने तिच्यावर दया केली. तो तिला म्हणाला: “मुली, तुझ्या विश्‍वासाने तुला बरे केले आहे; शांतीने जा आणि तुझ्या पीडेपासून मुक्‍त हो.”—मार्क ५:२५-३४.

येशूच्या शिकवणीत लोकांच्या मनोवृत्तीत बदल करण्याची शक्‍ती आहे. अशा प्रकारे तेही मग दयाळूपणे वागू शकतात. उदाहरणार्थ, देवाला संतुष्ट करण्याकरता मी काय करू शकतो, असे एका मनुष्याने येशूला विचारले तेव्हा येशूने त्याने काय उत्तर दिले ते पाहा. आपण आपल्या शेजाऱ्‍यावर प्रेम केले पाहिजे, अशी देव आपल्याकडून अपेक्षा करतो ही गोष्ट त्या मनुष्याला माहीत होती. तरीपण त्याने येशूला असे विचारले: “माझा शेजारी कोण?”

तेव्हा येशूने त्याला उत्तरात जो दाखला दिला तो बहुतेकांच्या परिचयाचा आहे. या दाखल्यात त्याने म्हटले, की एक मनुष्य जेरुसलेमहून यरीहोला प्रवास करत असताना वाटेत त्याला लुटारू लुटतात आणि “अर्धमेला” टाकून पळून जातात. त्याच रस्त्याने एक याजक चाललेला असतो. तो या जखमी माणसाला बघून लगेच रस्त्याच्या दुसऱ्‍या बाजूने चालायला लागतो. नंतर एक लेवीदेखील असेच करतो. पण काही वेळानंतर, एक शोमरोनी मनुष्य जेव्हा या घायाळ मनुष्याला पाहतो तेव्हा त्याला त्याचा “कळवळा” येतो. तो या माणसाच्या जखमा स्वच्छ करतो, त्याला उतारशाळेत नेतो आणि त्याला बरे वाटेपर्यंत त्याची काळजी घेण्याकरता उतारशाळेच्या रक्षकाला पैसे देऊन जातो. मग येशू विचारतो: “लुटारूंच्या हाती सापडलेल्या माणसाचा शेजारी ह्‍या तिघांपैकी . . . कोण झाला?” “त्याच्यावर दया करणारा,” असे उत्तर येशूला मिळते. मग येशू म्हणतो: “जा आणि तूही तसेच कर.”—लूक १०:२५-३७.

यहोवाचे साक्षीदार बनणारे लोक, येशूच्या अशा शिकवणी शिकतात तेव्हा त्यांच्या मनोवृत्तीत बदल होतो; ते गरजू लोकांना मदत करण्यास शिकतात. विमेन इन सोव्हिएट प्रिझन्स नावाच्या आपल्या पुस्तकात, एका लॅटवियन लेखिकेने १९६० दशकाच्या मध्यात पोट्‌मा येथील सक्‍त मजुरीची शिक्षा झालेल्यांसाठी असलेल्या छावणीत काम करत असताना तिच्या आजारपणाविषयी लिहिले. ती म्हणते: “माझ्या सर्व आजारपणात [यहोवाचे साक्षीदार] असलेल्या महिलांनी माझी खूप काळजी घेतली. माझी इतक्या चांगल्या प्रकारे काळजी घेतली जाईल, अशी मी अपेक्षादेखील केली नव्हती. यहोवाचे साक्षीदार सर्वांना, मग ते कोणत्याही धर्माचे किंवा राष्ट्राचे असोत, मदत करणे आपले कर्तव्य समजतात.”

आर्थिक मंदीच्या काळात, एक्वाडॉरच्या आँकॉन येथील काही यहोवाच्या साक्षीदारांचे काम सुटले आणि उदरनिर्वाहाचा कोणताच मार्ग त्यांच्याजवळ नव्हता तेव्हा इतर साक्षीदारांनी या गरजू बांधवांना आर्थिक साहाय्य देण्याचा एक तोडगा काढला. ते, रात्रभर मासेमारी करून परतणाऱ्‍या कोळ्यांसाठी जेवण तयार करून त्यांना विकत असत (उजव्या बाजूला चित्रात दाखवले आहे). मंडळीतल्या सर्वांनी, अगदी लहान मुलांनीसुद्धा या योजनेला हातभार लावला. ते दररोज पहाटे एक वाजता कामाला सुरुवात करायचे आणि मासेमारी करून येणाऱ्‍यांना चार वाजेपर्यंत जेवण मिळायचे. असे करून जमलेला पैसा प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या गरजेनुसार देण्यात आला.

या अनुभवांवरून दिसून येते, की येशूचे उदाहरण आणि त्याच्या शिकवणी यांत खरोखरच, गरजूंना मदत करण्यासाठी लोकांच्या मनोवृत्तीत बदल करण्याची शक्‍ती आहे.

३. मानवाचा स्वभाव बदलण्याची येशूची शक्‍ती स्वार्थीपणे वागण्याची मानवाची प्रवृत्ती आहे, हे आपल्या सर्वांना माहीत व कबूल आहे. हे पाप आहे, असे बायबलमध्ये म्हटले आहे. प्रेषित पौलानेदेखील असे लिहिले: “जो मी सत्कर्म करू इच्छितो त्या माझ्याजवळ वाईट आहेच असा नियम मला आढळतो.” आणि मग पुढे तो म्हणतो: “मला ह्‍या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडवील? आपला प्रभु येशू ख्रिस्त ह्‍याच्या द्वारे मी देवाचे आभार मानतो.” (रोमकर ७:२१-२५) मानवजातीला वारशाने पापी प्रवृत्ती मिळाली आहे. त्यातीलच एक प्रवृत्ती स्वार्थीपणा आहे व तीच दारिद्र्‌याचे मूळ कारण आहे. तर यहोवा देव येशूद्वारे आपल्या खऱ्‍या उपासकांना या पापी प्रवृत्तीपासून कसे मुक्‍त करणार आहे हे पौल येथे सांगतो. हे कसे होणार आहे?

येशूचा बाप्तिस्मा होऊन काही काळ उलटल्यानंतर बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाने येशूची अशी ओळख करून दिली: “हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा!” (योहान १:२९) लवकरच ही पृथ्वी, वारशाने मिळालेल्या पापी प्रवृत्तीपासून आणि केवळ स्वतःचेच हित पाहण्याच्या प्रवृत्तीपासून मुक्‍त केलेल्या लोकांनी भरेल. (यशया ११:९) दारिद्र्‌याचे मूळ कारण असलेली स्वार्थी प्रवृत्तीच येशू लोकांच्या स्वभावातून काढून टाकेल!

आनंदाची गोष्ट म्हणजे ज्याला जे हवे आहे ते त्याला मिळेल, असा काळ लवकरच येणार आहे. देवाचे वचन म्हणते: “ते सगळे आपापल्या द्राक्षीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसतील, कोणी त्यांस घाबरविणार नाही.” (मीखा ४:४) काव्यरुपात असलेले हे शब्द अशा काळाचे वर्णन करतात जेव्हा प्रत्येकाकडे समाधानकारक काम असेल, प्रत्येकाला सुरक्षित वाटेल आणि दारिद्र्‌याचा लवलेशही नसलेल्या जगाचा पूर्ण आनंद घेण्याची संधी असेल. यामुळे यहोवाची स्तुती होईल! (w११-E ०६/०१)