व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

एकट्या पालकांना सहानुभूती दाखवा

एकट्या पालकांना सहानुभूती दाखवा

एकट्या पालकांना सहानुभूती दाखवा

एकट्या पालकांना आपल्या कुटुंबाचा गाडा ओढायला इतरांच्या तुलनेत बरेच परिश्रम करावे लागतात. त्यांना नाना प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. कुटुंबाचे भरणपोषण करण्याची जबाबदारी त्यांच्या एकट्याच्याच खांद्यावर असते. नोकरी करून त्यांना, बाजारहाट, स्वयंपाक, घराची साफसफाई करावी लागते, मुलांची काळजी घ्यावी लागते. शिवाय, मुलांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे लागते, त्यांच्या मनोरंजनाची व्यवस्था करावी लागते व भावनिक आधार द्यावा लागतो. या सर्व जबाबदाऱ्‍या सांभाळत असताना, कधी कधी त्यांना स्वतःसाठीही थोडा वेळ काढावा लागतो.

आजकाल, एकट्या पालकांची संख्या अधिकच वाढू लागली असली तरी, त्यांच्याकडे सहज दुर्लक्ष होऊ शकते. एका आईने प्रामाणिकपणे म्हटले: “मी एकटी पालक झाल्यावरच मला, इतरही अनेक एकटे पालक आहेत, हे जाणवू लागले. तोपर्यंत मी त्यांचा मुळीच विचार करत नव्हते.” एकट्या पालकांना सहानुभूती दाखवण्याकरता तुम्ही तुमच्या परीने काय करू शकता? तुम्ही त्यांची काळजी करणे गरजेचे आहे का? त्यांच्या गरजांकडे आपण का लक्ष दिले पाहिजे याविषयीच्या तीन कारणांचा आपण विचार करू या.

सहानुभूती दाखवण्याची कारणे

पुष्कळ एकट्या पालकांना मदत हवी असते. दोन मुले असलेली एक ४१ वर्षीय विधवा म्हणते: “कधीकधी मला समजत नाही, मी काय करावं. मला एकावेळी कितीतरी जबाबदाऱ्‍या पार पाडाव्या लागतात. माझी खूप दमछाक होते.” वैधव्य आल्यामुळे किंवा सोडून दिल्यामुळे, किंवा इतर कारणांमुळे अनेक एकट्या पालकांना एका आईने म्हटल्याप्रमाणे वाटते. ती म्हणते: “आम्ही मदतीची विनंती करत आहोत; आम्हाला खरोखरच मदत हवी आहे.”

यामुळे स्वतःला आनंद मिळतो. तुम्ही कधी कोणाला, एखादी वजनदार पिशवी किंवा सामान उचलायला मदत केली आहे का जी त्याला एकट्याला पेलवत नव्हती? तुम्ही त्या व्यक्‍तीला एका व्यावहारिक मार्गाने मदत केली या जाणीवेने तुम्हाला मनापासून समाधान मिळाले असावे, नाही का? त्याच प्रकारे, एकटे पालकही अशी एक वजनदार जबाबदारी उचलत आहेत जी कधीकधी त्यांना एकट्याला पेलवत नसते. तुम्ही जेव्हा त्यांना मदतीचा हात द्याल तेव्हा तुम्हाला स्तोत्र ४१:१ येथे जे म्हटले आहे त्याचा प्रत्यय आल्यावाचून राहणार नाही. तेथे म्हटले आहे: “जो दीनांची चिंता वाहतो तो धन्य!”

हे पाहून देवाला आनंद होतो. याकोब १:२७ येथे म्हटले आहे: “देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे.” यात, एकट्या पालकांची काळजी घेण्याचाही समावेश होतो. * इब्री लोकांस १३:१६ म्हणते: “चांगले करण्यास व दान करण्यास विसरू नका; कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो.”

एकट्या पालकांना आपण सहानुभूती का दाखवली पाहिजे त्याची तीन कारणे आता आपण पाहिली. ही कारणे लक्षात ठेवून आपण आता हे पाहू या, की एकट्या पालकांना मदत करण्याकरता आपण काय करू शकतो आणि आपण देत असलेली मदत, ही व्यावहारिक स्वरूपाची मदत कशी ठरू शकेल.

त्यांच्या गरजा ओळखा

कदाचित आपल्याला वाटेल, आपण एखाद्या एकट्या पालकाला असे विचारून पाहू या: “तुम्हाला काही मदत हवी आहे का?” पण खरे पाहता, असे विचारल्यावर कोणताही एकटा पालक, त्याला किंवा तिला कोणती मदत हवी आहे हे सहजासहजी सांगणार नाही. आधी उल्लेखण्यात आलेल्या स्तोत्र ४१:१ या वचनात म्हटले आहे, की आपण त्यांची ‘चिंता वाहिली पाहिजे.’ एका संदर्भ ग्रंथात असे म्हटले आहे, की ज्या इब्री शब्दाचे भाषांतर ‘वाहणे’ असे करण्यात आले आहे त्याचा अर्थ “नीट विचार करून सुज्ञपणे वागणे,” असाही होऊ शकतो.

यास्तव, तुम्ही जर एकट्या पालकांना खरोखरच मदत करू इच्छिता तर तुम्ही, त्यांना कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते यावर गंभीर विचार केला पाहिजे. फक्‍त वरवर नव्हे तर त्यांना खरोखरच कशाची गरज आहे ते बारकाईने पाहा. स्वतःला विचारा: ‘मी त्यांच्या जागी असतो तर मला कोणती मदत लागली असती?’ अनेक एकटे पालक तुम्हाला सांगतील, की जोपर्यंत तुम्ही स्वतः एक एकटे पालक होत नाही तोपर्यंत तुम्हाला, त्यांचे दुःख समजणार नाही. असे असले तरीही, त्यांच्यावर ओढवलेल्या परिस्थितीत स्वतःला ठेवण्याचा प्रयत्न करा. मगच तुम्ही एकट्या पालकांच्या ‘चिंता वाहू’ शकाल.

देवाच्या परिपूर्ण उदाहरणाचे अनुकरण करा

एकट्या पालकांची काळजी, प्रेमाने व प्रभावीपणे घेण्याच्या बाबतीत यहोवा देवाच्या तोडीचा कोणीही नाही. विधवांबद्दल, अनाथांबद्दल व एकट्या पालकांबद्दल यहोवा देवाला किती काळजी आहे, त्यांचा तो किती विचार करतो हे बायबलमधील पुष्कळ वचनांवरून कळून येते. अशा नम्र लोकांच्या गरजा देव कशा पूर्ण करतो त्याचे परीक्षण केल्यावर आपणही, एकट्या पालकांना खरोखरच उपयोगी व व्यावहारिक ठरू शकणारी मदत पुरवू शकू. आपण चार गोष्टींचा विचार करू शकतो.

त्यांचे बोलणे ऐकण्यासाठी वेळ काढा

प्राचीन इस्राएल राष्ट्राला यहोवाने दिलेल्या नियमशास्त्रात त्याने म्हटले होते, की विधवांचे व अनाथांचे गाऱ्‍हाणे, “मी . . . अवश्‍य ऐकेन.” (निर्गम २२:२२, २३) तुम्हीही त्यांचे गाऱ्‍हाणे कसे ऐकू शकाल? एकट्या पालकांना पुष्कळदा खूप एकाकीपणा जाणवतो; मनातल्या गोष्टी सांगायला त्यांच्याजवळ कोणी प्रौढ व्यक्‍ती नसते. एक एकटी आई दुःखाने म्हणते: “मुलं झोपी जातात तेव्हा मला रडू आवरत नाही. हा एकाकीपणा कधीकधी मला खायला उठतो.” तुम्हाला शक्य असेल तर एका एकट्या पालकाला जेव्हा आपल्या मनातल्या गोष्टी कुणाला तरी सांगाव्याशा वाटतात तेव्हा तुम्ही ‘त्यांचे गाऱ्‍हाणे ऐकू’ शकाल का? इतरांसमक्ष किंवा योग्य ठिकाणी बसून तुम्ही तिला/त्याला आपले मन हलके करण्यास मदत करू शकता. असे केल्याने एकट्या पालकांची त्यांच्यावर आलेली जबाबदारी ते पूर्ण करू शकतील.

प्रोत्साहनाच्या दोन गोष्टी बोला

इस्राएली लोकांना उपासनेच्या वेळी गाता यावे म्हणून यहोवाने पवित्र गीते किंवा स्तोत्रे लिहिण्याची प्रेरणा दिली. इस्राएल लोकांमध्ये असलेल्या विधवा व अनाथ मुले जेव्हा, यहोवा त्यांचा “पिता” व “कैवारी” आहे व तो त्यांची दाद घेऊन त्यांना आराम देतो, असे या ईश्‍वरप्रेरित गीतांतील बोल गात असावेत तेव्हा त्यांना किती दिलासा मिळत असावा याची कल्पना करा. (स्तोत्र ६८:५; १४६:९) आपणही एकट्या पालकांना अशा प्रकारचे प्रोत्साहन देऊ शकतो जे ते कधीही विसरणार नाहीत. रूथ गेल्या वीस वर्षांपासून एकटी पालक आहे. तरीपण एका अनुभवी पित्याने तिला दिलेला सल्ला अजूनही तिच्या आठवणीत आहे. त्याने तिला असे सांगितले होते: “तुझ्या दोन मुलांना वाढवण्यास तू खरोखरच खूप मेहनत घेत आहेस. अशीच मेहनत घेत राहा.” रूथ आठवून सांगते: “त्यांच्या बोलण्याचा माझ्यावर खूप प्रभाव पडला.” होय, ‘गोड शब्द त्यांना आनंदित’ करू शकतात. एकट्या पालकांना आपल्या नम्र शब्दांचा आपल्याला कळणारही नाही इतका फायदा होऊ शकतो. (नीतिसूत्रे १२:२५) तुमच्या मनात असे काही आहे का ज्याबद्दल तुम्ही एकट्या पालकाची प्रशंसा करू शकाल?

गरज असते तेव्हा भौतिक गोष्टींची मदत करा

प्राचीन इस्राएल राष्ट्राला यहोवाने दिलेल्या नियमशास्त्रात, विधवांना व अनाथांना भीक मागून नव्हे तर मानाने अन्‍न प्राप्त करण्याची व्यवस्था होती. या व्यवस्थेमुळे, विधवा व अनाथ “खाऊन तृप्त” होते. (अनुवाद २४:१९-२१; २६:१२, १३) आपणही सुज्ञ व आदराने, एकट्या पालकाच्या गरजू कुटुंबाला भौतिक गोष्टींची मदत देऊ शकतो. तुम्ही त्यांना अन्‍न-धान्य किंवा महिन्याला लागणारे काही सामान भरून देऊ शकता. एकटा पालक किंवा त्याची मुले वापरू शकतील असे कपडेही देऊ शकता. किंवा मग त्यांना पैशा-आडक्याची मदत करू शकता जेणेकरून ते तो पैसा कुटुंबाला लागणाऱ्‍या विशिष्ट गोष्टी खरेदी करण्यासाठी वापरू शकतील.

त्यांच्याबरोबर सहवास करा

इस्राएल राष्ट्रातील लोक वर्षांतून एकदा काही सण साजरा करत असत. या सणांमध्ये त्यांनी विधवांना व अनाथांनाही घ्यावे, जेणेकरून इतर इस्राएली लोकांबरोबर त्यांना सहवास करता येईल, अशी यहोवाने आज्ञा दिली होती. या विधवांना व अनाथांना, ‘आनंद करा’ असे सांगण्यात आले होते. (अनुवाद १६:१०-१५) तसेच आजही ख्रिश्‍चनांना, “एकमेकांचा पाहुणचार करा” असा सल्ला देण्यात आला आहे. यामुळे सर्वांना एकमेकांच्या सहवासाचा आनंद लुटता येईल. (१ पेत्र ४:९) या वचनाच्या अनुषंगाने तुम्ही एकटे पालक असलेल्या कुटुंबाला घरी जेवायला बोलवू शकता. बरेच पदार्थ बनवण्याची गरज नाही. ‘थोडकेच, किंबहुना एकच पदार्थ’ बनवला तरी चालेल, असे येशू एकदा त्याच्या मित्रांच्या घरी जेवायला गेला असताना म्हणाला होता.—लूक १०:४२.

तुम्ही दाखवलेला विचारशीलपणा आठवणीत राहील

तीन मुलांना एकटीने वाढवलेल्या कॅथलीन नावाच्या एका एकट्या आईने, “अपेक्षा करू नकोस पण सर्वांबद्दल कदर बाळग,” असा तिला दिलेला सुज्ञ सल्ला तिच्या आठवणींच्या कप्प्यात जपून ठेवला आहे, असे म्हटले. मुलांचे संगोपन करणे ही आपली वैयक्‍तिक जबाबदारी आहे, हे कॅथलीनप्रमाणे पुष्कळ एकटे पालक कबूल करतात. त्यामुळेच तर, जी कामे त्यांनी स्वतःच केली पाहिजेत अशी कामे ते इतरांकडून अपेक्षित नाहीत. तरीपण, आपण जेव्हा त्यांना कोणतीही मदत देतो तेव्हा ते कृतज्ञ असतात. एकट्या पालकांना सहानुभूती दाखवून तुम्ही त्यांचे कल्याण करू शकता, तुम्ही स्वतःही आनंदी होऊ शकता; तसेच, हा भरवसा बाळगू शकता की यहोवा तुमच्या “सत्कृत्याची फेड” निश्‍चित करेल.—नीतिसूत्रे १९:१७. (w१०-E १२/०१)

[तळटीप]

^ बायबलमध्ये, “एकटे पालक” हा वाक्यांश आढळत नसला तरी, ‘विधवा,’ ‘अनाथ’ या शब्दांचा वारंवार उल्लेख आढळतो. यावरून असे सूचित होते, की बायबल लिहिले त्या काळातही एकट्या पालकांची संख्या अधिक होती.—यशया १:१७.

[३२ पानांवरील चित्र]

तुम्ही एकटे पालक असलेल्या कुटुंबाला अलीकडेच जेवायला बोलवले होते का? नसेल, तर लवकर बोलवा