व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ही खरोखरच बेईमानी आहे का?

ही खरोखरच बेईमानी आहे का?

ही खरोखरच बेईमानी आहे का?

“अपघाताच्या रिपोर्टमध्ये थोडा फेरफार करा, सर्वकाही ठीक होऊन जाईल.”

“कर अधिकाऱ्‍यांना सर्वच सांगण्याची गरज नाही.”

“कॉपी करताना आपण पकडले जाऊ नये, हे महत्त्वाचं आहे.”

“फुकट मिळत असताना, पैसे कशाला द्यायचे?”

आर्थिक मामल्यांविषयी तुम्ही सल्ला मागता तेव्हा लोक सहसा तुम्हाला असा सल्ला देतील. काही लोक स्वतःला खूप शहाणे समजतात; त्यांना वाटते, की त्यांच्याजवळ सर्व समस्यांवर “उपाय” आहेत. पण प्रश्‍न हा आहे, की या उपायांत खरोखरच ईमानदारी असते का?

आजच्या जगात बेईमानी सर्वत्र आहे. पुष्कळ लोकांना वाटते की, शिक्षा टाळायची असेल, पैसा कमवायचा असेल किंवा मग जगात पुढे जायचे असेल तर खोटे बोलावे लागते, फसवणूक किंवा मग चोरी करावीच लागते. समाजातील प्रतिष्ठित लोकच बेईमान असतील तर सामान्य जनता कोणाच्या उदाहरणाचे अनुकरण करेल? एका युरोपियन देशात, २००५ ते २००६ या वर्षांमध्ये बनवाबनवीची व गैरव्यवहाराची प्रकरणे ८५ टक्क्यांनी वाढली. या ८५ टक्क्यांमध्ये, बेईमानीच्या छोट्या प्रकरणांचा समावेश केलेला नाही. काही लोकांना, ही छोटी पापे अगदी क्षुल्लक वाटतात. म्हणूनच तर, त्या देशातील मोठमोठे व्यापारी व राजकीय नेते एका प्रकरणात अडकले तेव्हा कोणालाही आश्‍चर्य वाटले नाही. आपले करिअर वाढवण्यासाठी त्यांनी बनावट डिप्लोमा बनवले होते.

जगात बेईमानी सर्रास चालत असली तरी, पुष्कळ लोक ईमानदारीने वागू इच्छितात. कदाचित तुमचीही हीच इच्छा असेल. तुमचे देवावर प्रेम असेल आणि त्याच्या नजरेत जे योग्य आहे ते तुम्ही करू इच्छित असाल. (१ योहान ५:३) बायबलमध्ये उल्लेखण्यात आलेल्या प्रेषित पौलाप्रमाणे तुम्हालाही वाटेल. त्याने असे लिहिले: “सर्व बाबतीत चांगले [अर्थात ईमानदारीने] वागण्याची आमची इच्छा असून आमचा विवेकभाव चांगला [अर्थात ईमानदार] आहे अशी आमची खातरी आहे.” (इब्री लोकांस १३:१८) यास्तव, आम्ही तुम्हाला काही परिस्थितींचे परीक्षण करून पाहण्याचे उत्तेजन देत आहोत ज्यातून, एक व्यक्‍ती खरोखरच ‘सर्व बाबतीत चांगली’ अर्थात ईमानदारीने वागू इच्छिते किंवा नाही हे समजेल. अशा परिस्थितींत उपयोगी ठरणाऱ्‍या बायबल तत्त्वांवर देखील आपण विचार करू या.

अपघाताची नुकसान भरपाई कोणी दिली पाहिजे?

लिना * नावाची एक तरुण स्त्री, तिच्या गाडीला आधी झालेल्या एका अपघातासाठी आता विमा उतरवण्याचे ठरवते. तिचा मित्र गिरीश तिला असे सुचवतो, की गाडीला आत्ताच अपघात झाला आहे आणि गाडीच्या दुरुस्तीसाठी पैसे हवेत म्हणून ती विमा उतरवत आहे, असे तिने दाखवावे. कारण, आत्तापर्यंत तिने पुष्कळदा विम्याचे भरमसाठ पैसे भरले होते पण याचा तिला अद्यापतरी फायदा झाला नव्हता. लिनाचे एक मन तिला, तिच्या मित्राने सुचवलेली गोष्ट बरोबर आहे असे सांगत होते. मग लिनाने काय करावे?

जेव्हा कोणी पैशांचा दावा करतो तेव्हा विमा कंपन्या, विमा धारकांनी भरलेल्या पैशातून ते पैसे त्याला देतात आणि त्यांना पडलेला भुर्दंड भरून काढण्यासाठी विम्याचे पैसे वाढवतात. लिनाने जर तिच्या मित्राने दिलेला सल्ला ऐकला असता, तर याचा अर्थ तिने, न भरलेले ज्यादा पैसे व तिच्या अपघाताची भरपाई इतर विमा धारकांना भरायला लावली असती. तिने फक्‍त खोटा रिपोर्टच दिला नसता तर इतरांचे पैसेही चोरले असते. हीच गोष्ट, विम्याचे पैसे वाढवून मिळावेत म्हणून खोटी जबानी देण्याच्या बाबतीतही लागू होते.

कायद्याने मिळणाऱ्‍या शिक्षेमुळे एखादी व्यक्‍ती कदाचित अशा प्रकारचे बेईमान कृत्य करण्यापासून परावृत्त होईल. पण, देवाचे वचन बायबल यात, बेईमानी टाळण्याचे याहूनही एक महत्त्वाचे कारण दिलेले आहे. दहा आज्ञांतील एक आज्ञा अशी आहे: “चोरी करू नको.” (निर्गम २०:१५) प्रेषित पौलाने ख्रिश्‍चनांसाठी ही आज्ञा पुन्हा सांगितली: “चोरी करणाऱ्‍याने पुन्हा चोरी करू नये.” (इफिसकर ४:२८) देवाच्या वचनात असलेल्या आज्ञेचे विम्याच्या बाबतीतही पालन करून तुम्ही, देव ज्या गोष्टीचा निषेध करतो ती करण्याचे टाळता. तसेच, तुम्ही देवाचे नियम व तुमचे शेजारी यांबद्दल तुम्हाला असलेले प्रेम व आदर दाखवता.—स्तोत्र ११९:९७.

“कैसराचे ते कैसराला”

पलाशचा एक बिझनेस आहे. त्याचा अकाऊंटंट त्याला असे सुचवतो, की त्याच्या कंपनीने फक्‍त असे दाखवावे, की कंपनीने खूप महागडी कंप्युटर उपकरणे “खरेदी” केली आहेत तेव्हा त्यांना कर कपात मिळावी. पलाशसारखा बिझनेस करणारे अशा प्रकारचे व्यवहार वरचेवर करतच असतात. वास्तविक पाहता, पलाशने ही उपकरणे खरेदी केलीच नव्हती, त्यामुळे सरकारी अधिकारी या खर्चाची तपासणी करणार नव्हते. पण, या कपातीमुळे पलाशचा बराचसचा पैसा वाचणार होता. अशा वेळी तो काय करेल? योग्य निर्णय घेण्यासाठी कोणती गोष्ट त्याला मार्गदर्शन देऊ शकेल?

बायबलमध्ये उल्लेखण्यात आलेल्या प्रेषित पौलाने त्याच्या दिवसातील ख्रिश्‍चनांना असे सांगितले: “प्रत्येक जणाने वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या अधीन असावे; . . . ज्याला कर द्यावयाचा त्याला तो द्या; ज्याला जकात द्यावयाची त्याला ती द्या.” (रोमकर १३:१, ७) देवाला संतुष्ट करणारे, सरकारने ठरवलेले सर्व कर भरतात. पण जर एखाद्या देशात, विशिष्ट लोकांसाठी किंवा व्यापारांसाठी कर माफ करण्याविषयीचा कायदा असेल आणि कायदेशीर रीत्या या योजनेचा लाभ घेण्यास आपण पात्र असू तर आपण तसे करू शकतो.

कर भराव्या लागणाऱ्‍या आणखी एका परिस्थितीचा विचार करा. धीरजचे दुकान आहे. दुकानात आलेला एक गिऱ्‍हाईक त्याला एका वस्तुविषयी असे विचारतो, की मी जर विकत घेतलेल्या वस्तुचे बिल घेतले नाही तर त्याची किती किंमत असेल? गिऱ्‍हाईकाने सांगितल्याप्रमाणे जर धीरजने केले तर गिऱ्‍हाईकाला ती वस्तू स्वस्तात पडेल. पण, गिऱ्‍हाईक-मालकात झालेल्या या व्यवहाराची कोठेच नोंद नसल्यामुळे कर भरण्याचा प्रश्‍नच उरत नाही. पुष्कळ लोकांना यात काही गैर वाटत नाही, कारण यात ‘सर्वांचाच फायदा’ असतो. पण धीरजला देवाला संतुष्ट करायचे आहे, मग बील पुस्तकाशिवाय होणाऱ्‍या या व्यवहारांबद्दल त्याचा कोणता दृष्टिकोन आहे?

अशा प्रकारे व्यवहार करणारी व्यक्‍ती, सरकारला द्यावे लागणारे कर न भरल्यामुळे कदाचित पकडली जाणार नाही. पण येशूने अशी आज्ञा दिली आहे: “कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला भरा.” (मत्तय २२:१७-२१) कर भरण्याविषयी लोकांची चुकीची विचारसरणी सुधारण्याच्या हेतूने येशूने असे म्हटले. येशूने ज्यांना कैसर म्हटले ते सरकारी अधिकारी आहेत व कर आकारणे हा त्यांचा कायदेशीर हक्क आहे असे ते समजतात. म्हणूनच, सर्व प्रकारचे कर भरणे हे बायबलनुसार आपले कर्तव्य आहे, असे ख्रिस्ताचे अनुयायी मानतात.

परीक्षांच्या वेळी कॉपी करणे

मृणमयी नावाची एक उच्च शालेय विद्यार्थिनी, तिच्या अंतिम परीक्षांसाठी जोरदार तयारी करत आहे. चांगले गुण मिळण्यावरच तिला चांगली नोकरी मिळण्याची शक्यता असल्यामुळे रात्रंदिवस ती अभ्यास करते. तिच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांचीही जंगी तयारी चालली आहे पण एका वेगळ्या मार्गाने. चांगले मार्क मिळावेत म्हणून ते परीक्षेच्या वेळी कॉपी करण्यासाठी पेजर, आधीच प्रोग्रॅम केलेले कॅलक्यूलेटर्स आणि मोबाईलचा वापर करणार आहेत. आपल्यालाही चांगले मार्क मिळावेत म्हणून मृणमयीनेही “इतरांप्रमाणे” कॉपी करावी का?

कॉपी करणे आज सर्वसामान्य बनले आहे त्यामुळे पुष्कळांना त्यात काही गैर वाटत नाही. “कॉपी करताना आपण पकडले जाऊ नये, हे महत्त्वाचं आहे,” असे त्यांचे म्हणणे आहे. खऱ्‍या ख्रिश्‍चनांना मात्र हे पटत नाही. कॉपी करताना आपल्याला शिक्षक पाहणार नसले तरी, कोणीतरी आहे जो आपल्याला पाहत असतो. आपण काय करतो हे यहोवाला माहीत असते आणि तो आपल्या कार्यांचा न्याय करणार आहे. पौलाने लिहिले: “अस्तित्वात आलेली कोणतीही वस्तू त्याच्या दृष्टीस अदृश्‍य नाही; ज्याच्याजवळ आपल्याला हिशोब द्यायचा आहे त्याच्या दृष्टीस सर्व काही नग्न व उघडे आहे.” (इब्री लोकांस ४:१३, पं.र.भा.) आपण जे काही करतो ते बरोबर आहे हे जाणण्यात यहोवाला आवड असल्यामुळे तो आपल्यावर लक्ष ठेवतो ही जाणीव आपल्याला, परीक्षेच्या वेळी ईमानदार असण्यास प्रवृत्त करते, नाही का?

तुम्ही काय कराल?

लिना, गिरीश, पलाश, धीरज आणि मृणमयी यांनी त्यांच्यासमोर आलेल्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखले. त्यांनी ईमानदारीने वागण्याचे ठरवले. त्यामुळे त्यांचा विवेक शुद्ध राहिला व ते त्यांची नैतिक सचोटी टिकवून ठेवू शकले. तुमच्यासमोर अशी परिस्थिती आल्यास तुम्ही काय कराल?

तुमच्यासोबत काम करणाऱ्‍यांना, तुमच्या वर्गमित्रांना व तुमच्या शेजाऱ्‍यांना, खोटे बोलणे, कॉपी करणे किंवा चोरी करणे वावगे वाटणार नाही. ते कदाचित तुमची थट्टामस्करी करून तुम्हाला त्यांच्याप्रमाणे वागायला भाग पाडतील. बेईमानीने वागण्याचा तुमच्यावर कितीही दबाव असला तरी, योग्य निर्णय घेण्यास कोणती गोष्ट तुमची मदत करू शकेल?

देवाच्या इच्छेनुसार वागल्याने आपण आपला विवेक शुद्ध ठेवू शकतो तसेच देवाची कृपापसंती प्राप्त करू शकतो, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. राजा दाविदाने असे लिहिले: “हे परमेश्‍वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करील? तुझ्या पवित्र डोंगरांवर कोण राहील? जो सात्विकतेने चालतो व नीतीने वागतो, मनापासून सत्य बोलतो. . . . जो असा वागतो तो कधी ढळणार नाही.” (स्तोत्र १५:१-५) शुद्ध विवेक आणि स्वर्गात राहणाऱ्‍या देवासोबत मैत्री ही, बेईमानीमुळे मिळणाऱ्‍या कोणत्याही भौतिक फायद्यापेक्षा कैक पटीने मौल्यवान आहे. (w१०-E ०६/०१)

[तळटीप]

^ परि. 10 काही नावे बदलण्यात आली आहेत.

[१८ पानांवरील संक्षिप्त आशय]

“चोरी करणाऱ्‍याने पुन्हा चोरी करू नये.”

देवाचे नियम व तुमचे शेजारी यांबद्दल तुम्हाला असलेले प्रेम व आदर तुम्हाला विम्याच्या बाबतीत ईमानदारपणा दाखवण्यास प्रवृत्त करेल

[१८ पानांवरील संक्षिप्त आशय]

“ज्याला जे द्यावयाचे ते त्याला द्या; ज्याला कर द्यावयाचा त्याला तो द्या.”

देवाला संतुष्ट करण्याकरता आपण कायद्याने आवश्‍यक असलेले सर्व कर भरतो

[१९ पानांवरील संक्षिप्त आशय]

“ज्याच्याजवळ आपल्याला हिशोब द्यायचा आहे त्याच्या दृष्टीस सर्व काही . . . उघडे आहे.”

कॉपी करताना शिक्षक कदाचित आपल्याला पकडणार नाहीत पण देवासमोर ईमानदार असण्याची आपली इच्छा आहे

[२० पानांवरील चौकट/ चित्रे]

‘न दिसणारी’ चोरी

समजा तुमच्या मित्राने एक नवीन कंप्युटर प्रोग्राम घेतला आहे आणि तुम्हालाही तो हवा आहे. तो तुम्हाला म्हणतो, की त्या प्रोग्रामची एक कॉपी तो तुम्हाला देईल, तुम्ही विनाकारण पैसे खर्च करू नयेत. मग ही बेईमानी झाली का?

कंप्युटर वापरणारे जेव्हा, कंप्युटर सॉफ्टवेअर विकत घेतात तेव्हा, त्यांना त्या प्रोग्रामबद्दल लायसन्स करारात सांगितलेल्या अटी मान्य असतात. या लायसन्समुळे, प्रोग्राम विकत घेणारी व्यक्‍ती फक्‍त एकाच कंप्युटरवर तो प्रोग्राम घालून वापरू शकते. म्हणून, तिने जर दुसऱ्‍यासाठी तो सॉफ्टवेअर कॉपी केला तर ती लायसन्स करार मोडते आणि असे करणे कायद्याने गुन्हा आहे. (रोमकर १३:४) शिवाय, ही चोरी देखील आहे. कारण, सॉफ्टवेअर विकल्यामुळे जे पैसे सर्व हक्क असणाऱ्‍या मालकाला मिळायला पाहिजेत ते इतरांनी त्या सॉफ्टवेअरची कॉपी करून दुसऱ्‍याला दिल्यामुळे त्याला मिळत नाहीत.—इफिसकर ४:२८.

‘पण, आपण हे सॉफ्टवेअर कॉपी केले आहे, हे कोणाला कळणार आहे,’ असे काहीजण म्हणतील. त्यांचे म्हणणे बरोबर आहे. तरीपण येशूचे शब्द आपल्याला आठवले पाहिजेत: “ह्‍याकरिता लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा.” (मत्तय ७:१२) आपण केलेल्या कामाचा आपल्याला योग्य मोबदला मिळाला पाहिजे आणि इतरांनी आपल्या मालमत्तेचा योग्य वापर करावा, अशी आपल्या सर्वांची इच्छा असते. त्यामुळे, आपल्याला जसे वाटते तसे आपणही इतरांबरोबर वागले पाहिजे. त्यामुळे, सर्व अधिकार स्वाधीन असलेली साहित्ये, जसे की संगीताच्या सीडी, पुस्तके किंवा सॉफ्टवेअर मग ते छापील स्वरूपात असो अथवा सीडीवर स्टोर केलेले असो, यांच्या कॉपीज करून ‘न दिसणारी’ चोरी करण्याचे आपण टाळतो. कारण या मालमत्तेवर आपला हक्क नाही. ट्रेडमार्क, पेटंट, ट्रेड सीक्रेट्‌स व प्रसिद्धी अधिकार या सर्वांचा देखील याच प्रकारात समावेश होतो.—निर्गम २२:७-९.