व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपण यशस्वी व्हावे अशी त्याची इच्छा आहे

आपण यशस्वी व्हावे अशी त्याची इच्छा आहे

देवाच्या जवळ या

आपण यशस्वी व्हावे अशी त्याची इच्छा आहे

यहोशवा १:६-९

आपल्या मुलांनी यशस्वी व्हावे, त्यांनी अर्थपूर्ण व समाधानकारक जीवन जगावे, असे त्यांची काळजी घेणाऱ्‍या पालकांना वाटते. तसेच, पृथ्वीवरील आपल्या मुलांनी यशस्वी व्हावे असे आपला स्वर्गीय पिता यहोवा याला वाटते. त्याला आपली काळजी वाटते म्हणूनच तर त्याने आपल्याला, आपण यशस्वी कसे होऊ शकतो ते सांगितले आहे. उदाहरणार्थ, यहोशवा १:६-९ या वचनांमध्ये त्याने यहोशवाला जे काही सांगितले त्याचा विचार करा.

उजव्या बाजूला दाखवलेल्या चित्रातल्या परिस्थितीची कल्पना करा. मोशेचा मृत्यू झाल्यानंतर, लाखोंच्या घरात असलेल्या इस्राएल लोकांवर यहोशवाला त्यांचा नवा नेता बनण्याकरता निवडले जाते. देवाने त्यांच्या पूर्वजांना जो देश देण्याचे वचन दिले होते त्या देशात प्रवेश करण्याच्या ते तयारीत होते. देव यहोशवाला काही सूचना देतो. या सूचनांचे पालन केल्यास तो यशस्वी होणार होता. पण या सूचना फक्‍त यहोशवाच्याच फायद्याकरता देण्यात आल्या नव्हत्या. या सूचनांचे आपण पालन केले तर आज आपणही यशस्वी होऊ शकतो.—रोमकर १५:४.

खंबीर हो, हिंमत धर, असे यहोवाने यहोशवाला एकदा नव्हे तर तीनदा सांगितले. (वचन ६, ७, ९) देवाने वचन दिलेल्या देशात संपूर्ण इस्राएल राष्ट्राला घेऊन जाण्यासाठी यहोशवाला धैर्याची व शक्‍तीची खरोखरच गरज होती. पण तो धैर्यवान व बलवान कसा होणार होता?

देवाच्या प्रेरित वचनातून यहोशवाला धैर्य व शक्‍ती मिळणार होती. यहोवाने त्याला सांगितले: “माझा सेवक मोशे ह्‍याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ.” (वचन ७) त्यावेळी यहोशवाकडे संपूर्ण बायबल नव्हते तर बायबलमधील फक्‍त काहीच पुस्तके लिखित स्वरूपात होती. * पण ही पुस्तके फक्‍त स्वतःजवळ बाळगल्याने त्याला यश मिळणार नव्हते. त्यांच्यापासून फायदा मिळवण्याकरता यहोशवाला दोन गोष्टी करायच्या होत्या.

पहिली गोष्ट, यहोशवाने देवाच्या वचनांनी आपले अंतःकरण भरायचे होते. यहोवाने असे म्हटले होते: ‘नियमशास्त्राच्या या ग्रंथाचे . . . रात्रंदिवस मनन कर.’ (वचन ८) एका संदर्भ ग्रंथात असे म्हटले होते, की “यहोशवाने देवाच्या नियमशास्त्राचा ‘जप’ करावा, त्यावर ‘मनन’ करावे, ‘ध्यान’ करावे, अशी देवाने त्याला आज्ञा दिली होती.” देवाच्या वचनांचे रोज वाचन व मनन केल्यामुळे यहोशवाला त्याच्या समोरील समस्यांवर मात करण्यास मदत मिळणार होती.

दुसरी गोष्ट, देवाच्या वचनातून शिकलेल्या गोष्टी त्याने आचरणात उतरवायच्या होत्या. यहोवाने त्याला असे सांगितले: ‘नियमशास्त्रात . . . जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ . . . म्हणजे . . . तुला यशःप्राप्ति घडेल.’ (वचन ८) देवाची इच्छा पूर्ण केल्यावरच यहोशवाला यश प्राप्त होणार होते. नाहीतर तो यशस्वी कसा झाला असता? कारण देवाची इच्छा नेहमीच पूर्ण होते.—यशया ५५:१०, ११.

यहोशवाने यहोवाचा सल्ला पाळला व त्यामुळे यहोवाचा विश्‍वासू उपासक म्हणून तो अर्थपूर्ण व समाधानकारक जीवन जगला.—यहोशवा २३:१४; २४:१५.

यहोशवाप्रमाणे तुम्हालाही समाधानी जीवन जगायची इच्छा आहे का? तुम्ही जीवनात यशस्वी व्हावे अशी यहोवाची इच्छा आहे. पण स्वतःजवळ फक्‍त बायबल बाळगून आपण यशस्वी होणार नाही. अनेक वर्षांपासून देवाची सेवा विश्‍वासूपणे करत असलेल्या एका बांधवाने असे सुचवले, की “बायबलमधील संदेश छापील पानांवरून आपल्या हृदयात उतरवा.” तुम्ही जर नियमितरीत्या तुमचे अंतःकरण देवाच्या वचनांनी भरले आणि शिकलेल्या गोष्टींचे आपल्या जीवनात पालन केले तर यहोशवाप्रमाणेच तुमचा मार्ग देखील “सुखाचा” होईल. (w०९-E १२/०१)

[तळटीप]

^ परि. 7 यहोशवाजवळ जी प्रेरित लिखाणे होती त्यात कदाचित, मोशेने लिहिलेली पाच पुस्तके (उत्पत्ति, निर्गम, लेवीय, गणना आणि अनुवाद), ईयोबाचे पुस्तक आणि स्तोत्रसंहितेतील एक किंवा दोन स्तोत्रे होती.