व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

३ येशूबद्दलचे सत्य जाणून घ्या

३ येशूबद्दलचे सत्य जाणून घ्या

३ येशूबद्दलचे सत्य जाणून घ्या

“देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” —योहान ३:१६.

आक्षेप: येशू कधी अस्तित्वातच नव्हता असे काही जण म्हणतात. इतर जण तो अस्तित्वात होता असे मानतात पण तो फक्‍त एक सर्वसाधारण मनुष्य होता जो खूप वर्षांपूर्वी होऊन गेला असे म्हणतात.

तुम्ही काय करू शकता? तुम्ही नथनेल या शिष्याचे अनुकरण करू शकता. * नथनेलचा मित्र फिलिप्प याने त्याला सांगितले की त्याला मशीहा म्हणजे “योसेफाचा मुलगा येशू नासरेथकर” सापडला आहे. पण फिलिप्पाने सांगितले म्हणून नथनेलाने त्याच्यावर विश्‍वास ठेवला नाही. उलट तो त्याला म्हणाला: “नासरेथातून काहीतरी उत्तम निघू शकते काय?” त्याच्या मनात शंका होती तरीपण फिलिप्पाने त्याला “येऊन पाहा” असे म्हटले तेव्हा तो त्याच्यासोबत गेला. (योहान १:४३-५१) येशूबद्दल असलेल्या पुराव्यांचे परीक्षण केल्याने तुम्हालाही फायदा होऊ शकतो. तुम्ही काय करू शकता?

येशू खरोखर अस्तित्वात होता याबद्दलच्या ऐतिहासिक पुराव्यांचे परीक्षण करा. जोसिफस व टॅसिटस हे पहिल्या शतकातील दोन मान्यवर इतिहासकार होते व ते ख्रिस्ती नव्हते. येशू खरोखर अस्तित्वात होता असे ते सांगतात. सा.यु. ६४ मध्ये, रोममध्ये लागलेल्या प्रचंड आगीसाठी नीरोने ख्रिश्‍चनांना कसे दोषी ठरवले त्याविषयी टॅसिटसने असे लिहिले: “नीरोने, घृणित कार्यांसाठी द्वेष केल्या जाणाऱ्‍या एका विशिष्ट वर्गाला दोषी ठरवले आणि त्यांचा अतिशय क्रूररीत्या छळ केला; या लोकांना ख्रिस्ती म्हणून ओळखले जात होते. ख्रिस्तुस [ख्रिस्त], ज्याच्यावरून हे नाव आले होते, त्याला टायबेरियसच्या शासन काळात आपल्या एका अधिकाऱ्‍याने अर्थात पंतय पिलाताने देहान्ताची शिक्षा दिली होती.”

पहिल्या दोन शतकातील इतिहासकारांनी येशू ख्रिस्त आणि त्याच्या अनुयायांविषयी दिलेल्या संदर्भाचा सारांश दिल्यावर, द एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिका २००२ आवृत्ती शेवटी म्हणते: “हे वेगवेगळे अहवाल सिद्ध करतात की, प्राचीन काळी ख्रिस्ती धर्माच्या विरोधकांनीही कधी येशूच्या अस्तित्वाबद्दल शंका केली नाही; याबद्दल प्रथम १८ व्या शतकाच्या शेवटी, १९ व्या शतकात आणि २० व्या शतकाच्या सुरुवातीला आक्षेप घेण्यात आला आणि त्यालाही पर्याप्त आधार नव्हता.” २००२ साली, द वॉल स्ट्रीट जर्नल मधील एका संपादकीय लेखात असे लिहिले होते: “काही नास्तिकांना वगळता बाकीच्या अनेक विद्वानांनी नासरेथकर येशू एक ऐतिहासिक व्यक्‍ती होता हे मान्य केले आहे.”

येशूच्या पुनरुत्थानाचा पुरावा पाहा. येशूला त्याच्या विरोधकांनी अटक केली तेव्हा त्याचे सोबती त्याला सोडून पळून गेले व त्याचा मित्र पेत्र याने घाबरून त्याला ओळखत असल्याचे नाकारले. (मत्तय २६:५५, ५६, ६९-७५) येशूच्या अटकेनंतर त्याच्या शिष्यांची पांगापांग झाली. (मत्तय २६:३१) नंतर अचानक त्याचे शिष्य सक्रिय बनले. पेत्र व योहानाने तर येशूच्या मृत्यूचा कट रचनाऱ्‍या लोकांनाही धैर्याने साक्ष दिली. येशूचे शिष्य इतके आवेशी बनले की त्यांनी येशूच्या शिकवणी संपूर्ण रोमी साम्राज्यात पसरवल्या. आपल्या विश्‍वासाची तडजोड करण्याऐवजी ते मरण पत्करायला तयार होते.

येशूच्या शिष्यांमध्ये हा विलक्षण बदल कशामुळे झाला? प्रेषित पौल सांगतो की येशूचे पुनरुत्थान झाल्यानंतर “तो केफाला [पेत्राला], मग बारा जणांना दिसला.” नंतर पौल म्हणतो: “त्यानंतर तो एकदम पाचशेपेक्षा अधिक बंधूंना दिसला.” पुनरुत्थित येशूला प्रत्यक्ष पाहिलेल्या या लोकांपैकी अनेक जण पौलाने हे शब्द लिहिले तेव्हा जिवंत होते. (१ करिंथकर १५:३-७) फक्‍त एक दोघे साक्षीदार असते तर टीकाकारांनी कधीच त्यांना निकालात काढले असते. (लूक २४:१-११) पण पाचशेपेक्षा जास्त लोकांच्या साक्षीमुळे येशूचे पुनरुत्थान नक्कीच झाले होते हे सिद्ध झाले.

बायबलवर भरवसा ठेवल्यामुळे कोणते फायदे मिळतात? येशूवर विश्‍वास ठेवणाऱ्‍या व त्याची आज्ञा मानणाऱ्‍या सर्वांना त्यांच्या पापांची क्षमा मिळू शकते व ते शुद्ध विवेक प्राप्त करू शकतात. (मार्क २:५-१२; १ तीमथ्य १:१९; १ पेत्र ३:१६-२२) त्यांचा मृत्यू झाला तर येशू “शेवटल्या दिवशी” त्यांचे पुनरुत्थान करण्याचे वचन देतो.—योहान ६:४०. (w०९ ५/१)

अधिक माहितीसाठी बायबल नेमके काय शिकवते? * या पुस्तकातील “येशू ख्रिस्त कोण आहे?” अध्याय ४ व “खंडणी—देवाची सर्वात अमूल्य भेट” अध्याय ५ पाहा.

[तळटीपा]

^ शुभवर्तमान लेखक मत्तय, मार्क व लूक यांनी नथनेलाला बर्थलमय असे संबोधले आहे.

^ यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केले.

[७ पानांवरील चित्र]

नथनेलप्रमाणेच येशूबद्दलच्या पुराव्याचे परीक्षण करा