व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आज ‘चमत्काराने बरे केले जाणे’ देवाकरवी होते का?

आज ‘चमत्काराने बरे केले जाणे’ देवाकरवी होते का?

आज ‘चमत्काराने बरे केले जाणे’ देवाकरवी होते का?

काही देशात, भाविक धार्मिक स्थळांना भेटी देतानाचे दृश्‍य सर्रास पाहायला मिळते. बहुतेक भाविक असा दावा करतात, की अमूक एका धार्मिक स्थळी गेल्यामुळेच त्यांचे “असाध्य” रोग बरे झाले. इतर देशांत, अमूक बाबा किंवा मांत्रिक अलौकिक शक्‍तीने लोकांना बरे करण्याचा दावा करतात. आणखी इतर ठिकाणी, मोठमोठी भावनिक धार्मिक संमेलने भरवली जातात. तिथे आजारी लोक अचानक आपल्या व्हीलचेअरवरून उडी मारून उभे राहून किंवा आपल्या कुबड्या भिरकावून देत आपण बरे झालो, असा दावा करतात.

चमत्काराने रोग बरे करणारे लोक हे बहुधा वेगवेगळ्या धर्माचे असतात आणि सहसा असे होते, की ते एकमेकांवर विश्‍वासघातकी, खोटे, किंवा मूर्तीपूजक असे शेरे मारत असतात. तेव्हा प्रश्‍न येतो, की एकमेकांचा कडाडून विरोध करणाऱ्‍या लोकांकरवी देव चत्मकार घडवून आणतो का? कारण, बायबल तर शिकवते, की “देव अव्यवस्था माजविणारा नाही; तर तो शांतीचा देव आहे.” (१ करिंथकर १४:३३) मग, आज ‘चमत्काराने बरे केले जाणे’ देवाकरवी होते का? काही लोक येशूच्या नावाने रोग बरे करण्याचा दावा करतात. पण येशूने लोकांचे रोग कशा प्रकारे बरे केले ते आपण पाहू या.

येशूने लोकांना कशा प्रकारे बरे केले

आजच्या जगात जसे केले जाते त्यापेक्षा खूपच वेगळ्या पद्धतीने येशूने लोकांना बरे केले. उदाहरणार्थ, येशूजवळ बरे होण्यासाठी आलेल्या सर्वांना त्याने बरे केले. त्याने लोकसमुदायातून निवडक लोकांनाच बरे करून मग उरलेल्या पीडितांना तसेच माघारी पाठवले नाही. येशूने लोकांना पूर्णपणे व बहुतेकदा लगेचच बरे केले. बायबल म्हणते: “सर्व समुदायाची त्याला स्पर्श करण्याची धडपड चालली होती, कारण त्याच्यातून सामर्थ्य निघून ते सर्वांस निरोगी करीत होते.”लूक ६:१९.

पण आज असे होत नाही. जेव्हा कोणी रोगी बरा होत नाही तेव्हा बरे करणारे लगेच, रोगी व्यक्‍ती विश्‍वासात कमजोर होती म्हणून बरी झाली नाही, असे बोलून मोकळे होतात. येशूने तर, ज्यांनी त्याच्यावर अद्याप विश्‍वासही ठेवला नव्हता अशांनाही बरे केले होते. उदाहरणार्थ, एकदा येशूसमोर अचानक एक आंधळा मनुष्य आला तेव्हा येशूने त्याला बरे केले. नंतर मग येशूने त्याला विचारले: “तू मनुष्याच्या पुत्रावर विश्‍वास ठेवतोस काय?” तेव्हा तो मनुष्य म्हणाला: “महाराज, मी त्याच्यावर विश्‍वास ठेवावा असा तो कोण आहे?” येशूने त्याला म्हटले, “तुझ्याबरोबर आता बोलत आहे तोच तो आहे.”—योहान ९:१-७, ३५-३८.

आता तुम्ही म्हणाल, की बरे होण्यासाठी विश्‍वासाची गरज नाही तर मग येशूने ज्यांना ज्यांना बरे केले त्यांना त्याने “तुझ्या विश्‍वासाने तुला बरे केले आहे,” असे का म्हटले बरे? (लूक ८:४८; १७:१९; १८:४२) कारण, त्यांच्या विश्‍वासाने प्रवृत्त होऊनच तर ते येशूकडे बरे होण्यासाठी आले होते. आणि जे लोक येशूकडे आले नव्हते त्यांची बरे होण्याची संधी हुकली होती. म्हणूनच जे बरे झाले होते ते त्यांच्या विश्‍वासामुळे नव्हे तर देवाच्या शक्‍तीमुळे बरे झाले होते. बायबल येशूविषयी असे म्हणते: “[त्याला] देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला; तो सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला.”—प्रेषितांची कृत्ये १०:३८.

आजच्या रोगमुक्‍ती कार्यक्रमांत सहसा पैसा गोवलेला असतो. रोग बरे करणारे पैसा गोळा करण्यात पटाईत असतात, हे सर्वांनाच माहीत आहे. अशाच एका रोग बरे करणाऱ्‍याने, संपूर्ण जगभरात टीव्हीवरून प्रक्षेपित केल्या जाणाऱ्‍या कार्यक्रमाद्वारे एका वर्षात जवळजवळ ३ अब्ज ९१ कोटी ६० लाख रूपये कमावल्याचे सांगितले जाते. बरे होण्याची आशा बाळगून आलेल्या भाविकांकडून चर्च संघटनांना देखील बराच फायदा झाला आहे. पण येशूने ज्यांना बरे केले त्यांच्याकडून त्याने कधीही पैसे घेतले नाहीत. उलट त्यानेच आलेल्या जमावाला जेवू घातले. (मत्तय १५:३०-३८) येशूने जेव्हा आपल्या शिष्यांना प्रचारासाठी पाठवले तेव्हा त्याने त्यांना सांगितले: “रोग्यांस बरे करा, मेलेल्यांस उठवा, कुष्ठ्यांस शुद्ध करा, भुते काढा, तुम्हाला फुकट मिळाले, फुकट द्या.” (मत्तय १०:८) आज लोकांना बरे करणाऱ्‍यांची पद्धत व येशूची पद्धत यांत काय फरक आहे?

कोणाच्या शक्‍तीने “बरे” केले जाते?

काही वर्षांपासून, वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्‍यांनी अशा रोग बरे करणाऱ्‍यांचे परीक्षण करून पाहायचे ठरवले. काय दिसून आले त्यांना? लंडनच्या द डेली टेलिग्राफ नावाच्या बातमीपत्रकानुसार, इंग्लंडमधील एका डॉक्टरने या विषयावर २० वर्षे संशोधन केले. त्याने म्हटले: “चमत्काराने रोग बरे करण्याचा दावा करणारे लोक ज्या शक्‍तीने हे करतात त्याला एकही वैद्यकीय पुरावा नाही.” तरीपण पुष्कळ लोक अगदी मनापासून असा विश्‍वास करतात, की अमक्याने किंवा तमक्याने दिलेल्या वस्तूने, किंवा मंदिरात गेल्यामुळे किंवा रोग बरे करणाऱ्‍याच्या शक्‍तीमुळेच ते रोगमुक्‍त झालेत. म्हणजे, या लोकांची फसवणूक तर झालेली नसेल?

डोंगरावरील आपल्या लोकप्रिय प्रवचनात, येशूने असे म्हटले, की धार्मिक ठग त्याला म्हणतील: “प्रभो, प्रभो, आम्ही तुझ्या नावाने . . . पुष्कळ महत्कृत्ये केली नाहीत काय?” तेव्हा तो त्यांना स्पष्टपणे सांगेल: “मला तुमची कधीच ओळख नव्हती; अहो अनाचार करणाऱ्‍यांनो, माझ्यापुढून निघून जा.” (मत्तय ७:२२, २३) या लोकांकडे असलेल्या शक्‍तीविषयी प्रेषित पौलाने असा इशारा दिला: “सैतानाच्या कृतीप्रमाणे सर्व प्रकारची खोटी महत्कृत्ये, चिन्हे, अद्‌भुते आणि सर्व प्रकारचे अनीतिजनक कपट ह्‍यांनी युक्‍त असे त्या अनीतिमानाचे येणे होईल.”—२ थेस्सलनीकाकर २:९, १०.

शिवाय, धार्मिक प्रतिकांद्वारे, मूर्तींद्वारे व प्रतिमांद्वारे जे रोग “बरे” केले जातात ते देवाच्या शक्‍तीने होत नाहीत. का नाही? कारण देवाच्या वचनात स्पष्टपणे असे म्हटलेले आहे: “मूर्तिपूजेपासून दूर पळा,” आणि “स्वतःस मूर्तींपासून दूर राखा.” (१ करिंथकर १०:१४; १ योहान ५:२१) चमत्काराने रोग “बरे करण्याची” ही पद्धत लोकांना खऱ्‍या उपासनेपासून दूर नेण्यासाठी सैतान वापरत असलेली एक धूर्तयुक्‍ती आहे. बायबल म्हणते: “सैतानहि स्वतः तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो.”—२ करिंथकर ११:१४.

येशूने व त्याच्या प्रेषितांनी लोकांचे रोग बरे का केले?

ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांमधील चमत्काराने रोग बरे केलेल्या अहवालांवरून, येशू व प्रेषित देवाचे लोक आहेत हे लोकांना स्पष्ट दिसले. (योहान ३:२; इब्री लोकांस २:३, ४) येशूने केलेल्या चमत्कारांनी, तो ज्या संदेशाची घोषणा करत होता त्याला पुष्टी दिली: तो “सभास्थानात सुवार्तेची घोषणा करीत व राज्याची सुवार्ता गाजवीत आणि लोकांचे सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरी करीत गालीलभर फिरला.” (मत्तय ४:२३) येशूच्या महत्कृत्यांतून—जसे की केवळ रोग्यांना बरे करणे नव्हे, तर हजारोंना जेवू घालणे, निसर्ग शक्‍तींवर नियंत्रण करणे, मृतांना जिवंत करणे—या सर्व कार्यांतून, तो त्याच्या राज्य शासनात येईल तेव्हा आज्ञाधारक मानवजातीसाठी काय काय करेल हे दिसून आले. ही खरोखरच एक सुवार्ता आहे!

येशूचा व प्रेषितांचा मृत्यू झाल्यानंतर व त्यांनी ज्या कोणाला ही दाने दिली होती त्यांचा मृत्यू झाल्यानंतर मात्र ही महत्कृत्ये किंवा आत्म्याची दाने राहिली नाहीत. प्रेषित पौलाने असे लिहिले: “संदेश असेल तरी ते संपतील. [चमत्काराने बोलल्या जाणाऱ्‍या] भाषा असल्या तरी त्या समाप्त होतील; आणि [देवाकडून थेट प्रकट केली जाणारी] विद्या असली तरी ती संपेल.” (१ करिंथकर १३:८) का बरे? कारण या गोष्टी ज्या उद्देशास्तव होत होत्या, जसे की, येशूची वचनयुक्‍त मशिहा म्हणून ओळख पटणे, ख्रिस्ती मंडळीला देवाची स्वीकृती मिळणे, वगैरे सारखे उद्देश पूर्ण झाले. त्यामुळे, इतर महत्कृत्यांचा आणि चमत्काराने रोग बरे करण्याच्या गोष्टीचीसुद्धा आवश्‍यकता राहिली नाही. त्या गोष्टी ‘संपल्या.’

असे असले तरी, येशूने केलेल्या चमत्कारांमधून आज आपल्याला एक महत्त्वाचा संदेश मिळतो. तो म्हणजे, देवाच्या राज्याविषयी येशूने शिकवलेल्या गोष्टींकडे आपण लक्ष दिले आणि त्यांवर विश्‍वास ठेवला तर आपण अशा एका काळाची वाट पाहू शकतो जेव्हा एका ईश्‍वरप्रेरित भविष्यवाणीची आध्यात्मिक आणि शारीरिक अर्थाने देखील पूर्णता होईल. ती भविष्यवाणी सांगते: “मी रोगी आहे असे एकहि रहिवासी म्हणणार नाही.”—यशया ३३:२४; ३५:५, ६; प्रकटीकरण २१:४. (w०८ १२/१)