व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

लवकरच पृथ्वी नंदनवन बनेल!

लवकरच पृथ्वी नंदनवन बनेल!

लवकरच पृथ्वी नंदनवन बनेल!

“हे आमच्या स्वर्गांतील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो.”—मत्तय ६:९, १०.

ही प्रार्थना बहुतेकांना माहीत आहे. अनेक जण हिला “हे आमच्या स्वर्गातील पित्या” किंवा प्रभूची प्रार्थना देखील म्हणतात. ही प्रार्थना मनुष्यजातीला एक आशा देते. ती कशी?

प्रभूच्या प्रार्थनेत सांगितल्याप्रमाणे देवाच्या राज्यामुळे स्वर्गामध्ये त्याच्या इच्छेप्रमाणे घडले आहे हे ज्याप्रमाणे निश्‍चित आहे, त्याचप्रमाणे पृथ्वीवरही त्याच्या इच्छेप्रमाणे घडेल. आणि देवाची इच्छा आहे की पृथ्वी पुन्हा नंदनवन बनावी. (प्रकटीकरण २१:१-५) पण, देवाचे राज्य नक्की काय आहे व ते कशा प्रकारे पृथ्वीला नंदनवन बनवेल?

एक खरेखुरे सरकार

देवाचे राज्य एक खरेखुरे सरकार आहे. कोणतेही सरकार बनण्यासाठी शासकांची, कायद्यांची व प्रजेची गरज असते. देवाचे राज्य या अटी पूर्ण करते का? खालील तीन प्रश्‍नांना बायबल कशा प्रकारे उत्तर देते ते पाहा:

देवाच्या राज्यात कोण शासक आहेत? (यशया ३३:२२) यहोवा देवाने आपल्या राज्याचा कारभार चालवण्यासाठी आपला पुत्र येशू ख्रिस्त याला नियुक्‍त केले आहे. (मत्तय २८:१८) यहोवाच्या मार्गदर्शनाखाली येशूने “सर्व वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे, लोक व राष्ट्रे” यांतून काही व्यक्‍तींची निवड केली आहे. हे त्याच्यासोबत “पृथ्वीवर राज्य करितील” व त्यांची संख्या निश्‍चित आहे.—प्रकटीकरण ५:९, १०.

देवाच्या राज्यात प्रजेकडून कोणते कायदे पाळण्याची अपेक्षा केली जाते? देवाच्या राज्यातील काही कायदे किंवा आज्ञा पाळण्यामध्ये प्रजा जनांनी सकारात्मक पावले उचलणे समाविष्ट आहे. येशूने या आज्ञांपैकी सर्वात महत्त्वाच्या आज्ञेबद्दल बोलताना असे म्हटले: “‘तू आपला देव परमेश्‍वर ह्‍याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीति कर.’ हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी ही आहे की, ‘तू आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखी प्रीति कर.’”—मत्तय २२:३७-३९.

देवाच्या राज्यातील इतर काही कायद्यांनुसार प्रजा जनांनी काही गोष्टी टाळणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ बायबल स्पष्टपणे सांगते: “फसू नका! जारकर्मी, मुर्तिपूजक, व्यभिचारी, स्त्रीसारखा संभोग देणारे, पुरूषसंभोग घेणारे, चोर, लोभी, मद्यपी, चहाड व वित्तहरण करणारे ह्‍यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.”—१ करिंथकर ६:९, १०.

देवाच्या राज्याचे प्रजाजन कोण आहेत? येशूने देवाच्या राज्याच्या प्रजाजनांची तुलना मेंढरांसोबत केली. तो म्हणाला: “ती माझी वाणी ऐकतील; मग एक कळप, एक मेंढपाळ असे होईल.” (योहान १०:१६) देवाच्या राज्याचा प्रजाजन होऊ इच्छिणाऱ्‍याने उत्तम मेंढपाळ असलेल्या येशूचे आपण अनुकरण करतो असे फक्‍त बोलून फायदा नाही तर ते आपल्या कृतीतूनही दाखवले पाहिजे. म्हणजेच त्याने येशूच्या आज्ञांचे पालन केले पाहिजे. येशूने म्हटले: “मला प्रभुजी, प्रभुजी, असे म्हणणाऱ्‍या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही; तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल.”—मत्तय ७:२१.

येशूप्रमाणेच देवाच्या राज्याचे प्रजाजनही देवाच्या नावाचा वापर करतात व त्या नावाचा आदर करतात. (योहान १७:२६) येशूने ‘राज्याच्या सुवार्तेबद्दल’ इतरांना शिकवण्याची जी आज्ञा दिली आहे तिचे ते पालन करतात. (मत्तय २४:१४; २८:१९, २०) व एकमेकांवर खरी प्रीती दाखवतात.—योहान १३:३५.

“पृथ्वीची नासाडी करणाऱ्‍यांचा नाश”

जगाची सद्य परिस्थिती दाखवते की देवाचे राज्य लवकरच आवश्‍यक कारवाई करून या पृथ्वीवर आमूलाग्र बदल घडवून आणेल. आपण हे कशावरून म्हणतो? दोन हजार वर्षांपूर्वी येशूने एक चिन्ह सांगितले होते ज्यामुळे “देवाचे राज्य जवळ आले आहे” हे कळणार होते. या चिन्हामध्ये अनेक गोष्टी समाविष्ट आहेत. (लूक २१:३१) मागील लेखात पाहिल्याप्रमाणे ते चिन्ह पूर्ण होत असल्याचे स्पष्ट पुरावे आज जगभरात दिसून येत आहेत.

यानंतर काय घडणार आहे? येशू उत्तर देतो: “जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही, व पुढे कधीहि येणार नाही असे मोठे संकट त्या काळी येईल.” (मत्तय २४:२१) हे मानव-निर्मित संकट नसेल. तर या संकटाद्वारे परमेश्‍वर “पृथ्वीची नासाडी करणाऱ्‍यांचा नाश” करेल. (प्रकटीकरण ११:१८) ज्यांच्या स्वार्थी कार्यांमुळे आपला ग्रह विनाशाच्या उंबरठ्यावर आला आहे अशा दुष्ट लोकांचे “भूतलावरून उच्चाटन होईल.” पण देवाच्या इच्छेनुसार वागणारे सात्विक लोक मात्र “या भूतलावर टिकून राहतील.”—नीतिसूत्रे २:२१, २२, कॉमन लँग्वेज.

अशी कडक कारवाई करण्याचे यहोवा देवाकडे न्याय्य कारण आहे. असे का म्हणता येईल? या उदाहरणावर विचार करा: समजा तुमच्या मालकीची एक इमारत आहे, ज्यात राहणारे काही भाडेकरू चांगले, समजूतदार आहेत; ते वेळच्या वेळी भाडे देतात व तुमच्या घराचीही चांगली काळजी घेतात. पण इतर भाडेकरू मात्र स्वार्थी व त्रासदायक आहेत. घराचे भाडे तर ते देतच नाहीत उलट तोडफोड करून घराचे नुकसान करतात. पुन्हापुन्हा ताकीद देऊनही त्यांच्या वागण्यात काहीच फरक पडत नाही. अशा वेळी तुम्ही काय कराल? मालक या नात्याने नक्कीच तुम्ही त्या त्रासदायक भाडेकरूंना घालवून द्याल.

याच प्रकारे यहोवा देव पृथ्वी व तिच्यावरील सर्व गोष्टींचा निर्माणकर्ता असल्याने या ग्रहावर कोणाला राहू द्यायचे हे ठरवण्याचा हक्क त्याला आहे. (प्रकटीकरण ४:११) यहोवाने असे म्हटले आहे की त्याच्या इच्छेप्रमाणे न चालणाऱ्‍या व इतरांना त्रास देणाऱ्‍या दुष्ट लोकांना या पृथ्वीवरून काढून टाकले जाईल.—स्तोत्र ३७:९-११.

पृथ्वी नंदनवन बनेल

लवकरच येशू ख्रिस्त देवाच्या राज्याचा कारभार हाती घेऊन या पृथ्वीवर राज्य करायला सुरुवात करेल. या नव्या सुरुवातीला येशूने “सर्व गोष्टींचे नूतनीकरण” असे म्हटले. (मत्तय १९:२८, सुबोध भाषांतर) त्यावेळी पृथ्वीवर कशी परिस्थिती असेल? खाली दिलेल्या, बायबलमधील अभिवचनांवर लक्ष द्या:

स्तोत्र ४६:९. “तो दिगंतापर्यंत लढाया बंद करितो.”

यशया ३५:१. “अरण्य व रुक्ष भूमि ही हर्षतील; वाळवंट उल्लासेल व कमलाप्रमाणे फुलेल.”

यशया ६५:२१-२३. “माझे निवडलेले आपल्या हाताच्या श्रमाचे फळ पूर्णपणे भोगितील. त्यांचे परिश्रम व्यर्थ जाणार नाहीत, संकट तत्काळ गाठील अशा संततीला ते जन्म देणार नाहीत.”

योहान ५:२८. “कबरेतील सर्व माणसे [येशूची] वाणी ऐकतील आणि . . . बाहेर येतील, अशी वेळ येत आहे.”

प्रकटीकरण २१:४. “[देव] त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील, ह्‍यापुढे मरण नाही, शोक, रडणे व कष्ट ही नाहीत.”

विश्‍वास ठेवण्याजोगी कारणे

बायबलच्या या अभिवचनांवर तुमचा विश्‍वास आहे का? अनेकांचा नसेल असे बायबलमध्ये आधीच सांगण्यात आले होते. ते म्हणते: “स्वतःच्याच वासनांप्रमाणे चालणारे थट्टेखोर लोक शेवटल्या दिवसात . . . येऊन म्हणतील: ‘त्याच्या येण्याचे वचन आता कोठे आहे? कारण, वाडवडील निजले तेव्हापासून सर्व काही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे.’” (२ पेत्र ३:३, ४) पण या थट्टेखोर लोकांचा समज अगदीच चुकीचा आहे. बायबल जे म्हणते त्यावर तुम्ही का विश्‍वास ठेवू शकता हे समजण्यासाठी फक्‍त चार कारणांचा विचार करा:

(१) पूर्वीही देवाने पृथ्वीवरील दुष्ट लोकांविरुद्ध कारवाई केली होती. नोहाच्या काळातील जलप्रलय हे याचे एक उल्लेखनीय उदाहरण आहे.—२ पेत्र ३:५-७.

(२) सध्याच्या जागतिक परिस्थितीबद्दल देवाच्या वचनात अचूक भाकीत करण्यात आले होते.

(३) सर्व काही “उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे” हे खरे नाही. पूर्वी कधीही झाली नाही इतकी सामाजिक, नैतिक व पर्यावरणीय हानी आपल्या ग्रहाची सध्या होत आहे.

(४) आज ‘राज्याची सुवार्ता’ सबंध पृथ्वीवर गाजवली जात आहे, हे सूचित करते की लवकरच “शेवट होईल.”—मत्तय २४:१४.

देवाचे वचन बायबल यातून देवाच्या राज्याच्या शासनाखाली सर्वकाळ जगण्याच्या आशेबद्दल शिकण्यासाठी यहोवाचे साक्षीदार तुम्हाला आमंत्रित करत आहेत. (योहान १७:३) होय, मानवजातीसाठी एक सुंदर भवितव्य ठेवण्यात आले आहे. उत्तम परिस्थिती लवकरच येणार आहे! असे भवितव्य मिळवणाऱ्‍यांपैकी तुम्हीही एक असाल का? (w०८ ८/१)

[७ पानांवरील संक्षिप्त आशय]

जगाची परिस्थिती पूर्वी जशी होती तशीच पुढेही राहणार असे म्हणणाऱ्‍यांचा समज अगदीच चुकीचा आहे

[८ पानांवरील चित्र]

असे भवितव्य मिळवणाऱ्‍यांपैकी तुम्हीही एक असाल का?