व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवा तुमचा सांभाळ करेल

यहोवा तुमचा सांभाळ करेल

“तो रोगाने अंथरुणास खिळला असता परमेश्वर त्याला सांभाळेल.”—स्तो. ४१:३.

गीत क्रमांक: २३,

१, २. बायबल काळात देवानं काय केलं, आणि आजही काही जणांना काय वाटू शकतं?

‘मी या आजारातून बरा होईन का,’ असा प्रश्न कधी तुमच्या मनात आला आहे का? किंवा माझ्या कुटुंबातला एखादा सदस्य, मित्र किंवा मैत्रीण बरी होईल का, असा प्रश्न तुमच्या मनात केव्हातरी डोकावला असेलच. आपली तब्येत चांगली असावी किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीचं आरोग्य ठीक असावं असं आपल्या सर्वांनाच वाटत असतं आणि हे अगदी साहजिक आहे. बायबलमध्येही आपल्याला अशा काही लोकांबद्दल वाचायला मिळतं, जे आजारी होते आणि त्यांनाही असंच वाटायचं. उदाहरणार्थ अहाब आणि ईजबेल यांचा मुलगा अहज्या, याला आपलं दुखणं कधी बरं होईल अशी काळजी होती. शिवाय सिरियाचा राजा, बेनहदादसुद्धा आजारी होता, तेव्हा त्यानंही मी बरा होईन का असा प्रश्न विचारला होता.—२ राजे १:२; ८:७, ८.

बायबल असंही सांगतं, की प्राचीन काळात काही वेळा यहोवानं लोकांना चमत्कारिकपणे बरं केलं. एवढंच नव्हे तर आपल्या संदेष्ट्यांचा वापर करून त्यानं काही जणांना मरणातूनही जिवंत केलं. (१ राजे १७:१७-२४; २ राजे ४:१७-२०, ३२-३५) तेव्हा आजही काही जणांना कदाचित असं वाटेल, की देव आतासुद्धा आपल्याला बरं वाटावं म्हणून काहीतरी करेल.

३-५. यहोवा आणि येशूमध्ये काय करण्याची ताकद आहे आणि आपण कोणत्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत?

यहोवा आपल्या ताकदीनं लोकांच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो. अब्राहामाच्या काळातील फारो आणि मोशेची बहीण मिर्याम यांच्यासारख्या काही लोकांना त्यानं आजारी पाडून शिक्षा केली. (उत्प. १२:१७; गण. १२:९, १०; २ शमु. २४:१५) यासोबतच, त्यानं इस्राएलांनाही त्यांच्या अविश्वासूपणामुळे वेगवेगळ्या ‘विकारांनी व रोगांनी’ शिक्षा केली. (अनु. २८:५८-६१) पण याउलट, काही वेळा यहोवानं आजारांपासून किंवा रोगांपासून आपल्या लोकांचं संरक्षण केलं. (निर्ग. २३:२५; अनु. ७:१५) इतकंच नव्हे तर काही जणांना त्यानं बरंही केलं. उदाहरणार्थ, जेव्हा ईयोब खूप आजारी होता आणि त्याला मरून जावंसं वाटत होतं, तेव्हा यहोवानं त्याला बरं केलं.—ईयो. २:७; ३:११-१३; ४२:१०, १६.

यावरून आजारी व्यक्तींना बरं करण्याची ताकद यहोवामध्ये आहे, याची खात्री आपल्याला पटते. येशूमध्येही लोकांना बरं करण्याची क्षमता होती. पृथ्वीवर असताना त्यानं कित्येक कोडग्रस्तांना आणि फेफरेकऱ्यांना (फिट येणाऱ्यांना) बरं केलं. तसंच आंधळ्यांना आणि पक्षाघाताचा झटका आलेल्या लोकांनाही त्यानं बरं केलं. (मत्तय ४:२३, २४ वाचा; योहा. ९:१-७) येशूनं केलेले हे चमत्कार, तो नवीन जगात आणखी मोठ्या प्रमाणात ज्या आश्चर्यकारक गोष्टी करेल, त्याची केवळ एक झलक होती. त्या वेळी “मी रोगी आहे असे एकही रहिवासी म्हणणार नाही.”—यश. ३३:२४.

पण मग गंभीर रीत्या आजारी असताना, यहोवा आणि येशू काहीतरी चमत्कार करून आपल्याला बरं करतील, अशी अपेक्षा आपण आज करावी का? तसंच, उपचार निवडताना आपण कोणती गोष्ट लक्षात घेतली पाहिजे?

आजारपणात यहोवावर विसंबून राहा

६. पहिल्या शतकातील ख्रिश्चनांनी केलेल्या चमत्कारांबद्दल बायबल काय सांगतं?

पहिल्या शतकात, यहोवानं अभिषिक्त ख्रिश्चनांपैकी काहींना चमत्कार करण्याचं सामर्थ्य दिलं होतं हे आपल्याला माहीत आहे. (प्रे. कृत्ये ३:२-७; ९:३६-४२) त्यामुळेच वेगवेगळ्या भाषा बोलण्यासोबतच ते लोकांना बरंदेखील करू शकत होते. (१ करिंथ. १२:४-११) पण बायबलमध्ये आधीच सांगितल्याप्रमाणे, नंतरच्या काळात मात्र चमत्कार करण्याचं सामर्थ्य कोणालाही मिळालं नाही. (१ करिंथ. १३:८) त्यामुळे आज आपल्याला आणि आपल्या जवळच्या लोकांना बरं करण्यासाठी देव काहीतरी चमत्कार घडवून आणेल अशी अपेक्षा आपण करू शकत नाही.

७. स्तोत्र ४१:३ मुळे आपल्याला कशा प्रकारे सांत्वन मिळतं?

पण तुम्ही आजारी असाल तर यहोवा तुम्हाला सांभाळेल व तुमची काळजी घेईल. कारण गतकाळातही आपल्या सेवकांच्या बाबतीत त्यानं हेच केलं होतं. दाविदानं असं लिहिलं: “जो दीनांची चिंता वाहतो तो धन्य! संकटसमयी परमेश्वर त्याला मुक्त करेल. परमेश्वर त्याचे रक्षण करेल व त्याचा प्राण वाचवेल.” (स्तो. ४१:१, २) त्या वेळी हयात असणाऱ्या एखाद्या व्यक्तीनं जर गरीबांवर दया दाखवली, तर ती कधीच मरणार नाही असं दाविदाला म्हणायचं नव्हतं; तर देव अशा विश्वासू व्यक्तीची काळजी घेईल असं त्याला म्हणायचं होतं. हे कशावरून म्हणता येईल? कारण पुढे त्यानं असं म्हटलं: “तो रोगाने अंथरुणास खिळला असता परमेश्वर त्याला सांभाळील; तो रोगी असता तू त्याचे अंथरूण बदलतोस.” (स्तो. ४१:३) खरंच, आपल्या सेवकांना काय सहन करावं लागत आहे हे यहोवा अगदी अचूकपणे जाणतो आणि तो कधीच आपल्या सेवकांना विसरत नाही. अशा परिस्थितीत लागणारी सहनशक्ती आणि समजबुद्धी तो त्यांना देऊ शकतो. शिवाय, यहोवानं आपल्याला असं मानवी शरीर दिलं आहे, ज्यामध्ये आपोआप बरं होण्याची क्षमता आहे.

८. स्तोत्र ४१:४ नुसार दाविदानं यहोवाकडे कशाबद्दल मदत मागितली?

स्तोत्र ४१ मध्ये दाविदानं त्याच्या जीवनातल्या अशा काळाबद्दलही सांगितलं आहे, जेव्हा तो खूप आजारी होता आणि चिंतेनं अगदी खचून गेला होता. कदाचित याच वेळी त्याचा मुलगा, अबशालोम, त्याचं राजपद बळकावण्याचा प्रयत्न करत होता. पण त्या वेळी दावीद इतका आजारी होता की तो अबशालोमाला रोखू शकला नाही. त्याला माहीत होतं, की त्याच्या घरात असणाऱ्या या सर्व समस्या, बथशेबेशी त्यानं केलेल्या पापामूळेच त्याच्यावर आल्या होत्या. (२ शमु. १२:७-१४) पण मग त्यानं काय केलं? त्यानं यहोवाला प्रार्थना केली आणि म्हटलं: “हे परमेश्वरा, माझ्यावर कृपा कर; माझ्या जिवाला बरे कर; मी तुझ्याविरुद्ध पाप केले आहे.” (स्तो. ४१:४) दाविदाला याची खात्री होती, की यहोवानं त्याच्या पापांची क्षमा केली आहे. तसंच, आजारपणात मदतीसाठी त्यानं यहोवावर भरवसा ठेवला. पण यादरम्यान यहोवा काहीतरी चमत्कार करेल, अशी अपेक्षा दाविदानं केली होती का?

९. (क) हिज्कीया राजाच्या बाबतीत यहोवानं काय केलं? (ख) दाविदानं यहोवाकडून कोणत्या गोष्टीची अपेक्षा केली?

हे खरं आहे, की यहोवानं काही जणांना आजारातून बरं केलं आहे. उदाहरणार्थ, जेव्हा हिज्कीया राजा अगदी मरणाला टेकला होता, तेव्हा यहोवानं त्याला बरं केलं. आणि तो आणखी १५ वर्षं जगला. (२ राजे २०:१-६) पण दाविदानं अशा चमत्काराची अपेक्षा केली नाही. याउलट, “दीनांची चिंता” करणाऱ्यांना ज्या प्रकारे देव मदत करणार होता, त्याच प्रकारे आपल्यालाही देवानं मदत करावी अशी अपेक्षा त्यानं केली. दाविदाचा यहोवासोबत चांगला नातेसंबंध असल्यामुळे, त्याच्या आजारपणात त्याचं सांत्वन करण्यासाठी आणि त्याची काळजी घेण्यासाठी त्यानं यहोवाला विनंती केली. शिवाय त्याचा आजार बरा व्हावा आणि त्याला पुन्हा चांगलं आरोग्य मिळावं यासाठीही त्यानं यहोवाला प्रार्थना केली. आपणही यहोवाला अशीच प्रार्थना करू शकतो.—स्तो. १०३:३.

१०. त्रफिम आणि एपफ्रदीत यांच्या बाबतीत काय घडलं, आणि यावरून आपल्याला काय समजतं?

१० पहिल्या शतकात, पौल आणि इतर काही जणांकडे चमत्कारानं आजार बरा करण्याची क्षमता होती. पण म्हणून त्या काळच्या सर्वच ख्रिश्चनांना चमत्कारिकपणे बरं करण्यात आलं असं नाही. (प्रेषितांची कृत्ये १४:८-१० वाचा.) पुब्ल्य नावाच्या एका व्यक्तीच्या वडिलांना कसल्यातरी आजाराची लागण झाली होती आणि त्यांना खूप ताप चढला होता. ते गंभीर रीत्या आजारी पडले होते. तेव्हा प्रेषित पौलानं “प्रार्थना केली व त्याच्यावर हात ठेवून त्याला बरे केले.” (प्रे. कृत्ये २८:८) पण पौलानं प्रत्येकालाच असं बरं केलं नाही. त्याच्यासोबत मिशनरी दौऱ्यावर असणाऱ्या त्रफिमचंच उदाहरण घ्या. (प्रे. कृत्ये २०:३-५, २२; २१:२९) जेव्हा तो आजारी पडला, तेव्हा पौलानं त्याला चमत्कारानं बरं केलं नाही. त्यामुळे त्रफिमला पौलासोबत पुढे प्रवास करता आला नाही आणि ठीक होण्यासाठी त्याला मिलेत या ठिकाणीच थांबावं लागलं. (२ तीम. ४:२०) हीच गोष्ट पौलाचा आणखी एक मित्र, एपफ्रदीत याच्या बाबतीतही झाली. एकदा तो इतका आजारी होता की तो जवळजवळ मरायला टेकला होता. पण अशा परिस्थितीत पौलानं त्याला चमत्कार करून बरं केल्याचं बायबल सांगत नाही.—फिलिप्पै. २:२५-२७, ३०.

विचारपूर्वक निर्णय घ्या

११, १२. लूकबद्दल आपल्याला काय माहीत आहे, आणि पौलाला त्याची कशा प्रकारे मदत झाली?

११ लूक एक वैद्य होता आणि पौलासोबत त्यानंही प्रवास केला होता. (प्रे. कृत्ये १६:१०-१२; २०:५, ६; कलस्सै. ४:१४) येशूनं एकदा म्हटलं होतं, की रोग्यास वैद्याची गरज असते. (लूक ५:३१) येशूच्या म्हणण्याप्रमाणे, मिशनरी दौऱ्यावर असताना, पौल व इतर साथीदार आजारी पडले, तेव्हा लूकची त्यांना नक्कीच खूप मदत झाली असेल.—गलती. ४:१३.

१२ पण लक्षात घ्या की लूकला इतरांना उपचाराविषयी सल्ला द्यायला आवडायचं म्हणून तो इतरांना सल्ला देत नव्हता, तर तो एक प्रशिक्षित वैद्य होता. लूकनं हे प्रशिक्षण कुठं आणि केव्हा घेतलं, याविषयी बायबल काहीच सांगत नाही. पण पौलानं कलस्सैमधील बांधवांना आपल्या सदिच्छा कळवण्यासाठी लूकचा वापर केला होता. यावरून कलस्सैजवळ असणाऱ्या लावदिकीया इथल्या वैद्यकीय शाळेत लूकनं प्रशिक्षण घेतलं असावं, याची शक्यता नाकारता येत नाही. यासोबतच, जेव्हा लूकनं आपल्या शुभवर्तमानाच्या पुस्तकाचं आणि प्रेषितांची कृत्ये या पुस्तकाचं लिखाण केलं, तेव्हा काही विशिष्ट वैद्यकीय शब्द त्यानं वापरले. शिवाय तो एक वैद्य असल्यामुळेच येशूनं लोकांना बरं केल्याच्या अनेक घटनांचं त्यानं वर्णन केलं.

१३. उपचाराबद्दल इतरांचा सल्ला घेण्याविषयी किंवा इतरांना सल्ला देण्याविषयी आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे?

१३ आज, आपल्यातील कोणामध्येच चमत्कार करून आजार बरं करण्याची ताकद नाही. पण आपल्याला मदत व्हावी म्हणून कदाचित काही बंधुभगिनी, आवश्यक नसतानाही आपल्याला सल्ला देण्याचा प्रयत्न करतील. यांपैकी सगळेच सल्ले चुकीचे असतील असं नाही. कारण पौलानंही एकदा तिमथ्याला थोडा द्राक्षारस घेण्याविषयी सांगितलं होतं. दूषित पाणी पिल्यामुळे त्याला पोटाचा त्रास सुरू झाला होता. * (१ तीमथ्य ५:२३ वाचा.) पण आपल्याला मिळणाऱ्या सल्ल्यांबद्दल आपण सावध असलं पाहिजे. कधीकधी असं होऊ शकतं की एखादा बांधव तुम्हाला एक विशिष्ट प्रकारचं औषध घेण्याचा, एखादी वनौषधी घेण्याचा किंवा एखादं पथ्य पाळण्याचा आग्रह करेल. तो असंही सांगेल की त्याच्या कुटुंबातल्या कोणालातरी तुमच्यासारखाच त्रास होता पण असं केल्यानं त्याला लगेच फरक पडला. पण याचा अर्थ तुम्हालाही त्याचा उपयोग होईल असा मुळीच होत नाही. इतरांनी जरी अशा प्रकारचा उपचार घेतला असेल आणि त्याचा फायदा त्यांना झाला असेल, तरी त्यामुळे एखाद्याला बरंच नुकसानदेखील होऊ शकतं.—नीतिसूत्रे २७:१२ वाचा.

समजबुद्धी दाखवा

१४, १५. (क) आपण कोणत्या बाबतीत सावध असलं पाहिजे? (ख) नीतिसूत्रे १४:१५ या वचनातून आपण काय शिकू शकतो?

१४ आपलं आरोग्य चांगलं असावं आणि आपण जीवनाचा आनंद घेत यहोवाच्या सेवेत भरपूर काम करावं, असं आपल्या सर्वांनाच वाटतं. पण अपरिपूर्ण असल्यामुळे आपल्याला आजारपण टाळता येणं शक्य नाही. आपण आजारी पडतो, तेव्हा त्यासाठी पुष्कळ उपचार पद्धती उपलब्ध असतात आणि त्यांपैकी कोणती निवडायची हे ठरवण्याचा अधिकार आपला असतो. पण दुःखाची गोष्ट म्हणजे काही लोक आणि कंपन्या असा दावा करतात, की त्यांना असा उपचार सापडला आहे ज्यामुळे आपला आजार बरा होऊ शकतो. अशी जाहिरात करण्यामागं केवळ अमाप पैसा मिळवणं हाच त्यांचा उद्देश असतो. ते कदाचित असंही म्हणतील की बरेच लोक आमच्याकडे उपचार घेऊन ठीक झाले आहेत. त्यामुळे आपण आजारी असतो तेव्हा लवकर बरं होण्याकरता आणि आपलं आयुष्य वाढवण्याकरता आपण काहीही करण्यास धडपडत असतो. पण अशा वेळी, देवाच्या वचनात दिलेला हा सल्ला आपण विसरता कामा नये: “भोळा प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवतो; शहाणा नीट पाहून पाऊल टाकतो.”—नीति. १४:१५.

१५ तेव्हा शहाणी किंवा समंजस व्यक्ती, एखाद्याचा सल्ला ऐकताना त्या व्यक्तीवर, खासकरून योग्यपणे प्रशिक्षित नसलेल्या व्यक्तीवर, भरवसा ठेवण्याच्या बाबतीत सावधगिरी बाळगते. म्हणून आपण स्वतःला असं विचारलं पाहिजे: ‘या औषधामुळे, वनौषधीमुळे किंवा विशिष्ट आहारामुळे लोकांना बरं वाटलं आहे असा दावा जरी एखादी व्यक्ती करत असली, तरी यावर कितपत विश्वास ठेवता येईल? इतरांना यामुळे बरं वाटलं म्हणून मलाही बरं वाटेल हे कशावरून? माझ्या आरोग्याच्या समस्येवर योग्य उपचार शोधण्यासाठी मला आणखी संशोधन करण्याची आणि प्रशिक्षित व्यक्तींकडे विचारपूस करण्याची गरज आहे का?’—अनु. १७:६.

१६. आरोग्याविषयी कोणताही निर्णय घेण्याआधी आपण कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत?

१६ कोणत्या प्रकारची तपासणी योग्य असेल आणि कोणता उपचार निवडावा याविषयी निर्णय घेण्याची वेळ येते, तेव्हा यावर आपण “सुबुद्धीने” म्हणजे सुज्ञपणे विचार करण्याची गरज आहे. (तीत २:१२, १३, पं.र.भा.) जेव्हा तपासणीची किंवा उपचाराची पद्धत थोडी शंकास्पद वाटते, तेव्हा खासकरून असं करणं जास्त महत्त्वाचं आहे. अशा वेळी काही गोष्टींचा विचार करणं फायद्याचं ठरेल. जसं की, आपण ज्या व्यक्तीचा सल्ला घेत आहोत ती व्यक्ती केल्या जाणाऱ्या तपासणीबद्दल किंवा उपचाराबद्दल स्पष्ट माहिती देऊ शकते का? त्या व्यक्तीनं दिलेली माहिती न पटण्यासारखी वाटते का? ती व्यक्ती करत असलेली तपासणी किंवा उपचार योग्य आहे, याबद्दल इतर डॉक्टरदेखील सहमत आहेत का? (नीति. २२:२९) कदाचित काही जण असंदेखील म्हणतील की एका नवीन औषधाचा शोध अलीकडेच आणि खूप दूरच्या ठिकाणी लागला असल्यानं, इथल्या डॉक्टरांना याविषयी काही माहीत नाही. पण याविषयी काही खात्रीलायक पुरावे आहेत का? काही जण तर कदाचित असे उपचारही सुचवतील ज्यांत कसल्यातरी गोपनीय घटकाचा वापर केल्याचं सांगितलं असेल किंवा एखाद्या अज्ञात शक्तीचा वापर त्यामध्ये होत असल्याचं सांगितलं असेल. असा उपचार घेणं खूप धोकादायक ठरू शकतं. कारण अशा दुरात्मिक किंवा चमत्कारिक शक्तींच्या वापराबद्दल देवानं आधीच आपल्याला इशारा दिलेला आहे.—अनु. १८:१०-१२; यश. १:१३.

तुम्हाला चांगलं आरोग्य मिळो!

१७. कोणती गोष्ट आपल्याकरता साहजिक आहे?

१७ पहिल्या शतकातील नियमन मंडळानं, त्या काळातील मंडळ्यांना पत्र पाठवून अशा काही गोष्टींबद्दल सांगितलं, ज्या त्यांना टाळायच्या होत्या. या पत्राच्या शेवटी त्यांनी असं लिहिलं: “यापासून स्वतःला जपाल तर तुमचे हित होईल. क्षेमकुशल असो.” (प्रे. कृत्ये १५:२९) “क्षेमकुशल असो” या शेवटल्या दोन शब्दांनी आपल्याला याची आठवण होते, की आपलं आरोग्य चांगलं असावं असं वाटणं साहजिक आहे.

आपलं आरोग्य चांगलं असावं असं आपल्याला नेहमी वाटत असलं, तरी आपण आपलं लक्ष यहोवाच्या सेवेत केंद्रित करतो (परिच्छेद १७ पाहा)

१८, १९. कोणत्या गोष्टीची आपण आतुरतेनं वाट पाहत आहोत?

१८ अपरिपूर्णतेमुळे आजारपण टाळणं आपल्याला शक्य नाही. शिवाय जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा यहोवा काहीतरी चमत्कार करून आपल्याला बरं करेल अशी अपेक्षादेखील आपण करू नये. पण भविष्यात यहोवा सर्व आजारपण काढून प्रत्येकाला परिपूर्ण आरोग्य देईल त्या दिवसाची वाट आपण पाहू शकतो. प्रकटीकरण २२:१, २ मध्ये प्रेषित योहानानं अशा ‘जीवनाच्या पाण्याबद्दल’ आणि ‘जीवनाच्या झाडाबद्दल’ सांगितलं आहे, ज्यांमुळे प्रत्येकाला निरोगी आरोग्य प्राप्त होईल. पण हे ‘जीवनाचं पाणी’ आणि ‘जीवनाचं झाड’ कसलंतरी औषध किंवा औषधी वनस्पती नाही, ज्यांमुळे आपण आता किंवा नवीन जगात बरं होऊ शकतो. याउलट, आपल्याला सदासर्वकाळ जगता यावं म्हणून यहोवा आणि येशू ज्या गोष्टी करतील, त्यांना उद्देशून हे सांगण्यात आलं आहे.—यश. ३५:५, ६.

१९ त्या काळाची आपण आतुरतेनं वाट पाहत आहोत. पण आता, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, की यहोवा आपल्यातील प्रत्येकावर प्रेम करतो आणि आजारपणाचा सामना करताना आपल्याला कसं वाटतं, हे तो समजू शकतो. आपण आजारी पडलो तरी यहोवा आपल्याला सोडणार नाही याची दाविदाला जशी खात्री होती तशीच खात्री आपणदेखील बाळगू शकतो. कारण यहोवा त्याच्या विश्वासू सेवकांची नेहमी काळजी घेतो.—स्तो. ४१:१२.

^ परि. 13 दि ओरिजीन्स अॅन्ड एन्शंट हिस्ट्री ऑफ वाईन नावाचं एक पुस्तक सांगतं त्यानुसार, वैज्ञानिकांना असं आढळून आलं आहे की टायफाईडचे आणि इतर धोकादायक रोगांचे जिवाणू वाईनमुळे लगेच मरतात.