व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्न

वाचकांचे प्रश्न

राहेल आपल्या मुलांसाठी रडत आहे असे जे यिर्मयाने म्हटले त्याचा काय अर्थ होतो?

यिर्मया ३१:१५ या वचनात असे म्हटले आहे: “परमेश्वर असे म्हणतो, रामात शोक व आकांत यांचा शब्द ऐकू येत आहे; राहेल आपल्या मुलांसाठी रडत आहे; आपल्या मुलांमुळे ती सांत्वन पावत नाही, कारण ती नाहीत.”

राहेल हिला दोन मुले होती आणि त्या दोघांच्याही आधी तिचा मृत्यू झाला. त्यामुळे, यिर्मयाने राहेलच्या मृत्यूनंतर १,००० वर्षांनी लिहिलेले वरील शब्द चुकीचे वाटू शकतात.

राहेलचा पहिला मुलगा योसेफ होता. (उत्प. ३०:२२-२४) नंतर तिला आणखी एक मुलगा झाला. त्याचे नाव बन्यामीन होते. पण बन्यामीनाला जन्म देताना राहेलचा मृत्यू झाला. त्यामुळे, आपल्या मनात हा प्रश्न येऊ शकतो: यिर्मया ३१:१५ यात “राहेल आपल्या मुलांसाठी रडत आहे . . . कारण ती नाहीत” असे का सांगितले असावे?

राहेलचा पहिला मुलगा, योसेफ याला नंतर मनश्शे आणि एफ्राईम ही दोन मुले झाली. ही गोष्ट लक्ष देण्याजोगी आहे. (उत्प. ४१:५०-५२; ४८:१३-२०) कारण, कालांतराने एफ्राईमाचा वंश उत्तरेकडील सबंध इस्राएल राज्यापैकी सर्वात मोठा आणि महत्त्वाचा वंश ठरला. उत्तरेकडील राज्याच्या दहा वंशांना एफ्राईम या नावानेच संबोधले जाऊ लागले. दुसरीकडे पाहता, दक्षिणेकडील राज्य राहेलचा दुसरा मुलगा बन्यामीन याचे वंशज आणि यहूदा या वंशापासून बनले होते. त्यामुळे, लाक्षणिक अर्थाने राहेल ही सबंध इस्राएल राष्ट्रातील, म्हणजेच उत्तरेकडील व दक्षिणेकडील राज्यांतील सर्व मातांना सूचित करत होती.

यिर्मयाचे पुस्तक लिहिण्यात आले तोपर्यंत उत्तरेकडील दहा वंशांच्या राज्यावर अश्शूऱ्यांनी कब्जा केला होता आणि या राज्यातील बऱ्याच लोकांना बंदिवान करण्यात आले होते. पण, कदाचित एफ्राईमाच्या वंशजांपैकी काही जणांनी यहूदाच्या राज्यात पळ काढला असावा. इ.स.पू. ६०७ मध्ये बॅबिलोनी लोकांनी दक्षिणेकडील दोन वंशांच्या यहूदा राज्यावर विजय मिळवला. त्या वेळी, त्यांनी कित्येक बंदिवानांना जेरूसलेमच्या उत्तरेकडे आठ किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या रामा या ठिकाणी एकत्रित केले होते असे दिसते. (यिर्म. ४०:१) बन्यामीन वंशाच्या क्षेत्रात जेथे राहेलला पुरण्यात आले होते तेथे या बंदिवानांपैकी काहींचा संहार करण्यात आला असावा. (१ शमु. १०:२) त्यामुळे, राहेल आपल्या मुलांसाठी रडत आहे असे जे म्हणण्यात आले, त्यावरून ती एकंदरीत सर्व बन्यामीन वंशजांसाठी किंवा खास ज्यांचा रामा येथे संहार करण्यात आला होता त्यांच्यासाठी लाक्षणिक अर्थाने शोक करत होती असे सूचित होऊ शकते. आणखी एक शक्यता म्हणजे, इस्राएल राष्ट्रातील सर्व माता आपल्या मुलांचा मृत्यू झाल्यामुळे किंवा त्यांना बंदिवान करून नेण्यात आल्यामुळे रडत होत्या असे या शब्दांवरून सूचित होत असावे.

काहीही असो, राहेल आपल्या मुलांसाठी रडत आहे असे जे यिर्मयाने म्हटले त्यातून अनेक शतकांनंतर घडणार असलेल्या एका घटनेविषयी भाकीत करण्यात आले. येशूचा जन्म झाल्यानंतर हेरोद राजाने अशी आज्ञा केली की बेथलेहेमातल्या दोन वर्षांखालील सर्व मुलांना जिवे मारले जावे. त्या वेळी आपल्या मुलांना गमावलेल्या स्त्रियांनी किती आक्रोश केला असेल त्याची कल्पना करा! बेथलेहेम हे जेरूसलेमच्या दक्षिणेकडे होते. पण, या रडणाऱ्या स्त्रियांचा आक्रोश जणू जेरूसलेमच्या उत्तरेकडील रामापर्यंत ऐकू येत होता.—मत्त. २:१६-१८.

अशा रीतीने, यिर्मयाच्या काळात आणि येशूच्या काळातही, राहेल आपल्या मुलांसाठी रडत आहे असे म्हणण्याद्वारे यहुदी मातांनी आपल्या मरण पावलेल्या मुलांसाठी व्यक्त केलेल्या दुःखाचे वर्णन करण्यात आले. अर्थात, ‘शत्रूंच्या देशात’ गेलेले, म्हणजेच मरण पावलेले पुनरुत्थानाच्या वेळी परत येऊ शकतात.—यिर्म. ३१:१६; १ करिंथ. १५:२६