व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवा—आपला सर्वात चांगला मित्र

यहोवा—आपला सर्वात चांगला मित्र

“[अब्राहामाला] ‘देवाचा मित्र’ म्हणण्यात आले.”—याको. २:२३.

१. आपली निर्मिती देवाच्या स्वरूपात झाल्यामुळे आपल्यात कोणत्या क्षमता आहेत?

एखाद्या लहान मुलाच्या संदर्भात, “अगदी आपल्या बाबांवर गेलाय,” असे आपण अनेकदा ऐकतो. आणि खरोखरच अनेक मुले अगदी आपल्या आईवडिलांसारखी दिसतात किंवा वागतात. कारण, आई व वडील या दोघांचे गुण आनुवंशिकतेने मुलांमध्ये येतात. आपला स्वर्गातील पिता यहोवा हा आपला जीवनदाता आहे. (स्तो. ३६:९) त्याची मानवी मुले या नात्याने आपण काही प्रमाणात त्याच्यासारखे आहोत. आपली निर्मिती त्याच्या स्वरूपात झाली असल्यामुळे तर्क करण्याची, निर्णय घेण्याची आणि मैत्रिपूर्ण संबंध जोडण्याची आपल्यात क्षमता आहे.—उत्प. १:२६.

२. आपल्याला यहोवासोबत मैत्री जोडणे कशामुळे शक्य होते?

यहोवा आपला सर्वात चांगला मित्र बनू शकतो. यहोवाचे मित्र बनणे आपल्याला कशामुळे शक्य होते? त्याचे आपल्यावर प्रेम असल्यामुळे आणि आपण त्याच्यावर व त्याच्या पुत्रावर विश्वास दाखवत असल्यामुळे ही मैत्री शक्य होते. येशूने असे म्हटले: “देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” (योहा. ३:१६) बायबलमध्ये अशा अनेक लोकांची उदाहरणे आहेत ज्यांचा यहोवासोबत खूप जवळचा नातेसंबंध होता. आपण त्यांपैकी दोन उदाहरणांवर चर्चा करू या.

 “माझा मित्र अब्राहाम”

३, ४. यहोवा देवासोबत असलेल्या मैत्रीच्या बाबतीत अब्राहाम आणि इस्राएली लोक यांच्यात कोणता फरक होता?

इस्राएल लोकांचा कुलपिता व पूर्वज अब्राहाम याला यहोवाने “माझा मित्र” असे संबोधले. (यश. ४१:८) दुसरे इतिहास २०:७ या वचनातही देवाने अब्राहामाला आपला मित्र म्हटले. आपल्या निर्माणकर्त्यासोबत या विश्वासू माणसाच्या घनिष्ठ मैत्रीचा पाया काय होता? अब्राहामाचा देवावरील विश्वासच त्यांच्यातील मैत्रीचा पाया होता.—उत्प. १५:६; याकोब २:२१-२३ वाचा.

अब्राहामाचे वंशज पुढे प्राचीन इस्राएल राष्ट्र बनले. खरेतर यहोवा देव हा त्यांचा पिता व मित्र होता. पण, दुःखाची गोष्ट म्हणजे कालांतराने त्यांनी देवासोबतची आपली ही मैत्री गमावली. असे का घडले? देवाच्या अभिवचनांवर आपला विश्वास टिकवून ठेवण्यास ते चुकले आणि म्हणून असे घडले.

५, ६. (क) यहोवा देवासोबत तुमची मैत्री कशी झाली? (ख) आपण स्वतःला कोणते प्रश्न विचारले पाहिजेत?

तुम्ही जसजसे यहोवाबद्दल आणखी शिकत जाल, तसतसा त्याच्यावरील तुमचा विश्वास वाढत जाईल, आणि तुम्ही दिवसेंदिवस त्याच्यावर अगदी मनापासून प्रेम करू लागाल. तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा कळले की देव एक खरोखरची व्यक्ती आहे आणि तुम्ही त्याच्यासोबत जवळचा नातेसंबंध जोडू शकता तेव्हा तुम्हाला कसे वाटले होते त्याबद्दल विचार करा. तुम्हाला हेदेखील समजले की आदामाने केलेल्या बंडाळीमुळे आपण सर्व जन्मतःच पापी आहोत आणि त्यामुळे मानवजात ही देवापासून दुरावली आहे. (कलस्सै. १:२१) त्यानंतर तुम्हाला हे समजले की आपला प्रेमळ स्वर्गीय पिता कोणापासूनही दूर नाही आणि त्याला सर्वांबद्दल आस्था आहे. येशूच्या खंडणी बलिदानाची जी तरतूद यहोवाने केली आहे तिच्याबद्दल जेव्हा आपण शिकलो आणि या तरतुदीवर विश्वास ठेवला तेव्हा आपण यहोवासोबत मैत्री करण्यास सुरुवात केली.

आपण यहोवाबद्दल कसे शिकलो यावर जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण स्वतःला पुढील प्रश्न विचारले पाहिजेत: ‘देवासोबतची माझी मैत्री आणखी वाढवण्याकरता मी मेहनत घेत आहे का? माझ्या प्रिय मित्रावर, यहोवावर असलेला माझा विश्वास दृढ आहे का आणि त्याच्यावरील माझे प्रेम दिवसेंदिवस वाढत चालले आहे का?’ प्राचीन काळात आणखी एका जणाचा यहोवा देवासोबत जवळचा नातेसंबंध होता. तो होता गिदोन. आता आपण त्याच्या उत्तम उदाहरणावर लक्ष देऊ या आणि त्यातून आपल्याला काय शिकता येईल हे पाहू या.

यहोवा शांतीचा देव आहे

७-९. (क) गिदोनाला कोणता अनुभव आला आणि त्याचा त्याच्यावर कसा परिणाम झाला? (लेखाच्या सुरुवातीला दिलेले चित्र पाहा.) (ख) आपण यहोवासोबत घनिष्ठ मैत्री कशी अनुभवू शकतो?

इस्राएल राष्ट्र प्रतिज्ञात देशात गेल्यानंतर, एकदा त्यांच्यावर खूप कठीण परिस्थिती आली. त्याच काळादरम्यान गिदोन हा न्यायाधीश या नात्याने विश्वासूपणे यहोवाची सेवा करत होता. शास्ते याच्या ६ व्या अध्यायात, यहोवाच्या दूताने अफ्रा येथे गिदोनाला जी भेट दिली त्याबद्दलचा वृत्तांत आपल्याला वाचायला मिळतो. त्या काळात इस्राएली लोकांना मिद्यानी लोकांपासून धोका होता. याच कारणामुळे गिदोन शेतात, खुल्या ठिकाणी नव्हे तर द्राक्षकुंडात गव्हाची मळणी करत होता, जेणेकरून काही धोका आढळल्यास तो पटकन ते मौल्यवान धान्य लपवू शकेल. देवदूत त्याच्याकडे आला आणि त्याने त्याला “बलवान वीरा” असे म्हटले. गिदोनाने आश्चर्यचकित होऊन त्याला विचारले, की यहोवा देव ज्याने इस्राएली लोकांना इजिप्तच्या गुलामीतून सोडवले होते तो खरोखरच आताही त्यांना मदत करेल का? निर्माणकर्त्याच्या वतीने त्या देवदूताने गिदोनाला असे आश्वासन दिले की यहोवा खरोखरच त्याला साहाय्य करेल.

“इस्राएलाला मिद्यानाच्या हातून” सोडवणे आपल्याला कसे काय शक्य होईल अशी गिदोनाला शंका होती. पण यहोवाने त्याला स्पष्टपणे असे म्हटले: “खरोखर मी तुझ्याबरोबर असेन; जसे एका माणसाला मारावे तसे एकजात साऱ्या मिद्यानाला तू मारशील.” (शास्ते ६:११-१६) देवाचे हे शब्द ऐकूनही गिदोनाने देवदूताकडे एक चिन्ह मागितले. कारण हे नेमके कसे घडेल याबद्दल गिदोनाच्या मनात अद्यापही शंका होती. पण, यहोवा एक खरी व्यक्ती आहे किंवा नाही याबाबतीत गिदोनाच्या मनात किंचितही शंका असल्याचे या संभाषणातून दिसून येत नाही.

यानंतर जे घडले त्यामुळे गिदोनाचा विश्वास आणखी वाढला आणि तो देवाच्या अजून जवळ जाऊ शकला. गिदोनाने त्या देवदूतासाठी भोजन तयार करून त्याला ते वाढले. तेव्हा देवदूताने आपल्या काठीच्या टोकाने त्या अन्नाला स्पर्श केला आणि चमत्कारिक रीत्या ते भस्म केले. हे पाहून गिदोनाला याची खात्री पटली की देवानेच त्या देवदूताला पाठवले आहे. हे समजल्यावर गिदोन घाबरला आणि  त्याने असे म्हटले: “हाय, हाय, हे प्रभू परमेश्वरा! खरोखरच परमेश्वराचा दूत मी प्रत्यक्ष पाहिला आहे.” (शास्ते ६:१७-२२) या घटनेमुळे, यहोवासोबत गिदोनाची जी मैत्री होती त्यावर विपरीत परिणाम झाला का? खरे पाहता याच्या अगदी उलट घडले. यहोवासोबतचा आपला शांतीचा संबंध अजूनही कायम असल्याची गिदोनाला जाणीव झाली. असे म्हणण्याचे कारण म्हणजे, गिदोनाने त्या ठिकाणी एक वेदी तयार केली आणि तिला “याव्हे-शालोम” असे नाव दिले. यहोवा शांतीचा देव आहे असा या नावाचा अर्थ होतो. (शास्ते ६:२३, २४ वाचा.) यहोवा आपल्यासाठी दररोज जे काही करतो त्यावर जर आपण मनन केले तर तो आपला खरा मित्र आहे याची आपल्याला जाणीव होईल. आपण नियमित रीत्या यहोवाला प्रार्थना केल्यास त्याच्यासोबतची आपली मैत्री घनिष्ठ होत जाते आणि आपण खरी मनःशांती अनुभवू शकतो.

यहोवाच्या “मंडपात कोण वस्ती करेल?”

१०. स्तोत्र १५:३, ५ नुसार, देवाशी मैत्री करण्यासाठी आपण कोणत्या अटी पूर्ण केल्या पाहिजेत?

१० यहोवा आपला मित्र बनावा अशी जर आपली इच्छा असेल तर आपल्याला काही खास अटी पूर्ण कराव्या लागतील. स्तोत्र १५ यात नमूद केल्यानुसार, आपल्याला जर देवाच्या “मंडपात” वस्ती करायची असेल म्हणजेच त्याचे मित्र बनायचे असेल तर काय करण्याची गरज आहे हे दाविदाने सांगितले. (स्तो. १५:१) आपण त्यांपैकी दोन अटींवर चर्चा करू या. त्यांपैकी पहिली ही की आपण कोणाचीही चुगली किंवा निंदा करण्याचे टाळले पाहिजे, आणि दुसरी ही की आपण आपल्या सगळ्या व्यवहारांत प्रामाणिक राहिले पाहिजे. देवाच्या मंडपात वस्ती करणाऱ्या व्यक्तीबद्दल दाविदाने असे लिहिले, की ती व्यक्ती “आपल्या जिभेने चुगली करत नाही, . . . निरपराध्यांची हानी करण्याकरता लाच घेत नाही.”—स्तो. १५:३, ५.

११. आपण इतरांची निंदा का करू नये?

११ आणखी एका स्तोत्रात दाविदाने आपल्याला अशी ताकीद दिली, “तू आपली जीभ दुर्भाषणापासून . . . आवर.” (स्तो. ३४:१३) आपण जर त्याच्या या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले तर आपल्या आणि यहोवाच्या मैत्रीत खंड पडू शकतो. खरे पाहता चुगली करणे किंवा निंदा करणे हा सैतानाचा गुण आहे. सैतानासाठी “दियाबल” हे आणखी एक नाव वापरण्यात येते. दियाबल हा शब्द मुळात “निंदा करणारा” या अर्थाच्या एका ग्रीक शब्दापासून आला आहे. इतरांशी किंवा इतरांबद्दल बोलताना आपण काळजीपूर्वक विचार करून बोलले पाहिजे. असे केल्यास यहोवासोबतचा आपला जवळचा नातेसंबंध टिकून राहील. खासकरून मंडळीतील नियुक्त बांधवांबद्दल बोलताना आपण जास्त काळजी घेतली पाहिजे.—इब्री लोकांस १३:१७; यहूदा ८ वाचा.

१२, १३. (क) आपण आपल्या सर्व व्यवहारांत प्रामाणिक का असले पाहिजे? (ख) आपल्या प्रामाणिकपणाचा इतरांवर कोणता परिणाम होऊ शकतो?

१२ यहोवाचे साक्षीदार त्यांच्या प्रामाणिकपणासाठी ओळखले जातात. प्रेषित पौलाने असे लिहिले: “आमच्यासाठी प्रार्थना करत राहा; सर्व बाबतींत चांगले वागण्याची आमची इच्छा असून आमचा विवेकभाव चांगला आहे अशी आमची खातरी आहे.” (इब्री १३:१८) “सर्व बाबतींत चांगले वागण्याची” आपली इच्छा असल्यामुळे आपल्या ख्रिस्ती बांधवांचा आपण गैरफायदा घेत नाही. उदाहरणार्थ, आपला एखादा बांधव जर आपल्याकडे नोकरी करत असेल, तर आपण त्याच्यासोबत योग्य व्यवहार करून ठरल्याप्रमाणे त्याला वेतन देत आहोत का याची आपण खात्री केली पाहिजे. एक ख्रिस्ती या नात्याने आपण आपल्याकडे काम करणाऱ्या कामगारांसोबत व इतरांसोबत प्रामाणिकपणे व्यवहार केला पाहिजे. आणि जर आपण आपल्या एखाद्या बांधवाकडे काम करत असू, तर आपण त्याचा गैरफायदा घेऊ नये व त्याच्याकडून काही अवाजवी अपेक्षा किंवा खास सवलतींची अपेक्षा करू नये.

१३ यहोवाच्या साक्षीदारांशी व्यवहार करणारे इतर लोकही सहसा त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांची तारीफ करतात. उदाहरणार्थ, एका मोठ्या कंपनीच्या संचालकाने या गोष्टीची दखल घेतली की यहोवाचे साक्षीदार दिलेल्या शब्दानुसार वागतात. त्याने म्हटले “तुम्ही नेहमी दिलेला शब्द पाळता.” (स्तो. १५:४) अशा वागणुकीमुळे आपल्याला देवासोबतची मैत्री टिकवून ठेवण्यास मदत होते. पण, त्याहून महत्त्वाचे म्हणजे यामुळे आपल्या प्रेमळ स्वर्गीय पित्याचा महिमा होतो.

इतरांनाही देवाचे मित्र बनण्यास मदत करा

आपण इतरांनाही यहोवाचे मित्र बनण्यास मदत करतो (परिच्छेद १४, १५ पाहा)

१४, १५. आपण आपल्या सेवाकार्याद्वारे इतरांनाही यहोवाचे मित्र बनण्यास कशी मदत करू शकतो?

१४ देव आहे असा विश्वास बाळगणारे अनेक जण आपल्याला क्षेत्रात भेटतात. पण, देव आपला सर्वात चांगला मित्र होऊ शकतो हे त्यांना माहीत नाही.  अशा लोकांना आपण कशा प्रकारे मदत करू शकतो? आपल्या शिष्यांना प्रचार करण्यासाठी पाठवताना येशूने त्यांना ज्या सूचना दिल्या त्यांकडे लक्ष द्या. तो म्हणाला: “ज्या कोणत्या घरात जाल, तेथे या घरास शांती असो, असे प्रथम म्हणा. तेथे कोणी शांतिप्रिय माणूस असला तर तुमची शांती त्याच्यावर राहील; नसला तर तुम्हाकडे ती परत येईल.” (लूक १०:५, ६) आपण जर मैत्रिपूर्ण पद्धतीने लोकांशी बोललो तर ते आपल्या संदेशाकडे आकर्षित होतील. आपल्या मैत्रिपूर्ण वागणुकीमुळे, विरोधकांचाही राग कमी होऊ शकतो आणि भविष्यात ते कदाचित सुवार्ता ऐकून घेण्यास तयार होऊ शकतात.

१५ आपल्याला असेही लोक भेटतात जे खोट्या धर्मात किंवा रूढी-परंपरांत गढून गेलेले असतात. अशा लोकांसोबतही आपण मैत्रिपूर्ण व शांतिपूर्ण व्यवहार करतो. जे लोक सध्याच्या जगाच्या परिस्थितीमुळे त्रस्त झालेले आहेत व आपण ज्याची सेवा करतो त्या खऱ्या देवाला ओळखून त्याची उपासना करण्याची ज्यांची इच्छा आहे अशा सर्वांचे आपण आनंदाने आपल्या सभांमध्ये स्वागत करतो. टेहळणी बुरूजमधील “बायबलने बदलले जीवन!” या लेखांत अशा अनेकांची उदाहरणे आपण वाचू शकतो.

आपल्या सर्वात चांगल्या मित्रासोबत काम करणे

१६. आपण कशा रीतीने यहोवाचे मित्रच नव्हे तर त्याचे सहकारीदेखील आहोत?

१६ सहसा जे लोक सोबत मिळून काम करतात त्यांची एकमेकांशी चांगली मैत्री होते. यहोवाचे सर्व समर्पित उपासक केवळ त्याचे मित्रच नव्हे, तर त्याचे “सहकारी” देखील आहेत. हा खरोखरच त्यांच्याकरता एक बहुमान आहे. (१ करिंथकर ३:९ वाचा.) जेव्हा आपण प्रचार करण्याच्या व शिष्य बनवण्याच्या कामात सहभागी होतो तेव्हा आपल्या स्वर्गीय पित्याचे उत्तम गुण आपण अधिक चांगल्या प्रकारे समजू लागतो. सुवार्तेचा प्रचार करण्याची आपल्यावर सोपवलेली मोठी जबाबदारी पूर्ण करण्यासाठी त्याचा पवित्र आत्मा आपल्याला कशा प्रकारे साहाय्य करतो हेदेखील आपण अनुभवतो.

१७. यहोवा आपला मित्र आहे हे अधिवेशन व संमेलन यांद्वारे कसे दिसून येते?

१७ शिष्य बनवण्याच्या कामात आपण जितके जास्त सहभागी होतो, तितकेच जास्त यहोवा देवाच्या जवळ आल्याचे आपल्याला जाणवते. आपल्या विरोधकांच्या प्रयत्नांना यहोवा कशा प्रकारे निष्फळ करतो ते आपण पाहू शकतो. मागील काही वर्षांचा विचार करा. यहोवा कशा प्रकारे आपले मार्गदर्शन करत आहे ते आपण पाहिले आहे. आपल्याला सतत उत्तम प्रतीचे आध्यात्मिक अन्न पुरवण्यात येत आहे. याचे तुम्हाला नवल वाटत नाही का? आपली अधिवेशने व संमेलने यांद्वारे यहोवा जे काही शिकवतो त्यावरून कळते की तो आपल्या समस्या व गरजा जाणतो. अधिवेशनात उपस्थित राहिल्यानंतर एका कुटुंबाने आपली कृतज्ञता पुढील शब्दांत व्यक्त केली: “अधिवेशनात ज्या गोष्टी शिकवण्यात आल्या त्या अगदी आमच्या मनापर्यंत पोचल्या. आम्हाला जाणवलं की यहोवाचं आम्हा प्रत्येकावर प्रेम आहे आणि जीवनात आम्ही यशस्वी व्हावं अशी त्याची इच्छा आहे.” आयर्लंडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका खास अधिवेशनात जर्मनीतील एक जोडपे उपस्थित राहिले होते. तेथील बांधवांनी त्यांचे अगदी आनंदाने स्वागत केले आणि त्यांची काळजी घेतली याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले. त्यांनी पुढे असे लिहिले, “आम्ही खरेतर यहोवाचे आणि त्याचा राजा येशू ख्रिस्त याचे सर्वात जास्त आभार मानतो. कारण त्यांनीच आम्हाला खऱ्या अर्थाने ऐक्यात असलेल्या या राष्ट्राचा भाग बनण्याची संधी दिली आहे. आपण ऐक्याबद्दल फक्त बोलतच नाही, तर दररोज  ते अनुभवत आहोत. डब्लिन येथे झालेल्या या खास अधिवेशनात आम्ही जे अनुभवलं त्यामुळे तुम्हा बांधवांसोबत मिळून आपला महान देव यहोवा याची सेवा करण्याच्या सुहक्काची आम्हाला सतत आठवण होत राहील.”

मित्र एकमेकांशी संवाद साधतात

१८. देवासोबतच्या आपल्या संवादासंबंधी आपण स्वतःला काय विचारले पाहिजे?

१८ मित्र एकमेकांशी संवाद साधतात तेव्हा त्यांची मैत्री आणखी घनिष्ठ होते. आजच्या इंटरनेटच्या काळात सोशल नेटवर्किंग आणि टेक्स्ट मेसेजिंग खूप प्रचलित आहे. याच्या तुलनेत आपला सर्वात चांगला मित्र यहोवा याच्यासोबत आपण किती संवाद साधतो? हे खरे आहे की तो प्रार्थना ऐकणारा देव आहे. (स्तो. ६५:२) असे असले, तरी आपण स्वतःहून त्याच्याशी संवाद साधण्यासाठी किती वेळ घालवतो?

१९. स्वर्गीय पित्याजवळ मनातील भावना व्यक्त करणे जर आपल्याला जमत नसेल तर कोणती मदत उपलब्ध आहे?

१९ देवाच्या काही सेवकांना त्याच्यासमोर आपले मन मोकळे करणे व आपल्या मनातील भावना व्यक्त करणे अवघड जाते. पण, प्रार्थना करताना आपण असे केले पाहिजे अशी यहोवा आपल्याकडून अपेक्षा करतो. (स्तो. ११९:१४५; विलाप. ३:४१) आपल्याला जर आपल्या मनातील भावना शब्दांत व्यक्त करणे जमत नसेल तर आपल्याकरता मदत उपलब्ध आहे. पौलाने रोममधील ख्रिश्चनांना असे लिहिले: “आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही; पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कण्हण्याने मध्यस्थी करतो; पण अंतर्यामे पारखणाऱ्याला त्या आत्म्याचा मनोभाव काय हे ठाऊक आहे, कारण हा आत्मा पवित्रजनांसाठी देवाच्या मर्जीप्रमाणे मध्यस्थी करतो.” (रोम. ८:२६, २७) बायबलमधील ईयोब, स्तोत्र आणि नीतिसूत्रे या पुस्तकांतील शब्दांवर जर आपण मनन केले तर आपल्याला अगदी मनापासून आपल्या भावना यहोवा देवासमोर व्यक्त करणे शक्य होईल.

२०, २१. फिलिप्पैकर ४:६, ७ यात पौलाने जे म्हटले आहे त्यामुळे आपल्याला सांत्वन कसे मिळते?

२० आपल्यावर जेव्हा समस्या येतात तेव्हा, पौलाने फिलिप्पैकरांस जो सल्ला दिला तो आपल्यालाही साहाय्य करू शकतो. त्याने लिहिले: “कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा.” आपल्या सर्वात चांगल्या मित्रासमोर आपण जर आपले मन मोकळे केले तर आपल्याला नक्कीच सांत्वन मिळेल. पौलाने पुढे लिहिले: “सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.” (फिलिप्पै. ४:६, ७) देवाकडून आपल्याला जी खरी शांती मिळते त्यासाठी आपण नेहमी त्याचे आभारी राहू या. कारण ही शांती आपल्या मनाचे व विचारांचे रक्षण करते.

प्रार्थनेमुळे यहोवासोबतची आपली मैत्री कशी मजबूत होते? (परिच्छेद २१ पाहा)

२१ प्रार्थनेमुळे यहोवासोबतची आपली मैत्री आणखी मजबूत करण्यास आपल्याला मदत मिळते. त्यामुळे आपण “निरंतर प्रार्थना” करत राहू या. (१ थेस्सलनी. ५:१७) देवासोबतचा आपला बहुमूल्य नातेसंबंध आणखी घनिष्ठ करण्यासाठी आणि त्याच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी हा अभ्यास आपल्याला साहाय्य करेल. यहोवा आपल्याला जे अनेक आशीर्वाद देतो त्यांवर मनन करण्यासाठी आपण वेळ काढू या, कारण तो खरोखरच आपला पिता, आपला देव आणि आपला मित्र आहे.