व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आमच्या संग्रहातून

“कासवाच्या कवचासारखं माझं घर नेहमीच माझ्यासोबत असायचं”

“कासवाच्या कवचासारखं माझं घर नेहमीच माझ्यासोबत असायचं”

सन १९२९ च्या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत अमेरिकेत साक्षकार्याची एक झंझावाती मोहीम राबवण्यात आली. या नऊ दिवसीय मोहिमेत दहा हजार पेक्षा जास्त प्रचारकांनी अमेरिकेच्या कानाकोपऱ्‍यात प्रचार केला. त्यांनी अडीच लाख पुस्तके व पुस्तिका लोकांना दिल्या. या राज्य प्रचारकांपैकी जवळजवळ एक हजार जण कॉलपोर्टर होते. त्यांच्या संख्येत किती आश्‍चर्यजनक वाढ झाली होती! १९२७ पासून १९२९ या दोन वर्षांत पायनियरांची संख्या तीनपट वाढली होती. ही वाढ “अविश्‍वसनीय” होती असे बुलेटीन * नावाच्या पत्रिकेत म्हणण्यात आले.

१९२९ या वर्षाच्या शेवटी सर्व जगावर आर्थिक संकट आले. मंगळवार, २९ ऑक्टोबर १९२९ या दिवशी न्यू यॉर्क स्टॉक एक्सचेंजच्या (शेअर बाजार) किमती धडाधड कोसळल्या आणि त्यामुळे जगाची आर्थिक स्थिती अचानक खालावली. त्या दिवसाला ब्लॅक ट्यूस्डे असे म्हणतात कारण त्या दिवशी झालेल्या या घटनेमुळे सर्व जगात महामंदी पसरली. हजारो बँकांचे दिवाळे निघाले. शेती उद्योग ठप्प पडले. मोठमोठाल्या फॅक्ट्रींना ताळे लागले. लाखो लोकांच्या नोकऱ्‍या गेल्या. गहाण ठेवण्यात आलेली घरे परत मिळवण्याचा हक्क सोडावा लागल्यामुळे, १९३३ साली अमेरिकेत दररोज जवळजवळ १,००० घरे सरकारच्या ताब्यात जात होती.

पूर्ण वेळेचे प्रचारक अशा कठीण परिस्थितीला कशा प्रकारे सामोरे जाणार होते? यावरील एक उपाय म्हणजे चालते-फिरते घर. कारचे किंवा मोठ्या वाहनाचे रूपांतर करून असे चालते-फिरते घर बनवता येत होते. यामुळे पायनियरांना त्यांची सेवा कमीत कमी खर्चात पूर्ण करणे शक्य झाले कारण या घरांचा टॅक्स भरावा लागत नव्हता, तसेच भाडेही. * शिवाय, अधिवेशनाच्या वेळी अशा घरांमुळे हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च वाचायचा. १९३४ साली बुलेटीन या पत्रिकेत अशा प्रकारची छोटी पण आरामदायी घरे कशी बनवायची याची आकृतींसह सविस्तर माहिती देण्यात आली होती. तसेच, या घरात पाणी, स्वयंपाक करण्यासाठी लागणारा स्टोव्ह, बंद करून ठेवता येणारा पलंग यांची व्यवस्था कशी करता येऊ शकते हेही त्यात सांगण्यात आले होते. इतकेच नाही तर हिवाळ्यात घर उबदार कसे ठेवता येईल तेदेखील सांगण्यात आले होते.

सबंध जगात अनेक प्रचारक कल्पकतेचा उपयोग करून आपापले चालते-फिरते घर बनवण्याच्या कामाला लागले. व्हिक्टर ब्लॅकवेल नावाचे एक बांधव असे म्हणतात: “नोहाला जहाज बांधण्याचा अनुभव नव्हता आणि मलासुद्धा हे चालतं-फिरतं घर कसं बनवायचं हे माहीत नव्हतं.” तरीसुद्धा या बांधवाने असे घर बनवले.

भारतात एका नदीकाठी, घरात रूपांतरित केलेली कार नावेतून नेण्याची तयारी करत असतानाचे पावसाळ्यातील एक दृश्‍य

एव्हरी आणि लोव्हीन्या ब्रिस्टो या पायनियर जोडप्याची एक कार होती ज्याचे रूपांतर त्यांनी एका घरात केले. एव्हरी म्हणायचे, की “कासवाच्या कवचासारखं माझं घर नेहमीच माझ्यासोबत असायचं.” ब्रिस्टो जोडप्याने हार्वी आणि ॲन कॉनरो यांच्यासोबत पायनियरिंग केली. या जोडप्याचेही चालते-फिरते घर होते ज्याच्या भिंती डांबर लावलेल्या पुठ्ठ्याने बनलेल्या होत्या. जेव्हा ते त्यांचे घर एका जागेहून दुसऱ्‍या जागी न्यायचे तेव्हा प्रत्येक वेळी त्या पुठ्ठ्याचे तुकडे पडायचे. एव्हरी म्हणतात, “कोणीही याअगोदर असं घर पाहिलं नव्हतं आणि त्यानंतरही तसं घर पाहायला मिळालं नाही!” पण एव्हरी पुढे म्हणतात, की कॉनरो दांपत्य आणि त्यांची दोन मुले हे “सर्वात आनंदी कुटुंब होतं.” हार्वी कॉनरोंनी लिहिले, की “आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी भासली नाही. यहोवाच्या सेवेत आणि त्याच्या प्रेमळ छत्रछायेत आम्हाला खूप सुरक्षित वाटायचं.” कॉनरो कुटुंबातील चौघांनाही गिलियड प्रशालेला उपस्थित राहण्याची संधी मिळाली आणि त्यांना पेरू या देशात मिशनरी म्हणून सेवा करण्याची नेमणूक मिळाली.

जूस्टो आणि व्हीन्चेंझा बाटायनो यांचे कुटुंबही पायनियरिंग करायचे. जेव्हा त्यांच्या लक्षात आले की त्यांना मूल होणार आहे तेव्हा त्यांनी त्यांच्या १९२९ मॉडल ए या फोर्ड कंपनीच्या ट्रकचे रूपांतर एका घरात केले. हे घर ते पूर्वी राहत असलेल्या तंबूंच्या तुलनेत “एखाद्या आलिशान हॉटेलप्रमाणे होते.” अमेरिकेत राहणाऱ्‍या इटॅलियन लोकांना प्रचार करण्याचे त्यांचे आवडते कार्य ते आपल्या लहान मुलीसोबत पुढेही करत राहिले.

अनेक जणांनी अगदी आनंदाने सुवार्ता ऐकली. पण गरीब व बेरोजगार असल्यामुळे बायबल प्रकाशनांसाठी ते क्वचितच दान द्यायचे. या प्रकाशनांच्या बदल्यात पैशांऐवजी ते निरनिराळ्या वस्तू द्यायचे. दोन पायनियर बहिणींनी त्यांना मिळालेल्या ६४ प्रकारच्या वस्तूंची यादी लिहून ठेवली होती. ती जणू काय “एखाद्या दुकानातील वस्तूंची यादी वाटायची.”

फ्रेड ॲन्डर्सन या बांधवाला एकदा एक शेतकरी भेटला ज्याला आपली पुस्तके हवी होती. पुस्तकांच्या बदल्यात त्याने एक चष्मा दिला जो पूर्वी त्याची आई वापरायची. शेजारच्या शेतमळ्यात त्या बांधवाला एक माणूस भेटला ज्याला आपली प्रकाशने वाचण्याची इच्छा तर होती पण त्याच्याजवळ ती वाचण्यासाठी चष्मा नव्हता. पण त्याच्या शेजाऱ्‍याच्या चष्म्याने त्याला वाचता येत होते आणि म्हणून त्या बांधवाने त्याला पुस्तके आणि तो चष्मा दिला. त्या माणसाने आनंदाने पुस्तकांसाठी आणि चष्म्यासाठी दान दिले.

हर्बर्ट ॲबट हे बांधव सहसा त्यांच्या कारमध्ये कोंबडीचे एक खुराडे ठेवायचे. कारण कधीकधी लोक प्रकाशनांच्या बदल्यात कोंबड्या द्यायचे. या बांधवाला तीन-चार कोंबड्या मिळाल्या की ते त्या बाजारात नेऊन विकायचे आणि त्यातून मिळणाऱ्‍या पैशाने आपल्या गाडीत इंधन भरायचे. त्यांनी असे लिहिले: “आमच्याजवळ काहीच पैसे उरले नाहीत असं कधी झालं का? हो, आमच्यावर अशी वेळ आली, पण त्यामुळं आम्ही आमची सेवा थांबवली नाही. गाडीत इंधन असल्यास, आम्ही यहोवावर भरवसा ठेऊन बाहेर पडायचो.”

त्या बिकट परिस्थितीत यहोवाचे लोक नेहमी त्याच्यावर विसंबून राहिले आणि त्याची सेवा करत राहण्याचा त्यांचा निर्धारही पक्का होता; यामुळेच त्या कठीण परिस्थितीचा ते सामना करू शकले. एकदा खूप जोरदार वादळ आले तेव्हा मॅक्सवेल आणि एम्मी लुईस हे सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यासाठी आपल्या गाडीतून बाहेर पडले. तेवढ्यात एक झाड कोसळून त्यांच्या गाडीवर पडले आणि त्यांच्या गाडीचे दोन तुकडे झाले. मॅक्सवेलने लिहिले, की “अशा घटना कधीच आमच्या मार्गातील अडथळा बनल्या नाहीत. त्या घटनांमुळे ही सेवा सोडून द्यायचा विचार कधीही आमच्या मनात आला नाही. साक्ष देण्याचं भरपूर काम बाकी होतं आणि ते काम करण्याची आमची इच्छा होती.” या घटनेनंतर घाबरून न जाता मॅक्सवेल आणि एम्मीने आपल्या प्रेमळ मित्रांच्या साहाय्याने त्यांचे चालते-फिरते घर पुन्हा बनवले.

सध्याच्या या बिकट काळातही यहोवाचे लाखो आवेशी साक्षीदार अशीच स्वत्यागाची भावना दाखवत आहेत. जोपर्यंत यहोवा म्हणत नाही की कार्य पूर्ण झाले आहे तोपर्यंत प्रचार करत राहण्याचा आपणही पूर्वीच्या त्या पायनियरांप्रमाणे निर्धार केला आहे.

^ आता या पत्रिकेला आपली राज्य सेवा असे म्हणतात.

^ त्या काळात बहुतेक पायनियर नोकरी करत नव्हते. त्यांना बायबल प्रकाशने कमी दरात मिळायची आणि ती क्षेत्रात दिल्यावर जे दान मिळायचे त्यावरच हे पायनियर साधेसे जीवन जगायचे.