व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

स्वतःला कनिष्ठ लेखण्यास शिका

स्वतःला कनिष्ठ लेखण्यास शिका

स्वतःला कनिष्ठ लेखण्यास शिका

“तुम्हा सर्वांमध्ये जो कनिष्ठ आहे तोच श्रेष्ठ आहे.” —लूक ९:४८.

तुम्ही उत्तरे शोधू शकता का?

स्वतःला कनिष्ठ लेखण्याची मनोवृत्ती उत्पन्‍न करण्यास कोणती गोष्ट आपली मदत करेल?

एक कनिष्ठ व्यक्‍ती कोणत्या अर्थाने “श्रेष्ठ” असते?

आपण विवाहामध्ये, मंडळीमध्ये व इतरांसोबतच्या आपल्या नातेसंबंधांमध्ये नम्रता कशी दाखवू शकतो?

१, २. येशूने आपल्या प्रेषितांना कोणता सल्ला दिला, आणि त्याने असे का केले?

 इसवी सन ३२ ची गोष्ट. येशू गालील प्रांतात असताना काही समस्या निर्माण झाल्या. त्याचे काही प्रेषित, आपल्यापैकी सर्वश्रेष्ठ कोण याविषयी वाद घालू लागले. शुभवर्तमान लेखक लूक लिहितो: “आपणामध्ये मोठा कोण ह्‍याविषयी त्यांचा आपसात वाद सुरू झाला. येशूने त्यांच्या अंतःकरणांतील विचार ओळखून एका बाळकाला घेतले आणि त्याला आपणाजवळ उभे केले; मग त्याने त्यांना म्हटले, जो कोणी ह्‍या बाळकाचा माझ्या नावाने स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो आणि जो कोणी माझा स्वीकार करतो तो ज्याने मला पाठविले त्याचा स्वीकार करतो; कारण तुम्हा सर्वांमध्ये जो कनिष्ठ आहे तोच श्रेष्ठ आहे.” (लूक ९:४६-४८) येशूने धीराने पण अगदी खंबीरपणे, नम्र असणे किती गरजेचे आहे हे पाहण्यास प्रेषितांना मदत केली.

स्वतःला कनिष्ठ लेखण्याचा येशूचा सल्ला, पहिल्या शतकातील यहुदी मूल्यांच्या एकवाक्यतेत होता का? की तो यहुद्यांच्या मनोवृत्तीपेक्षा वेगळा होता? त्या काळातील समाजाच्या परिस्थितीविषयी सांगताना थिऑलॉजिकल डिक्शनरी ऑफ द न्यू टेस्टामेंट असे म्हणते: “प्रत्येक गोष्टीत आपल्यात श्रेष्ठ कोण हा प्रश्‍न सारखा उद्‌भवायचा, आणि ज्याच्या त्याच्या पदानुसार त्याला मान देणे ही एक महत्त्वाची गोष्ट होती जी नेहमी चिंतेची बाब ठरायची.” येशूने आपल्या प्रेषितांना सर्वसाधारण लोकांपेक्षा वेगळे असण्याचा सल्ला दिला.

३. (क) स्वतःला कनिष्ठ लेखणे म्हणजे काय, आणि असे करणे कठीण का वाटू शकते? (ख) स्वतःला कनिष्ठ लेखण्याच्या बाबतीत कोणते प्रश्‍न उद्‌भवतात?

“कनिष्ठ” असे भाषांतर केलेल्या ग्रीक शब्दाचा अर्थ विनयशील, नम्र, दीन, साधारण किंवा मानमरातब नसलेला असा होतो. येशूने एका बालकाचा उपयोग करून आपल्या प्रेषितांना स्पष्टपणे सांगितले की त्यांनी नम्र आणि विनयशील असण्याची गरज आहे. हा सल्ला पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांप्रमाणेच आज आपल्यालासुद्धा लागू होतो. पण काही प्रसंगी, स्वतःला कनिष्ठ लेखणे आपल्याला कठीण वाटू शकते. मानवांमध्ये गर्विष्ठ असण्याची प्रवृत्ती असते जी त्यांना स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ लेखण्यास प्रवृत्त करू शकते. आज आपण एका स्पर्धात्मक वातावरणात राहत आहोत आणि या जगाचा आत्मा आपल्याला अहंकारी, भांडखोर किंवा कारस्थानी वृत्ती दाखवण्यास प्रभावित करू शकतो. तर मग स्वतःला कनिष्ठ लेखण्यास कोणती गोष्ट आपली मदत करेल? आपल्यामध्ये जो कनिष्ठ तो कशा प्रकारे श्रेष्ठ असतो? जीवनातील कोणत्या क्षेत्रांत आपण नम्र मनोवृत्ती दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे?

“अहाहा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे!”

४, ५. नम्रता उत्पन्‍न करण्यास कोणती गोष्ट आपल्याला प्रवृत्त करू शकते? उदाहरण द्या.

नम्रता उत्पन्‍न करण्याचा एक मार्ग म्हणजे आपल्या तुलनेत यहोवा किती महान आहे यावर विचार करणे. खरे पाहता, “त्याची बुद्धी अगम्य आहे.” (यश. ४०:२८) यहोवाच्या भव्यपणाच्या विशिष्ट पैलूंविषयी सांगताना प्रेषित पौलाने असे लिहिले: “अहाहा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे! त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत!” (रोम. ११:३३) पौलाने हे शब्द २,००० वर्षांपूर्वी लिहिले तेव्हापासून निरनिराळ्या गोष्टींविषयी मानवांचे ज्ञान वाढले असले, तरी हे शब्द आजही खरे आहेत. आपण नम्रपणे याची जाणीव ठेवली पाहिजे की आपल्याजवळ कितीही ज्ञान असले, तरीही यहोवाबद्दल, त्याच्या कार्यांबद्दल आणि त्याच्या मार्गांबद्दल अशा अगणित गोष्टी आहेत ज्या आपण शिकत राहू शकतो.

लेओ * याचे उदाहरण पाहू या. देवाचे मार्ग पूर्णपणे समजून घेणे आपल्या सामर्थ्यापलीकडे आहे याची जाणीव झाल्यामुळे त्याला स्वतःला कनिष्ठ लेखण्यास मदत मिळाली. लेओ तरुण होता तेव्हा त्याला विज्ञानाची फार आवड होती. त्याला सृष्टीविषयी जास्तीत जास्त जाणून घेण्याची उत्कट इच्छा होती म्हणून त्याने खगोलीय भौतिकशास्त्राचा अभ्यास केला आणि एका महत्त्वाच्या निष्कर्षावर पोहचला. तो म्हणतो: “या अभ्यासाद्वारे मला याची जाणीव झाली की केवळ सध्याचे विज्ञानाचे सिद्धांत मानवांना विश्‍वाची पूर्ण माहिती देऊ शकत नाहीत. म्हणून मी वकिली शिकू लागलो.” काही काळानंतर तो एक सरकारी वकील बनला. कालांतराने तो आणि त्याची पत्नी यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास करू लागले. त्यांनी सत्य स्वीकारले, आणि ते देवाचे समर्पित सेवक बनले. इतका शिकलेला असला तरी लेओ यास स्वतःला कनिष्ठ लेखण्यास कोणत्या गोष्टीमुळे मदत मिळाली? तो निःसंकोचपणे उत्तर देतो: “मला याची जाणीव आहे की आपण यहोवाविषयी व या विश्‍वाविषयी कितीही शिकलो तरी आपल्याला आणखी बऱ्‍याच गोष्टी शिकायच्या आहेत.”

६, ७. (क) नम्रतेच्या बाबतीत यहोवाने कोणते अद्‌भुत उदाहरण मांडले आहे? (ख) देवाच्या लीनतेमुळे एक व्यक्‍ती कशा प्रकारे “श्रेष्ठ” बनते?

यहोवा स्वतः नम्रता प्रदर्शित करतो. ही आणखी एक गोष्ट आहे जी आपल्याला नम्र राहण्यास मदत करते. जरा विचार करा, आपण “देवाचे सहकारी आहो.” (१ करिंथ. ३:९) केवढा मोठा विशेषाधिकार! सबंध विश्‍वात सर्वात श्रेष्ठ असूनही, यहोवाने आपल्याला सन्मानित केले आहे. त्याच्या वचनाचा वापर करण्याद्वारे आपले सेवाकार्य पूर्ण करण्याची सुसंधी त्याने आपल्याला दिली आहे. आपण बी पेरतो व पाणी घालतो, पण वाढवणारा हा यहोवाच आहे. तरीसुद्धा, त्याच्यासोबत मिळून कार्य करण्याचा बहुमान त्याने आपल्याला दिला आहे. (१ करिंथ. ३:६, ७) नम्रतेच्या बाबतीत देवाने दाखवलेले हे उदाहरण खरोखरच अद्‌भुत आहे! त्याच्या उदाहरणातून आपल्या प्रत्येकाला स्वतःस कनिष्ठ लेखण्याचे खूप प्रोत्साहन मिळाले पाहिजे.

देवाने दाखवलेल्या नम्रतेचा स्तोत्रकर्त्या दाविदावर जबरदस्त प्रभाव पडला. त्याने एका गीतात यहोवाला असे म्हटले: “तू मला आपले तारणरूप कवच दिले आहे. तुझ्या लीनतेमुळे मला थोरवी प्राप्त झाली आहे.” (२ शमु. २२:३६) यहोवाच्या नम्रतेमुळेच, अर्थात यहोवाने खाली वाकून किंवा स्वतःला नम्र करून दाविदाकडे लक्ष दिल्यामुळेच त्याला इस्राएलमध्ये थोरवी मिळाली होती हे त्याने ओळखले. (स्तो. ११३:५-७) आपल्या बाबतीत काय? आपल्याजवळ जे काही चांगले गुण, क्षमता आणि विशेषाधिकार आहेत ते आपल्याला यहोवानेच “दिलेले” नाहीत का? (१ करिंथ. ४:७) स्वतःला कनिष्ठ लेखणारा “श्रेष्ठ” बनतो तो या अर्थाने की तो यहोवाचा सेवक या नात्याने आणखी मौल्यवान बनतो. (लूक ९:४८) असे का म्हणता येईल ते पाहू या.

“तुम्हा सर्वांमध्ये जो कनिष्ठ आहे तोच श्रेष्ठ आहे”

८. नम्रतेमुळे यहोवाच्या संघटनेप्रती असलेल्या आपल्या दृष्टिकोनावर कसा प्रभाव पडू शकतो?

देवाच्या ईश्‍वरशासित संघटनेत समाधानी असण्यासाठी आणि मंडळीतील व्यवस्थेला पाठिंबा देण्यासाठी आपल्यात नम्रता असणे खूप महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, पेट्रा या तरुणीचा विचार करा, जी एका साक्षीदार कुटुंबात लहानाची मोठी झाली होती. तिला तिच्या हिशोबाने जीवन जगायचे होते म्हणून तिने सभांना उपस्थित राहण्याचे बंद केले. काही वर्षांनंतर, ती पुन्हा सभांना येऊ लागली. आता तिला यहोवाच्या संघटनेत असल्याबद्दल आनंद होतो आणि मंडळीच्या व्यवस्थेला सहकार्य देण्यास ती उत्सुक असते. हे परिवर्तन कसे काय घडून आले? ती म्हणते: “देवाच्या संघटनेत आनंदी राहण्यासाठी मला नम्रता व विनयशीलता या दोन सर्वात महत्त्वपूर्ण गुणांचे मोल जाणून घेणे आणि ते उत्पन्‍न करणे गरजेचे होते.”

९. यहोवाकडून मिळणाऱ्‍या आध्यात्मिक अन्‍नाकडे एक नम्र व्यक्‍ती कोणत्या दृष्टिकोनातून पाहते, आणि असे करण्याद्वारे ती इतकी मौल्यवान का ठरते?

एक नम्र व्यक्‍ती यहोवाने केलेल्या तरतुदींबद्दल, सोबतच आध्यात्मिक अन्‍नाबद्दल मनःपूर्वक आदर बाळगते. अशी व्यक्‍ती बायबलचा प्रामाणिक विद्यार्थी असते आणि टेहळणी बुरूज नियतकालिकाचे वाचन करण्यास उत्सुक असते. यहोवाचे बरेच विश्‍वासू सेवक, नवीन प्रकाशने आपल्या वैयक्‍तिक लायब्ररीमध्ये ठेवून देण्याआधी ती वाचून काढतात. बायबल आधारित प्रकाशनांचे वाचन व अभ्यास करण्याद्वारे आपण नम्र व कृतज्ञ मनोवृत्ती दाखवल्यास आपल्याला आध्यात्मिक प्रगती करता येईल, आणि यहोवा त्याच्या सेवेकरता आपला जास्तीत जास्त वापर करू शकेल.—इब्री ५:१३, १४.

१०. आपण मंडळीमध्ये स्वतःला कनिष्ठ लेखण्याची मनोवृत्ती कशी दाखवू शकतो?

१० जो स्वतःला कनिष्ठ लेखतो तो आणखी एका मार्गाने “श्रेष्ठ” ठरतो. प्रत्येक मंडळीत, यहोवाच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली, पात्र असलेल्या पुरुषांना वडील म्हणून सेवा करण्यास नियुक्‍त केले जाते. ते आध्यात्मिक गोष्टींची, उदाहरणार्थ मंडळीतल्या सभांची, क्षेत्र सेवेची आणि मेंढपाळ भेटींची व्यवस्था करतात. आपण स्वतःला कनिष्ठ लेखून या व्यवस्थांना पूर्ण मनाने पाठिंबा देतो, तेव्हा आपण मंडळीतील आनंद, शांती व एकता वाढण्यास साहाय्य करतो. (इब्री लोकांस १३:७, १७ वाचा.) तुम्ही एक वडील किंवा सेवा सेवक म्हणून कार्य करत असाल, तर तुमच्यावर सोपवण्यात आलेल्या या सुहक्काबद्दल तुम्ही नम्रपणे यहोवाचे आभार मानता का?

११, १२. आपण कोणत्या मनोवृत्तीमुळे देवाच्या संघटनेत आणखी मौल्यवान बनतो, आणि असे का म्हणता येईल?

११ स्वतःला कनिष्ठ लेखणारी व्यक्‍ती “श्रेष्ठ” किंवा यहोवाच्या संघटनेत आणखी मौल्यवान बनते, कारण तिच्या नम्रतेमुळे ती देवाची एक चांगली आणि उपयोगी सेवक बनते. येशूला आपल्या शिष्यांना स्वतःस कनिष्ठ लेखण्याची मनोवृत्ती जोपासण्याचा सल्ला द्यावा लागला कारण त्यांच्यापैकी काही जणांवर त्या काळातील मनोवृत्तीचा प्रभाव पडला होता. लूक ९:४६ म्हणते: “आपणामध्ये मोठा कोण ह्‍याविषयी त्यांचा आपसात वाद सुरू झाला.” काही गोष्टींत आपण आपल्या सहविश्‍वासू बंधुभगिनींपेक्षा चांगले आहोत किंवा सर्वसाधारण लोकांपेक्षा श्रेष्ठ आहोत असा आपणही विचार करण्याची शक्यता आहे का? आपल्या अवतीभोवती असलेले बहुतेक लोक गर्विष्ठ व स्वार्थी आहेत. पण आपण नम्रता दाखवून स्वतःला जगातील गर्विष्ठ लोकांपासून दूर ठेवले पाहिजे. जेव्हा आपण असे करतो आणि यहोवाची इच्छा पूर्ण करण्यास प्राधान्य देतो तेव्हा आपण आपल्या बंधुभगिनींसाठी चांगले सहकारी ठरतो.

१२ स्वतःला कनिष्ठ लेखण्याचा येशूने दिलेला सल्ला खरोखरच उत्तेजन देणारा आहे. तर मग, आपण जीवनातील सर्व पैलूंत स्वतःला कनिष्ठ लेखण्याची मनोवृत्ती दाखवण्याचा प्रयत्न करू नये का? आता आपण त्यांपैकी तीन पैलूंकडे खास लक्ष देऊ या.

स्वतःला कनिष्ठ लेखण्याचा प्रयत्न करा

१३, १४. पती व पत्नीने कशा प्रकारे स्वतःला कनिष्ठ लेखले पाहिजे, आणि याचा त्यांच्या विवाहावर कसा परिणाम पडू शकतो?

१३ विवाहामध्ये. आज पुष्कळ लोक आपले वैयक्‍तिक हक्क मिळालेच पाहिजेत असा अट्टहास करतात, मग त्यासाठी दुसऱ्‍यांचे हक्क पायदळी तुडवावे लागले तरीही. पण, स्वतःला कनिष्ठ लेखणारी व्यक्‍ती पौलाने दिलेल्या सल्याचे पालन करण्याचा प्रयत्न करते. रोमी ख्रिश्‍चनांना त्याने असे लिहिले: “शांतीला व परस्परांच्या बुद्धीला पोषक होणाऱ्‍या गोष्टींच्या मागे आपण लागावे.” (रोम. १४:१९) स्वतःला कनिष्ठ लेखणारी व्यक्‍ती सर्वांशी आणि खासकरून आपल्या प्रिय विवाह सोबत्याशी शांतीने राहण्याचा प्रयत्न करते.

१४ मनोरंजनाविषयी विचार करा. करमणुकीच्या बाबतीत जोडप्यांची निवड वेगवेगळी असू शकते. पतीला कदाचित फावल्या वेळात आरामशीर घरी बसून पुस्तक वाचायला आवडत असेल. दुसरीकडे पाहता, पत्नीला बाहेर जेवायला जायला किंवा मित्र-मैत्रिणींना भेटी द्यायला आवडत असेल. एक पत्नी जेव्हा पाहते की तिचा पती नम्र मनोवृत्ती दाखवून, फक्‍त स्वतःच्या आवडीनिवडींचा विचार करण्याऐवजी तिच्याही आवडीनिवडींचा प्रामाणिकपणे विचार करतो, तेव्हा अशा पत्नीला आपल्या पतीचा आदर करणे सोपे जाणार नाही का? पती जेव्हा पाहील की त्याची पत्नी स्वतःच्याच इच्छांवर अडून न राहता त्याला आवडणाऱ्‍या गोष्टींचाही विचार करते, तेव्हा तिच्याबद्दल असलेले त्याचे प्रेम व कदर आणखी वाढणार नाही का? विवाहसोबती स्वतःला कनिष्ठ लेखतात तेव्हा विवाहबंधन आणखी मजबूत होते.—फिलिप्पैकर २:१-४ वाचा.

१५, १६. स्तोत्र १३१ मध्ये दाविदाने कोणती मनोवृत्ती दाखवण्याचा सल्ला दिला, आणि याचा मंडळीमध्ये आपल्या वागणुकीवर कसा प्रभाव पडला पाहिजे?

१५ मंडळीमध्ये. आपल्याला जे काही हवे आहे ते ताबडतोब मिळवायच्या उद्देशानेच आज बरेच लोक जीवन जगतात. अशा लोकांजवळ धीर नसतो, एखाद्या गोष्टीसाठी वाट पाहणे त्यांच्यासाठी जणू परीक्षा असते. पण स्वतःला कनिष्ठ लेखण्याची मनोवृत्ती उत्पन्‍न केल्यामुळे आपल्याला यहोवावर भरवसा ठेवून धीर धरण्यास मदत मिळते. (स्तोत्र १३१:१-३ वाचा.) नम्र असण्याचा व यहोवावर भरवसा ठेवण्याचा फायदा म्हणजे यामुळे सुरक्षा, आशीर्वाद, शांती व समाधान लाभते. म्हणूनच, तर दाविदाने सहइस्राएलांना यहोवावर भरवसा ठेवून धीर धरण्याचे प्रोत्साहन दिले.

१६ तुम्ही यहोवावर भरवसा ठेवून धीर धरला तर तुम्हालाही अशा सांत्वनाचा अनुभव घेता येईल. (स्तो. ४२:५) कदाचित तुम्ही “चांगल्या कामाची आकांक्षा” धरत असाल आणि पर्यवेक्षकाची जबाबदारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असाल. (१ तीम. ३:१-७) पण यासोबतच, पर्यवेक्षकाची जबाबदारी पार पाडण्यासाठी जरुरी असलेले गुण पवित्र आत्म्याने तुमच्यात उत्पन्‍न करावेत म्हणून तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. पण ही जबाबदारी मिळायला दुसऱ्‍यांच्या तुलनेत तुम्हाला जास्त वेळ लागल्यास काय? स्वतःला कनिष्ठ लेखणारी जी व्यक्‍ती सुहक्क मिळवण्यासाठी धीराने वाट पाहते, ती यहोवाची सेवा आनंदाने करते व मिळालेल्या कोणत्याही नेमणुकीत समाधान मानते.

१७, १८. (क) आपण क्षमा मागतो आणि क्षमा करण्यास तयार असतो तेव्हा काय फायदा होतो? (ख) नीतिसूत्रे ६:१-५ मध्ये कोणता सल्ला देण्यात आला आहे?

१७ इतरांसोबतच्या नातेसंबंधांमध्ये. बहुतेक लोकांना क्षमा मागणे कठीण वाटते. पण चुका कबूल करण्याद्वारे व माफी मागण्याद्वारे देवाचे सेवक स्वतःला कनिष्ठ लेखण्याची मनोवृत्ती उत्पन्‍न करू शकतात. तसेच इतरांकडून झालेल्या चुकांची क्षमा करण्यासही ते तयार असतात. अहंकारी व्यक्‍तीमुळे मतभेद व भांडणे होतात, पण दुसरीकडे पाहता क्षमाशील असल्यामुळे मंडळीच्या शांतीला हातभार लागतो.

१८ आपण एखाद्या व्यक्‍तीसोबत करार केला असेल. पण, आता परिस्थिती आपल्या हातात नसल्यामुळे, केलेला करार पूर्ण करणे आपल्याला शक्य नसेल. अशा वेळी आपण नम्र होऊन त्या व्यक्‍तीला प्रामाणिकपणे क्षमा मागितली पाहिजे. यात काही प्रमाणात दुसऱ्‍या व्यक्‍तीचा दोष असला, तरी एक नम्र ख्रिस्ती व्यक्‍ती दुसऱ्‍यांच्या चुकांकडे लक्ष देण्याऐवजी स्वतःच्या चुकांकडे लक्ष देते आणि त्या कबूल करण्यास तयार असते.—नीतिसूत्रे ६:१-५ वाचा.

१९. स्वतःला कनिष्ठ लेखण्याची मनोवृत्ती उत्पन्‍न करण्याच्या बायबलच्या सल्ल्याबद्दल प्रत्येकाने आभारी का असले पाहिजे?

१९ स्वतःला कनिष्ठ लेखण्याची मनोवृत्ती उत्पन्‍न करण्याच्या बायबलमधील प्रोत्साहनासाठी आपण किती आभारी आहोत! अशी मनोवृत्ती विकसित करणे केव्हाकेव्हा आपल्याला कठीण वाटू शकते. पण आपल्या निर्माणकर्त्याच्या तुलनेत आपल्या स्थानाबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगल्यामुळे आणि त्याच्या नम्रतेची कदर केल्यामुळे हा उत्तम गुण उत्पन्‍न करण्याची आपल्याला प्रेरणा मिळेल. असे केल्यामुळे आपण नक्कीच यहोवाचे आणखी मौल्यवान सेवक ठरू. तर मग, आपण प्रत्येक जण स्वतःला कनिष्ठ लेखू या.

[तळटीप]

^ परि. 5 काही नावे बदलण्यात आली आहेत.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१६ पानांवरील चित्र]

सुवार्तेचा प्रचार करण्याचा सुहक्क देऊन यहोवाने आपल्याला सन्मानित केले आहे

[१९ पानांवरील चित्रे]

स्वतःला कनिष्ठ लेखण्याच्या कोणकोणत्या संधी तुम्हाला उपलब्ध आहेत?