व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबलचं वाचन केल्यामुळे मला आयुष्यभर बळ मिळत राहिलं

बायबलचं वाचन केल्यामुळे मला आयुष्यभर बळ मिळत राहिलं

बायबलचं वाचन केल्यामुळे मला आयुष्यभर बळ मिळत राहिलं

मॉरसो लर्वा यांच्याद्वारे कथित

“प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्‍न केली,” मी गुप्तपणे माझ्या खोलीत वाचू लागलो. पण, मी गुप्तपणे का वाचत होतो? कारण माझे बाबा एक कट्टर नास्तिक होते आणि माझ्या हातात असलेलं पुस्तक अर्थात बायबल पाहून ते नक्कीच संतापले असते.

मी याआधी कधीच बायबल वाचलं नव्हतं, आणि उत्पत्ति पुस्तकातील ते सुरुवातीचे शब्द वाचून मी आश्‍चर्यचकित झालो. मी विचार केला, ‘भौतिक नियमांची सुसंगतता पाहून मी नेहमी थक्क व्हायचो; हेच त्याचं स्पष्टीकरण आहे!’ मी इतका प्रभावित झालो की रात्री आठ वाजेपासून पहाटे चार वाजेपर्यंत मी वाचत राहिलो. अशा रीतीनं देवाच्या वचनाचं वाचन करण्याची मला सवय लागली. बायबलचं वाचन केल्यामुळे मला कशा प्रकारे आयुष्यभर बळ मिळत राहिलं ते मी तुम्हाला सांगू इच्छितो.

“तुला ते रोज वाचावं लागेल”

माझा जन्म १९२६ मध्ये, फ्रान्सच्या उत्तरेला कोळशाच्या खाणी असलेल्या वेर्मेल नावाच्या गावात झाला होता. दुसऱ्‍या विश्‍वयुद्धादरम्यान, कोळशाला राष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले होते. मी कोळशाच्या खाणीत काम करत असल्यामुळे, मला सैन्यात भरती होण्यापासून सूट मिळाली होती. तरीसुद्धा, माझं जीवनमान सुधारण्यासाठी मी रेडिओ व विद्युत या विषयांचा अभ्यास करू लागलो. भौतिक नियम कशा प्रकारे सुसंगतपणे कार्य करतात हे मला या अभ्यासावरून शिकायला मिळालं. मी २१ वर्षांचा होतो तेव्हा माझ्या एका वर्गमित्रानं मला बायबलची एक प्रत दिली. हेच माझं पहिलं बायबल होतं. त्यानं म्हटलं: “प्रत्येकानं वाचलंच पाहिजे असं हे पुस्तक आहे.” बायबलचं वाचन पूर्ण होईपर्यंत माझी खातरी पटली होती, की बायबल हे देवानं मानवांना प्रकट केलेलं त्याचं वचन आहे.

आमच्या शेजाऱ्‍यांनादेखील बायबल वाचायला आवडेल असा विचार करून मी बायबलच्या आठ प्रती मिळवल्या. पण, आश्‍चर्य म्हणजे त्यांनी माझी थट्टा आणि विरोध केला. माझ्या अंधश्रद्धाळू नातेवाइकांनी मला अशी ताकीद दिली, “एकदा का तू हे पुस्तक वाचायला सुरू केलं, तर तुला ते रोज वाचावं लागेल!” हो, मी दररोज बायबल वाचू लागलो, आणि त्याचा मला कधीही पस्तावा झाला नाही. बायबलचं वाचन करण्याची मला सवयच लागली.

मला बायबलविषयी आवड आहे हे पाहून आमचे काही शेजारी, त्यांना मिळालेली यहोवाच्या साक्षीदारांची प्रकाशनं मला द्यायचे. एक जग, एक सरकार * (फ्रेंच भाषेत दाखवलेले) यांसारख्या पुस्तिकांमध्ये मानवजातीची एकमात्र आशा म्हणून बायबल देवाच्या राज्याकडे का लक्ष वेधते हे स्पष्ट करण्यात आलं होतं. (मत्त. ६:१०) या आशेबद्दल इतरांना सांगण्याचा माझा निश्‍चय आणखी दृढ झाला.

माझ्याकडून बायबलची प्रत स्वीकारणारा सर्वात पहिला होता माझा बालपणचा मित्र नॉएल. तो कॅथलिक धर्माचं पालन करणारा होता आणि त्यानं अशा एका माणसासोबत भेटण्याची आमची व्यवस्था केली जो पाळक बनण्यासाठी शिक्षण घेत होता. मला भीती वाटली, पण स्तोत्र ११५:४-८ आणि मत्तय २३:९, १० या वचनांचं वाचन केल्यामुळे मला माहीत होतं की उपासनेत मूर्तींचा वापर करणं व पाळकांना धार्मिक पदव्यांनी संबोधणं देवाला स्वीकृत नाही. यामुळे मला माझ्या नवीन विश्‍वासाचं समर्थन करण्याचं धैर्य मिळालं. परिणामी, नॉएलनं सत्याचा स्वीकार केला आणि आजपर्यंत तो यहोवाचा एक विश्‍वासू साक्षीदार आहे.

मी माझ्या बहिणीच्या घरीदेखील गेलो. माझ्या भावजींकडे भूतविद्येशी संबंधित पुस्तकं होती आणि त्यांना दुष्टात्मे छळत होते. सुरुवातीला मला फार दुर्बळ वाटलं, पण इब्री लोकांस १:१४ यांसारख्या वचनांवरून मला खातरी पटली की मला यहोवाच्या देवदूतांचा आधार आहे. जेव्हा माझ्या भावजींनी जीवनात बायबलची तत्त्वं लागू केली आणि भूतविद्येशी संबंधित असलेली प्रत्येक वस्तू फेकून दिली, तेव्हा ते दुष्टात्म्यांच्या प्रभावापासून मुक्‍त झाले. माझी बहीण व भावजी दोघंही आवेशी साक्षीदार बनले.

सन १९४७ मध्ये आर्थर एमयॉट नावाचा एक अमेरिकी साक्षीदार मला भेटायला माझ्या घरी आला. त्याला भेटून मला खूप आनंद झाला. साक्षीदारांच्या सभा कुठं भरतात हे मी त्याला विचारलं. सुमारे १० किलोमीटर दूर असलेल्या ल्येवेनमध्ये एक गट असल्याचं त्यानं मला सांगितलं. त्या काळात सायकली विकत घेणं खूप कठीण होतं. म्हणून कित्येक महिने मी पायीच सभांना ये-जा करायचो. फ्रान्समध्ये यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यावर आठ वर्षांपूर्वी बंदी घालण्यात आली होती. संपूर्ण देशात केवळ २,३८० साक्षीदार होते. त्यांपैकी बरेच जण मूळचे पोलंडचे रहिवाशी होते. पण, १ सप्टेंबर १९४७ रोजी फ्रान्समध्ये आपल्या कार्याला पुन्हा एकदा कायद्यानं मान्यता मिळाली. पॅरीसमधील विल्ला गीबेर इथं एका शाखा कार्यालयाची पुनःस्थापना करण्यात आली. त्या वेळी फ्रान्समध्ये एकही पायनियर नसल्यामुळे, डिसेंबर १९४७ च्या इनफॉर्मंटच्या (आता आमची राज्य सेवा) अंकात, बांधवांना सामान्य पायनियरिंग करण्याचं आवाहन करण्यात आलं. या सामान्य पायनियरांना दर महिन्याला १५० तास प्रचार करावे लागणार होते. (१९४९ मध्ये हे तास १५० वरून १०० करण्यात आले.) योहान १७:१७ मध्ये येशूनं म्हटलं होतं: “[देवाचे] वचन हेच सत्य आहे.” या शब्दांच्या पूर्ण सामंजस्यात मी १९४८ मध्ये बाप्तिस्मा घेतला आणि १९४९ च्या डिसेंबर महिन्यात पायनियर सेवा सुरू केली.

तुरुंगातून परत डन्कर्कमध्ये

मला सुरुवातीला फ्रान्सच्या दक्षिण भागातील ऑझेनमध्ये सेवा करण्यास नियुक्‍त करण्यात आलं. पण, तिथं मी जास्त काळ सेवा करू शकलो नाही. मी कोळशाच्या खाणीत काम करत नसल्यामुळे, मला सैन्यात भरती होणं भाग होतं. पण, मी सैन्यात भरती होण्यास नकार दिला, तेव्हा मला तुरुंगात पाठवण्यात आलं. तिथं मला स्वतःजवळ बायबल बाळगण्याची परवानगी नव्हती; तरीसुद्धा, स्तोत्रसंहिता पुस्तकातील काही पानं मी मिळवू शकलो. ती स्तोत्रं वाचून मला प्रोत्साहन मिळालं. तुरुंगातून सुटल्यानंतर मला एक निर्णय घ्यायचा होता: एखादी नोकरी शोधून आरामदायक जीवन जगावं, की पूर्ण वेळची सेवा करावी? या वेळीसुद्धा, बायबलमधून वाचलेल्या गोष्टींची मला मदत झाली. मी फिलिप्पैकर ४:११-१३ मध्ये असलेल्या पौलाच्या शब्दांवर मनन केलं: “मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्‍तिमान आहे.” मी पायनियर सेवा करत राहण्याचा निर्धार केला. १९५० मध्ये मला एक नवीन नेमणूक मिळाली. मला डन्कर्कमध्ये सेवा करण्यास पाठवण्यात आलं, जिथं मी याआधी प्रचार कार्य केलं होतं.

मी तिथं पोहचलो तेव्हा माझ्याजवळ काहीच नव्हतं. या शहराचं दुसऱ्‍या विश्‍वयुद्धादरम्यान भारी नुकसान झालं होतं, आणि राहण्यासाठी जागा शोधणं खूप कठीण होतं. मी पूर्वी ज्या कुटुंबाला भेट द्यायचो त्यांच्याकडे जाण्याचं ठरवलं, आणि मला पाहून घरमालकिणीला खूप आनंद झाला: “अरे! मिस्टर लर्वा, त्यांनी तुम्हाला तुरुंगातून सोडलं! माझे पती म्हणतात की जर तुमच्यासारखे आणखी लोक असते, तर युद्ध कधीच झालं नसतं.” त्यांच्याकडे पाहुण्यांच्या राहण्याकरता एक खोली होती. म्हणून पर्यटकांचा हंगाम सुरू होईपर्यंत त्यांनी मला तिथं राहू दिलं. त्याच दिवशी, आर्थर एमयॉट यांचा भाऊ एवान्झ यांनी मला एक काम दिलं. * ते बंदरावर दुभाष्याचं काम करायचे. रात्रीच्या वेळी एका जहाजाची रखवाली करण्यासाठी त्यांना एक जण हवा होता. त्यांनी माझी भेट जहाजाच्या एका अधिकाऱ्‍याशी करून दिली. मी तुरुंगात होतो त्यामुळे मी काडीसारखा बारीक झालो होतो. मी इतका अशक्‍त का आहे हे एवान्झनं त्या अधिकाऱ्‍याला सांगितलं तेव्हा त्यानं मला फ्रिजमधील अन्‍न खाण्यास सांगितलं. त्या एकाच दिवशी माझ्या राहण्याची, कामाची आणि जेवणाची व्यवस्था झाली! मत्तय ६:२५-३३ मध्ये असलेल्या येशूच्या शब्दांवरील माझा भरवसा आणखी दृढ झाला.

पर्यटकांचा हंगाम सुरू झाल्यानंतर, मला व माझा पायनियर साथीदार सीमोन ऑपॉलीनॉर्स्कीला दुसरीकडं राहण्याची सोय करावी लागली. पण, आम्ही आमच्या नेमणुकीत टिकून राहण्याचं ठरवलं होतं. आमच्या राहण्याची सोय घोड्यांच्या एका जुन्या तबेल्यात झाली. तिथं आम्ही गवताच्या गादीवर झोपायचो. आम्ही पूर्ण दिवस सेवेत घालवायचो. आम्ही त्या तबेल्याच्या मालकाला साक्ष दिली आणि सत्य स्वीकारणाऱ्‍या अनेकांपैकी तोदेखील एक बनला. काही काळातच स्थानिक वर्तमानपत्रात एक लेख आला. “या भागात यहोवाच्या साक्षीदारांचं कार्य जोरात सुरू आहे,” असा इशारा त्या लेखाद्वारे डन्कर्कच्या रहिवाशांना देण्यात आला. पण, खरंतर त्या भागात केवळ मी, सीमोन आणि इतर मूठभर प्रचारक इतकेच साक्षीदार होतो! आमच्यापुढे समस्या आल्या, तेव्हा आपल्या ख्रिस्ती आशेवर आणि यहोवानं कशा प्रकारे आमची काळजी घेतली होती यावर मनन केल्यानं आम्हाला प्रोत्साहन मिळालं. १९५२ मध्ये मला दुसरी नेमणूक मिळाली, तेव्हा डन्कर्कमध्ये ३० नियमित प्रचारक होते.

नव्या जबाबदाऱ्‍या हाताळण्यासाठी बळ मिळालं

आमयेन शहरात काही काळ सेवा केल्यानंतर, मला एक खास पायनियर म्हणून सेवा करण्यासाठी पॅरीसमधील बूलोन-बीलांकूर नावाच्या उपनगरात नेमण्यात आलं. मी कितीतरी लोकांसोबत बायबल अभ्यास चालवायचो. त्यांच्यापैकी काहींनी नंतर पूर्ण वेळची सेवा आणि मिशनरी सेवा हाती घेतली. गी मॉबीलॉ नावाच्या एका तरुणानं सत्य स्वीकारलं आणि पुढं त्यानं विभागीय पर्यवेक्षक आणि नंतर प्रांतीय पर्यवेक्षक या नात्यानं सेवा केली. त्यानंतर त्यानं, लूवीये या ठिकाणी सध्या असलेल्या बेथेलमधील छापखान्याच्या बांधकामाची देखरेख केली. हे ठिकाण पॅरीसपासून काही अंतरावर आहे. सेवाकार्यात वारंवार बायबलवर चर्चा केल्यानं माझ्या मनात देवाचं वचन आणखी बिंबवलं गेलं, आणि यामुळे माझा आनंद द्विगुणित झाला व माझी शिकवण्याची कला आणखी सुधारली.

त्यानंतर, १९५३ मध्ये अचानक, मला अलसास-लरेन या भागात विभागीय पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आलं. १८७१ ते १९४५ या काळादरम्यान जर्मनीनं दोनदा हा भाग हस्तगत केला होता. त्यामुळे, मला थोडीफार जर्मन भाषा शिकावी लागली. मी विभागीय कार्य सुरू केलं तेव्हा त्या भागात केवळ मोजक्याच मोटारगाड्या, टीव्ही किंवा टाईपरायटर होते आणि ट्रान्सिस्टर रेडिओ किंवा पर्सनल कंप्यूटर तर मुळीच नव्हते. पण, मी दुःखी नव्हतो किंवा माझं जीवन नीरसही नव्हतं. उलट, माझ्यासाठी तो अत्यंत आनंदाचा काळ होता. आज यहोवाच्या सेवेपासून आपलं लक्ष विकर्षित करणाऱ्‍या अनेक गोष्टी आहेत तशा त्या काळी नव्हत्या. त्यामुळे आपला “डोळा निर्दोष” ठेवण्याविषयी बायबलमधील सल्ल्याचं पालन करणं सोपं होतं.—मत्त. ६:१९-२२.

सन १९५५ मध्ये पॅरीस शहरात भरलेलं “विजयी राज्य” संमेलन माझ्याकरता एक अविस्मरणीय प्रसंग होता. त्या अधिवेशनात मला माझी भावी पत्नी ईरेन कोलान्सकी भेटली. मी पूर्ण वेळची सेवा सुरू केली होती त्याच्या एका वर्षाआधी तिनं पूर्ण वेळची सेवा सुरू केली होती. तिचे आईबाबा मूळचे पोलंडचे असून ते दीर्घकाळापासून आवेशी साक्षीदार होते. फ्रान्समध्ये त्यांना पहिल्यांदा आडॉल्फ वेबेरनं भेट दिली होती. आडॉल्फ वेबेर हे बंधू रस्सल यांचे माळी होते आणि सुवार्तेची घोषणा करण्यासाठी ते युरोपमध्ये आले होते. १९५६ मध्ये माझं व ईरेनचं लग्न झालं, आणि ती माझ्यासोबत विभागीय सेवा करू लागली. या संबंध काळादरम्यान तिनं मला नेहमी साथ दिली!

याच्या दोन वर्षांनंतर, आणखी एक अनपेक्षित गोष्ट घडली. मला प्रांतीय पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आलं. पण, पुरेसे कार्यक्षम बांधव नसल्यामुळे मी अजूनही एक विभागीय पर्यवेक्षक म्हणून मंडळ्यांना भेटी देत होतो. तो खरोखर किती व्यस्त काळ होता! दर महिन्याला १०० तास प्रचार करण्यासोबतच मला प्रत्येक आठवडी भाषणं द्यावी लागायची, तीन पुस्तक अभ्यास गटांना भेटी द्याव्या लागायच्या, मंडळीचे अहवाल तपासावे लागायचे आणि लेखी अहवाल तयार करावे लागायचे. हे सर्व करत असताना देवाचं वचन वाचण्यासाठी वेळ काढणं मला कसं शक्य झालं? मी एक उपाय शोधून काढला. मी एका जुन्या बायबलची पानं फाडून काढली आणि त्यातली काही माझ्याजवळ ठेवली. मला एखाद्याची वाट पाहावी लागत असे तेव्हा मी ती वाचायचो. मला आध्यात्मिक तजेला देणाऱ्‍या त्या छोट्या-छोट्या क्षणांमुळे माझ्या नेमणुकीत टिकून राहण्याचा माझा निर्धार आणखी दृढ झाला.

सन १९६७ मध्ये मला व ईरेनला, बूलोन-बीलांकूरमधील बेथेल कुटुंबाचे स्थायी सदस्य होण्याचं निमंत्रण देण्यात आलं. बेथेलमध्ये मी सेवा विभागात काम सुरू केलं आणि आज ४० पेक्षा जास्त वर्षांनंतरही मला त्या विभागात काम करण्याचा सुहक्क आहे. माझ्या कामाचा एक आनंददायक पैलू म्हणजे बायबलविषयी प्रश्‍न विचारणाऱ्‍या पत्रांची उत्तरं देणं. देवाच्या वचनाचा सखोल अभ्यास करणं आणि ‘सुवार्तेचं समर्थन’ करणं यांत मला अतिशय आनंद होतो. (फिलिप्पै. १:७) बेथेलमध्ये न्याहारीच्या आधी होणाऱ्‍या सकाळच्या उपासनेत बायबल चर्चा चालवण्यातदेखील मला खूप आनंद होतो. १९७६ मध्ये मला फ्रान्सच्या शाखा समितीचा सदस्य म्हणून नेमण्यात आलं.

जीवनाचा सर्वोत्तम मार्ग

माझ्या जीवनात मी अनेक कठीण प्रसंग अनुभवले. पण, सध्याचा काळ मला सगळ्यात कठीण वाटतो. कारण, मी व ईरेन आता वयोवृद्ध झालो आहोत व आम्हाला आरोग्याच्या समस्या आहेत. त्यामुळे, आम्ही देवाच्या सेवेत जास्त करू शकत नाही. तरीसुद्धा, एकत्र देवाच्या वचनाचं वाचन व अभ्यास केल्यामुळे भविष्याविषयीची आमची आशा जिवंत आहे. आमच्या मंडळीच्या क्षेत्रातील लोकांना या आशेविषयी सांगण्यासाठी आम्ही बसनं प्रवास करतो आणि आम्हाला ते खूप आवडतं. आम्ही दोघांनी मिळून १२० पेक्षा जास्त वर्षं पूर्ण वेळच्या सेवेत खर्च केली आहेत. त्यामुळे, ज्यांना एक रोमांचक, आनंददायक व अर्थपूर्ण जीवन जगण्याची इच्छा आहे अशा सर्वांनी पूर्ण वेळची सेवा हाती घ्यावी अशी आम्ही त्यांना मनापासून शिफारस करतो. दावीद राजानं स्तोत्र ३७:२५ ची रचना केली तेव्हा तो ‘म्हातारा झाला’ होता. पण, त्यानं कधीच कोणा नीतिमान व्यक्‍तीला ‘निराश्रित झालेलं पाहिलं नाही.’ तीच गोष्ट मीसुद्धा माझ्या आयुष्यात अनुभवली आहे.

यहोवानं मला आयुष्यभर त्याच्या वचनाद्वारे बळ दिलं. मला बायबल वाचण्याची कायमची सवय लागेल असं ६० हून अधिक वर्षांआधी माझ्या नातेवाइकांनी म्हटलं होतं. त्यांचं म्हणणं अगदी बरोबर होतं. दररोज बायबलचं वाचन करण्याची मला खरोखरच सवय लागली आहे आणि त्याचा मला कधीच पस्तावा झाला नाही!

[तळटीपा]

^ १९४४ मध्ये प्रकाशित, पण सध्या छापले जात नाही.

^ एवान्झ एमयॉट यांच्याविषयी जास्त माहितीसाठी टेहळणी बुरूज, १ जानेवारी १९९९, पृष्ठे २२ आणि २३ पाहा.

[५ पानांवरील चित्र]

मी आणि सीमोन

[५ पानांवरील चित्र]

मला पहिल्यांदा मिळालं होतं अगदी तसंच बायबल

[५ पानांवरील चित्र]

प्रांतीय पर्यवेक्षक म्हणून सेवा करताना

[६ पानांवरील चित्र]

आमच्या लग्नाच्या दिवशी

[६ पानांवरील चित्र]

मला व ईरेनला देवाच्या वचनाचं वाचन व अभ्यास करणं खूप आवडतं