व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशू नरकातील अग्नीत यातना भोगण्याविषयी बोलत होता का?

येशू नरकातील अग्नीत यातना भोगण्याविषयी बोलत होता का?

येशू नरकातील अग्नीत यातना भोगण्याविषयी बोलत होता का?

पापीजनांना नरकातील अग्नीत सर्वकाळ यातना भोगाव्या लागतात असे मानणारे काही जण, मार्क ९:४७ (काही बायबलमध्ये ४४ किंवा ४६ वे वचन) यातील येशूच्या शब्दांचा, या शिकवणीचे समर्थन करण्याकरता उपयोग करतात. या वचनात येशूने कधी न मरणाऱ्‍या किड्यांचा व कधी न विझणाऱ्‍या अग्नीचा उल्लेख केला. जर तुम्हाला कोणी या वचनाचा अर्थ विचारला तर तुम्ही कसे उत्तर द्याल?

हा प्रश्‍न विचारणारी व्यक्‍ती बहुधा ४४, ४६ किंवा ४७ यांपैकी कोणतेही एक वचन वाचून दाखवेल, कारण बायबलच्या काही भाषांतरांत या तिन्ही वचनांत मिळताजुळता मजकूर आढळतो. * नवे जग भाषांतर या भाषांतरात या वचनांचा अशा रीतीने अनुवाद करण्यात आला आहे: “जर तुझा डोळा तुला अडखळवीत असेल तर तो काढून टाक; जेथे त्यांचा किडा मरत नाही व अग्नी विझत नाही अशा गेहेन्‍नात तू टाकले जावे, यापेक्षा एक डोळा घेऊन देवाच्या राज्यात जावे हे तुला बरे आहे.”—मार्क ९:४७, ४८.

मार्क ९:४७ यातील येशूचे विधान, मृत्यूनंतर दुष्टजनांचे आत्मे सर्वकाळ यातना भोगतात या शिकवणीला पुष्टी देते असे काही जणांचे म्हणणे आहे. उदाहरणार्थ, नवार विद्यापीठाच्या स्पॅनिश भाषेतील साग्राथा बीब्लीया या ग्रंथात असे म्हटले आहे: “[या शब्दांतून] प्रभू येशू नरकातील यातनांबद्दल उल्लेख करतो. ‘जो किडा मरत नाही’ त्यास नरकाची शिक्षा मिळालेल्या पापी जनांच्या सार्वकालिक दुःखाचे सूचक मानण्यात आले आहे; तर ‘कधी न विझणारा अग्नी’ हा त्यांना भोगाव्या लागणाऱ्‍या शारीरिक यातनेस सूचित करतो.”

परंतु, येशूच्या शब्दांची यशयाच्या भविष्यवाणीतील शेवटल्या वचनाशी तुलना करून पाहा. * येशूने यशयाच्या ६६ व्या अध्यायातील मजकुराचा अप्रत्यक्षपणे उल्लेख केला हे अगदी उघड आहे, नाही का? तेथे संदेष्टा यशयाने “जेरूसलेम शहराबाहेर असलेल्या हिन्‍नोमच्या खोऱ्‍यात (गेहेन्‍ना) जाण्याविषयी उल्लेख केला. या ठिकाणी एके काळी मनुष्यबली दिले जात होते (यिर्म ७:३१) आणि कालांतराने ही सबंध शहरातील कचरा आणून फेकण्याची जागा बनली.” (द जेरोम बिब्लिकल कॉमेंट्री) यशया ६६:२४ यातील लाक्षणिक भाषेतील वर्णन, यातना भोगण्याविषयी नाही हे तर स्पष्टच आहे कारण यात प्रेतांचा उल्लेख आहे. कधी मरावयाचे नाही असे जे म्हटले आहे, ते जिवंत मानवांबद्दल किंवा अमर आत्म्यांविषयी नसून किड्यांबद्दल म्हणण्यात आले आहे. तर मग येशूला नेमके काय सांगायचे होते?

एल ईव्हान्हेल्यो दी मार्कोस, आनालीसिस लिंग्विस्तीको ई कोमेन्तार्यो एक्सीहीटीको या कॅथलिक ग्रंथाच्या दुसऱ्‍या खंडात मार्क ९:४८ यावर पुढील भाष्य करण्यात आले आहे: “[हा] वाक्यांश यशया (६६,२४) यातून घेतलेला आहे. त्या ठिकाणी संदेष्ट्याने, मृतदेहांची विल्हेवाट लावण्याच्या दोन सर्वसामान्य पद्धतींविषयी सांगितले: कुजवणे व जाळणे. . . . या वचनात किड्यांचा व अग्नीचा एकसाथ उल्लेख करण्याद्वारे संपूर्ण विनाशाच्या कल्पनेवर भर देण्यात आला आहे. . . . येथे उल्लेख केलेल्या दोन्ही नाशकारक गोष्टी कायमस्वरूपी असल्याचे सांगण्यात आले आहे (‘मरत नाही, विझत नाही’): त्याअर्थी त्यांपासून सुटकेचा मार्गच नाही. शिल्लक राहतात ते मनुष्य नव्हेत, तर फक्‍त किडे आणि अग्नी. आणि या दोन गोष्टी त्यांच्या संपर्कात जे काही येईल त्याचा सर्वनाश करतात. तेव्हा, हे वर्णन सार्वकालिक यातनांचे नसून, संपूर्ण विनाशाचे आहे. आणि या विनाशानंतर पुनरुत्थानही शक्य नसल्यामुळे हा विनाश कायमस्वरूपी मृत्यूस सूचित करतो. अशा रीतीने, [अग्नी] संपूर्ण विनाशाचे प्रतीक आहे.”

खरा देव प्रेमळ व न्यायप्रिय आहे हे माहीत असलेल्या कोणत्याही व्यक्‍तीला, येशूच्या शब्दांचे हे स्पष्टीकरण नक्कीच तर्कशुद्ध वाटेल. दुष्ट लोक सर्वकाळ यातना भोगतील असे तो म्हणत नव्हता. तर, त्यांचा संपूर्ण विनाश होऊ शकतो व त्यानंतर पुनरुत्थानाचीही आशा नाही असे तो सांगत होता.

[तळटीपा]

^ परि. 3 बायबलच्या सर्वात विश्‍वसनीय हस्तलिखितांत ४४ व ४६ वे वचन आढळत नाही. ही दोन वचने मुळात बायबलचा भाग नसून नंतर जोडण्यात आली असावीत, असे बरेच विद्वान कबूल करतात. प्राध्यापक आर्चिबॉल्ड टी. रॉबर्टसन लिहितात: “सर्वात जुन्या व सर्वात भरवशालायक हस्तलिखितांत ही वचने आढळत नाहीत. पाश्‍चिमात्त्य व सिरियन (बायझंटाईन) गटांतील हस्तलिखितांतून घेतलेली ही वचने, केवळ ४८ व्या वचनातील शब्दांची पुनरुक्‍ती करतात. म्हणूनच, आम्ही ४४ व ४६ या वचनांचा समावेश केलेला नाही कारण ही वचने मुळात बायबलचा भाग नाहीत.”

^ परि. 5 “ज्या मनुष्यांनी मजविरुद्ध बंड केले त्यांची प्रेते ते बाहेर जाऊन पाहतील; कारण त्यांस लागलेली कीड कधी मरावयाची नाही; त्यांस लागलेला अग्नि कधी विझावयाचा नाही; सर्व मानवजातीस त्यांची किळस येईल.”—यश. ६६:२४.