व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रेषितांची कृत्ये पुस्तकातील ठळक मुद्दे

प्रेषितांची कृत्ये पुस्तकातील ठळक मुद्दे

यहोवाचे वचन सजीव आहे

प्रेषितांची कृत्ये पुस्तकातील ठळक मुद्दे

बायबलमधील प्रेषितांची कृत्ये या पुस्तकात, ख्रिस्ती मंडळीची स्थापना आणि या मंडळीचा हळुवारपणे होत गेलेला विस्तार याबद्दलचा इत्थंभूत इतिहास आहे. डॉक्टरकीचा पेशा असलेल्या लूकने हे पुस्तक लिहिले आहे. यात, सा.यू. ३३ ते सा.यु. ६१ सालापर्यंतच्या २८ वर्षांच्या कालावधीत घडलेल्या ख्रिस्ती कार्याचे जिवंत कथन आहे.

प्रेषितांची कृत्ये पुस्तकाचा पहिला भाग खासकरून प्रेषित पेत्राच्या आणि उरलेला भाग प्रेषित पौलाच्या कार्यांविषयीचा आहे. काही घटना घडल्या तेव्हा लूक स्वतः तेथे उपस्थित असल्यामुळे त्याने “आपण,” “आम्ही,” यासारख्या सर्वनामांचा उपयोग केला आहे. प्रेषितांची कृत्ये पुस्तकातील संदेश आपण लक्षपूर्वक वाचल्यास, देवाच्या लिखित वचनातील व त्याच्या पवित्र आत्म्याच्या शक्‍तीबद्दल आपली कृतज्ञता वाढेल. (इब्री ४:१२) निःस्वार्थ होण्यास व राज्य आशेवरील आपला विश्‍वास आणखी भक्कम करण्यासही आपल्याला यामुळे प्रेरणा मिळेल.

पेत्र “राज्याच्या किल्ल्या” वापरतो

(प्रेषितांची कृत्ये १:१–११:१८)

पवित्र आत्मा मिळाल्यानंतर सर्व प्रेषितांनी धडाडीने साक्ष देण्यास सुरुवात केली. “ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला” त्या यहुदी व यहुदी मतानुसारी लोकांना देवाच्या राज्यात प्रवेश मिळावा म्हणून ज्ञान व संधी खुली करण्याकरता पेत्राने ‘स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्यांतील’ पहिल्या किल्लीचा उपयोग केला. (मत्त. १६:१९; प्रे. कृत्ये २:५, ४१) पण अचानक छळाची लाट आल्यामुळे शिष्यांची पांगापांग होते पण यामुळे प्रचार कार्यात वाढच होते.

शोमरोनातील लोकांनी देवाच्या वचनाचा स्वीकार केला आहे हे ऐकल्यावर जेरुसलेमेतील प्रेषित, पेत्राला व योहानाला त्यांच्याकडे पाठवतात. शोमरोनी लोकांना राज्यात प्रवेश करण्याची संधी देण्याद्वारे पेत्र दुसऱ्‍या किल्लीचा उपयोग करतो. (प्रे. कृत्ये ८:१४-१७) येशूचे पुनरुत्थान होऊन एक वर्ष पूर्ण होण्याच्या आतच कदाचित तार्ससच्या शौलाचा आश्‍चर्यकारक कायापालट होतो. सा.यु. ३६ मध्ये पेत्र तिसऱ्‍या किल्लीचा उपयोग करतो. यामुळे, राष्ट्रांतील सुंता न झालेल्या लोकांवर पवित्र आत्म्याच्या दानाचा वर्षाव होतो.—प्रे. कृत्ये १०:४५.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

२:४४-४७; ४:३४, ३५—विश्‍वास ठेवणाऱ्‍यांनी आपली मालमत्ता विकून गरजूंना साहाय्य का केले? विश्‍वास ठेवणारे लोक दूरहून आले होते व जेरुसलेमेत जास्त दिवस राहण्याकरता त्यांच्याजवळ पुरेशा वस्तू नव्हत्या. पण, त्यांना मिळालेल्या नवीन धर्माविषयी अधिक शिकून घेण्याची आणि शिकलेल्या गोष्टी इतरांना सांगण्याची त्यांची इच्छा होती त्यामुळे ते जेरुसलेमेत जास्त दिवस राहू इच्छित होते. अशा नवीन शिष्यांना मदत करण्याकरता काही ख्रिश्‍चनांनी आपली मालमत्ता विकली आणि मिळालेले पैसे गरजूंना वाटले.

४:१३—पेत्र व योहान निरक्षर व अज्ञानी होते असे लोकांनी का म्हटले? कारण धार्मिक शिक्षण मिळण्याकरता पेत्राने व योहानाने रब्बींच्या शाळेत शिक्षण घेतले नव्हते.

५:३४-३९—जनतेसाठी खुल्या नसलेल्या न्यायसभेत गमलियेलाने जे म्हटले ते लूकला कसे समजले? याच्या तीन शक्यता असाव्यात: (१) गमलियेलाचा विद्यार्थी पौल याने कदाचित लूकला आत काय झाले ते सांगितले असावे; (२) येशूच्या शिष्यांबद्दल सहानुभूती असलेल्या न्यायसभेतील निकदेम नावाच्या एका सभासदाला लूकने विचारले असावे; (३) लूकला ईश्‍वरप्रेरणेने ही माहिती मिळाली असावी.

७:५९—स्तेफनाने येशूला प्रार्थना केली का? नाही, त्याने येशूला प्रार्थना केली नाही. कारण आपण केवळ यहोवा देवाचीच उपासना केली पाहिजे व त्याअर्थी प्रार्थना देखील यहोवा देवालाच केली पाहिजे. (लूक ४:८; ६:१२) स्तेफन नेहमीच येशूच्या नावाने यहोवाला प्रार्थना करीत असावा. (योहा. १५:१६) पण या प्रसंगी, स्तेफनाला एक दृष्टांत झाला ज्यात त्याने ‘मनुष्याच्या पुत्राला देवाच्या उजवीकडे उभे असलेले पाहिले.’ (प्रे. कृत्ये ७:५६) मृतांना पुन्हा जिवंत करण्याची शक्‍ती येशूला देण्यात आली आहे, याची स्तेफनाला पूर्ण जाणीव असल्यामुळे, पुनरुत्थानाच्या वेळी आपलीही आठवण करावी अशी तो येशूला प्रार्थना नव्हे तर केवळ विनवणी करत होता.—योहा. ५:२७-२९.

आपल्याकरता धडे:

१:८. यहोवाचे उपासक जगभर करत असलेले प्रचार कार्य पवित्र आत्म्याच्या साहाय्याविना साध्य होऊच शकत नाही.

४:३६–५:११. कुप्र येथे जन्मलेल्या योसेफाचे आडनाव बर्णबा होते ज्याचा अर्थ “बोधपुत्र” [सांत्वनाचा पुत्र] असा होतो. प्रेषितांनी मुद्दामहून त्याचे नाव बर्णबा ठेवले असावे कारण तो मायाळू, कृपाळू होता आणि इतरांना मदत करण्यातही पुढे असे. आपण हनन्या व सप्पीराप्रमाणे दिखावा, ढोंग आणि फसवेगिरी करणारे न होता बर्णबाप्रमाणे असले पाहिजे.

९:२३-२५. प्रचार कार्य चालू ठेवण्याकरता शत्रूंचा डोळा चुकवणे हे भितरटपणाचे लक्षण नव्हे.

९:२८-३०. विशिष्ट भागांत किंवा विशिष्ट लोकांना साक्ष देणे हे आपल्यासाठी, शारीरिकरीत्या, नैतिकरीत्या किंवा आध्यात्मिकरीत्या धोक्याचे असल्यास, आपण सुजाणपणा दाखवला पाहिजे व कोठे आणि कोणाला प्रचार केला पाहिजे याबाबतीतही विचारी असले पाहिजे.

९:३१. छळाला व विरोधाला अद्याप सुरुवात झालेली नाही तोपर्यंत अर्थात शांतीमय काळ आहे तोपर्यंत आपण अभ्यास व मनन यांद्वारे आपला विश्‍वास मजबूत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामुळे ज्या गोष्टी आपण शिकतो त्यांचे पालन करून व सेवेमध्ये आवेशी राहून आपण यहोवाचे भय बाळगू शकतो.

पौलाची उत्साही सेवा

(प्रेषितांची कृत्ये ११:१९–२८:३१)

बर्णबा व शौल “वर्षभर” जिथे शिकवत होते तेथे म्हणजे अंत्युखियास, सा.यु. ४४ साली अगब येतो. एक “मोठा दुष्काळ” पडणार आहे, असे तो सांगतो. आणि त्याने सांगितल्याप्रमाणे दोन वर्षांनी खरोखरच दुष्काळ पडतो. (प्रे. कृत्ये ११:२६-२८) जेरुसलेममध्ये दुष्काळामुळे पीडित बंधूभगिनींना आवश्‍यक ती सामग्री पुरवल्यानंतर अर्थात “आपली सेवा पूर्ण करून” बर्णबा व शौल पुन्हा अंत्युखियास परततात. (प्रे. कृत्ये १२:२५) सा.यु. ४७ साली म्हणजे, शौलाचा पौल झाल्याच्या १२ वर्षांनंतर बर्णबा व शौल यांना पवित्र आत्म्याकरवी एका मिशनरी दौऱ्‍यावर पाठवण्यात येते. (प्रे. कृत्ये १३:१-४) सा.यु. ४८ साली ते अंत्युखियास परत येतात. याच ठिकाणाहून त्यांना “देवाच्या कृपेवर सोपवून पाठविण्यात आले होते.”—प्रे. कृत्ये १४:२६.

सुमारे नऊ महिन्यांनंतर पौल (ज्याला शौल म्हणूनही ओळखले जाते) तो सीलाला आपला जोडीदार म्हणून निवडतो आणि आपल्या दुसऱ्‍या मिशनरी दौऱ्‍यावर निघतो. (प्रे. कृत्ये १५:४०) तीमथ्य व लूकही पौलासोबत निघतात. लूक फिलिप्पै येथेच थांबतो पण पौल पुढे अथेनै व मग करिंथला जातो. तो अक्विल्ला व प्रिस्किल्ला यांना भेटतो आणि तेथे दीड वर्ष राहतो. (प्रे. कृत्ये १८:११) तीमथ्य व सीला यांना करिंथमध्ये मागे सोडून पौल सा.यु. ५२ सालच्या सुरुवातीला अक्विल्ला व प्रिस्किल्ला यांना घेऊन सुरियाला तारवाने निघतो. (प्रे. कृत्ये १८:१८) अक्विल्ला व प्रिस्किल्ला त्याला इफिससपर्यंत साथ देतात व नंतर मात्र ते इफिससमध्येच राहतात.

सुरियातील अंत्युखियात काही दिवस मुक्काम केल्यानंतर सा.यु. ५२ साली पौल आपल्या तिसऱ्‍या मिशनरी दौऱ्‍यावर जाण्यासाठी निघतो. (प्रे. कृत्ये १८:२३) इफिससमध्ये “प्रभूच्या सामर्थ्याचे वचन वाढत जाऊन प्रबल झाले.” (प्रे. कृत्ये १९:२०) येथे पौल तीन वर्षे राहतो. (प्रे. कृत्ये २०:३१) सा.यु. ५६ सालच्या पेंटेकॉस्टपर्यंत पौल जेरुसलेमेत असतो. त्याला अटक केल्यानंतर तो अधिकाऱ्‍यांसमोर उभे राहून अगदी निर्भयपणे साक्ष देतो. रोममध्ये प्रेषित पौलाला दोन वर्ष (सुमारे सा.यु. ५९-सा.यु. ६१) नजरकैदेत ठेवले जाते. पण कैदेत असतानाही राज्याचा प्रचार व “प्रभु येशू ख्रिस्ताविषयीच्या गोष्टी” शिकवण्याचे मार्ग त्याला सापडतात.—प्रे. कृत्ये २८:३०, ३१.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

१४:८-१३—लुस्र येथील लोकांनी ‘बर्णबाला ज्यूपितर व पौलाला मर्क्यूरी’ का म्हटले? ग्रीक दंतकथेत, ज्यूपितर हा दैवतांचा शासक होता आणि त्याचा पुत्र मर्क्यूरी त्याच्या वाक्‌चातुर्यासाठी विख्यात होता. लुस्र येथे पौलच जास्त बोलत असल्यामुळे तेथील लोकांनी त्याला मर्क्यूरी म्हटले आणि बर्णबाला ज्यूपितर म्हटले.

१६:६, ७—पवित्र आत्म्याने पौल आणि त्याच्या सहकाऱ्‍यांना आशियाच्या व बिथुनियाच्या प्रांतात प्रचार करण्यास प्रतिबंध का केला? कारण, प्रचार कार्य करणारे कामकरी हातावर मोजण्याइतकेच होते. त्यामुळे, पवित्र आत्म्याने त्यांना, अधिक फलदायी क्षेत्रांत प्रचार कार्य करण्यास निर्देशित केले.

१८:१२-१७—लोकांनी जेव्हा सोस्थनेस याला मारहाण सुरू केली तेव्हा सुभेदार गल्लियो मध्ये का पडला नाही? कदाचित गल्लियोला वाटले असावे, की पौलाविरुद्ध उठलेल्या जमावाचा पुढारी सोस्थनेस असावा त्यामुळे त्याला शिक्षा मिळत आहे, हे बरोबरच आहे. पण, या घटनेचा मात्र परिणाम चांगला झाला. सोस्थनेसने ख्रिस्ती धर्म स्वीकारला. नंतर पौलाने सोस्थनेसविषयी बोलताना त्याला “आपला बंधू” असे संबोधले.—१ करिंथ. १:२.

१८:१८—पौलाने कोणता नवस केला होता? पौलाने नाजीरांप्रमाणे नवस केला होता, असे काही विद्वान सुचवतात. (गण. ६:१-२१) पण, तो नवस काय होता, याबद्दल बायबलमध्ये काहीही सांगण्यात आलेले नाही. शिवाय, पौलाने हा नवस परिवर्तन होण्याआधी केला होता किंवा नंतर अथवा त्याने तो नवस पूर्ण करायला सुरुवात केली होती की तो नवस फेडत होता याविषयी देखील बायबलमध्ये काहीही सांगण्यात आलेले नाही. काहीही असो, अशाप्रकारचा नवस करणे पाप नव्हते.

आपल्याकरता धडे:

१२:५-११. आपण आपल्या बंधूभगिनींसाठी प्रार्थना करू शकतो, नव्हे केलीच पाहिजे.

१२:२१-२३; १४:१४-१८. जे गौरव देवाला दिले पाहिजे ते हेरोदाने स्वतःला दिले. हेरोदाच्या वागण्यात आणि पौल व बर्णबाच्या वागण्यात किती फरक होता! पौल व बर्णबाची लोकांनी स्तुती व प्रशंसा केली तेव्हा त्या दोघांनी लगेचच व अगदी ठामपणे ती नाकारली. यहोवाच्या सेवेत आपण काहीही साध्य करतो तेव्हा त्याचे श्रेय स्वतःला देण्याचा प्रयत्न करू नये.

१४:५-७. सावधगिरी बाळगल्यास आपण सेवेमध्ये सक्रिय राहू शकतो.—मत्त. १०:२३.

१४:२२. ख्रिश्‍चनांनी छळाची अपेक्षा केली पाहिजे. आपल्या विश्‍वासाशी हातमिळवणी करून ते छळ चुकवत नाहीत.—२ तीम. ३:१२.

१६:१, २. ख्रिस्ती मंडळीतल्या युवकांनी देवाच्या सेवेत परिश्रम घेतले पाहिजेत आणि एक चांगले नाव कमवण्यासाठी यहोवाची मदत स्वीकारली पाहिजे.

१६:३. बायबलमधील तत्त्वांच्या सुसंगतेत आपण कसेही करून लोकांपर्यंत सुवार्ता पोहचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.—१ करिंथ. ९:१९-२३.

२०:२०, २१. घरोघरचे कार्य हे आपल्या सेवेतील प्रमुख पैलू आहे.

२०:२४; २१:१३. आपल्या प्राणापेक्षा आपण देवाशी एकनिष्ठ राहण्याला अधिक महत्त्व दिले पाहिजे.

२१:२१-२६. चांगला सल्ला ऐकून घेण्यास आपण उत्सुक असले पाहिजे.

२५:८-१२. ‘सुवार्तेसंबंधीच्या प्रत्युत्तरासाठी व तिच्या समर्थनासाठी’ उपलब्ध असलेल्या कायदेशीर तरतुदींचा उपयोग आज ख्रिश्‍चन करू शकतात, नव्हे त्यांनी केला पाहिजे.—फिलिप्पै. १:७.

२६:२४, २५. ‘स्वाभाविक वृत्तीच्या माणसाला’ “खरेपणाच्या व सुज्ञपणाच्या गोष्टी” मूर्खपणाच्या वाटत असल्या तरी आपण त्या गोष्टी लोकांना सांगितल्या पाहिजेत.—१ करिंथ. २:१४.

[३० पानांवरील चित्र]

पेत्राने “राज्याच्या किल्ल्या” केव्हा वापरल्या?

[३१ पानांवरील चित्र]

जगभर होत असलेले प्रचार कार्य पवित्र आत्म्याच्या साहाय्याविना साध्य होऊच शकत नाही