व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पारध्याच्या पाशापासून बचाव

पारध्याच्या पाशापासून बचाव

पारध्याच्या पाशापासून बचाव

‘पारध्याच्या पाशापासून [यहोवा] तुझा बचाव करील.’—स्तोत्र ९१:३.

१. ‘पारधी’ कोण आहे आणि तो धोकेदायक का आहे?

सर्व खऱ्‍या ख्रिश्‍चनांना एका शिकाऱ्‍यापासून धोका आहे. या शिकाऱ्‍याला अलौकिक बुद्धी आहे व तो अतिशय कावेबाज आहे. स्तोत्र ९१:३ यात त्याला ‘पारधी’ म्हटले आहे. कोण आहे हा शत्रू? या मासिकाने आपल्या जून १, १८८३ अंकापासून आजपर्यंत, हा शत्रू दुसरा तिसरा कोणी नसून दियाबल सैतान आहे हे स्पष्ट केले. पारधी ज्याप्रकारे पक्ष्याला पाशात अडकवण्याचा प्रयत्न करतो त्याचप्रकारे हा शक्‍तिशाली शत्रू अतिशय चतुराईने यहोवाच्या लोकांना बहकवून त्यांना पाशात पाडण्याचा प्रयत्न करतो.

२. सैतानाची तुलना पारध्याशी का करण्यात आली आहे?

प्राचीन काळी, पक्ष्यांच्या मंजूळ गाण्यासाठी किंवा त्यांच्या रंगीबेरंगी पिसाऱ्‍यासाठी तसेच खाद्यासाठी व यज्ञासाठी पक्ष्यांना पकडले जात होते. पण पक्षी स्वभावतःच सावध व दक्ष असतात त्यामुळे त्यांना पाशात अडकवणे तसे अवघडच असते. म्हणूनच पुरातन काळात, पारध्याला जो पक्षी पकडायचा असेल त्याच्या वैशिष्ट्यांचे व सवयींचे तो आधी नीट निरीक्षण करत असे. मग या पक्ष्यांना पकडण्यासाठी तो कावेबाजपणे युक्‍ती शोधून काढत असे. सैतानाला पारधी म्हणण्याद्वारे बायबल आपल्याला त्याच्या कार्यपद्धतीविषयी समजण्यास मदत करते. दियाबल आपल्यापैकी प्रत्येकाचे निरीक्षण करतो. तो आपल्या सवयी व स्वभावगुणांकडे बारकाईने पाहतो आणि त्या आधारावर आपल्याला धरण्यासाठी धूर्त पाश रचतो. (२ तीमथ्य २:२६) आपण सैतानाच्या पाशात अडकल्यास आपला आध्यात्मिक दृष्ट्या नाश होईल आणि शेवटी आपला कायमचा सर्वनाश होईल. म्हणून, स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आपण या ‘पारध्याच्या’ निरनिराळ्या कुयुक्‍त्‌या ओळखल्या पाहिजेत.

३, ४. सैतानाचे हल्ले कशाप्रकारे कधी सिंहाच्या तर कधी अजगराच्या हल्ल्यासारखे असतात?

स्तोत्रकर्त्याने सैतानाची तुलना तरुण सिंह व अजगर यांच्याशीही केली आहे. (स्तोत्र ९१:१३) सिंहाप्रमाणे कधीकधी सैतान यहोवाच्या लोकांवर छळाच्या किंवा सरकारी कार्यवाहीच्या रूपात थेटपणे हल्ला करतो. (स्तोत्र ९४:२०) सिंहाच्या हल्ल्याप्रमाणे असलेल्या या छळामुळे काहीजण यहोवाची उपासना सोडून देण्याची शक्यता असते. पण, सहसा या थेट हल्ल्यांचा उलटच परिणाम होतो आणि देवाच्या लोकांमध्ये असलेली एकी आणखीनच वाढते. पण सैतान जे हल्ले एखाद्या अजगराप्रमाणे बेमालूमपणे करतो त्यांच्याविषयी काय?

दियाबल आपल्या अलौकिक बुद्धीचा वापर करून, एखाद्या लपून बसलेल्या विषारी सर्पाप्रमाणे धूर्त व घातक हल्ले करतो. या पद्धतीने त्याने देवाच्या लोकांपैकी काहींची मने कलुषित केली आहेत आणि यहोवाच्या इच्छेप्रमाणे वागण्याऐवजी स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागण्यास त्यांना बहकवले आहे. याचा परिणाम अतिशय दुःखदायक ठरला आहे. पण आनंदाची गोष्ट ही आहे की सैतानाच्या कुयुक्‍त्‌यांविषयी आपण अनभिज्ञ नाही. (२ करिंथकर २:११) तर आता आपण या पारध्याच्या चार वेगवेगळ्या घातक पाशांविषयी चर्चा करू.

मनुष्याचे भय

५. “मनुष्याची भीति” बाळगण्याचा पाश सहसा इतका परिणामकारक का ठरतो?

‘पारध्याला’ अर्थात सैतानाला हे माहीत आहे, की इतरांनी आपल्याला पसंत करावे, स्वीकारावे ही मानवांची एक स्वाभाविक इच्छा असते. ख्रिस्ती या नात्याने आपणही इतर लोकांच्या भावनांविषयी किंवा मतांविषयी बेपर्वा वृत्ती बाळगत नाही. इतरजण आपल्याविषयी काय विचार करतात या स्वाभाविक भावनेचा दियाबल गैरफायदा घेऊ इच्छितो. उदाहरणार्थ, तो “मनुष्याची भीति” बाळगण्याच्या पाशात देवाच्या काही सेवकांना अडकवण्याचा प्रयत्न करतो. (नीतिसूत्रे २९:२५) मनुष्याच्या भीतीमुळे जर देवाचे सेवक त्याच्या वचनात मना केलेल्या गोष्टी करण्यात इतरांसोबत सहभागी होत असतील किंवा देवाने आज्ञा दिलेल्या गोष्टी जर ते करत नसतील तर ते ‘पारध्याच्या’ पाशात अडकले आहेत.—यहेज्केल ३३:८; याकोब ४:१७.

६. एखादा तरुण कशाप्रकारे ‘पारध्याच्या’ पाशाला बळी पडू शकतो हे कोणत्या उदाहरणावरून दिसून येते?

उदाहरणार्थ, एखादा तरुण आपल्या वर्गसोबत्यांच्या दबावाला बळी पडून सिगारेट ओढतो. त्या दिवशी शाळेला जाताना कदाचित त्याने सिगारेट ओढण्याविषयी विचारही केला नसेल. पण थोड्या वेळातच तो असे एक कृत्य करून बसतो की जे त्याच्या आरोग्याला तर हानीकारक आहेच पण जे देवालाही दुखवते. (२ करिंथकर ७:१) कसा अडकला असावा बरे तो या पाशात? कदाचित त्याने वाईट मुलांशी मैत्री केली असेल आणि त्यांच्यासारखे आपण वागलो नाही तर ते आपली थट्टा करतील असे त्याला वाटले असेल. तरुणांनो, ‘पारध्याच्या’ पाशाला बळी पडू नका! त्याने तुम्हाला धरू नये म्हणून, अगदी क्षुल्लक वाटणाऱ्‍या गोष्टींतही हातमिळवणी करण्याचे टाळा. कुसंगतीविषयी बायबलमध्ये दिलेल्या इशाऱ्‍याकडे लक्ष द्या.—१ करिंथकर १५:३३.

७. सैतान कशाप्रकारे काही पालकांना आपले आध्यात्मिक संतुलन गमवायला लावतो?

जाणते ख्रिस्ती पालक आपल्या कुटुंबाच्या भौतिक गरजा पूर्ण करण्याची जी जबाबदारी देवाने त्यांना दिली आहे तिच्याकडे दुर्लक्ष करत नाहीत. (१ तीमथ्य ५:८) पण सैतानाचा हाच प्रयत्न आहे, की ही जबाबदारी पूर्ण करण्यातच ख्रिश्‍चनांनी स्वतःला पूर्णपणे गुरफटून घ्यावे. कदाचित वरिष्ठ अधिकाऱ्‍यांनी जादा काम करण्याचा दबाव आणल्यामुळे ते नियमितपणे सभा चुकवत असतील. आपल्या बांधवांसोबत यहोवाची उपासना करण्याकरता प्रांतीय अधिवेशनाच्या सर्व सत्रांना उपस्थित राहण्यासाठी रजा मागायला कदाचित त्यांना भीती वाटत असेल. या पाशापासून सुरक्षित राहण्याकरता ‘[यहोवावर] भाव ठेवणे’ महत्त्वाचे आहे. (नीतिसूत्रे ३:५, ६) शिवाय आपण हे आठवणीत ठेवले पाहिजे की आपण सर्वजण यहोवाच्या घराण्याचे सदस्य आहोत आणि आपली काळजी वाहण्याची जबाबदारी त्याने स्वतःवर घेतली आहे. हे आठवणीत ठेवल्यास आपल्याला समतोल दृष्टिकोन बाळगण्यास मदत मिळेल. आईवडिलांनो, तुम्हाला हा विश्‍वास वाटतो का, की तुम्ही यहोवाच्या इच्छेप्रमाणे करत राहिल्यास तो कोणत्या न कोणत्या प्रकारे तुमची व तुमच्या कुटुंबाची काळजी घेईल? की मनुष्याच्या भीतीने तुम्ही दियाबलाच्या इच्छेप्रमाणे वागून त्याच्या पाशात धरले जाल? या प्रश्‍नांवर प्रार्थनापूर्वक विचार करण्यास आम्ही तुम्हाला प्रोत्साहन देऊ इच्छितो.

धनसंपत्तीचा पाश

८. धनसंपत्तीच्या मोहाचा सैतान कशारितीने उपयोग करतो?

देवाच्या सेवकांना धरण्याकरता सैतान धनसंपत्तीच्या पाशाचाही उपयोग करतो. या जगातले व्यापारी जगत झटपट श्रीमंत होण्याचे स्वप्न दाखवणाऱ्‍या अनेक योजना देऊ करते. देवाचे सेवकही अशा फसवणुकीला बळी पडू शकतात. कधीकधी काही बांधवांना असे सांगितले जाते: “मेहनत करा आणि आर्थिक दृष्ट्या आधी स्थिरस्थावर व्हा. मग तुम्ही आरामशीर बसून खाऊ शकाल. वाटल्यास पायनियर सेवाही करू शकाल.” हे शब्द ख्रिस्ती मंडळीतल्या बांधवांचा आपल्या स्वार्थाकरता गैरफायदा घेणाऱ्‍यांचे असू शकतात. पण त्यांचा हा तर्कवाद योग्य नाही. आता मेहनत करून नंतर आरामशीर जगण्याच्या या आमीषाविषयी लक्षपूर्वक विचार करा. येशूने दिलेल्या दृष्टान्तातल्या “मूर्ख” मनुष्याच्या विचारसरणीशी त्याचे साम्य आहे असे तुम्हाला वाटत नाही का?—लूक १२:१६-२१.

९. काही ख्रिस्ती निरनिराळ्या वस्तू मिळवण्याच्या इच्छेला कशाप्रकारे बळी पडू शकतात?

सैतान या दुष्ट व्यवस्थीकरणाचा कारभार अशाप्रकारे चालवतो की जेणेकरून लोकांच्या मनात निरनिराळ्या वस्तू बाळगण्याची इच्छा निर्माण होते. ही इच्छा हळूहळू एका ख्रिस्ती व्यक्‍तीच्या जीवनावर इतका परिणाम करते की शेवटी ती वचनाची वाढ खुंटविते आणि त्यास “निष्फळ” करते. (मार्क ४:१९) बायबल आपल्याला अन्‍न व वस्त्र असल्यास तेवढ्यात तृप्त असण्याचे प्रोत्साहन देते. (१ तीमथ्य ६:८) पण बरेचजण ‘पारध्याच्या’ पाशाला बळी पडतात कारण ते हा सल्ला स्वतःला लागू करत नाहीत. कदाचित गर्वामुळे तर त्यांना असे वाटत नसेल, की एक विशिष्ट राहणीमान टिकवून ठेवणे त्यांच्याकरता महत्त्वाचे आहे? व्यक्‍तिशः आपल्याविषयी काय? निरनिराळ्या वस्तू बाळगण्याच्या इच्छेमुळे आपण खऱ्‍या उपासनेशी संबंधित कार्यांना दुय्यम स्थान देतो का? (हाग्गय १:२-८) दुःखाची गोष्ट म्हणजे कठीण आर्थिक परिस्थितीत, काहींनी पूर्वीचे राहणीमान टिकवून ठेवण्यासाठी आपल्या आध्यात्मिकतेचा बळी दिला आहे. धनसंपत्तीचा लोभ बाळगण्याची ही वृत्ती पाहून ‘पारध्याला’ आनंदच वाटतो!

अहितकारक करमणुकीचा पाश

१०. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्‍तीने कशाविषयी आत्मपरीक्षण केले पाहिजे?

१० ‘पारध्याचा’ आणखी एक पाश म्हणजे चांगले व वाईट यांतला फरक ओळखण्याची लोकांची स्वाभाविक जाणीव नष्ट करणे. आजच्या जगातल्या मनोरंजन उद्योगावर प्राचीन काळातल्या सदोम व गमोराच्या लोकांसारख्या विचारसरणीचा पगडा असल्याचे दिसून येते. फार काय, टीव्ही व मासिकांतल्या बातम्यांमध्येही हिंसाचारावर आणि लैंगिकतेविषयी जाणून घेण्याची विकृत लालसा पूर्ण करण्यावर भर दिला जातो. प्रसारमाध्यमांतून करमणुकीच्या नावाखाली दाखवल्या जाणाऱ्‍या बहुतेक गोष्टी लोकांची ‘चांगले व वाईट समजण्याची’ बुद्धी भ्रष्ट करतात. (इब्री लोकांस ५:१४) पण यहोवाने यशया संदेष्ट्याला जे सांगितले होते ते आठवणीत घ्या: “जे वाईटाला बरे व बऱ्‍याला वाईट म्हणतात . . . त्यांस धिक्कार असो!” (यशया ५:२०) ‘पारध्याने’ अशा अहितकारक करमणुकीच्या माध्यमाने नकळत तुमच्या विचारसरणीवरही प्रभाव टाकला आहे का? प्रत्येकाने याविषयी आत्मपरीक्षण केले पाहिजे.—२ करिंथकर १३:५.

११. टीव्ही मालिकांविषयी याच मासिकात कोणती ताकीद देण्यात आली होती?

११ जवळजवळ २५ वर्षांपूर्वी टेहळणी बुरूजने खऱ्‍या उपासकांच्या घराण्याला, टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्‍या मालिकांविषयी प्रेमळपणे ताकीद दिली होती. * या लोकप्रिय मालिका किती बेमालूमपणे आपल्यावर प्रभाव पाडू शकतात याविषयी त्यात असे सांगण्यात आले होते: “प्रेमाची स्वाभाविक ओढ तृप्त करण्यासाठी काहीही केले तरी चालते असा संदेश या मालिकांतून दिला जातो. उदाहरणार्थ, एका मालिकेत बिनलग्नाची गरोदर राहिलेली एक तरुणी आपल्या मैत्रिणीला म्हणते: ‘पण माझं व्हिक्टरवर प्रेम आहे. मला कसलीही पर्वा नाही. . . . हे बाळ मला हवंय. त्यासाठी मी वाटेल ते करीन!’ हा संवाद सुरू असताना मागून अगदी मंद स्वरात सुरेल संगीत वाजत असते. ते मंद संगीत ऐकताना या मुलीने अवलंबलेला मार्ग तुम्हाला तितकासा वाईट वाटत नाही. तुम्हालाही व्हिक्टर आवडत असतो. त्यामुळे, या मुलीसाठी आता तुम्हाला सहानुभूती वाटू लागते. तुम्ही तिची परिस्थिती ‘समजू शकता.’ ही मालिका पाहणारी एक स्त्री नंतर शुद्धीवर येऊन म्हणाली: ‘आपण किती सहजपणे तडजोड करतो, याची जाणीव झाल्यावर खरंच आश्‍चर्य वाटतं. अनैतिकता वाईट आहे हे आपल्याला चांगले ठाऊक असते, नाही असे नाही . . . पण तरी, मानसिक दृष्ट्या का होईना मी त्या अनैतिकतेत सहभागी होत होते याची मला जाणीव झाली.’”

१२. काही टीव्ही कार्यक्रमांविषयीची ताकीद सध्याच्या परिस्थितीतही समर्पक आहे हे कशावरून दिसून येते?

१२ आता तर अशाप्रकारच्या नैतिकरित्या निकृष्ट दर्जाच्या कार्यक्रमांना ऊत आला आहे. बऱ्‍याच ठिकाणी असे कार्यक्रम चोवीस तास टीव्हीवर दाखवले जातात. पुरुष, स्त्रिया व अनेक कोवळ्या वयाची मुले सतत अशाप्रकारच्या कार्यक्रमांनी आपली करमणूक करून घेत असतात. आपल्या मनावर व अंतःकरणावर त्यांचा प्रभाव पडू देत असतात. पण आपण खोट्या तर्कवादाने स्वतःची फसवणूक करता कामा नये. टीव्ही, सिनेमात जे दाखवले जाते ते आजच्या समाजात चाललेल्या गोष्टींचेच चित्रण आहे, त्यामुळे ते पाहण्यात काही नुकसान नाही, असा तर्क करणे चुकीचे ठरेल. ज्याप्रकारच्या लोकांना आपण आपल्या घरात घेण्याचा कधी विचारही करणार नाही, त्यांच्याचकडून स्वतःची करमणूक करून घेणे, त्यातल्या त्यात स्वतःहून अशी करमणूक निवडणे एका ख्रिस्ती व्यक्‍तीकरता कितपत योग्य आहे?

१३, १४. टीव्हीसंबंधी दिलेल्या इशाऱ्‍यामुळे फायदा झाल्याचे काहींनी कशाप्रकारे व्यक्‍त केले?

१३ ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाने’ दिलेला त्या सल्ल्याचे गांभीर्याने पालन करणाऱ्‍या अनेकांना फायदा झाला. (मत्तय २४:४५-४७) बायबलवर आधारित तो सडेतोड सल्ला वाचल्यावर, या लेखांचा आपल्याला व्यक्‍तिशः किती फायदा झाला याविषयी काहींनी पत्राद्वारे कळवले. * एकीने असे कबूल केले: “तेरा वर्षांपासून मला या टीव्ही मालिकांचे जणू व्यसन लागले होते. आपण ख्रिस्ती सभांना जातो, अधूनमधून क्षेत्र सेवेलाही जातो, तेव्हा आपल्याला काही धोका नाही अशी माझी समजूत होती. पण नकळत मी मालिकांतून सर्रास दाखवली जाणारी मनोवृत्ती स्वीकारली होती, की जर तुमचा नवरा तुम्हाला नीट वागवत नसेल किंवा तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर विवाहबाह्‍य संबंध वैध आहेत. तो स्वतःच याकरता जबाबदार आहे. त्यामुळे, आपल्या परिस्थितीतही हे ‘वैध’ आहे असे जेव्हा मला वाटले तेव्हा मी हा वाईट मार्ग अवलंबला आणि यहोवाच्या व माझ्या पतीच्या विरोधात पाप केले.” या स्त्रीला बहिष्कृत करण्यात आले. शेवटी तिचे डोळे उघडले, तिने पश्‍चात्ताप केला आणि तिला पुन्हा मंडळीत स्वीकारण्यात आले. टीव्ही मालिकांविरुद्ध इशारा देणाऱ्‍या या लेखांनी तिला यहोवाला घृणास्पद वाटणाऱ्‍या गोष्टींनी स्वतःची करमणूक करून घेण्यास नकार देण्याची ताकद दिली.—आमोस ५:१४, १५.

१४ आणखी एक वाचक जिच्या जीवनावर या लेखांचा प्रभाव पडला तिने म्हटले: “मी हे लेख वाचले तेव्हा मी अक्षरशः रडले कारण मला जाणीव झाली की मी पूर्ण हृदयाने यहोवाची उपासना करत नव्हते. मी माझ्या देवाला वचन दिले की मी यापुढे या मालिकांची गुलाम राहणार नाही.” लेखांबद्दल प्रशंसा व्यक्‍त करून आणखी एका ख्रिस्ती स्त्रीने आपल्याला या मालिका पाहण्याची सवय असल्याचे कबूल केले आणि लिहिले: “मी विचार करू लागले, की यामुळे यहोवासोबतच्या माझ्या नातेसंबंधावर परिणाम होईल का? मला एकाच वेळी ‘या मालिकांतल्या पात्रांशी’ आणि यहोवाशीही मैत्री कशी बरे करता येईल?” जर २५ वर्षांपूर्वी अशा मालिका लोकांची मने भ्रष्ट करू शकत होत्या तर मग आज त्यांचा काय परिणाम होत असेल? (२ तीमथ्य ३:१३) टीव्ही मालिका, हिंसक व्हिडिओ गेम्स किंवा अनैतिक संगीत व्हिडिओ यांसारख्या निरनिराळ्या प्रकारच्या अहितकारक मनोरंजनाच्या रूपात सैतानाने ठेवलेला पाश आपण ओळखला पाहिजे.

आपसांतील मतभेदांचा पाश

१५. काहीजण दियाबलाच्या पाशात कशाप्रकारे धरले जातात?

१५ आपसांतील मतभेदांनाही सैतान एक पाश बनवून त्यांयोगे यहोवाच्या लोकांमध्ये फुटी पाडण्याचा प्रयत्न करतो. आपल्याजवळ सेवेचे कोणतेही विशेषाधिकार असले तरीही आपण या पाशाला बळी पडू शकतो. काहीजण दियाबलाच्या या पाशात धरले जातात कारण ते एखाद्या व्यक्‍तीशी झालेल्या मतभेदामुळे शांती व एकतेचा आणि यहोवाने अस्तित्वात आणलेल्या अद्‌भुत आध्यात्मिक नंदनवनाचा भंग होऊ देतात.—स्तोत्र १३३:१-३.

१६. सैतान कोणत्या मार्गाने आपली एकता भंग करण्याचा अतिशय कावेबाजपणे प्रयत्न करत आहे?

१६ पहिल्या महायुद्धादरम्यान सैतानाने यहोवाच्या संघटनेचा पृथ्वीवर जो हिस्सा आहे त्यावर थेट हल्ला केला पण तो निष्फळ ठरला. (प्रकटीकरण ११:७-१३) तेव्हापासून तो अतिशय कावेबाजपणे आपली एकता भंग करण्याचा प्रयत्न करत आहे. आपण आपसांतील मतभेदांना आपली एकता भंग करू देतो तेव्हा एका अर्थाने ‘पारध्याला’ त्याचे दुष्ट हेतू साध्य करण्याची संधी देत असतो. असे केल्यामुळे आपण स्वतःच्या वैयक्‍तिक जीवनात आणि मंडळीतही पवित्र आत्म्याच्या मुक्‍त प्रवाहाला व्यत्यय आणत असतो. यामुळे सैतानाला अतिशय आनंद होतो कारण मंडळीतील शांती व एकता भंग झाल्यास आपोआपच प्रचार कार्यात अडथळा येतो.—इफिसकर ४:२७, ३०-३२.

१७. ज्यांचे आपसांत मतभेद आहेत त्यांनी हे मतभेद सोडवण्याचा कशाप्रकारे प्रयत्न केला पाहिजे?

१७ जर तुमचा एखाद्या ख्रिस्ती बांधवाशी मतभेद झाला असेल तर तुम्ही काय करू शकता? प्रत्येक मतभेदाचे कारण वेगळे असते हे कबूल आहे. पण मतभेद कोणत्याही कारणामुळे निर्माण झाला असला तरी तो तसाच राहू देण्याचे कारण नाही. तो सोडवला पाहिजे. (मत्तय ५:२३, २४; १८:१५-१७) देवाच्या वचनातील सल्ला प्रेरित व परिपूर्ण आहे. बायबलमधील तत्त्वांचे पालन केल्यास तुमची कधीही निराशा होणार नाही कारण त्यांमुळे नेहमी चांगलाच परिणाम होतो!

१८. यहोवाचे अनुकरण केल्यामुळे आपल्याला वैयक्‍तिक मतभेद सोडवण्यास कशी मदत मिळू शकेल?

१८ यहोवा “क्षमाशील” आहे आणि तो “[खऱ्‍या अर्थाने] क्षमा” करतो. (स्तोत्र ८६:५; १३०:४, NW) आपण त्याचे अनुकरण करतो तेव्हा आपण त्याची प्रिय मुले आहोत हे सिद्ध करतो. (इफिसकर ५:१) आपण सर्वजण पापी आहोत आणि सर्वांनाच यहोवाच्या क्षमेची गरज आहे. पण जर आपल्याला एखाद्या व्यक्‍तीला क्षमा करण्यास कठीण वाटत असेल तर आपण सांभाळून राहिले पाहिजे. नाहीतर, आपण येशूच्या दृष्टान्तातल्या त्या दासासारखे ठरू, ज्याचे मोठे कर्ज राजाने रद्द केले; पण तो मात्र त्याच्या तुलनेत अगदी लहानशी रक्कम असलेल्या आपल्या मित्राचे कर्ज माफ करण्यास तयार झाला नाही. राजाला जेव्हा याविषयी कळले तेव्हा त्याने क्षमा करण्यास तयार नसणाऱ्‍या सेवकाला तुरुंगात टाकले. दृष्टान्ताच्या शेवटी येशूने असे म्हटले: “जर तुम्ही प्रत्येक जण आपआपल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही तर माझा स्वर्गातील पिताहि त्याप्रमाणेच तुमचे करील.” (मत्तय १८:२१-३५) या दृष्टान्तावर मनन केल्यास व यहोवाने आपल्याला कितीदा उदारपणे क्षमा केली आहे यावर विचार केल्यास आपल्या बांधवासोबत झालेला मतभेद सोडवताना आपल्याला नक्कीच साहाय्य मिळेल.—स्तोत्र १९:१४.

“परात्पराच्या गुप्त स्थली” सुरक्षित

१९, २०. या धोकेदायक काळात आपण यहोवाच्या ‘गुप्त स्थलाविषयी’ व त्याच्या ‘सावलीविषयी’ कसा दृष्टिकोन बाळगावा?

१९ आपण अतिशय धोकेदायक काळात राहात आहोत. यहोवाचे प्रेमळ संरक्षण नसते तर सैतानाने आपल्या सर्वांचा केव्हाच सर्वनाश केला असता. तेव्हा, ‘पारध्यापासून’ स्वतःला बचावण्यासाठी आपण संरक्षणाच्या लाक्षणिक स्थानी अर्थात, ‘परात्पराच्या गुप्त स्थली वसले’ पाहिजे व ‘सर्वसमर्थाच्या सावलीत राहिले’ पाहिजे.—स्तोत्र ९१:१.

२० यहोवाच्या सूचना व मार्गदर्शन आपल्यावर बंधने आणण्याकरता नसून आपल्या संरक्षणाकरता आहे असाच दृष्टिकोन आपण नेहमी बाळगला पाहिजे. आपल्या सर्वांना, अलौकिक बुद्धिमत्ता असलेल्या एका शिकाऱ्‍याला तोंड द्यायचे आहे. यहोवाच्या प्रेमळ साहाय्याशिवाय कोणीही त्याच्या तावडीतून सुटू शकत नाही. (स्तोत्र १२४:७, ८) म्हणूनच आपण यहोवाला प्रार्थना करूया जेणेकरून तो आपल्याला “पारध्याच्या” पाशापासून सोडवेल!—मत्तय ६:१३. (w०७ १०/१)

[तळटीपा]

^ परि. 11 टेहळणी बुरूज, डिसेंबर १, १९८२ (इंग्रजी), पृष्ठे ३-७.

^ परि. 13 टेहळणी बुरूज, डिसेंबर १, १९८३ (इंग्रजी), पृष्ठ २३.

तुम्हाला आठवते का?

• “मनुष्याची भीति” बाळगणे एखाद्या घातक पाशाप्रमाणे का ठरू शकते?

• दियाबल धनसंपत्तीच्या मोहाचा कशाप्रकारे वापर करतो?

• अहितकारक करमणुकीच्या माध्यमाने सैतानाने कशाप्रकारे काहींना पाशात पाडले आहे?

• आपली एकता भंग करण्यासाठी दियाबल कोणता पाश टाकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२८ पानांवरील चित्र]

काहीजण ‘मनुष्याच्या भीतीमुळे’ पाशात पडले आहेत

[२९ पानांवरील चित्र]

यहोवाला घृणास्पद वाटतात अशा गोष्टींनी तुम्ही आपली करमणूक करता का?