व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“तज्ज्ञांचा” उदय आणि पतन

“तज्ज्ञांचा” उदय आणि पतन

“तज्ज्ञांचा” उदय आणि पतन

आजच्या जगात ज्या लोकांकडे कंप्युटर आहे ते इंटरनेटवर मुलांचे संगोपन करण्याकरता आईवडिलांसाठी कोणते मार्गदर्शन आहे हे पाहतात तेव्हा या विषयावर त्यांना २.६ कोटींपेक्षा अधिक संदर्भ मिळतात. हे संदर्भ पाहायला व वाचायला तुम्ही फक्‍त एकच मिनिट जरी घालवलात तरी, तुमचे सर्व संदर्भ वाचून होईपर्यंत तुमचे मूल मोठे होऊन स्वतःच्या पायांवर उभे राहिलेले असेल.

बालरोगतज्ज्ञ, बाल मनोवैज्ञानिक आणि इंटरनेट अस्तित्वात यायच्या आधी पालक मार्गदर्शन कोठून मिळवत असत? सहसा ते आपल्या कुटुंबावर अवलंबून राहायचे. आई, वडील, काका-काकू, मावश्‍या-आत्या मार्गदर्शन देण्यासाठी, आर्थिक हातभार लावण्यासाठी, मुलांचे संगोपन करण्यासाठी तयार असत; शिवाय देऊही शकत होते. पण पुष्कळशा देशांत, बहुसंख्य लोक ग्रामीण भागांतून शहरांत राहायला गेल्यामुळे कुटुबांतील अशी जवळची नाती जवळजवळ नाहीशीच झाली आहेत. आजकाल बहुतेकदा आई वडिलांना एकट्यानेच मुलांचे संगोपन करण्याची जबाबदारी सांभाळावी लागत आहे.

बहुतेककरून हे एक कारण आहे ज्यामुळे आधुनिक दिवसांत मुलांच्या संगोपनाच्या संस्था झपाट्याने वाढत आहेत. दुसरे एक कारण म्हणजे, आज बहुतेक लोकांचा विज्ञानावर विश्‍वास वाढत चालला आहे. अठराशेच्या दशकाच्या शेवटापर्यंत, विज्ञानात मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूत सुधारणा घडवून आणण्याची शक्‍ती आहे अशी बहुतेक अमेरिकन जनतेची खात्री पटली होती. मग, मुलांच्या संगोपनाच्याबाबतीत विज्ञान मार्गदर्शन देऊ शकत नाही का? अमेरिकन नॅशनल काँग्रेस ऑफ मदर्स या संस्थेने १८९९ मध्ये, ‘पालकांच्या अक्षमतेबाबत’ जाहीररीत्या खंत व्यक्‍त केली तेव्हा, अनेक ‘वैज्ञानिक तज्ज्ञमंडळी’ मदतीसाठी धावून आली. या समस्येशी झगडणाऱ्‍या मातांना व वडिलांना मार्गदर्शन देण्याचे त्यांनी आश्‍वासन दिले.

पुस्तकी मार्गदर्शन

एवढे सर्व असूनही या तज्ज्ञ मंडळीला यश लाभले आहे का? गत काळांपेक्षा आजच्या पालकांना कमी चिंता आहेत का? मुलांचे संगोपन करण्यास ते सज्ज आहेत का? ब्रिटनमध्ये अलिकडेच घेतलेल्या एका सर्व्हेवरून तर असे वाटत नाही. लहान मुले असलेले सुमारे ३५ टक्के पालक आजही विश्‍वसनीय मार्गदर्शनाच्या शोधात आहेत, असे या सर्व्हेवरून स्पष्ट झाले. इतरांना वाटते, की त्यांच्याकडे, त्यांना योग्य वाटणाऱ्‍या मार्गाने मुलांचे संगोपन करण्याशिवाय गत्यंतर नाही.

रेझींग अमेरिका: एक्सपट्‌र्स, पॅरंट्‌स ॲण्ड अ सेंचुरी ऑफ ॲडव्हाईस अबाऊट चिल्ड्रन, असे शीर्षक असलेल्या आपल्या पुस्तकात ॲन हलबर्ट, मुलांच्या संगोपनावर तज्ज्ञांच्या पुस्तकांची सुरुवात केव्हा झाली ते सांगतात. दोन मुलांची आई असलेल्या हलबर्ट ही गोष्ट निदर्शनास आणून देतात, की फार कमी तज्ज्ञांची मते, ठोस विज्ञानावर आधारित होती. खरे पाहता, या तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यावर वस्तुनिष्ठ माहितीपेक्षा स्वतःच्या जीवनातल्या अनुभवाचाच जास्त प्रभाव पडलेला दिसतो. भूतकाळाचा विचार करता, असे दिसते की त्यांनी जे काही लिहिले त्यात काही तथ्य नव्हते, ते परस्परविरोधी होते आणि कधीकधी तर अक्षरशः विचित्र होते.

तेव्हा, आजचे पालक कोणत्या परिस्थितीत आहेत? स्पष्ट सांगायचे तर पूर्वीपेक्षा आज इतके सल्ले, इतकी मते, इतके वाद आहेत की कोणते स्वीकारावे आणि कोणते सोडावे हे समजत नसल्यामुळे पुष्कळ पालक गोंधळलेल्या स्थितीत आहेत. परंतु सर्वच पालकांना असे भरकटल्याप्रमाणे वाटत नाही. संपूर्ण जगभरातील पालकांना बुद्धीच्या एका प्राचीन स्रोताचा फायदा होत आहे ज्यात आजच्या दिवसांतही लागू होईल असा विश्‍वसनीय सल्ला आहे. याविषयी पुढील लेखात चर्चा करण्यात आली आहे. (w०६ ११/०१)