व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही ज्यांना शिकवता त्यांच्यात सत्याचे फळ उत्पन्‍न होत आहे का?

तुम्ही ज्यांना शिकवता त्यांच्यात सत्याचे फळ उत्पन्‍न होत आहे का?

तुम्ही ज्यांना शिकवता त्यांच्यात सत्याचे फळ उत्पन्‍न होत आहे का?

यापुढे आपल्याला, स्वतःला यहोवाचा साक्षीदार म्हणवून घ्यायचे नाही असे एरिक नावाच्या मुलाने एके दिवशी आपल्या आईवडिलांना सांगितले तेव्हा त्यांना धक्काच बसला. एरिक कधी असा निर्णय घेईल असे त्यांना स्वप्नातही वाटले नव्हते. लहानपणी एरिक नेमाने कौटुंबिक बायबल अभ्यासाला बसायचा, ख्रिस्ती सभांना यायचा आणि मंडळीसोबत प्रचार कार्यालाही जायचा. तो सत्यात आहे असे त्याच्या आईवडिलांना भासत होते. पण आता, तो गेल्यानंतर, त्यांना जाणवले की सत्य त्याच्यात नव्हते. ही जाणीव एकीकडे अतिशय धक्कादायक, तर दुसरीकडे अत्यंत निराशाजनकही होती.

अशाचप्रकारच्या निराशेच्या भावना एखादा बायबल विद्यार्थी अचानक अभ्यास करण्याचे थांबवतो तेव्हा काहींना येतात. असे घडते तेव्हा ते विचार करू लागतात, ‘असे घडणार याची मला चाहूल कशी लागली नाही?’ तर प्रश्‍न असा उद्‌भवतो, की आपण ज्यांना शिकवत असतो, त्यांच्यामध्ये सत्याचे फळ उत्पन्‍न होत आहे किंवा नाही हे कोणत्याही प्रकारची आध्यात्मिक दुर्घटना घडण्याआधी ठरवता येणे शक्य आहे का? तसेच, आपण ज्यांना शिकवतो त्यांच्यासोबतच आपल्या स्वतःमध्ये सत्य क्रियाशील आहे किंवा नाही याची खात्री कशी केली जाऊ शकते? बी पेरणाऱ्‍याच्या सुपरिचित दाखल्यात येशूने जे सांगितले त्याच्या साहाय्याने या प्रश्‍नांची उत्तरे आपण मिळवू शकतो.

सत्य अंतःकरणापर्यंत पोचले पाहिजे

येशूने म्हटले: “बी हे देवाचे वचन आहे. चांगल्या मातीत पडलेले हे आहेत की, ते वचन ऐकून सालस व चांगल्या अंतःकरणात धरून ठेवतात आणि धीराने फळ देत जातात.” (लूक ८:११, १५) त्याअर्थी, राज्याविषयीचे सत्य शिकल्यावर त्याचे आपल्या विद्यार्थ्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारचे फळ दिसून यायचे असेल, तर प्रथम या सत्याने त्यांच्या लाक्षणिक अंतःकरणात मूळ धरले पाहिजे. येशू आपल्याला आश्‍वासन देतो की चांगल्या जमिनीत पडणारे उत्तम बी ज्याप्रमाणे लगेच वाढू लागते व फळ देते त्याप्रमाणे देवाच्या वचनातील सत्य चांगल्या अंतःकरणात रुजताच त्याचे फळ निश्‍चितच दिसून येईल. आपण कशाची अपेक्षा करू शकतो?

आपण केवळ वरकरणी दिखाव्यावर नव्हे, तर हृदयापासून व्यक्‍त होणाऱ्‍या गुणांकडे लक्ष दिले पाहिजे. एखादी व्यक्‍ती उपासनेचा नित्यक्रम काटेकोरपणे पाळत असेल, पण यावरून तिच्या अंतःकरणात काय चालले आहे हे नेहमीच दिसून येत नाही. (यिर्मया १७:९, १०; मत्तय १५:७-९) म्हणूनच आपण वरवर नव्हे तर खोलात शिरून पाहिले पाहिजे. त्या व्यक्‍तीच्या इच्छा, हेतू आणि तिला महत्त्वाच्या वाटणाऱ्‍या गोष्टी यांत फरक झालेला दिसून आला पाहिजे. तिने देवाच्या इच्छेनुसार असलेले नवे व्यक्‍तिमत्त्व संपादन करण्यास सुरुवात केली आहे हे दिसून आले पाहिजे. (इफिसकर ४:२०-२४) उदाहरणार्थ: पौल सांगतो, की थेस्सलनीकाकरांनी सुवार्ता ऐकल्यावर त्यास देवाचे वचन म्हणून स्वीकारले. पण सत्य त्यांच्यात “कार्य करीत आहे” याची त्याला खात्री केव्हा पटली, तर त्यांनी नंतर धीर, विश्‍वासूपणा व प्रीती यांसारखे गुण प्रदर्शित केले तेव्हा.—१ थेस्सलनीकाकर २:१३, १४; ३:६.

अर्थात, एरिकच्या उदाहरणावरून दिसून येते त्याप्रमाणे, सत्य शिकणाऱ्‍या व्यक्‍तीच्या अंतःकरणात जे काही असेल ते आज ना उद्या त्या व्यक्‍तीच्या वर्तनावरून उजेडात येईल. (मार्क ७:२१, २२; याकोब १:१४, १५) पण, कधीकधी एखाद्या व्यक्‍तीच्या कृतींतून तिचे वाईट गुण स्पष्टपणे दिसून येईपर्यंत खूप उशीर झालेला असतो. तेव्हा विशिष्ट अवगुण आध्यात्मिक प्रगतीत बाधा बनण्याआधीच ते ओळखणे महत्त्वाचे आहे. यासाठी व्यक्‍तीच्या लाक्षणिक अंतःकरणात डोकवावे लागेल. पण हे कसे शक्य आहे?

येशूकडून शिका

अर्थात, येशू लोकांच्या मनात काय चालले आहे हे अचूकपणे ओळखू शकत होता. (मत्तय १२:२५) आपल्यापैकी कोणाजवळही ही शक्‍ती नाही. पण तरीसुद्धा येशूने दाखवून दिले की आपणही एका व्यक्‍तीच्या इच्छा, हेतू व तिला कोणत्या गोष्टी खरोखर महत्त्वाच्या वाटतात हे ओळखू शकतो. शारीरिक हृदयात झालेला बिघाड शोधून काढण्याकरता डॉक्टर निरनिराळ्या निदान पद्धती वापरतात. त्याचप्रमाणे, चारचौघांना दिसण्याइतपत अद्याप स्पष्ट न झालेले “मनातील विचार व हेतु,” येशूने देवाच्या वचनाच्या साहाय्याने ‘बाहेर काढले.’—नीतिसूत्रे २०:५; इब्री लोकांस ४:१२.

उदाहरणार्थ, एकदा येशूने पेत्राचा एक अवगुण त्याच्या लक्षात आणून दिला. नंतर याच अवगुणामुळे पेत्र अडखळला देखील. पेत्राचे आपल्यावर प्रेम आहे हे येशूला माहीत होते. किंबहुना, येशूने नुकत्याच “स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या” पेत्राच्या स्वाधीन केल्या होत्या. (मत्तय १६:१३-१९) पण आपल्या प्रेषितांवर सैतानाचा डोळा आहे आणि भविष्यात त्यांच्यावर हातमिळवणी करण्याचा दबाव आणला जाईल याची येशूला जाणीव होती. आपल्या शिष्यांपैकी काहीजणांचा विश्‍वास हवा तितका मजबूत नाही हेही येशूने ओळखले होते. तेव्हा, त्यांनी कोणत्या बाबतीत सुधारणा करण्याची गरज आहे हे त्यांच्या लक्षात आणून देण्यास तो कचरला नाही. त्याने हा विषय कशाप्रकारे मांडला?

मत्तय १६:२१ म्हणते: “तेव्हापासून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगू लागला की, मी . . . पुष्कळ दुःखे सोसावी, जिवे मारले जावे . . . ह्‍याचे अगत्य आहे.” मूळ भाषेतील मजकुरानुसार, येशूने त्यांना केवळ सांगण्यास नव्हे, तर दाखवण्यास सुरुवात केली की त्याला भविष्यात काय काय सोसावे लागेल. कदाचित त्याने स्तोत्र २२:१४-१८ किंवा यशया ५३:१०-१२ यांसारख्या शास्त्रवचनांचा उपयोग केला असावा, ज्यात मशीहाला दुःखे सोसून मरावे लागेल हे सूचित करण्यात आले आहे. काहीही असो, शास्त्रवचनांतून वाचून दाखवण्याद्वारे किंवा ती उद्धृत करण्याद्वारे येशूने पेत्राला व इतरांना त्यांची मनःपूर्वक प्रतिक्रिया व्यक्‍त करण्याची संधी दिली. छळ होण्याविषयी ऐकल्यावर त्यांची काय प्रतिक्रिया होती?

एरवी अतिशय धैर्यवान व आवेशी वाटणारा पेत्र या प्रसंगी अतिशय अविचारीपणे प्रतिक्रिया व्यक्‍त करतो आणि त्यावरून त्याच्या विचारसरणीत असलेला गंभीर दोष उजेडात येतो. तो म्हणतो, “प्रभुजी, आपणावर दया असो, असे आपल्याला होणारच नाही.” पेत्राची विचार करण्याची पद्धत निश्‍चितच योग्य नव्हती; येशूने म्हटल्याप्रमाणे, ‘तो मानवाच्या दृष्टिकोणातून विचार करत होता, देवाच्या दृष्टिकोणातून नाही.’ (सुबोध भाषांतर) ही एक गंभीर चूक होती जिच्यामुळे भयंकर दुष्परिणाम घडण्याची शक्यता होती. मग येशूने काय केले? पेत्राची चूक त्याच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्याने पेत्राला व बाकीच्या शिष्यांना सांगितले: “माझ्यामागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे.” स्तोत्र ४९:८ व ६२:१२ यात सुचवल्याप्रमाणे त्याने त्यांना याची आठवण करून दिली की त्यांचे सार्वकालिक भविष्य देवाच्या हाती आहे, मनुष्याच्या हाती नाही, कारण मानवांकडून तारण मिळणे शक्य नाही.—मत्तय १६:२२-२८.

नंतर पेत्राने लोकांना भिऊन तीन वेळा येशूला नाकारले; पण तरीसुद्धा या व अशा इतर चर्चांमुळे त्याला लवकरात लवकर आध्यात्मिकरित्या स्वतःला सावरण्यास मदत मिळाली असे म्हणता येईल. (योहान २१:१५-१९) केवळ ५० दिवसांनंतर, पेत्र धैर्याने जेरूसलेममधील जमावापुढे उभा राहिला आणि त्याने येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष दिली. येणाऱ्‍या आठवड्यांत, महिन्यांत व वर्षांत त्याने वारंवार अटक, मारहाण व तुरुंगवास यांसारख्या परीक्षांना धैर्यपूर्वक तोंड दिले आणि अशारितीने निर्भयतेने विश्‍वासात टिकून राहण्याचे उत्तम उदाहरण सर्वांकरता पुरवले.—प्रेषितांची कृत्ये २:१४-३६; ४:१८-२१; ५:२९-३२, ४०-४२; १२:३-५.

यातून आपण काय शिकतो? पेत्राच्या अंतःकरणात जे होते ते बाहेर काढण्याकरता येशूने काय केले याकडे तुम्ही लक्ष दिले का? सर्वप्रथम त्याने एका विशेष मुद्द्‌याकडे पेत्राचे लक्ष वेधण्याकरता योग्य शास्त्रवचने निवडली. यानंतर त्याने पेत्राला मनापासून प्रतिक्रिया व्यक्‍त करण्याची संधी दिली. शेवटी त्याने शास्त्रवचनांतून आणखी मार्गदर्शन पुरवून पेत्राला त्याची विचारसरणी बदलण्यास मदत केली. इतक्या उत्तम प्रकारे शिकवणे आपल्याला जमण्यासारखे नाही असा कदाचित तुम्ही विचार करत असाल. पण आपण आता अशा दोन अनुभवांवर विचार करू या, ज्यांवरून दिसून येते की उत्तम तयारी केल्यामुळे व यहोवावर विसंबून राहिल्यामुळे येशूचे अनुकरण करण्यास कशाप्रकारे कोणालाही मदत मिळू शकते.

मनातले विचार बाहेर काढणे

पहिल्या व दुसऱ्‍या वर्गात शिकणाऱ्‍या आपल्या दोन मुलांनी त्यांच्या शिक्षिकेच्या टेबलावरून कॅन्डीज घेतल्या हे एका ख्रिस्ती पित्याला समजले तेव्हा त्याने त्यांच्यासोबत बसून याविषयी चर्चा केली. ही काय लहानशी चूक आहे, मुलांच्या हातून अशा चुका होतातच असे म्हणून दुर्लक्ष करण्याऐवजी, हा पिता सांगतो, “मी त्यांच्या मनातले विचार, ही चूक करण्यास ते कशामुळे प्रवृत्त झाले हे बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.”

पित्याने मुलांना यहोशवा अध्याय ७ यात दिलेल्या आखानच्या उदाहरणाची आठवण करून दिली. मुलांना लगेच आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्यांनी ती कबूल केली. त्यांचा विवेक आधीपासूनच त्यांना टोचत होता. म्हणून पित्याने त्यांना इफिसकर ४:२८ वाचायला लावले ज्यात म्हटले आहे: “चोरी करणाऱ्‍याने पुन्हा चोरी करु नये, तर त्यापेक्षा गरजवंताला द्यावयास आपल्याजवळ काही असावे म्हणून . . . उद्योग करीत राहावे.” त्याने मुलांना कॅन्डी विकत घेऊन आपल्या शिक्षिकेला द्यायला लावली; यामुळे शास्त्रवचनांतून दिलेले मार्गदर्शन आणखीनच परिणामकारक ठरले.

हा पिता सांगतो, “आमच्या मुलांनी वाईट हेतूंनी काहीतरी केले हे कळताच आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करून, ते वाईट हेतू त्यांच्या मनातून समूळ काढण्याचा आणि त्याठिकाणी चांगले, शुद्ध हेतू रुजवण्याचा प्रयत्न केला.” आपल्या मुलांना शिकवताना येशूचे अनुकरण केल्यामुळे या आईवडिलांना कालांतराने उत्तम परिणाम दिसून आले. त्यांच्या दोन्ही मुलांना ब्रुकलिन येथे असलेल्या मुख्यालयातील बेथेलमध्ये कार्य करण्याकरता निमंत्रण देण्यात आले; आज २५ वर्षांनंतरही त्यांचा एक मुलगा तेथेच सेवा करत आहे.

आणखी एका ख्रिस्ती बहिणीने अशाचप्रकारे आपल्यासोबत अभ्यास करणाऱ्‍या एका स्त्रीला मदत केली. ही स्त्री सभांना येत होती आणि सेवाकार्यातही सहभाग घेत होती. तिने बाप्तिस्मा घेण्याची इच्छा देखील व्यक्‍त केली होती. पण ती यहोवापेक्षा स्वतःवर जास्त विसंबून राहते असे तिचा अभ्यास घेणाऱ्‍या बहिणीच्या लक्षात आले. ती सांगते: “ही स्त्री अविवाहित होती व एकटीच राहात होती. त्यामुळे तिच्या लक्षात आले नव्हते तरीसुद्धा ती अतिशय स्वतंत्र वृत्तीची बनली होती. मला कधीकधी भीती वाटायची की तिला एकतर नर्व्हस ब्रेकडाऊन (मनोविकार) तरी होईल नाहीतर ती आध्यात्मिकरित्या तरी पडेल.”

साक्षीदार बहिणीने पुढाकार घेऊन आपल्या या विद्यार्थिनीला मत्तय ६:३३ या वचनाच्या साहाय्याने आपल्या समस्येविषयी विचार करण्यास मदत केली. तिने तिला आपल्या जीवनातल्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या यावर फेरविचार करण्याचे, देवाच्या राज्याला प्राधान्य देण्याचे आणि आपल्या निर्णयांवर यहोवा आशीर्वाद देईल असा पूर्ण भरवसा बाळगण्याचे प्रोत्साहन दिले. तिने या स्त्रीला स्पष्टपणे विचारले: “एकटीच राहात असल्यामुळे कधीकधी तुला इतरांवर, अगदी यहोवावरही विसंबून राहणे कठीण वाटते का?” विद्यार्थिनीने कबूल केले की आपण यहोवाला प्रार्थना करायचे जवळजवळ बंदच केले आहे. बहिणीने मग तिला स्तोत्र ५५:२२ यातील सल्ल्याचे पालन करण्याचे व यहोवावर आपला सर्व भार टाकून देण्याचे उत्तेजन दिले कारण १ पेत्र ५:७ सांगते त्याप्रमाणे तो आपली “काळजी घेतो.” हे शब्द वाचल्यावर ती स्त्री भारावून गेली. साक्षीदार बहीण सांगते, “ती मुळात हळवी नाही, पण त्या दिवशी ती रडली.”

स्वतःच्या जीवनात सत्याला कार्य करू द्या

आपण ज्यांना शिकवतो ते बायबलमधील सत्याला प्रतिसाद देतात तेव्हा आपल्याला अवर्णनीय आनंद होतो. पण इतरांना मदत करण्याचे आपले प्रयत्न यशस्वी होण्याकरता प्रथम आपण उत्तम आदर्श मांडला पाहिजे. (यहूदा २२, २३) सर्वांनीच “भीत व कापत आपले तारण साधून” घेणे गरजेचे आहे. (फिलिप्पैकर २:१२) याकरता आपण वेळोवेळी शास्त्रवचनांच्या प्रकाशात आपल्या स्वतःच्या अंतःकरणातील प्रवृत्तींचे, इच्छांचे व भावनांचे परीक्षण केले पाहिजे आणि कोठे सुधारणा करण्याची गरज आहे हे पाहिले पाहिजे.—२ पेत्र १:१९.

उदाहरणार्थ, ख्रिस्ती कार्यांविषयीचा तुमचा आवेश अलीकडे कमी झाला आहे का? असल्यास, असे का घडले? याचे एक कारण असे असू शकते की तुम्ही स्वतःच्या बळावर जास्त विसंबून राहात असाल. तुमच्याबाबतीत असे घडत आहे हे तुम्ही कसे ठरवू शकता? हाग्गय १:२-११ ही वचने वाचा आणि बंदिवासातून परतलेल्या यहुद्यांना विचार करण्यास मदत करण्यासाठी यहोवा कशाप्रकारे त्यांच्याशी तर्क करत आहे याचे प्रामाणिकपणे परीक्षण करा. मग स्वतःला हे प्रश्‍न विचारा: ‘आर्थिक सुरक्षा आणि भौतिक सुखसोयी यांविषयी मी फाजील काळजी करतो का? आध्यात्मिक कार्यांना प्राधान्य दिल्यास यहोवा माझ्या कुटुंबाची काळजी घेईल असा खरोखर मला भरवसा वाटतो का? की मी स्वतः आधी आपली सोय करावी असे मला वाटते?’ जर तुमच्या विचारसरणीत फेरबदल करण्याची गरज आहे असे तुम्हाला आढळले तर असे करण्यास उशीर करू नका. मत्तय ६:२५-३३, लूक १२:१३-२१ व १ तीमथ्य ६:६-१२ यांसारख्या शास्त्रवचनांत सापडणारा सल्ला आपल्याला भौतिक गरजांविषयी व संपत्तीविषयी वाजवी रित्या विचार करण्यास मदत करतो; आणि अशाच दृष्टिकोनामुळे आपल्याला जीवनात सतत यहोवाचा आशीर्वाद मिळतो.—मलाखी ३:१०.

अशाप्रकारचे प्रामाणिक आत्मपरीक्षण कधीकधी आपल्याला गांभीर्याने विचार करण्यास भाग पाडते. आपले दोष लक्षात आणून दिले जातात तेव्हा ते लगेच कबूल करणे तितके सोपे नसते. तरीसुद्धा, आपल्या मुलांना, बायबल विद्यार्थ्याला किंवा स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करताना प्रेमळपणे पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे. समस्या कितीही वैयक्‍तिक स्वरूपाची किंवा नाजूक असली तरीसुद्धा अशाप्रकारे ती हाताळल्यास, कदाचित त्या व्यक्‍तीचे किंवा स्वतःचे जीवन वाचवण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल ठरू शकते.—गलतीकर ६:१.

पण तुम्ही प्रयत्न करूनही हवे तसे चांगले परिणाम दिसून आले नाहीत तर? खचून जाऊ नका. अपरिपूर्ण हृदयातील बिघाड दूर करण्यासाठी तुम्हाला अतिशय काळजीपूर्वक काम करावे लागेल. कदाचित बराच वेळ लागेल आणि कधीकधी तुम्ही निराशही व्हाल. पण हे अतिशय समाधानदायकही ठरू शकते.

सुरुवातीला ज्याचा उल्लेख करण्यात आला होता, त्या एरिक नावाच्या मुलाचे कालांतराने डोळे उघडले आणि तो पुन्हा ‘सत्यात चालू लागला.’ (२ योहान ४) तो म्हणतो, “आपण काय गमावले आहे याची जाणीव झाल्यावर मी यहोवाकडे परत फिरलो.” आपल्या आईवडिलांच्या मदतीने एरिक आता एकदा विश्‍वासूपणे देवाची सेवा करत आहे. एरिकचे आईवडील पूर्वी त्याला आपल्या हृदयाचे परीक्षण करण्यासाठी वारंवार मदत करण्याचा प्रयत्न करायचे तेव्हा त्याला अक्षरशः त्यांचा राग यायचा पण आज तो त्यांनी जे काही केले त्याबद्दल कृतज्ञ आहे. तो म्हणतो, “माझे आईवडील खूप चांगले आहेत. माझ्यावरचे त्यांचे प्रेम कधीच बदलले नाही.”

आपण ज्यांना शिकवतो त्यांना देवाच्या वचनाचा प्रकाश दाखवून, त्यांच्या अंतःकरणाचे परीक्षण करण्यास मदत करणे हे एक प्रेमळपणाचे कृत्य आहे. (स्तोत्र १४१:५) आपल्या मुलांमध्ये व बायबल विद्यार्थ्यांमध्ये नवे ख्रिस्ती व्यक्‍तिमत्त्व खरोखर विकसित होत आहे किंवा नाही याची खात्री करण्याकरता त्यांच्या अंतःकरणाचे परीक्षण करण्याचा प्रयत्न करत राहा. ‘सत्याचे वचन नीट सांगण्याद्वारे’ इतरांत व स्वतःत सत्याला सदोदीत कार्य करू द्या.—२ तीमथ्य २:१५.

[२९ पानांवरील चित्र]

येशूच्या शब्दांनी पेत्राचा दोष उघडकीस आणला

[३१ पानांवरील चित्र]

मनातले विचार बाहेर काढण्यासाठी बायबलचा उपयोग करा