व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“नद्या टाळ्या वाजवोत”

“नद्या टाळ्या वाजवोत”

यहोवाच्या निर्मितीतील शोभा

“नद्या टाळ्या वाजवोत”

पृथ्वीच्या नकाशावर एक नजर टाकल्यावर बहुतेक ठिकाणी जमिनीला छेदणाऱ्‍या नागमोडी वळणाच्या रेषा तुम्हाला दिसतील. ही नागमोडी वळणे मैदाने, वाळवंट आणि गवताळ प्रदेश पार करून डोंगरदऱ्‍यांना व जंगलांना भेदून जातात. (हबक्कूक ३:९) ही नागमोडी वळणे म्हणजे नद्या, पृथ्वीग्रहाची सजीवता कायम ठेवणाऱ्‍या जीवनसरिता. हे पाट, पृथ्वीचा निर्माणकर्ता, यहोवा याच्या बुद्धीची व शक्‍तीची ग्वाही देतात. त्यांना पाहून आपल्यालाही स्तोत्रकर्त्याप्रमाणे वाटते, ज्याने गायिले: “नद्या टाळ्या वाजवोत; पर्वत एकवटून परमेश्‍वरासमोर आनंदाने गावोत.”—स्तोत्र ९८:८, ९. *

नद्या मानवी इतिहासाशी जवळून निगडीत आहेत. बायबलमध्ये चार मुख्य नद्यांविषयी सांगितले आहे ज्या एदेनमधून सुरू होणाऱ्‍या एका नदीपासून फुटल्या होत्या. (उत्पत्ति २:१०-१४) सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक, मध्य पूर्वेतील टायग्रीस व फरात नद्यांच्या सुपीक खोऱ्‍यांमध्ये उदयास आली. चीनमधील ह्वांग नदी, दक्षिण आशियातील गंगा व हिंद व ईजिप्तमधील नाईल नद्यांमुळे मोठमोठ्या संस्कृती निर्माण होऊ शकल्या.

म्हणूनच, नद्यांचे सामर्थ्य, विपुलता आणि सौंदर्य याबद्दल मानवांनी नेहमीच आश्‍चर्य व्यक्‍त केले आहे. ईजिप्तच्या नाईल नदीचा पल्ला ६,६७० किलोमीटर इतका आहे. दक्षिण अमेरिकेतील ॲमझोन हिला सर्वात मोठी नदी असल्याचे श्रेय दिले जाते. काही नद्या प्रचंड मोठ्या आहेत, तर काही जपानमधील लहान परंतु वेगाने वाहणाऱ्‍या टोने नदीसारख्या अत्यंत सुंदर आहेत.

नदीला प्रवाह कशामुळे मिळतो? एका शब्दात उत्तर द्यायचे तर गुरुत्वाकर्षणामुळे. गुरुत्वाकर्षणामुळेच उंच ठिकाणांहून पाणी खालच्या ठिकाणी येते. काहीवेळा यामुळे गर्जणारे धबधबे निर्माण होतात. शक्‍ती आणि सौंदर्याच्या या प्रदर्शनांचे वर्णन बायबलमध्ये या शब्दांत केले आहे: “हे परमेश्‍वरा, नद्यांनी कल्लोळ केला आहे, महानाद केला आहे; नद्यांनी आपल्या लाटांनी गर्जना केली आहे.”—स्तोत्र ९३:३.

“पर्जन्याचा लोट खाली यावा म्हणून पाट कोण फोडितो?” असा प्रश्‍न यहोवाने सात्विक ईयोबाला विचारला. (ईयोब ३८:२५) खरेच, इतके पाणी येते तरी कोठून? याला कारणीभूत आहे पाण्याचे चक्र म्हटलेली क्लिष्ट रचना. सूर्याच्या ऊर्जेमुळे आणि गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील पाण्याचे एक चक्र सतत चालू असते. पाण्याचे बाष्पीभवन झाल्यावर ते वातावरणात वर जाते. कालांतराने ते थंड होऊन त्याचे ढग निर्माण होतात. आणि नतंर, हे बाष्प हिम किंवा पावसाच्या रूपात पृथ्वीवर पुन्हा येते. महासागर, सरोवरे, नद्या, हिमनद्या, ध्रुव प्रदेशातील बर्फ आणि जमिनीखाली पुष्कळसे पाणी साठवले जाते.

या उल्लेखनीय चक्राविषयी बायबल म्हणते: “सर्व नद्या सागराला जाऊन मिळतात तरी सागर भरून जात नाही; ज्या स्थली त्या जाऊन मिळतात तेथेच त्या पुनः पुनः वाहत राहतात.” (उपदेशक १:७) असीम बुद्धी असलेला आणि प्रेमळ काळजी करणारा देव यहोवा हाच केवळ असे चक्र सुरू करण्यास समर्थ आहे. ही कल्पक रचना आपल्याला देवाच्या व्यक्‍तित्वाविषयी काय सांगते? हेच की तो अत्यंत बुद्धिमान आणि प्रेममय काळजी घेणारा देव आहे.—स्तोत्र १०४:१३-१५, २४, २५; नीतिसूत्रे ३:१९, २०.

नद्यांचा आकार मोठा असला आणि त्या बहुसंख्येत असल्या तरी जगातील गोड्या पाण्याचे फार कमी प्रमाण त्यांच्यात असते. तरीही, जीवनासाठी त्या आवश्‍यक आहेत. वॉटर या पुस्तकात म्हटले आहे की, “पाणी उपलब्ध नसले आणि पाण्यावर काही प्रमाणात नियंत्रण ठेवले नाही तर मानवी जीवनाच्या सर्वात मूलभूत आणि सर्वात जटिल गरजा पुरवणे अशक्य होऊन बसेल. या गोष्टीला मानवजातीने दाखवलेल्या प्रतिक्रियेचा अहवाल हाच बहुतांशी संस्कृतीचा इतिहास आहे.”

हजारो वर्षांपासून नद्यांनी मनुष्याची तहान भागवली आहे आणि त्याच्या बागांना पाणी पुरवले आहे. बहुतेक नद्यांच्या बाजूने असलेली सुपीक जमीन पीक काढण्यासाठी उत्तम असते. हीच कल्पना, यहोवाच्या सेवकांना मिळालेल्या आशीर्वादात कशी व्यक्‍त करण्यात आली आहे ते पाहा: “हे याकोबा, तुझे डेरे, हे इस्राएला, तुझे निवासमंडप किती रमणीय आहेत! खजुरीच्या विस्तृत बनासारखे, नदीतीरीच्या बागांसारखे, परमेश्‍वराने लाविलेल्या अगरू वृक्षांसारखे, पाण्याजवळच्या गंधसरूंसारखे ते आहेत.” (गणना २४:५, ६) येथे चित्रात दिसणारे बदक आणि कोल्ह्यासारखे प्राणीही नदीवर उपजीविका करतात. खरोखर, नद्यांविषयी आपण जितके अधिक शिकू तितकेच यहोवाचे आभार मानण्यास प्रवृत्त होऊ.

[तळटीप]

^ परि. 3 पाहा २००४ कॅलेंडर ऑफ जेहोवाज विटनेसेस, मे/जून.

[८ पानांवरील चौकट/चित्र]

अर्जेंटिना आणि ब्राझीलच्या सीमेवरील इग्वाकु धबधबा हा सर्वात विस्तृत धबधब्यांमध्ये गणला जातो. त्याचा विस्तार तीन किलोमीटरहून अधिक आहे. सुंदर उष्णकटिबंधीय जंगलात वसलेला हा धबधबा जवळजवळ ३०० लहान धबधब्यांचा मिळून बनला आहे. पावसाळ्यात दर सेकंदाला सुमारे १०,००० चौरस मीटर पाणी त्यातून पडत असते.

[९ पानांवरील चित्र]

टोने नदी, जपान