व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

एकमेकांना आधार द्या

एकमेकांना आधार द्या

एकमेकांना आधार द्या

“ते मला . . . फार मोठा आधार आहेत.”—कलस्सैकर ४:११, इजी टू रीड व्हर्शन.

१, २. पौलाला तुरुंगात जाऊन भेटणे जिकरीचे असूनही त्याच्या मित्रांनी असे का केले?

तुरुंगात खितपत पडलेल्या एखाद्या व्यक्‍तीचा मित्र असणे धोकेदायक असू शकते—तुमच्या मित्राला अन्यायाने तुरुंगात डांबण्यात आले असले तरीसुद्धा. तुरुंगातील अधिकारी तुमच्याकडे संशयाने पाहतील, तुम्ही कोणत्याही प्रकारचा गुन्हा करू नये म्हणून ते तुमच्या सर्व हालचालींवर बारीक नजर ठेवतील. म्हणूनच, तुमच्या मित्राशी संपर्क ठेवणे आणि त्याला तुरुंगात जाऊन भेटणे मोठ्या जिकरीचे काम असू शकते.

पण जवळजवळ १,९०० वर्षांआधी प्रेषित पौलाच्या काही मित्रांनी अगदी हेच केले. तुरुंगवासात असलेल्या पौलाला आवश्‍यक असलेले सांत्वन व प्रोत्साहन देण्याकरता व आध्यात्मिकरित्या त्याला बळकट करण्याकरता त्याला जाऊन भेटण्याचे धैर्य त्यांनी केले. हे विश्‍वासू मित्र कोण होते? आणि त्यांचे धैर्य, एकनिष्ठा आणि मैत्री यावरून आपण काय शिकू शकतो?—नीतिसूत्रे १७:१७.

“आधार”

३, ४. (अ) पौलाचे पाच मित्र कोण आहेत आणि त्याच्याकरता ते काय बनले? (ब) “आधार” म्हणजे काय?

काहीवेळासाठी, आपण सा.यु. ६० सालात आहोत असे समजू या. प्रेषित पौलाला देशद्रोहाच्या खोट्या आरोपावरून रोममधील तुरुंगात डांबून ठेवण्यात आले आहे. (प्रेषितांची कृत्ये २४:५; २५:११, १२) आपल्या पाठीशी उभ्या राहिलेल्या खास पाच ख्रिस्ती बांधवांचा पौल नावाने उल्लेख करतो: तुखिक, जो आशिया प्रांतातून पौलासोबत आला होता व ‘प्रभूमधील त्याचा सोबतीचा दास’; अनेसिम, कलोसे येथला एक “विश्‍वासू व प्रिय बंधू”; अरिस्तार्ख, थेस्सलोनीका येथला एक मासेदोनी आणि एकेकाळी पौलाच्या “सोबतीचा बंदिवान” असणारा; मार्क, हा पौलासोबत मिशनरी यात्रा करणाऱ्‍या बर्णबाचा भाऊबंद आणि त्याच्याच नावाचे शुभवर्तमान पुस्तक लिहिणारा; आणि युस्त, “देवाच्या राज्याकरिता” पौलाचे सहकारी असणाऱ्‍यांपैकी एक बंधू. या पाच जणांबद्दल पौल म्हणतो: “ते मला फार मोठा आधार आहेत.”—कलस्सैकर ४:७-११.

आपल्या निष्ठावान साथीदारांनी दिलेल्या मदतीबद्दल पौलाने अतिशय प्रभावशाली विधान केले. त्याने एका ग्रीक शब्दाचा (पॅरेगोरीया) वापर केला ज्याचे भाषांतर “आधार” असे केले आहे; बायबलमध्ये केवळ या एका वचनात हा शब्द आढळतो. या शब्दाचे अनेक अर्थ असून तो मुळात औषधी संदर्भांत वापरला जात असे. * त्याचे भाषांतर ‘सांत्वन, दुःखपरिहार, दिलासा किंवा आराम’ असे करता येते. पौलाला याच प्रकारच्या आधाराची गरज होती आणि या पाच बांधवांनी त्याला तो आधार पुरवला.

पौलाला ‘आधाराची’ गरज का होती?

५. एक प्रेषित असूनही पौलाला कशाची गरज होती आणि आपल्या सर्वांना वेळोवेळी कशाची गरज पडते?

काहींना वाटेल, की पौल तर स्वतः एक प्रेषित होता. त्याला आधाराची काय गरज? पण त्यालाही आधाराची गरज होती. त्याचा विश्‍वास मजबूत होता यात शंका नाही; तसेच, त्याने बऱ्‍याच शारीरिक यातना देखील सोसल्या होत्या; “बेसुमार फटके,” “पुष्कळ वेळा मृत्यूच्या दाढेत” जाणे व इतर क्लेश त्याने भोगले होते. (२ करिंथकर ११:२३-२७) पण काही झाले तरी तो देखील एक माणूसच होता आणि सर्व मानवांना कधी न कधी सांत्वनाची गरज पडते; आपला विश्‍वास अधिक दृढ करण्याकरता त्यांना इतरांची मदत लागते. हे येशूच्या बाबतीतही खरे ठरले. त्याच्या शेवटल्या रात्री एका स्वर्गदूताने येऊन त्याला ‘शक्‍ति दिली.’—लूक २२:४३.

६, ७. (अ) रोममध्ये कोणी पौलाची निराशा केली आणि त्याला प्रोत्साहन कोणी दिले? (ब) पौलाच्या ख्रिस्ती बांधवांनी त्याला रोममध्ये कोणत्या प्रकारे मदत करण्याद्वारे ते त्याच्याकरता “आधार” बनले?

पौलालाही आधाराची गरज होती. रोममध्ये तो एक कैदी म्हणून आला तेव्हा त्याच्या स्वतःच्या जातीच्या लोकांनी त्याचे प्रेमाने स्वागत केले नाही. या यहूद्यांपैकी बहुतेकजण राज्य संदेश स्वीकारू इच्छित नव्हते. यहुद्यांपैकी काही मुख्य पुरुषांनी पौल कैदेत असताना त्याला भेट दिली; त्याविषयी प्रेषितांची कृत्ये यातील अहवाल असे सांगतो: “त्याने जे सांगितले त्यावरून कित्येकांची खातरी झाली तर कित्येक विश्‍वास ठेविनात. त्यांचे आपसात एकमत न झाल्यामुळे ते उठून जाऊ लागले.” (प्रेषितांची कृत्ये २८:१७, २४, २५) यहोवाच्या अपात्री कृपेविषयी त्यांना कदर नाही हे पाहून पौलाला किती दुःख झाले असेल! याबाबतीत त्याच्या तीव्र भावना, काही वर्षांपूर्वी त्याने रोममधील मंडळीला लिहिलेल्या पत्रावरून आपण समजू शकतो: “मला मोठा खेद वाटतो व माझ्या अंतःकरणामध्ये अखंड वेदना आहेत. कारण माझे बंधुजन [यहुदी] म्हणजे देहदृष्ट्या माझे नातेवाईक ह्‍यांच्यासाठी मी स्वतः ख्रिस्तापासून शापभ्रष्ट व्हावे हे शक्य असते तर मी तशी इच्छा केली असती.” (रोमकर ९:२, ३) पण तरीसुद्धा रोममध्ये त्याला काही निष्ठावान व विश्‍वासू साथीदार सापडले ज्यांचे धैर्य व प्रेम पाहून त्याला सांत्वन मिळाले. हे त्याचे खरे आध्यात्मिक बंधुजन होते.

ते पाच बंधू पौलाकरता आधार कशाप्रकारे बनले? पौल तुरुंगात आहे म्हणून त्यांनी त्याला टाळले नाही. उलट त्यांनी स्वखुषीने व प्रेमळपणे पौलाकरता काही वैयक्‍तिक कामे केली, आणि कैदेत असल्यामुळे त्याला स्वतःला करता येणे शक्य नव्हते अशी कामे त्याच्याकरता केली. उदाहरणार्थ, त्यांनी निरोप्यांचे काम केले व पौलाची पत्रे व त्याचे तोंडी संदेश वेगवेगळ्या मंडळ्यांत पोचवले; त्यांनी रोम व इतरत्र असलेल्या बांधवांची खुशाली पौलाला कळवून त्याला प्रोत्साहन दिले. तसेच, त्यांनी कदाचित आवश्‍यक वस्तू, उदाहरणार्थ, हिवाळ्याकरता लागणारे गरम कपडे, गुंडाळ्या व लिहिण्याची साधने देखील त्याला आणून दिली असावीत. (इफिसकर ६:२१, २२; २ तीमथ्य ४:११-१३) या सर्व मदतीमुळे कैदेत असलेल्या पौलाला मदत मिळाली आणि यामुळे तो स्वतः देखील इतरांना व सबंध मंडळ्यांना एक “आधार” बनू शकला.—रोमकर १:११, १२.

आपण “आधार” कसे होऊ शकतो

८. पौलाने आपल्याला ‘आधाराची’ गरज असल्याचे नम्रपणे कबूल केले यावरून आपण काय शिकू शकतो?

पौल व त्याच्या पाच सहकाऱ्‍यांच्या उदाहरणावरून आपण काय शिकतो? शिकता येण्यासारख्या एका खास मुद्द्‌यावर लक्ष देऊ: एखाद्यावर संकट येते तेव्हा त्याच्या मदतीला धावून जाण्याकरता धैर्य व आत्मत्याग दाखवावा लागतो. तसेच आपल्यावर संकट आल्यास आपल्याला इतरांच्या मदतीची गरज पडेल हे कबूल करण्यास नम्रता लागते. पौलाने आपल्याला मदतीची गरज असल्याचेच केवळ कबूल केले नाही, तर त्याला देण्यात आलेली मदत त्याने विनम्रपणे स्वीकारली आणि ज्यांनी ती दिली होती त्यांची त्याने प्रशंसा केली. इतरांकडून मदत घेणे हे दुर्बलतेचे लक्षण आहे किंवा अपमानास्पद आहे असा विचार त्याने केला नाही आणि आपणही असा विचार करू नये. आपल्याला कधी कोणाच्या मदतीची गरज पडणार नाही असे म्हणणे, आपल्याजवळ काहीतरी अतिमानवीय शक्‍ती आहे असे सुचवण्यासारखे ठरेल. आठवणीत असू द्या, येशूचे उदाहरण दाखवते की एका परिपूर्ण मानवावरही कधीकधी मदतीसाठी आक्रोश करण्याची वेळ येऊ शकते.—इब्री लोकांस ५:७.

९, १०. एक व्यक्‍ती आपल्यालाही मदतीची गरज असल्याचे कबूल करते तेव्हा कोणते चांगले परिणाम घडून येतात आणि यामुळे कुटुंबात व मंडळीत इतरांवर कोणता प्रभाव पडू शकतो?

जबाबदार पदांवर असलेले बंधू आपल्यालाही मर्यादा असल्याचे कबूल करतात आणि आपण इतरांच्या साहाय्यावर अवलंबून आहोत असे कबूल करतात तेव्हा उत्तम परिणाम घडून येऊ शकतात. (याकोब ३:२) यामुळे, जे अधिकारपदी आहेत आणि जे त्यांच्या अधीन आहेत त्यांच्यातील संबंध सुदृढ होतो आणि परिणामस्वरूप आपसात प्रेमळपणाने व मोकळेपणाने सुसंवाद करणे सोपे जाते. मदत स्वीकारण्यास तयार असलेल्यांची नम्रता त्यांच्याचसारख्या परिस्थितीत असलेल्या इतरांसाठी एक उदाहरण बनते. यावरून हे दिसून येते की पुढाकार घेणारेही मानवी दुर्बलतेला वश आहेत आणि इतरांना त्यांच्याजवळ मदतीसाठी येण्यास संकोच वाटत नाही.—उपदेशक ७:२०.

१० उदाहरणार्थ, मुलांना जेव्हा कळते की आपले आईवडील लहान होते तेव्हा त्यांनाही अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले होते, तेव्हा त्यांना आपल्या समस्यांना व आपल्यासमोर येणाऱ्‍या मोहांना तोंड देताना आईवडिलांची मदत घेणे सोपे जाते. (कलस्सैकर ३:२१) अशाप्रकारे आईवडील व मुलांमध्ये सुसंवाद साधणे शक्य होते. आईवडिलांना शास्त्रवचनीय उपाय अधिक परिणामकारक पद्धतीने सुचवणे शक्य होते आणि मुले ते अधिक सहजतेने स्वीकारतात. (इफिसकर ६:४) त्याचप्रकारे मंडळीतल्या सदस्यांना जेव्हा कळते की वडिलांनाही समस्यांना व भीतीदायक अथवा गोंधळविणाऱ्‍या परिस्थितीला तोंड द्यावे लागते तेव्हा त्यांना वडिलांकडून मदत स्वीकारणे सोपे जाईल. (रोमकर १२:३; १ पेत्र ५:३) पुन्हा एकदा, सुसंवाद साधणे व शास्त्रवचनीय सल्ला देणे सोपे जाते आणि यामुळे बांधवांचा विश्‍वास मजबूत होतो. आठवणीत असू द्या, आपल्या बांधवांना व बहिणींना पूर्वी कधी नव्हती इतकी आज आधाराची गरज आहे.—२ तीमथ्य ३:१.

११. आज जगात इतक्या जणांना ‘आधाराची’ गरज का आहे?

११ आज प्रत्येकाला, मग तो कोणीही असो, कोठेही राहात असो, कोणत्याही वयोगटातला असो, त्याला जीवनात ताणतणावांना तोंड द्यावेच लागते. आजच्या जगात हे टाळता येण्यासारखे नाही. (प्रकटीकरण १२:१२) अशाप्रकारच्या शारीरिक किंवा भावनिक दुःख देणाऱ्‍या परिस्थिती आपल्या विश्‍वासाची परीक्षा घेतात. कधीकधी कामाच्या ठिकाणी, शाळेत, कुटुंबात तर कधी मंडळीत समस्या उद्‌भवू शकतात. गंभीर आजारपण किंवा गतकाळातील एखाद्या आघातजन्य अनुभवामुळे काही समस्या घडू शकतात. अशा वेळी वैवाहिक साथीदार, वडील किंवा एखादा मित्र अथवा मैत्रीणीने विचारशील शब्दांनी व कृतींनी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला तर किती सांत्वन मिळते! जणू जखमेवर कोणी फुंकर घातल्यासारखे वाटते! तेव्हा, जर तुम्हाला बांधवांपैकी एखादा अशा स्थितीत असल्याचे दिसले तर त्याचा आधार व्हा. आणि जर तुमच्यासमोर एखादी कठीण समस्या आली असेल, तर आध्यात्मिकरित्या योग्य अशा व्यक्‍तींना मदतीची विनंती करा.—याकोब ५:१४, १५.

मंडळीकडून मिळणारी मदत

१२. आपल्या बांधवांना आधार देण्याकरता मंडळीतली प्रत्येक व्यक्‍ती काय करू शकते?

१२ मंडळीतले सर्वजण, अगदी लहान मुलेसुद्धा इतरांना आधार देण्याकरता योगदान देऊ शकतात. उदाहरणार्थ, तुम्ही सभांना व क्षेत्र सेवेला नियमित हजर राहता तेव्हा इतरांचा विश्‍वास दृढ होण्यास बरीच मदत मिळते. (इब्री लोकांस १०:२४, २५) पवित्र सेवेत तुम्ही सातत्याने सहभाग घेता तेव्हा आपण यहोवाला निष्ठावान असल्याचे तुम्ही शाबीत करता; तसेच तुमच्यासमोर समस्या असूनही तुम्ही आध्यात्मिकरित्या जागृत राहात आहात असे दाखवता. (इफिसकर ६:१८) तुमचा हा नियमितपणा इतरांना एकप्रकारे आधार देऊ शकतो.—याकोब २:१८.

१३. काहीजण अक्रियाशील का बनतात आणि त्यांना मदत करण्यासाठी काय करता येईल?

१३ कधीकधी जीवनातल्या दबावांमुळे किंवा इतर कठीण परिस्थितीमुळे काहीजण काहीसे निरुत्साही होतात व क्षेत्र सेवेत अक्रियाशील होतात. (मार्क ४:१८, १९) अक्रियाशील झालेले हे बांधव मंडळीच्या सभांमध्ये आपल्याला दिसत नाहीत. पण देवाबद्दल अजूनही त्यांच्या मनात कदाचित प्रेम असेल. त्यांच्या विश्‍वासाला मजबूत करण्यासाठी काय करता येईल? वडील त्यांना भेट देऊन प्रेमळपणे मदत करू शकतात. (प्रेषितांची कृत्ये २०:३५) कदाचित ते मंडळीतल्या इतर सदस्यांनाही मदत करण्यास सांगू शकतात. विश्‍वासात कमजोर झालेल्यांना कदाचित याच औषधाची अर्थात, अशाप्रकारच्या प्रेमळ भेटींचीच गरज असेल.

१४, १५. इतरांना आधार देण्याविषयी पौल कोणता सल्ला देतो? त्याच्या सल्ल्याचे एका मंडळीने कशाप्रकारे पालन केले याचे उदाहरण द्या.

१४ बायबल आपल्याला “जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या. अशक्‍तांना आधार द्या” असा आर्जव करते. (१ थेस्सलनीकाकर ५:१४) कदाचित या ‘अल्पधीराच्या’ व्यक्‍तींना अगदी हवालदिल झाल्यासारखे वाटत असेल; कोणाच्या मदतीशिवाय एकट्याने आपल्याला आपल्या समस्यांवर मात करताच येणार नाही असे त्यांना वाटत असेल. तुम्ही त्यांना मदतीचा हात देऊ शकता का? “अशक्‍तांना आधार द्या” या वाक्यांशाचे भाषांतर, अशक्‍तांना “घट्ट धरणे” किंवा “त्यांना चिकटून राहणे” असेही करण्यात आले आहे. यहोवाच्या नजरेत त्याची सर्व मेंढरे मोलवान आहेत, त्या सर्वांवर तो प्रेम करतो. तो कधीही त्यांना तुच्छ लेखत नाही आणि त्यांच्यापैकी कोणीही भटकून जावे असे त्याला वाटत नाही. आध्यात्मिकरित्या दुर्बल झालेले पुन्हा एकदा सुदृढ होईपर्यंत, त्यांना ‘चिकटून राहण्याकरता’ तुम्ही आपल्या मंडळीला मदत करू शकता का?—इब्री लोकांस २:१.

१५ एका वडिलाने सहा वर्षांपासून अक्रियाशील असलेल्या एका जोडप्याला भेट दिली. हे वडील लिहितात: “सबंध मंडळीने या जोडप्याप्रती जे प्रेम व जी कळकळ व्यक्‍त केली तिचा त्यांच्यावर इतका जबरदस्त परिणाम झाला की यामुळे त्यांना कळपात परत येण्याची प्रेरणा मिळाली आहे.” एकेकाळी अक्रियाशील असलेल्या एका बहिणीला मंडळीच्या सदस्यांनी दिलेल्या भेटींविषयी काय वाटते? आता ती म्हणते: “आम्हाला भेटायला येणारे बंधू किंवा त्यांच्यासोबत येणाऱ्‍या बहिणी कधीही आमच्याशी दोषी ठरवण्याच्या अविर्भावात बोलल्या नाहीत, किंवा त्यांनी आमची टीका केली नाही. उलट त्यांनी अतिशय समजूतदार मनोवृत्तीने आम्हाला बायबलमधून प्रोत्साहन दिले. यामुळेच आम्हाला पुन्हा क्रियाशील होण्यास मदत मिळाली.”

१६. ज्यांना आधाराची गरज आहे त्यांना मदत करण्यास कोण सदैव तयार आहे?

१६ होय, एका प्रामाणिक ख्रिस्ती व्यक्‍तीला इतरांकरता आधार बनण्यास आनंद वाटतो. शिवाय, आपल्या जीवनातही अनेक चढ-उतार येत राहतात, तेव्हा उद्या कदाचित आपल्यालाही आपल्या बांधवांची मदत होऊ शकते. कधीकधी मात्र असेही घडू शकते की आपल्याला मदतीची गरज असताना कोणाही मानवाची मदत आपल्याला उपलब्ध नसेल. पण अशा वेळीही आपल्यासाठी एक आधारस्तंभ आहे जो सदैव आपल्याला मदत करण्यास तयार आहे, अर्थात, यहोवा देव.—स्तोत्र २७:१०.

यहोवा—सर्वश्रेष्ठ आधारस्तंभ

१७, १८. यहोवाने आपला पुत्र येशू ख्रिस्त याला कशाप्रकारे आधार दिला?

१७ वधस्तंभावर खिळलेला असताना येशू जिवाच्या आकांताने ओरडून म्हणाला: “हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो.” (लूक २३:४६) मग त्याने प्राण सोडला. काही तासांपूर्वीच त्याला अटक करण्यात आली होती आणि त्याच्या सर्वात जवळच्या साथीदारांनी त्याला एकटे सोडून दिले होते आणि भयभीत होऊन ते पसार झाले होते. (मत्तय २६:५६) येशू आता एकटा होता आणि त्याच्याकरता फक्‍त एकच आधार उरला होता—त्याचा स्वर्गीय पिता. यहोवावर त्याने ठेवलेला हा भरवसा व्यर्थ ठरला नाही. येशू आपल्या पित्याला निष्ठावान राहिला आणि यहोवाने स्वतः देखील त्याला एकनिष्ठपणे आधार देऊन याचे प्रतिफळ दिले.—स्तोत्र १८:२५; इब्री लोकांस ७:२६.

१८ येशूच्या पृथ्वीवरील सेवाकार्याच्या सबंध काळात यहोवाने आपल्या पुत्राला शेवटल्या घटकेपर्यंत विश्‍वासू राहण्याकरता जी काही मदत लागेल ती पुरवली. उदाहरणार्थ, येशूचा बाप्तिस्मा झाला व त्याने आपल्या सेवाकार्याला सुरवात केली तेव्हा त्याच्या पित्याने स्वर्गातून आकाशवाणी करून आपल्या पुत्राबद्दल प्रशंसा व प्रेम व्यक्‍त केलेले त्याने ऐकले. येशूला आधाराची गरज होती तेव्हा यहोवाने त्याला बळ देण्याकरता देवदूतांस पाठवले. पृथ्वीवरील जीवनाच्या शेवटी जेव्हा येशूला सर्वात कठीण परीक्षेला तोंड द्यावे लागले तेव्हा यहोवाने त्याच्या याचना व विनंत्या ऐकल्या व स्वीकारल्या. या सर्वामुळे नक्कीच येशूला खूप आधार मिळाला असेल.—मार्क १:११, १३; लूक २२:४३.

१९, २०. आपल्याला गरज पडल्यास यहोवा आधार देईल याची खात्री आपण का बाळगू शकतो?

१९ यहोवा आपलाही एकमेव आधारस्तंभ बनू इच्छितो. (२ इतिहास १६:९) आपल्यावर एखादी विपत्ती येते तेव्हा, सर्व सामर्थ्याचा खरा उगम व प्रबळ सत्ताधीश असणारा यहोवा आपला आधार होऊ शकतो. (यशया ४०:२६) युद्धे, गरिबी, आजारपण, मृत्यू किंवा आपल्या स्वतःच्या अपरिपूर्णतेमुळे कधीकधी आपल्यावर खूप दबाव येतो. एका ‘बलाढ्य वैऱ्‍याप्रमाणे’ जेव्हा जीवनातल्या परीक्षा आपल्याला भारावून टाकतात तेव्हा यहोवा आपला आधार व बल होऊ शकतो. (स्तोत्र १८:१७; निर्गम १५:२) त्याच्याजवळ आपल्याकरता एक शक्‍तीशाली साधन, अर्थात त्याचा पवित्र आत्मा आहे. त्याच्या आत्म्याच्या माध्यमाने यहोवा “भागलेल्यांस जोर देतो,” जेणेकरून ते “गरुडांप्रमाणे पंखांनी वर उडतील.”—यशया ४०:२९, ३१.

२० देवाचा आत्मा सबंध विश्‍वातील सर्वात सामर्थ्यशाली शक्‍ती आहे. पौलाने म्हटले: “मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्‍तिमान आहे.” होय, आपला प्रेमळ स्वर्गीय पिता आपल्याला ‘पराकोटीचे सामर्थ्य’ देतो जेणेकरून, त्याने प्रतिज्ञा केलेले परादीस लवकरच येईल व त्यात तो “सर्व गोष्टी नवीन” करील. तोपर्यंत आपल्याला जीवनात येणाऱ्‍या सर्व क्लेशदायक समस्यांना तोंड देता येईल.—फिलिप्पैकर ४:१३; २ करिंथकर ४:७; प्रकटीकरण २१:४, ५.

[तळटीप]

^ परि. 4 डब्ल्यू. ई. व्हाईन यांच्या व्हाईन्स कंप्लीट एक्पोझिटरी डिक्शनरी ऑफ ओल्ड ॲन्ड न्यू टेस्टमेंट वड्‌र्स यात म्हटले आहे: “[पॅरेगोरीया] या शब्दाचे एक क्रियापद, वेदनाशामक औषधांना सूचित करते.”

तुम्हाला आठवते का?

• रोममध्ये बांधव कशाप्रकारे पौलाकरता आधार बनले?

• आपण मंडळीत कशाप्रकारे “आधार” बनू शकतो?

• यहोवा कोणत्या अर्थाने आपला सर्वश्रेष्ठ आधारस्तंभ आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१८ पानांवरील चित्र]

बांधवांनी पौलाला एकनिष्ठपणे पाठिंबा दिला, प्रोत्साहन दिले आणि वैयक्‍तिक साहाय्य पुरवले व अशाप्रकारे त्याच्याकरता ते “आधार” ठरले

[२१ पानांवरील चित्र]

मंडळीला आधार देण्यात वडील पुढाकार घेतात