व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कोमप्ल्यूटेनसियान पॉलीग्लोट अनुवादाचे एक ऐतिहासिक साधन

कोमप्ल्यूटेनसियान पॉलीग्लोट अनुवादाचे एक ऐतिहासिक साधन

कोमप्ल्यूटेनसियान पॉलीग्लोट अनुवादाचे एक ऐतिहासिक साधन

सुमारे १४५५ साली, बायबल प्रकाशनात एक क्रांती घडली. योहानस गुटेनबर्ग यांनी चल खिळ्यांच्या साहाय्याने पहिले बायबल छापण्यासाठी छपाई यंत्राचा उपयोग केला. मर्यादित हस्तलिखितांमुळे बायबलच्या वितरणात असलेली अडचण सरतेशेवटी दूर झाली. आता बायबलचे मोठ्या प्रमाणात आणि फार कमी खर्चात उत्पादन करता येत होते. बघता बघता, बायबल हे जगातील सर्वाधिक वितरण असलेले पुस्तक बनले.

गुटेनबर्ग यांचे बायबल लॅटिन भाषेत होते. परंतु, युरोपियन विद्वानांनी हे लगेच ताडले की, हिब्रू आणि ग्रीक या मूळ भाषांमध्ये बायबलचा विश्‍वसनीय मजकूर असण्याची आवश्‍यकता होती. कॅथलिक चर्चने केवळ लॅटिन व्हल्गेटला बायबलचा स्वीकारणीय अनुवाद म्हणून मान्य केले होते; तरीपण याचे दोन मोठे तोटे होते. १६ व्या शतकात, बहुतेक लोकांना लॅटिन भाषा समजत नव्हती. शिवाय, हजार वर्षांच्या कालावधीत, व्हल्गेटमधील मजकुरात नकलाकारांच्या लक्षात येण्याजोग्या अनेक चुका झाल्या होत्या.

अनुवादकांना आणि विद्वानांना मूळ भाषांमध्ये बायबलची त्याचप्रमाणे सुधारित लॅटिन अनुवादाची गरज होती. १५०२ साली, स्पेनची राणी इझाबेला पहिली हिचा राजकीय आणि आध्यात्मिक सल्लागार, कार्डिनल हेमेनेथ दे दिसनिरोस यांनी केवळ एका प्रकाशनाने त्यांच्या या गरजा पूर्ण करायचा निर्णय घेतला. अनुवादाच्या या ऐतिहासिक साधनाला कोमप्ल्यूटेनसियान पॉलीग्लोट हे नाव पडले. दिसनिरोस यांना हिब्रू, ग्रीक आणि लॅटिनमध्ये निवडक मजकूर असलेले त्याचप्रमाणे अरेमिकमध्ये काही भाग असलेले एक पॉलीग्लोट किंवा बहुभाषिक बायबल तयार करायचा हेतू होता. छपाईचे तंत्र अद्याप नवीन होते त्यामुळे ही साध्यता छपाई क्षेत्रातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार होती.

दिसनिरोस यांनी प्राचीन हिब्रू हस्तलिखिते खरेदी करून आपल्या कठीण कार्याला सुरवात केली; अशी हस्तलिखिते स्पेनमध्ये पुष्कळ होती. त्यांनी ग्रीक आणि लॅटिनमधील विविध हस्तलिखिते देखील जमा केली. ही हस्तलिखिते पॉलीग्लॉट मजकुराचा आधार असणार होती. दिसनिरोस यांनी प्रत्यक्ष संकलनाचे कार्य विद्वानांच्या एका गटाला सोपवले; हा गट त्यांनी नुकतेच स्थापन झालेल्या स्पेनमधील आल्काला दे देएनारेस विद्यापीठात संघटित केला होता. या विद्वानांमध्ये, रॉटरडॅमचा इरॅसमस यांनाही गटात सामील होण्यास बोलवण्यात आले होते परंतु या सुप्रसिद्ध भाषा तज्ज्ञाने हे आमंत्रण स्वीकारले नाही.

विद्वानांना संकलनाचे हे विशाल कार्य पार पाडायला दहा वर्षे लागली; त्यानंतर प्रत्यक्ष छपाईला आणखी चार वर्षे लागली. स्पॅनिश मुद्रकांजवळ हिब्रू, ग्रीक किंवा अरेमिक खिळे उपलब्ध नसल्यामुळे पुष्कळ तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. म्हणून, दिसनिरोस यांनी या भाषांमधील खिळे तयार करण्यासाठी मुद्रण करण्यात पटाईत असलेल्या आर्नाल्डो गीयर्मो ब्रोकार यांची मदत घेतली. शेवटी, १५१४ साली मुद्रकांनी उत्पादनाला सुरवात केली. जुलै १०, १५१७ रोजी म्हणजे कार्डिनलच्या मृत्यूच्या केवळ चार महिन्यांआधी या सहा खंडांची छपाई पूर्ण करण्यात आली. या सर्व ग्रंथांच्या सुमारे सहाशे प्रती प्रकाशित करण्यात आल्या; यात विरोधाभास असा होता की, हे ऐन स्पॅनिश धर्मसभेची चौकशी जोरात चालू होती त्या वेळी प्रकाशित करण्यात आले. *

ग्रंथाची रचना

पॉलीग्लॉटचे प्रत्येक पान माहितीचे भंडार होते. हिब्रू शास्त्रवचनांशी समांतर असलेल्या चार खंडांमध्ये, व्हल्गेटमधील मजकूर प्रत्येक पानाच्या मध्यभागी होता; हिब्रू मजकूर बाहेरील स्तंभात होता आणि लॅटिनच्या ओळींमधील अनुवादासोबत ग्रीक मजकूर आतील स्तंभात होता. समासांत, अनेक हिब्रू शब्दांचे मूळ शब्द दिले होते. तसेच प्रत्येक पानावर पेन्टेट्यूकशी समांतर असलेल्या खालच्या भागात, संपादकांनी लॅटिन अनुवादासह टार्गम ऑफ आन्कलास (बायबलच्या पहिल्या पाच पुस्तकांचा अरेमिकमध्ये स्वैर अनुवाद) याचाही समावेश केला होता.

पॉलीग्लॉटच्या पाचव्या खंडात, ग्रीक शास्त्रवचने दोन स्तंभांमध्ये होती. एकात ग्रीक मजकूर व दुसऱ्‍यात व्हल्गेटमधील समान लॅटिन मजकूर होता. दोन्ही भाषेच्या मजकुरातील समानता, लहान अक्षरांद्वारे दाखवण्यात आली होती जी प्रत्येक स्तंभातील समान शब्दाकडे वाचकाचे ध्यान आकर्षित करत होती. पॉलीग्लॉटमधील ग्रीक मजकूर ग्रीक शास्त्रवचनांचा किंवा “नव्या कराराचा” छापलेला सर्वात पहिला संपूर्ण संग्रह होता; यानंतर इरॅसमसने तयार केलेला अनुवाद छापण्यात आला.

विद्वानांनी पाचव्या खंडातील मजकुराचे लेखन तपासताना इतकी दक्षता घेतली की, त्यात केवळ ५० मुद्रण चुका आढळल्या. या विद्वानांनी बारकाईने काम केल्यामुळे, आधुनिक टीकाकारांनी त्यास इरॅसमसच्या प्रसिद्ध ग्रीक शास्त्रवचनांपेक्षा श्रेष्ठ असल्याचा मान दिला आहे. यातील शोभिवंत ग्रीक अक्षरे जुन्या अन्सियल हस्तलिखितांच्या निर्मळ सुरेखपणाशी जुळत होती. पंधराव्या शतकात ग्रीकमध्ये छपाई (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात, आर. प्रॉक्टर म्हणतात: “स्पेनला सर्वात पहिली ग्रीक छपाईची शैली निर्माण केल्याचा बहुमान मिळाला आहे जी आतापर्यंतच्या ग्रीक शैलींपैकी सर्वात उत्तम आहे यात शंका नाही.”

पॉलीग्लॉटच्या सहाव्या खंडात, बायबलच्या अभ्यासासाठी अनेक साधने होती: हिब्रू आणि अरेमिक शब्दकोश, ग्रीक, हिब्रू आणि अरेमिक नावांचा अर्थ, हिब्रू व्याकरण आणि शब्दकोशाकरता लॅटिन अनुक्रमणिका. म्हणूनच, कोमप्ल्यूटेनसियान पॉलीग्लॉट यास “मुद्रणकलेचे आणि बायबल शास्त्राचे उत्कृष्ट उदाहरण” म्हटले आहे.

“शास्त्रवचनांच्या अभ्यासाला नव्याने जोम आणण्याच्या” उद्देशाने दिसनिरोस यांनी हे ग्रंथ प्रकाशित केले परंतु जनसामान्यांना बायबल उपलब्ध करून देणे अशी इच्छा मात्र त्यांची नव्हती. त्यांचे असे मत होते की, “देवाचे वचन सामान्य जनतेला समजणार नाही अशाप्रकारे ते त्यांच्यापासून काळजीपूर्वक लपवून ठेवायचे होते.” त्यांचा असाही विश्‍वास होता की, “क्रूसावर चढवलेल्या आपल्या पुत्राच्या डोक्यावरती, ज्या तीन प्राचीन भाषांमध्ये लिहिण्याची अनुमती देवाने दिली होती केवळ त्यांमध्येच शास्त्रवचने असली पाहिजेत.” * याच कारणास्तव, कोमप्ल्यूटेनसियान पॉलीग्लॉटमध्ये स्पॅनिश भाषेचा कसलाही अनुवाद सामील नव्हता.

व्हल्गेट विरुद्ध मूळ भाषा

पॉलीग्लॉटचे स्वरूपच असे होते की, त्यात गोवलेल्या विद्वानांमध्ये यावरून काही मतभेद झाले. प्रसिद्ध स्पॅनिश विद्वान, आन्टोन्यो दे नेब्रीहा * यांना पॉलीग्लॉट बायबलमध्ये असलेला व्हल्गेटमधील मजकूर तपासून पाहण्याची जबाबदारी देण्यात आली होती. कॅथलिक चर्च केवळ जेरोमच्या व्हल्गेटला अधिकृत अनुवाद मानत असले तरी नेब्रीहा यांना व्हल्गेटची तुलना मूळ हिब्रू, अरेमिक आणि ग्रीक शास्त्रांशी करण्याची गरज भासली. व्हल्गेटच्या तेव्हाच्या प्रतींमध्ये झालेल्या उघड चुका दुरुस्त करण्याची त्यांची इच्छा होती.

व्हल्गेट आणि मूळ भाषांमधील कोणतेही भेद मिटवण्यासाठी नेब्रीहा यांनी दिसनिरोस यांना असे आर्जवले: “आपल्या धर्माच्या दोन विझलेल्या मशाली, हिब्रू आणि ग्रीक भाषा, यांना पुन्हा एकदा पेटवा. या कार्यासाठी जे स्वतःला वाहून देतात त्यांना प्रतिफळ द्या.” शिवाय त्यांनी असेही सुचवले: “नव्या कराराच्या लॅटिन हस्तलिखितांमध्ये फरक दिसला तर प्रत्येक वेळी आपण ग्रीक हस्तलिखितांशी त्याची तुलना केली पाहिजे. जुन्या कराराच्या विविध लॅटिन हस्तलिखितांमध्ये किंवा लॅटिन आणि ग्रीक हस्तलिखितांमध्ये भेद दिसला तर प्रत्येक वेळी आपण विश्‍वसनीय हिब्रू शास्त्रातून अचूकतेचा तपास केला पाहिजे.”

दिसनिरोस यांनी याला काय उत्तर दिले? पॉलीग्लॉट बायबलच्या प्रस्तावनेत दिसनिरोस यांनी या विषयावरील आपले मत स्पष्टपणे मांडले. “रोमन, किंवा लॅटिन चर्चचे प्रतिनिधीत्व करणाऱ्‍या येशूच्या दोन्ही बाजूला ज्याप्रमाणे चोर लटकवण्यात आले होते त्याचप्रमाणे आम्ही सिनगॉग [हिब्रू शास्त्र] आणि पौर्वात्य चर्च [ग्रीक शास्त्र] यांच्यामध्ये धन्य झालेला जेरोमचा लॅटिन अनुवाद मांडला आहे.” अशाप्रकारे, दिसनिरोस यांनी मूळ भाषांमधील शास्त्रानुसार लॅटिन व्हल्गेटमधील चुका दुरुस्त करण्याची परवानगी नेब्रीहा यांना दिली नाही. शेवटी, नेब्रीहा यांनी अशा सदोष आवृत्तीत आपले नाव सामील करण्याऐवजी या कार्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

कोमा योहानेउम

आल्काला दे देएनारेसचे पॉलीग्लॉट बायबल हे बायबलच्या मूळ भाषांमध्ये सुधारित शास्त्र उपलब्ध करून देण्यात उचललेले प्रचंड मोठे पाऊल होते तरी काही वेळा विद्वत्तेपेक्षा परंपरा श्रेष्ठ ठरत असे. व्हल्गेटला इतका बहुमान दिला जात होता की, संपादकांनी, मूळ ग्रीकनुसार लॅटिनमध्ये सुधार करण्याऐवजी अनेक वेळा “नव्या करारातील” ग्रीक मजकूर लॅटिनशी जुळावा म्हणून त्यात सुधारणा केल्या. याचे एक उदाहरण म्हणजे, कोमा योहानेउम या नावाने प्रसिद्ध असलेला अशुद्ध वाक्यांश. * प्राचीन काळच्या कोणत्याही ग्रीक हस्तलिखितांमध्ये हा वाक्यांश नव्हता; तो, योहानाने आपले पत्र लिहिल्यानंतर अनेक शतकांनी त्यांत सामील करण्यात आला. किंबहुना, व्हल्गेटच्या सर्वात जुन्या लॅटिन हस्तलिखितांमध्येही तो नव्हता. त्यामुळे, इरॅसमस यांनी आपल्या ग्रीक “नव्या करारातून” हा अशुद्ध वाक्यांश वगळला.

पॉलीग्लॉटच्या संपादकांना, कित्येक शतकांपासून व्हल्गेटच्या पारंपरिक शास्त्राचा भाग असलेले हे वचन काढून टाकावेसे वाटले नाही. अशाप्रकारे, त्यांनी लॅटिनमधील अशुद्ध मजकूर तसाच राहू दिला आणि दोन्ही स्तंभातील शास्त्रांमध्ये साम्य राहावे म्हणून त्याचा अनुवाद करून तो ग्रीक शास्त्रात सामील करण्याचे ठरवले.

नवीन बायबल अनुवादांकरता आधार

कोमप्ल्यूटेनसियान पॉलीग्लॉट हे सेप्ट्यूअजिंटसहित संपूर्ण ग्रीक शास्त्रवचनांची पहिली छापील आवृत्ती होती केवळ यामुळेच त्याला महत्त्व होते असे नाही. ज्याप्रमाणे इरॅसमस यांचा ग्रीकमधील “नवा करार” ग्रीक शास्त्राकरता (इतर भाषांमधील अनुवादाकरता आधार) स्वीकृत शास्त्र बनले त्याचप्रमाणे पॉलीग्लॉटचे हिब्रू शास्त्र हिब्रू-अरेमिक शास्त्रवचनांकरता मुख्य आधार ठरले. * विल्यम टिंडेल यांनी इंग्रजीमध्ये बायबलचे भाषांतर करताना हिब्रू शास्त्राचा आधार म्हणून पॉलीग्लॉटचा उपयोग केला.

कोमप्ल्यूटेनसियान पॉलीग्लॉट तयार केलेल्या गटाच्या अभ्यासाचा, बायबलच्या विद्वत्तापूर्ण प्रगतीमध्ये महत्त्वाचा वाटा होता. याचे प्रकाशन झाले त्या वेळी संपूर्ण युरोपात बायबलविषयी आवड वाढत असल्यामुळे लोकांच्या सामान्य भाषेत त्याचे भाषांतर करण्यास प्रोत्साहन मिळू लागले होते. ग्रीक व हिब्रू शास्त्र टिकवून ठेवण्याच्या व त्यांच्यात सुधार करण्याच्या टप्प्यांमधील पॉलीग्लॉट हा आणखी एक दुवा ठरला. हे सर्व, देवाच्या या उद्देशाच्या एकमतात आहे की, ‘कसास उतरलेले देवाचे वचन,’ अर्थात “आपल्या देवाचे वचन सर्वकाळ कायम” राहील.—स्तोत्र १८:३०; यशया ४०:८; १ पेत्र १:२५.

[तळटीपा]

^ परि. 6 कागदाच्या सहाशे प्रती आणि चर्मपत्राच्या सहा प्रती करण्यात आल्या. १९८४ मध्ये, विशिष्ट भागाची हुबेहूब नक्कल छापण्यात आली.

^ परि. 12 हिब्रू, ग्रीक आणि लॅटिन.—योहान १९:२०.

^ परि. 14 नेब्रीहा यांना स्पॅनिश ह्‍यूमॅनिस्टमधील (स्वैर विद्वान) अग्रेसर मानले जात होते. १४५२ साली त्यांनी पहिले ग्रामाटिका कास्टेलयाना (कास्टिलियन भाषेचे व्याकरण) प्रकाशित केले. तीन वर्षांनंतर, त्यांनी आपले उर्वरित आयुष्य पवित्र शास्त्राच्या अभ्यासाकरता वाहून देण्याचा निर्णय घेतला.

^ परि. 18 बायबलच्या काही भाषांतरांमध्ये १ योहान ५:७ येथे आढळणारा अशुद्ध वाक्यांश असा आहे, “स्वर्गात पिता, शब्द आणि पवित्र आत्मा; आणि हे तिन्ही मिळून एक आहेत.”

^ परि. 21 इरॅसमसच्या ग्रंथाविषयीच्या अहवालासाठी, टेहळणी बुरूज (इंग्रजी), सप्टेंबर १५, १९८२, पृष्ठे ८-११ पाहा.

[२९ पानांवरील चित्र]

कार्डिनल हेमेनेथ दे दिसनिरोस

[चित्राचे श्रेय]

Biblioteca Histórica. Universidad Complutense de Madrid

[३० पानांवरील चित्र]

आन्टोन्यो दे नेब्रीहा

[चित्राचे श्रेय]

Biblioteca Histórica. Universidad Complutense de Madrid

[२८ पानांवरील चित्राचे श्रेय]

Biblioteca Histórica. Universidad Complutense de Madrid