व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रभूचे सांज भोजन कसे साजरे करतात?

प्रभूचे सांज भोजन कसे साजरे करतात?

प्रभूचे सांज भोजन कसे साजरे करतात?

प्रभूच्या सांज भोजनाच्या विधीविषयी ख्रिस्ती प्रेषित पौल असे लिहितो: “जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की, ज्या रात्री प्रभु येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली; आभार मानून ती मोडली, आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे. माझ्या स्मरणार्थ हे करत राहा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्‍ताने झालेला नवा करार आहे; जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करिता.”—१ करिंथकर ११:२३-२६, NW.

पौल म्हणतो त्याप्रमाणे, ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळण्यासाठी रोमनांवर दबाव आणणाऱ्‍या यहुदी धार्मिक नेत्यांना, ज्या रात्री यहूदा इस्कार्योताने “[येशूला] धरून” दिले “त्या रात्री” येशूने प्रभूचे सांज भोजन सुरू केले. ते भोजन गुरुवारी सायंकाळी, सा.यु. ३३ च्या मार्च ३१ रोजी पार पडले. येशू शुक्रवारी दुपारी, एप्रिल १ रोजी वधस्तंभावर मरण पावला. यहुदी दिनदर्शिकेनुसार एका दिवसाच्या संध्याकाळापासून दुसऱ्‍या दिवसाच्या संध्याकाळापर्यंत एक दिवस मोजला जात असे म्हणून प्रभूचे सांज भोजन आणि येशू ख्रिस्ताचा मृत्यू एकाच दिवशी अर्थात सा.यु. ३३, निसान १४ रोजी घडले.

भाकर आणि द्राक्षारस सेवन करणाऱ्‍यांना येशूच्या स्मरणार्थ हे ‘करत राहायचे होते.’ दुसऱ्‍या एका अनुवादानुसार, येशू म्हणाला: “माझे स्मारक म्हणून असे करीत जा.” (१ करिंथकर ११:२४, मराठी कॉमन लँग्वेज) प्रभूच्या सांज भोजनाला ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारक असेही म्हटले जाते.

येशूच्या मृत्यूचे स्मरण करण्याची काय गरज?

तो मृत्यू कशाशी संबंधित आहे यातून याचे उत्तर मिळते. यहोवाच्या सार्वभौमत्वाचा सर्वश्रेष्ठ समर्थक या नात्याने येशू मरण पावला. अशाप्रकारे, मानव केवळ स्वार्थापोटी देवाची सेवा करतात हा सैतानाचा आरोप त्याने खोटा सिद्ध करून दाखवला. (ईयोब २:१-५; नीतिसूत्रे २७:११) परिपूर्ण मानवाच्या रूपात येशूचा मृत्यू झाल्यामुळे त्याने “पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण [देखील] अर्पण” केला. (मत्तय २०:२८) आदामाने देवाविरुद्ध पाप केले तेव्हा परिपूर्ण मानवी जीवन आणि त्याच्यासोबत असलेली आशा त्याने गमावली. परंतु “देवाने [मानवजातीच्या] जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” (योहान ३:१६) होय, “पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभु येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे.”—रोमकर ६:२३.

यास्तव येशू ख्रिस्ताच्या मृत्यूचा संबंध प्रीतीच्या दोन सर्वश्रेष्ठ अभिव्यक्‍तींशी आहे—यहोवाने आपला पुत्र देऊन मानवजातीला दाखवलेली श्रेष्ठ प्रीती आणि येशूने आपले मानवी जीवन स्वेच्छेने बहाल करून मानवजातीबद्दल दाखवलेली निःस्वार्थ प्रीती. येशूच्या मृत्यूचा स्मारक प्रीतीच्या या दोन अभिव्यक्‍तींचे गौरव करतो. ही प्रीती आपण ग्रहण करत असल्यामुळे त्याबद्दल आपण आपली कृतज्ञता व्यक्‍त करू नये का? असे करण्याचा एक मार्ग म्हणजे, प्रभूच्या सांज भोजनाच्या विधीला उपस्थित राहणे.

भाकर आणि द्राक्षारस यांचे महत्त्व

प्रभूच्या सांज भोजनाची सुरवात करताना, येशूने भाकर आणि लाल द्राक्षारसाचा प्याला यांचा बोधचिन्हे किंवा चिन्हे म्हणून उपयोग केला. येशूने भाकर घेतली, “आभार मानून ती मोडली, आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे.” (१ करिंथकर ११:२४) ही भाकर खमीर किंवा यीस्ट न घालता केवळ कणिक आणि पाणी मिसळून केली असल्यामुळे ती कडक होती व इतरांसोबत वाटून खाण्यासाठी तिला मोडावे लागले. शास्त्रवचनांमध्ये, खमीर पापाला सूचित करते. (मत्तय १६:११, १२; १ करिंथकर ५:६, ७) येशू पापी नव्हता. म्हणून त्याचे परिपूर्ण मानवी शरीर मानवजातीकरता उचित खंडणी बलिदान ठरले. (१ योहान २:१, २) ख्रिस्ताच्या पापरहित हाडामांसाच्या शरीराला सूचित करणारी भाकरी बेखमीर असावी हे योग्यच नव्हे काय?

येशूने शुद्ध लाल द्राक्षारसाच्या प्याल्यासाठी देखील आभार मानले आणि म्हटले: “हा प्याला माझ्या रक्‍ताने झालेला नवा करार आहे.” (१ करिंथकर ११:२५) प्याल्यातला लाल द्राक्षारस येशूच्या रक्‍ताला सूचित करतो. सा.यु.पू. १५१३ मध्ये, देव आणि इस्राएल राष्ट्रामधील नियमशास्त्राच्या कराराला, अर्पण केलेल्या गोऱ्ह्यांच्या व बकरांच्या रक्‍ताने ज्याप्रमाणे कायदेशीर रूप देण्यात आले त्याचप्रमाणे येशूच्या मृत्यूने सांडलेल्या रक्‍तामुळे नवीन कराराला कायदेशीर रूप मिळाले.

सेवन करणारे कोण आहेत?

स्मारकाची बोधचिन्हे कोणी सेवन करावीत हे स्पष्ट करण्याकरता नवीन करार काय आहे आणि त्यात कोण भागीदार आहेत हे समजण्याची आपल्याला गरज आहे. बायबल म्हणते: “परमेश्‍वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की त्यात इस्राएलाचे घराणे व यहूदाचे घराणे यांच्याबरोबर मी नवा करार करीन; . . . मी आपले धर्मशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन; मी ते त्यांच्या हृदयपटलावर लिहीन; मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील. . . . मी त्यांच्या अधर्माची क्षमा करीन, त्यांचे पाप मी यापुढे स्मरणार नाही.”—यिर्मया ३१:३१-३४.

नवीन करारामुळे यहोवा देवासोबत एक खास प्रकारचा नातेसंबंध ठेवणे शक्य झाले आहे. या कराराद्वारे, काही व्यक्‍ती त्याचे लोक होतात आणि तो त्यांचा देव होतो. यहोवाचा नियम त्यांच्यामध्ये, त्यांच्या अंतःकरणात लिहिलेला आहे आणि शारीरिकरित्या सुंता न झालेल्यांमधील यहुदी देखील देवासोबत नवीन कराराच्या नातेसंबंधात सामील होऊ शकतात. (रोमकर २:२९) बायबल लेखक लूक, देवाच्या उद्देशाविषयी लिहितो की, त्याने “परराष्ट्रीयांतून आपल्या नावाकरिता काही लोक काढून घ्यावे म्हणून . . . त्यांची भेट” घेतली. (प्रेषितांची कृत्ये १५:१४) १ पेत्र २:१० नुसार, ते ‘पूर्वी लोक नव्हते, तर आता देवाचे लोक आहेत.’ शास्त्रवचनांमध्ये त्यांना ‘देवाचे इस्राएल’ अर्थात आत्मिक इस्राएल म्हटले आहे. (गलतीकर ६:१६; २ करिंथकर १:२१) त्यामुळे, नवीन करार हा यहोवा देव आणि आत्मिक इस्राएल यांमधील एक करार आहे.

आपल्या शिष्यांसोबत घालवलेल्या शेवटल्या रात्री, येशूने देखील स्वतः त्यांच्यासोबत एक वेगळा करार केला. तो त्यांना म्हणाला, “जसे माझ्या पित्याने मला राज्य नेमून दिले तसे मीहि तुम्हास नेमून देतो.” (लूक २२:२९) हा राज्याचा करार आहे. राज्याच्या करारात १,४४,००० अपरिपूर्ण मानव सामील आहेत. पुनरुत्थान होऊन स्वर्गात गेल्यावर ते ख्रिस्तासोबत राजे आणि याजक म्हणून राज्य करतील. (प्रकटीकरण ५:९, १०; १४:१-४) यास्तव, यहोवा देवासोबतच्या नवीन करारात असलेले येशू ख्रिस्तासोबतच्या राज्य करारात देखील सामील आहेत. केवळ तेच प्रभूच्या सांज भोजनातील बोधचिन्हे यथायोग्यपणे सेवन करू शकतात.

स्मारकाची बोधचिन्हे सेवन करण्यास लायक असलेल्यांना कसे माहीत होते की देवासोबत त्यांचा अनोखा नातेसंबंध आहे आणि ख्रिस्ताचे ते सहवारस आहेत? पौल स्पष्ट करतो: “[पवित्र] आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर [आपल्या मनोवृत्तीबरोबर] साक्ष देतो की, आपण देवाची मुले आहो; आणि जर मुले तर वारीसहि आहो; म्हणजे देवाचे वारीस, ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारीस असे आहो; आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावे म्हणून त्याच्याबरोबर जर दुःख भोगित असलो तरच.”—रोमकर ८:१६, १७.

देव आपल्या पवित्र आत्म्याद्वारे अथवा कार्यकारी शक्‍तीद्वारे ख्रिस्ताच्या सोबतीच्या वारशांना अभिषिक्‍त करतो. यामुळे आपण राज्याचे वारीस आहोत अशी निश्‍चिती त्यांना प्राप्त होते. आणि अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांमध्ये स्वर्गीय आशा निर्माण होते. बायबलमध्ये स्वर्गीय जीवनाविषयी जे काही म्हटले आहे ते त्यांना उद्देशून म्हटले आहे असे त्यांना वाटते. शिवाय, पृथ्वीवरील सर्व बंधने त्याचप्रमाणे पृथ्वीवरील जीवन आणि सर्व मानवी नातेसंबंध देखील त्यागण्यास ते तयार आहेत. पार्थिव परादीसातील जीवन सर्वोत्कृष्ट असेल हे आत्म्याने अभिषिक्‍त असलेल्या ख्रिश्‍चनांना ठाऊक असले तरी ती त्यांची आशा नाही. (लूक २३:४३) चुकीच्या धार्मिक दृष्टिकोनामुळे नव्हे तर देवाच्या आत्म्याच्या कार्यामुळे त्यांना न बदलणारी स्वर्गीय आशा प्राप्त झाली आहे आणि यास्तव ते उचितपणे स्मारकाच्या बोधचिन्हांचे सेवन करतात.

समजा, एका व्यक्‍तीला निश्‍चितपणे आपण नवीन करारात आणि राज्य करारात आहोत अशी खात्री नसेल. ख्रिस्ताबरोबर सोबतीचा वारीस असल्याची त्याला देवाच्या आत्म्याकडून साक्ष देखील मिळाली नाही तर काय? मग, त्याने स्मारकाच्या बोधचिन्हांचे सेवन करणे चुकीचे ठरेल. एखाद्याला स्वर्गीय राजा व याजक बनण्याचे बोलवणे नसताना त्याने जाणूनबुजून तसे बोलावणे असल्याचे दर्शवले तर देवाला ते मुळीच आवडणार नाही.—रोमकर ९:१६; प्रकटीकरण २२:५.

किती वेळा पाळावा?

येशूच्या मृत्यूचा स्मारक दर आठवडी किंवा दररोज पाळावा का? वल्हांडणाच्या दिवशी ख्रिस्ताने प्रभूच्या सांज भोजनाची सुरवात केली आणि त्याच दिवशी त्याला अन्यायीपणे ठार मारण्यात आले. वर्षातून केवळ एकदाच, निसान १४ रोजी पाळला जाणारा वल्हांडणाचा सण ईजिप्तमधून इस्राएलांची सुटका झाल्याचे स्मारक होते. (निर्गम १२:६, १४; लेवीय २३:५) यास्तव, “आपला वल्हांडणाचा यज्ञपशु जो ख्रिस्त” त्याच्या मृत्यूचा स्मारक वर्षातून एकदाच पाळला जावा, दर आठवडी किंवा दररोज नव्हे. (१ करिंथकर ५:७) येशूने प्रभूच्या सांज भोजनाचा विधी सुरू केल्यावर ज्या पद्धतीने तो पाळला तीच पद्धत ख्रिस्ती पाळतात.

पौलाच्या पुढील शब्दांचा काय अर्थ आहे: “जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करिता”? (१ करिंथकर ११:२६) या वचनात पौलाने “प्रत्येक वेळी” किंवा “जेव्हा कधी” या अर्थाच्या शब्दाचा वापर केला. अशाप्रकारे, तो म्हणत होता की, जेव्हा कधी अभिषिक्‍त ख्रिस्ती बोधचिन्हांचे सेवन करतात तेव्हा ते येशूच्या खंडणी बलिदानावरील आपला विश्‍वास घोषित करत असतात.

अभिषिक्‍त ख्रिस्ती, ख्रिस्ताच्या मृत्यूचे स्मरण “तो येईपर्यंत” करत राहतील. येशू आपल्या ‘उपस्थितीच्या’ दरम्यान आपल्या अभिषिक्‍त अनुयायांना आत्मिक जीवनाकरता पुनरुत्थित करून त्यांना स्वर्गात नेण्यासाठी येतो तोपर्यंत हा विधी पाळला जाईल. (१ थेस्सलनीकाकर ४:१४-१७) ख्रिस्ताने ११ विश्‍वासू प्रेषितांना म्हटलेल्या शब्दांशी हे सुसंगत आहे: “मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्याजवळ घेईन; ह्‍यासाठी की, जेथे मी आहे तेथे तुम्हीहि असावे.”—योहान १४:३.

तुमच्याकरता काय अर्थ?

येशूच्या बलिदानाचा लाभ प्राप्त करण्यासाठी व पृथ्वीवर सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी स्मारकाच्या बोधचिन्हांचे सेवन करणे आवश्‍यक आहे का? नाही. नोहा, अब्राहाम, सारा, इसहाक, रिबका, योसेफ, मोशे आणि दावीद यांसारख्या देवभीरू लोकांचे पृथ्वीवर पुनरुत्थान झाल्यावर ते बोधचिन्हांचे कधी सेवन करतील असे बायबलमध्ये कोठेही आढळत नाही. तरीही, त्यांना आणि पृथ्वीवर अंतहीन जीवनाची इच्छा बाळगणाऱ्‍या इतर जणांना देवावर आणि ख्रिस्तावर त्याचप्रमाणे येशूच्या खंडणी बलिदानाच्या यहोवाच्या तरतुदीवर विश्‍वास प्रदर्शित करावा लागेल. (योहान ३:३६; १४:१) सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी तुम्ही देखील असा विश्‍वास प्रदर्शित केला पाहिजे. ख्रिस्ताच्या मृत्यूच्या वार्षिक विधीला उपस्थित राहिल्यास त्या महान बलिदानाची तुम्हाला आठवण करून दिली जाईल आणि त्याबद्दल तुमची कदर वाढेल.

प्रेषित योहानाने येशूच्या बलिदानाच्या महत्त्वावर जोर देऊन म्हटले: “तुम्ही [सोबतीचे अभिषिक्‍त जन] पाप करू नये म्हणून हे मी तुम्हास लिहितो. जर कोणी पाप केले, तर नीतिसंपन्‍न असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे, आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्‍चित आहे; केवळ आपल्याच पापांबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याहि पापांबद्दल आहे.” (१ योहान २:१, २) अभिषिक्‍त जन म्हणू शकतात की, येशूचे बलिदान त्यांची पापे झाकणारे प्रायश्‍चित आहे. पण हे बलिदान संपूर्ण जगाच्या पापांकरताही आहे ज्यामुळे आज्ञाधारक मानवजातीला सार्वकालिक जीवन प्राप्त करणे शक्य झाले!

एप्रिल ४, २००४ रोजी येशूच्या मृत्यूचे स्मरण करण्यास तुम्ही उपस्थित राहाल का? हा विधी जगभरात यहोवाच्या साक्षीदारांद्वारे त्यांच्या सभांच्या ठिकाणी पार पाडला जाईल. तुम्ही उपस्थित राहिल्यास, एक महत्त्वाचे बायबल आधारित भाषण ऐकून तुम्हाला लाभ मिळेल. यहोवा देवाने आणि येशू ख्रिस्ताने आपल्याकरता किती काही केले आहे याची तुम्हाला आठवण करून दिली जाईल. देवाबद्दल आणि ख्रिस्ताबद्दल तसेच येशूच्या खंडणी बलिदानाबद्दल आदर बाळगणाऱ्‍यांसोबत एकत्र जमण्याचा अनुभव आध्यात्मिकरित्या फायदेकारक देखील असेल. या प्रसंगामुळे देवाची अपात्र कृपा ग्रहण करण्यासाठी लायक बनण्याची तुमची इच्छा बळावू शकेल ज्यामुळे तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. तर मग, मागेपुढे पाहू नका. आपल्या स्वर्गीय पित्याचा अर्थात यहोवा देवाचा आदर करणाऱ्‍या व त्याला संतुष्ट करणाऱ्‍या या सुखद विधीसाठी उपस्थित राहा.

[५ पानांवरील चित्र]

येशूच्या मृत्यूचा संबंध प्रीतीच्या दोन सर्वश्रेष्ठ अभिव्यक्‍तींशी आहे

[६ पानांवरील चित्र]

बेखमीर भाकर आणि द्राक्षारस हे येशूच्या पापरहित शरीराची व त्याने सांडलेल्या रक्‍ताची उचित प्रतीके आहेत