युगारीट—बआलचे वर्चस्व असलेले प्राचीन शहर

युगारीट—बआलचे वर्चस्व असलेले प्राचीन शहर

युगारीट—बआलचे वर्चस्व असलेले प्राचीन शहर

सन १९२८ मध्ये, एका सिरियन शेतकऱ्‍याचा नांगर एका कबरेवर झाकलेल्या दगडाला लागला, ज्यात प्राचीन काळातील मातीची भांडी होती. हा शोध किती महत्त्वाचा आहे याची कल्पना त्याला त्या वेळी आली नसावी. या अनपेक्षित शोधाची बातमी ऐकून, क्लॉड शाफेर यांच्या नेतृत्वाखालील एक फ्रेंच पुरातत्त्वीय गट पुढील वर्षी त्या ठिकाणी पोचला.

काही काळातच या गटाला एक कोरीवलेख सापडला ज्यावरून त्यांना सापडणाऱ्‍या अवशेषांची ओळख पटली. त्यांना सापडलेले अवशेष युगारीट शहराचे होते; “पूर्वेकडील जवळच्या प्राचीन शहरांमधील सर्वात महत्त्वाच्या शहरांपैकी ते एक होते.” लेखक बॅरी होबरमन यांनी असेही म्हटले: “इतर कोणत्याही पुरातत्त्वीय शोधाचा, अगदी मृत समुद्राच्या गुंडाळ्यांच्या शोधाचाही बायबलविषयीच्या आमच्या समजेवर इतका जबरदस्त प्रभाव पडलेला नाही.”—अटलांटिक मासिक (इंग्रजी).

मुख्य जंक्शन

सध्याच्या उत्तर सिरिया येथील भूमध्य किनारपट्टीवर रास शामरा नावाच्या टेकडीवर वसलेले युगारीट हे सा.यु.पू. दुसऱ्‍या सहस्त्रातील सुसंपन्‍न शहर होते जेथे सर्व देशातील लोक राहत होते. उत्तरेतील कासिअस पर्वतापासून दक्षिणेतील तेल सुकासपर्यंत ६० किलोमीटर आणि पश्‍चिमेतील भूमध्यापासून पूर्वेतील आरोंटस दरीपर्यंत ३० ते ५० किलोमीटर विस्ताराचे त्याचे क्षेत्र होते.

युगारीटचे समशीतोष्ण हवामान गुराढोरांकरता एकदम उत्तम होते. त्या प्रदेशात धान्य, जैतुनाचे तेल, वाईन आणि लाकूड यांचे उत्पादन होत असे; लाकडाचे उत्पादन मेसोपोटेमिया आणि ईजिप्तमध्ये अत्यंत कमी प्रमाणात होत असे. शिवाय, हे शहर व्यापारी मार्गांच्या केंद्रस्थानी असल्यामुळे ते सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय बंदरांपैकी पहिले होते. युगारीट येथे एजियन, अनाटोलिया, बॅबिलोन, ईजिप्त आणि मध्य पूर्वेच्या इतर भागांतील व्यापारी धातू, शेतीचे उत्पन्‍न आणि इतर असंख्य स्थानीय उत्पादनांचा व्यापार करत असत.

भौतिक सुसंपन्‍नता असूनही युगारीट कधीच स्वराज्य बनले नाही. ईजिप्शियन साम्राज्यात ते शहर उत्तरेकडील सैन्याची छावणी होते आणि नंतर सा.यु.पू. १४ व्या शतकात ते जगीक हिटाईट साम्राज्यात सामावण्यात आले. युगारीटला कर द्यावा लागत असे आणि त्यावर राज्य करत असलेल्या शासनाला सैनिक पुरवावे लागत असत. आक्रमण करणारे “समुद्राचे लोक” * अनाटोलिया (मध्य टर्की) आणि उत्तर सिरियाला लुटू लागले तेव्हा हिटाईट लोकांनी युगारीटकडून सैनिकांची व जहाजांच्या ताफ्याची मागणी केली. परिणामतः, युगारीट असहाय ठरले आणि सा.यु.पू. १२०० मध्ये त्याचा पूर्णतः नाश झाला.

गतकाळ वर्तमानात आणणे

युगारीट शहर उद्‌ध्वस्त झाल्यावर त्या जागी जवळजवळ २० मीटर उंचीची एक मोठी टेकडी निर्माण झाली जिचा विस्तार ६० एकरांपेक्षा जास्त होता. या प्रदेशाच्या केवळ एक षष्ठांश भागाचे उत्खनन करण्यात आले आहे. या अवशेषांमध्ये पुरातत्त्वशास्त्रज्ञांना एका प्रचंड मोठ्या राजमहालाच्या इमारतीचे अवशेष सापडले आहेत ज्यात सुमारे शंभर खोल्या आहेत आणि अंगणे आहेत; या इमारतीचा विस्तार सुमारे १०,००० चौरस मीटर इतका आहे. या इमारतीत वाहते पाणी, शौचालये आणि मल वाहून नेण्याची सोय होती. तेथील लाकडी सामान सुवर्ण, नीलाश्‍म आणि हस्तिदंत यांनी जडलेले होते. बारीक नक्षीकाम केलेली हस्तिदंताची तावदाने सापडली आहेत. भिंतीचे कुंपण असलेली बाग आणि एक खोलगट तळे राजमहालाची शान वाढवत होते.

शहरात आणि आजूबाजूच्या सपाट प्रदेशात बआल आणि डेगन दैवतांची असंख्य मंदिरे होती. * २० मीटर उंचीच्या या मंदिरांमध्ये एक छोटासे द्वार होते ज्यातून आतल्या खोलीत जाता येत होते; आणि तेथे दैवताची मूर्ती असे. त्यात एक जिना देखील होता ज्यावरून गच्चीवर जाता येत होते; या ठिकाणाहून राजा विविध धार्मिक सोहळे पार पाडत असे. रात्रीच्या वेळी किंवा वादळे होत असत तेव्हा, जहाजांना सुरक्षितपणे बंदरांमध्ये मार्गदर्शित करण्यासाठी मंदिरांच्या शिखरांवर दीप जाळले जात असावेत. आपल्याला सुरक्षित आणल्याबद्दल खलाशी वादळाचे दैवत बआल-हदाद याची पूजा करून त्याला दगडी नांगर अर्पण करत असत; असे १७ नांगर त्याच्या मंदिरात सापडले.

कोरीव लेखांचा खजिना

युगारीटच्या अवशेषांमध्ये हजारो पाषाण लेख आढळले. आर्थिक, कायदेविषयक, परराष्ट्रीयकार्यासंबंधी आणि व्यवस्थापनासंबंधीचे आठ भाषांमधील लेख पाच लिपींमध्ये लिहिलेले आढळले. शाफेर यांच्या गटाला असे कोरीव लेख सापडले ज्यांची भाषा अद्याप अज्ञात आहे; या भाषेला युगारीटिक असे नाव देण्यात आले. आतापर्यंत सापडलेल्या सर्वात प्राचीन वर्णमालांतील एक असलेल्या या भाषेत ३० पाचरीच्या आकाराच्या खुणा आहेत.

दररोजच्या व्यवहारांविषयी माहिती असण्याखेरीज युगारीटिक दस्तऐवजांमध्ये साहित्यिक मजकूर देखील आहे; या मजकुरामुळे, त्या काळातील धार्मिक संकल्पना आणि चालीरीती समजण्यास नवा मार्ग खुला झाला. युगारीट येथील धर्म आणि शेजारच्या कनानी लोकांचा धर्म यांत अनेक समानता दिसून येतात. रोलंड द वो यांच्या मते, हे मजकूर “इस्राएलांनी कब्जा करण्याआधी कनान देशातील संस्कृतीची बऱ्‍याच अंशी उचित माहिती देतात.”

बआलच्या शहरातील धर्म

रास शामरा यात २०० हून अधिक देवी-देवतांचा उल्लेख केला आहे. एल हे सर्वात श्रेष्ठ दैवत होते; त्याला देवांचा व मानवांचा पिता मानले जात. शिवाय, बआल-हदाद हे वादळाचे दैवत, “ढगांवर स्वारी करणारा” आणि “पृथ्वीचा अधिपती” होता. एलला बुद्धिमान, पांढऱ्‍या दाढीचा, मनुष्यांपासून वेगळा असलेला पुरुष असे चित्रित करण्यात आले आहे. दुसऱ्‍या बाजूला पाहता, बआल हा शक्‍तिशाली व महत्त्वाकांक्षी देव असून तो इतर देवांवर आणि मानवांवर आधिपत्य गाजवतो.

सापडलेल्या लिखाणांचा धार्मिक सोहळ्यांमध्ये, जसे की, नव वर्षाच्या किंवा कापणीच्या प्रसंगी जप केला जात असावा. परंतु, अचूक अर्थ अद्यापही स्पष्ट झालेला नाही. आधिपत्यावरून झालेल्या एका वादासंबंधीच्या कवितेत बआल, एलच्या आवडत्या पुत्राचा, समुद्र दैवत याम याचा पराजय करतो. कदाचित याच विजयामुळे युगारीटच्या खलाशांना असा आत्मविश्‍वास होता की, बआल त्यांचे समुद्रात रक्षण करील. मॉटशी झालेल्या झुंजीत बआल पराजित होतो आणि तो पाताळात जातो. त्यानंतर पाण्याची कोरड पडते आणि मानवांच्या सर्व कार्यहालचाली बंद पडतात. बआलची पत्नी आणि बहीण अनात—प्रेम व युद्धाची देवी—मॉटला ठार मारते आणि बआलला पुन्हा जिवंत करते. बआल, आथिरात (अशेरा) या एलच्या पत्नीच्या मुलांना ठार मारतो आणि पुन्हा सिंहासनावर ताबा मिळवतो. पण सात वर्षांनंतर मॉट पुन्हा येतो.

ही कविता विविध हंगामांच्या चक्राचे चिन्ह आहे असा काहीजण अर्थ काढतात, ज्यामध्ये जीवनदायक पावसाला ग्रीष्म ऋतूची तीव्र उष्णता पराजित करते पण शरद ऋतूत त्याचे पुनरागमन होते. इतरांचे म्हणणे आहे की, सात वर्षांचे चक्र दुष्काळ आणि कोरड पडण्याच्या भीतीशी संबंधित आहे. पण दोन्ही बाबतीत, बआलचे श्रेष्ठत्व मानवांच्या प्रयत्नांच्या यशाकरता महत्त्वाचे आहे असे मानले जाते. विद्वान पीटर क्रेगी म्हणतात: “बआलच्या धर्माचा मुख्य हेतू स्वतःचे श्रेष्ठत्व टिकवून ठेवणे हा होता; त्याच्या उपासकांचा असा विश्‍वास होता की, तो श्रेष्ठ असेल तरच मानवांना जगण्याकरता आवश्‍यक असलेली पीके व गुरेढोरे राहतील.”

मूर्तिपूजेविरुद्ध संरक्षण

या लिखाणांमधून युगारीटिक धर्मात किती भ्रष्टपणा होता हे स्पष्ट दिसते. दि इलस्ट्रेटेड बायबल डिक्शनरी म्हणते: “या दैवतांच्या उपासनेचा वाईट परिणाम या लिखाणांवरून स्पष्ट होतो; युद्ध, पवित्र वेश्‍याव्यवसाय, शृंगारिक प्रेम या गोष्टींना दिलेले महत्त्व आणि यामुळे झालेली सामाजिक अधोगती.” द वो म्हणतात: “या कविता वाचल्यावर, याव्हेच्या उपासकांना व श्रेष्ठ संदेष्ट्यांना या उपासनेबद्दल किती घृणा वाटत असावी हे लक्षात येते.” देवाने इस्राएलच्या प्राचीन राष्ट्राला दिलेले नियमशास्त्र अशा खोट्या धर्माविरुद्ध एक संरक्षण होते.

युगारीटमध्ये शकुन सांगणे, फलज्योतिष आणि जादूटोणाच्या प्रथा सर्रास चालत होत्या. शकुन केवळ आकाशातील नक्षत्रांकडे पाहून नव्हे तर विरूप गर्भ व मारलेल्या पशुंचे अवयव पाहून देखील सांगितला जात असे. इतिहासकार झाकलीन गाशे म्हणतात, “विधिनुसार अर्पण केलेला पशु देवाचा भाग बनत असे व देवाच्या आत्म्याचा त्या पशुच्या आत्म्याशी मिलाफ होत असे असा लोकांचा विश्‍वास होता. परिणामतः, या अवयवांवरील दृश्‍य खुणा पाहून देवांची इच्छा जाणणे शक्य होते; [देव अशाप्रकारे] भावी घटनांबद्दलच्या एखाद्या प्रश्‍नाचे किंवा एखाद्या विशिष्ट प्रसंगी काय करावे याचे होकारार्थी किंवा नकारार्थी उत्तर देऊ शकत होते.” (ल पेए डुगारीट ओटुर द १२०० आव्हां) याच्या उलट, इस्राएलांना अशा प्रथांपासून दूर राहण्याची ताकीद देण्यात आली होती.—अनुवाद १८:९-१४.

मोशेच्या नियमशास्त्रात पशुगमन करू नये अशी स्पष्ट मनाई करण्यात आली होती. (लेवीय १८:२३) युगारीटमध्ये या प्रथेबद्दल लोकांचा काय विचार होता? सापडलेल्या लिखाणांत, बआल एका पाडीशी संग करतो. पुरातत्त्वशास्त्रज्ञ सायरस गॉर्डन म्हणतात, “या कृत्यासाठी बआल एका बैलाचे रूप धारण करत होता असा वाद मांडल्यास, जे पुजारी कल्पकथेतील [बआलची] भूमिका उतरवत होते त्यांच्याबाबतीत असे म्हणता येणार नाही.”

इस्राएली लोकांना अशी आज्ञा देण्यात आली होती: “कोणी मृत झाल्यामुळे आपल्या अंगावर वार करून घेऊ नका.” (लेवीय १९:२८) परंतु, बआलचा मृत्यू झाल्यावर एलने “चाकूने स्वतःवर वार केले, त्याने वस्तऱ्‍याने स्वतःला चिरले; त्याने आपल्या गालावर आणि हनुवटीवर वार केले.” बआल उपासकांमध्ये विधीनुसार स्वतःवर वार करण्याची कदाचित प्रथा होती असे दिसते.—१ राजे १८:२८.

एका युगारिटिक कवितेत असे सुचवण्यात येते की, कनानी धर्मातल्या एका फलत्वाच्या विधीत, करडाला दुधात शिजवले जात असे. परंतु, मोशेच्या नियमशास्त्रात इस्राएलांना अशी आज्ञा देण्यात आली होती की, “करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नये.”—निर्गम २३:१९.

बायबलच्या लिखाणांशी तुलना

युगारिटिक लिखाणांचा, प्रामुख्याने, बायबलच्या हिब्रू भाषेच्या साहाय्याने सर्वप्रथम अनुवाद करण्यात आला होता. पीटर क्रेगी म्हणतात: “हिब्रू शास्त्रात अनेक शब्द वापरले आहेत ज्यांचा अर्थ स्पष्ट नाही आणि काही वेळा त्यांचा अर्थ अज्ञात आहे; २० व्या शतकाआधीच्या अनुवादकांनी विविध मार्गांनी संभाव्य अर्थाचा अंदाज लावला. पण तेच शब्द युगारिटिक लिखाणांत सापडतात तेव्हा त्यांचा अर्थ स्पष्ट होतो.”

उदाहरणार्थ, यशया ३:१८ येथे वापरलेल्या एका इब्री शब्दाचे सहसा “बिंद्या” असे भाषांतर केले जाते. युगारिटिकमधील असाच एक मूळ शब्द सूर्य आणि सूर्य-देवी या दोघांना सूचित करतो. यास्तव, यशयाच्या भविष्यवाणीत उल्लेखिलेल्या जेरूसलेममधील स्त्रियांनी कनानी देवांचे चिन्ह म्हणून सूर्याची लहान पदके त्याचप्रमाणे “चंद्रकोरी” अलंकार घातले असावेत.

मॅसोरेटिक लिखाणांत नीतिसूत्रे २६:२३ मध्ये “ओठात एक व पोटात एक” याची तुलना “रुपेरी मुलामा” दिलेल्या मडक्याशी केली आहे. युगारिटिक मूळ शब्दामुळे या तुलनेचा अनुवाद “मडक्याच्या तुकड्यावरील चकचकीत मुलामा” असा करता येतो. नवे जग भाषांतर यात हे नीतिसूत्र उचितपणे पुढीलप्रमाणे भाषांतरित केले आहे: “वाणी कळवळ्याची पण मन दुष्ट असणे हे, रुप्याचा चकचकीत मुलामा दिलेल्या मडक्याच्या तुकड्यासारखे आहे.”

बायबलकरता आधार?

रास शामराच्या लिखाणांचे परीक्षण केल्यावर काही विद्वान असा दावा करू लागले आहेत की, बायबलमधील काही उतारे युगारिटिक काव्य साहित्यावर आधारलेले आहेत. फ्रेंच शिक्षण संस्थेचे एक सदस्य, आन्द्रे काको म्हणतात की, “कनानी संस्कृती ही इस्राएली धर्माचा आधार” आहे.

रोममधील पोपच्या बायबल शिक्षण संस्थेतील मिशेल डेहड स्तोत्र २९ विषयी म्हणतात: “वादळाचे दैवत, बआल याच्याकरता असलेल्या एका प्राचीन कनानी भक्‍तिगीतावर आधारून यहोवाकरता हे स्तोत्र बनवण्यात आले आहे . . . स्तोत्रातील जवळजवळ प्रत्येक शब्द प्राचीन कनानी लिखाणांत सापडू शकतो.” हा निष्कर्ष खरा आहे का? मुळीच नाही!

अधिक अलीकडील काळातल्या विद्वानांना हे माहीत आहे की, या समानता अतिशयोक्‍ती आहेत. इतरांनी, सर्व युगारिटांचे असे ज्याला म्हटले आहे त्याची टीका केली आहे. तत्त्ववेत्ता गॅरी ब्रँटली म्हणतात, “एकही युगारिटिक लिखाण पूर्णपणे स्तोत्र २९ शी जुळत नाही. स्तोत्र २९ (किंवा बायबलचे इतर कोणतेही लिखाण) मूर्तिपूजक कल्पकथेवर आधारलेले आहे या दाव्याला कोणताही पुरावा नाही.”

भाषालंकार, काव्यात्मक समांतरता आणि लेखनशैलीतील वैशिष्ट्ये यांमधील समानता रूपांतराचा पुरावा आहे का? उलट, या समानता असल्या पाहिजेत. एन्सायक्लोपिडिया ऑफ रिलिजन यात म्हटले आहे: “पद्धत आणि मजकुरातील समानतेचे कारण सांस्कृतिक आहे: युगारीट आणि इस्राएल यांमध्ये बरेच भौगोलिक आणि ऐहिक फरक असले तरी त्या [जाती] एका व्यापक संस्कृतीचा भाग होत्या आणि त्यांचा काव्यात्मक व धार्मिक शब्दसंग्रह एकच होता.” यास्तव, गॅरी ब्रँटली असा निष्कर्ष काढतात: “केवळ भाषेतील समानतेमुळे बायबलची लिखाणे ही मूर्तिपूजक विश्‍वासांवर आधारित आहेत असे ठासून सांगणे उचित ठरणार नाही.”

शेवटी, रास शामराची लिखाणे आणि बायबल यांमध्ये समानता असल्या तरी त्या केवळ साहित्यिक समानता आहेत, आध्यात्मिक नाहीत याची नोंद घेतली जावी. पुरातत्त्वशास्त्रज्ञ सायरस गॉर्डन म्हणतात, “बायबलमधील उच्च नैतिक दर्जे युगारीटमध्ये सापडत [नाहीत].” उलट, समानतेपेक्षा फरकच जास्त आहेत.

युगारिटिक अभ्यासांमुळे कदाचित बायबल विद्यार्थ्यांना बायबल लेखकांच्या व सर्वसाधारपणे इब्री राष्ट्राच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि धार्मिक वातावरणाची समज मिळत राहील. रास शामराच्या लिखाणांचे अधिक परीक्षण कदाचित प्राचीन इब्री भाषेची समज प्राप्त करण्यासही मदत करू शकेल. परंतु, युगारीट येथे सापडलेले पुरातत्त्वीय अवशेष, बआलची अशुद्ध उपासनापद्धत व यहोवाची शुद्ध उपासनापद्धत यांच्यातील फरक स्पष्टपणे दाखवतात.

[तळटीपा]

^ परि. 7 “समुद्राचे लोक” हे सहसा भूमध्याच्या बेटांवरील आणि किनारपट्टीच्या प्रदेशांतील समुद्रप्रवासी होते असे मानले जात. फिलिस्टीन लोक त्यांच्यापैकी असावेत.—आमोस ९:७.

^ परि. 10 डेगनचे मंदिर हेच एलचे मंदिर आहे असे काहीजण म्हणतात; पण याबद्दल अनेकांची वेगळी मते आहेत. फ्रेंच विद्वान आणि बायबल अभ्यासाच्या जेरूसलेम शाळेतील प्राध्यापक, रोलंड द वो असे सुचवतात की, डेगन—शास्ते १६:२३ आणि १ शमुवेल ५:१-५ मधील दागोन—हे एलचे पूर्णनाम आहे. दि एन्सायक्लोपिडिया ऑफ रिलिजन म्हणतो की, कदाचित, “डेगनचा [एल]शी संबंध लावला जात होता किंवा [एलमध्ये तो] सामावलेला होता.” रास शामराच्या लिखाणांमध्ये, बआल याला डेगनचा पुत्र असे म्हटले आहे; परंतु येथे “पुत्र” या शब्दाचा अर्थ निश्‍चित नाही.

[२५ पानांवरील संक्षिप्त आशय]

युगारीट येथील पुरातत्त्वीय शोधांमुळे शास्त्रवचनांबद्दलची आपली समज वाढली आहे

[२४, २५ पानांवरील नकाशा/चित्रे]

सा.यु.पू. १४ व्या शतकातील हिटाईट साम्राज्य

भूमध्य सागर

युफ्रेटीस

केसियस पर्वत (जेबेल एल-आग्रा)

युगारीट (रास शामरा)

टेल सुकास

ओरोन्टेस

सिरिया

ईजिप्त

[चित्राचे श्रेय]

प्राण्याच्या शिराच्या आकाराची बआलची मूर्ती आणि प्याला Musée du Louvre, Paris; राजमहालाचे रंगचित्र: © D. Héron-Hugé pour “Le Monde de la Bible”

[२५ पानांवरील चित्र]

राजमहालाच्या प्रवेशद्वाराचे अवशेष

[२६ पानांवरील चित्र]

कल्पकथेतील एका युगारिटिक काव्यातून, निर्गम २३:१९ विषयी माहिती मिळू शकते

[चित्राचे श्रेय]

Musée du Louvre, Paris

[२७ पानांवरील चित्रे]

बआलचे स्मारक

शिकाराचे दृश्‍य असलेली सोन्याची थाळी

फलत्वाच्या देवीचे चित्र असलेल्या हस्तिदंताच्या सौंदर्यप्रसाधन पेटीचे झाकण

[चित्राचे श्रेय]

सर्व चित्रे: Musée du Louvre, Paris