व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

काहींना उत्तरे कशी मिळालीत

काहींना उत्तरे कशी मिळालीत

काहींना उत्तरे कशी मिळालीत

कोट्यवधी लोक प्रार्थना करतात. काहींना खात्री वाटते की, त्यांच्या प्रार्थना उत्तरल्या जातात. इतरांना, आपल्या प्रार्थना ऐकल्या जातात की नाही याचीच शंका वाटते. आणि काहीजण असे आहेत की, त्यांना उत्तरे हवीत परंतु आपली विनंती देवाला प्रार्थनेद्वारे सादर करण्याविषयी त्यांनी कधी विचार केलेला नसतो.

बायबलमध्ये, खऱ्‍या देवाला ‘प्रार्थना ऐकणारा’ असे म्हटले आहे. (स्तोत्र ६५:२) तुम्ही प्रार्थना करता तेव्हा, तुमच्या प्रार्थना खरोखर खऱ्‍या देवाला केल्या जातात का? तुमच्या प्रार्थना, तो त्यांचे उत्तर देईल अशाप्रकारच्या आहेत का?

पृथ्वीच्या सर्व भागांतील अनेक लोकांसाठी याचे उत्तर होय असे सिद्ध झाले आहे! त्यांना उत्तरे कशी मिळालीत? त्यांना काय शिकायला मिळाले?

देव—आहे तरी कोण?

पोर्तुगालमध्ये नन्स आणि पाळकांकडून शिक्षण मिळालेली एक शिक्षिका अगदी प्रामाणिकपणे आपला धर्म पाळत होती. चर्चमध्ये जेव्हा बदल झाले आणि महत्त्वाच्या शिकवणुकी चर्चने त्यागल्या आहेत असे तिला सांगण्यात आले होते तेव्हा ती गोंधळून गेली. विविध ठिकाणी प्रवास केल्यावर तिला पौर्वात्य देशांमधील उपासनापद्धतीची ओळख पटली आणि एक खरा देव आहे का अशी तिला शंका वाटू लागली. आपण उपासना कशी करावी? तिने बायबलमधील गोष्टींविषयी तिच्या पाळकाला विचारले तेव्हा तिच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि यामुळे ती निराश झाली.

कॅथलिक चर्चने या शिक्षिकेच्या शहरात एका पत्रिकेचे वाटप केले होते आणि त्यामध्ये चर्चला जाणाऱ्‍यांनी यहोवाच्या साक्षीदारांसोबत चर्चा करू नये अशी ताकीद देण्यात आली होती. पण तिच्या मनातले प्रश्‍न मात्र तसेच्या तसेच राहिले. एकदा तिच्या घरी साक्षीदार आले तेव्हा तिने त्यांचे ऐकून घेतले आणि तिला ते आवडले. साक्षीदारांशी बोलण्याची तिची ही पहिलीच वेळ होती.

आपल्या पुष्कळ प्रश्‍नांची उत्तरे मिळवण्यासाठी ही स्त्री साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करू लागली. प्रत्येक आठवडी तिच्याजवळ प्रश्‍नांची जणू लांबलचक यादीच असायची. देवाला नाव आहे का, एकच खरा देव आहे का, उपासनेत प्रतिमांचा उपयोग करण्यास त्याची संमती आहे का वगैरे अनेक प्रश्‍नांबद्दल तिला जाणून घ्यायचे होते. तिने पाहिले की, तिला मिळालेली सगळी उत्तरे बायबलमधून होती, कोणाच्या मनाची उत्तरे नव्हती; म्हणून ती चकित झाली होती आणि शिकत असलेल्या गोष्टींमुळे आनंदी होती. शेवटी, तिच्या मनात असलेल्या पुष्कळ प्रश्‍नांची उत्तरे तिला मिळाली. आज ती, येशू ख्रिस्ताने ‘खऱ्‍या उपासकांविषयी’ म्हटल्याप्रमाणे आत्म्याने व खरेपणाने यहोवाची उपासना करते.—योहान ४:२३.

श्रीलंकेत, एक कुटुंब नियमितपणे एकत्र मिळून बायबल वाचत असे; पण तरीही त्यांच्या अनेक महत्त्वाच्या प्रश्‍नांची त्यांना उत्तरे मिळत नव्हती. त्यांना मदत हवी होती, पण त्यांचे पाळक त्यांची मदत करायला असमर्थ होते. तथापि, यहोवाचे साक्षीदार त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी त्यांना मदतदायी बायबल साहित्य दिले. नंतर, यहोवाच्या साक्षीदारांनी त्या कुटुंबाच्या बायबल प्रश्‍नांना समाधानकारक उत्तरे दिली तेव्हा ते बायबल अभ्यास करायला तयार झाले. अभ्यासात शिकलेल्या गोष्टी त्यांना फार आवडल्या.

तरीपण, लहानपणापासून चर्चच्या शिकवणी मनात ठासल्यामुळे पत्नीला हे कबूल करणे मुश्‍कील होते की, येशू ख्रिस्ताचा पिता खुद्द येशूने म्हटल्याप्रमाणे “एकच खरा देव” आहे. (योहान १७:१, ३) येशू हा पित्याच्या बरोबरीचा आहे आणि हे “रहस्य” उलगडण्याचा प्रयत्न करू नये असे तिला शिकवण्यात आले होते. शेवटी तिने प्रामाणिकपणे आणि कळकळून यहोवाचे नाव घेऊन त्याला प्रार्थना केली आणि येशू कोण आहे याविषयी तिला समज देण्याची विनंती केली. मग पुन्हा एकदा तिने संबंधित शास्त्रवचनांचे काळजीपूर्वक परीक्षण केले. (योहान १४:२८; १७:२१; १ करिंथकर ८:५, ६) तिच्या डोळ्यांवरील पट्टी जणू दूर केल्याप्रमाणे तिला स्पष्ट समज मिळाली की, यहोवा—स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माणकर्ता आणि येशू ख्रिस्ताचा पिता—हाच खरा देव आहे.—यशया ४२:८; यिर्मया १०:१०-१२.

दुःख—कशाला?

ईयोब नावाच्या एका इसमाला अत्यंत दुःख भोगावे लागले. त्याची सर्व मुले एका वादळात ठार झाली आणि गरीबीमुळे तो अगदी रस्त्यावर आला. त्याला एक वेदनादायक आजारही झाला; शिवाय त्याच्या खोट्या मित्रांकडून त्याला दबावाचा सामना करावा लागला. या सर्वाचा सामना करत असताना ईयोबाने काही अविचारीपणाचे बोलणे केले. (ईयोब ६:३) पण देवाने त्याची परिस्थिती विचारात घेतली. (ईयोब ३५:१५) ईयोबाच्या हृदयात काय होते याची त्याला जाणीव होती आणि त्याने ईयोबाला आवश्‍यक तो सल्ला दिला. तो आजही लोकांना असाच सल्ला देतो.

मोझांबिकमध्ये, कास्ट्रु केवळ दहा वर्षांचा असताना त्याची आई वारली. त्याचे जीवन उद्‌ध्वस्त झाले. “ती अशी आम्हाला का सोडून गेली?” असा त्याच्या मनात प्रश्‍न होता. त्याचे पालक देवाला भिऊन वागणारे होते; पण आता तो पूर्णपणे गोंधळून गेला. त्याच्या मनाला आणि हृदयाला सांत्वन कसे मिळणार? एक लहान चिचेवा बायबल वाचून आपल्या थोरल्या भावांसोबत त्याची चर्चा करून त्याला सांत्वन मिळू लागले.

शेवटी, कास्ट्रुला कळाले की, त्याची आई देवाने अन्याय केल्यामुळे नव्हे तर वारशात मिळालेल्या अपरिपूर्णतेमुळे मरण पावली. (रोमकर ५:१२; ६:२३) बायबलमध्ये दिलेल्या पुनरुत्थानाच्या वचनातून त्याला सर्वात अधिक सांत्वन मिळाले कारण आपल्याला आपली आई पुन्हा भेटणार ही खात्री त्याला त्यातून मिळाली. (योहान ५:२८, २९; प्रेषितांची कृत्ये २४:१५) दुःखाची गोष्ट म्हणजे, आणखी चार वर्षांनी त्याचे वडीलही वारले. पण तोपर्यंत कास्ट्रु हे दुःख सहन करण्यास समर्थ होता. आज, यहोवावर त्याचे प्रेम आहे आणि देवाच्या सेवेत तो विश्‍वासूपणे आपले जीवन उपयोगात आणत आहे. त्याला मिळालेला आनंद त्याला ओळखणाऱ्‍या सर्वांना दिसून येतो.

कास्ट्रुला बायबल सत्यांमधून सांत्वन मिळाले तसेच ज्यांचे प्रिय जन मरण पावले आहेत त्यांनाही सांत्वन मिळते. दुष्टांच्या कार्यांमुळे ज्यांना पुष्कळ त्रास सहन करावा लागला आहे ते ईयोबाप्रमाणे विचारतात: “दुष्ट का जिवंत राहतात?” (ईयोब २१:७) देवाने आपल्या वचनाद्वारे दिलेले उत्तर लोक खरोखर ऐकतात तेव्हा देवाच्या पद्धतीने कार्य केल्याने आपला फायदा होतो हे त्यांना कळते.—२ पेत्र ३:९.

अमेरिकेत लहानाची मोठी झालेली बार्बरा हिने स्वतः कधी युद्धाच्या वाईट परिणामांचा अनुभव घेतला नाही. पण ती मोठी होत असताना जगातील अनेक देशांमध्ये युद्धे चालली होती. युद्धाच्या अघोरी कृत्यांचा अहवाल दररोजच्या बातम्यांमध्ये येत होता. शाळेत अभ्यास करत असताना, इतिहासाच्या काही घटना किती अनपेक्षितपणे घडतात याने ती गोंधळून जायची. याला काय कारणीभूत होते? जे काही घडत होते त्याची देवाला काळजी होती का? देवाच्या अस्तित्वावर तिला विश्‍वास होता परंतु त्याच्याविषयी तिच्या मनात दोन्ही प्रकारच्या भावना होत्या.

पण बार्बरा यहोवाच्या साक्षीदारांशी सहवास राखू लागली तसा तिच्या दृष्टिकोनात फरक झाला. तिने त्यांचे ऐकून घेतले आणि ती त्यांच्यासोबत बायबलचा अभ्यास करू लागली. ती राज्य सभागृहात सभांना जाऊ लागली. ती त्यांच्या एका अधिवेशनाला देखील हजर राहिली. शिवाय, तिने प्रश्‍न विचारले तेव्हा वेगवेगळ्या साक्षीदारांकडून आपल्याला वेगवेगळी उत्तरे मिळत नाहीत हे तिने पाहिले. उलट, सगळ्या साक्षीदारांचे एकमत होते कारण त्यांचे विचार बायबलवर आधारित होते.

साक्षीदारांनी बायबलमधून पुरावा दाखवला की, हे जग, त्याच्या शासकाच्या अर्थात दियाबल सैतानाच्या प्रभावाखाली आहे आणि ते त्याचा आत्मा प्रकट करते. (योहान १४:३०; २ करिंथकर ४:४; इफिसकर २:१-३; १ योहान ५:१९) त्यांनी समजावून सांगितले की, बार्बराला ज्या घटनांमुळे मनात गोंधळ झाला होता त्यांविषयी बायबलमध्ये भाकीत केले होते. (दानीएल, अध्याय २,, आणि ८) देवाने त्या घटनांविषयी भाकीत केले होते कारण त्याला हवे तेव्हा भविष्यात काय होणार ते पाहण्याची त्याला ताकद आहे. त्यांपैकीच्या काही घटना देवाने घडवून आणल्या होत्या. इतर घटना त्याने केवळ घडण्यास अनुमती दिली होती. साक्षीदारांनी बार्बराला दाखवले की, बायबल आपल्या काळातील चांगल्या तसेच वाईट घटनांविषयी भाकीत करते आणि त्यांचा अर्थ समजावून सांगते. (मत्तय २४:३-१४) नीतिमत्त्वाच्या एका नवीन जगाविषयी बायबल वचन देते आणि दुःख गतकाळात जमा होईल हे त्यांनी तिला दाखवले.—२ पेत्र ३:१३; प्रकटीकरण २१:३, ४.

हळूहळू बार्बराला हे कळू लागले की, मानवांवरील दुःखाला देव जबाबदार नसला तरी मानवांना त्याच्या आज्ञा पाळायच्या नसतात तेव्हा त्यांना जबरदस्तीने त्या पाळायला लावून तो दुःख टाळत नाही. (अनुवाद ३०:१९, २०) देवाने अशी व्यवस्था केली आहे ज्यामुळे आपण सदासर्वदा आनंदी राहू शकतो, परंतु त्याच्या नीतिमान मार्गांनुरूप आपण राहू की नाही हे प्रदर्शित करण्याची संधी तो सध्या आपल्याला देत आहे. (प्रकटीकरण १४:६, ७) बार्बराने देवाच्या अपेक्षा पाळण्याचा व त्यांनुरूप जगण्याचा निर्धार केला. शिवाय, जे प्रेम येशूने त्याच्या खऱ्‍या अनुयायांचे ओळख चिन्ह आहे असे त्याने म्हटले होते तेच प्रेम तिला यहोवाच्या साक्षीदारांमध्येही पाहायला मिळाले.—योहान १३:३४, ३५.

तिला ज्या व्यवस्थेमुळे मदत मिळाली त्याचा लाभ तुम्हालाही होऊ शकतो.

अर्थपूर्ण जीवन

ज्यांचे जीवन सुरळीत चालले आहे असे दिसते ते देखील त्यांच्या मनात घोळणाऱ्‍या प्रश्‍नांची उत्तरे मिळवू शकतात. उदाहरणार्थ, ब्रिटनमधील मॅथ्यू या तरुणाला खऱ्‍या देवाची ओळख करून घेण्याची व जीवनाच्या उद्देशाविषयी जाणून घेण्याची खूप इच्छा होती. मॅथ्यू १७ वर्षांचा असताना त्याचे वडील वारले. त्यानंतर, मॅथ्यूने संगीत क्षेत्रात महाविद्यालयीन पदवी घेतली. नंतर, आपली भौतिकवादी जीवनशैली किती व्यर्थ आहे याची जाणीव त्याला होऊ लागली. त्याने घर सोडले व तो लंडनला गेला आणि तेथे जाऊन तो अंमली पदार्थ घेऊ लागला, क्लब्समध्ये जाऊ लागला व ज्योतिषशास्त्र, जादूटोणा, झेन बुद्धिझम आणि इतर तत्त्वज्ञानी शिकवणींविषयी जाणून घेऊ लागला. हे सगळे तो समाधानकारक जीवन जगण्याच्या प्रयत्नात करत होता. शेवटी, निराश होऊन त्याने देवाकडे त्याला सत्य शोधण्यात मदत करण्यासाठी प्रार्थना केली.

दोन दिवसांनी मॅथ्यूला आपला एक जुना मित्र भेटला आणि त्याने आपल्या दुविधेविषयी त्याला सांगितले. या माणसाने यहोवाच्या साक्षीदारांसोबत अभ्यास केला होता. मॅथ्यूला जेव्हा २ तीमथ्य ३:१-५ हे वचन दाखवण्यात आले तेव्हा बायबलमध्ये आपल्या भोवतालच्या जगाचे किती अचूक वर्णन केले आहे ते पाहून तो चकित झाला. त्याने डोंगरावरील प्रवचन वाचले तेव्हा ते त्याच्या अंतःकरणाला भिडले. (मत्तय, अध्याय ५-७) यहोवाच्या साक्षीदारांविषयी टीका करणारे साहित्य वाचल्यामुळे सुरवातीला तो जरा कचरत होता पण शेवटी त्याने जवळच्या एका राज्य सभागृहात सभांना जाण्याचे ठरवले.

ज्या गोष्टी मॅथ्यू शिकत होता त्या त्याला आवडत होत्या आणि त्याने मंडळीतल्या एका वडिलांसोबत बायबलचा अभ्यास करायला सुरवात केली. काही दिवसातच त्याला जाणवले की आपण ज्याच्या शोधात होतो तेच आपण शिकत आहोत आणि हेच आपण देवाला केलेल्या प्रार्थनेचे उत्तर आहे. यहोवाला न आवडणाऱ्‍या सवयी सोडून दिल्याने फायदा होतो याचा त्याला प्रत्यय आला. देवाबद्दल हितकर भय निर्माण करताना आपले जीवन देवाच्या आज्ञांच्या एकवाक्यतेत आणण्यास तो प्रेरित झाला. मॅथ्यूला कळले की, या जीवनाला खरा अर्थ आहे.—उपदेशक १२:१३.

मॅथ्यूला किंवा या लेखात उल्लेख केलेल्या इतरांना समाधानकारक जीवनशैली मिळेल हे काही देवाने आधीच ठरवले नव्हते. तथापि, यहोवा देवाचा एक प्रेमळ उद्देश आहे आणि त्याच्या आज्ञा पाळण्याची जे तयारी दाखवतात त्या सर्वांना तो स्वीकारतो हे त्यांना शिकायला मिळाले. (प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५) त्या उद्देशात, युद्ध, आजारपण, उपासमार शिवाय मृत्यूही नसलेल्या जगात सार्वकालिक जीवन हे सामील आहे. (यशया २:४; २५:६-८; ३३:२४; योहान ३:१६) तुम्हाला हेच हवे आहे का? असल्यास, यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात बायबलवर आधारित असलेल्या सभांना उपस्थित राहून तुम्ही समाधानकारक जीवनशैली कशी मिळवता येईल याविषयी अधिक शिकू शकता. यासाठी तुमचे केव्हाही स्वागत आहे.

[७ पानांवरील चित्र]

देवाला कळकळून व त्याचे व्यक्‍तिगत नाव घेऊन प्रार्थना करा

[७ पानांवरील चित्र]

बायबलमधील गोष्टी खरोखर शिकवणाऱ्‍यांसोबत त्याचा अभ्यास करा

[७ पानांवरील चित्रे]

राज्य सभागृहात सभांना उपस्थित राहा

[४ पानांवरील चित्र]

गिर्यारोहक: Chad Ehlers/Index Stock Photography