व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आधी आणि नंतर तिच्या जीवनाचा कायापालट

आधी आणि नंतर तिच्या जीवनाचा कायापालट

“देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल”

आधी आणि नंतर तिच्या जीवनाचा कायापालट

मॉत्सपांगचे जीवन निरस आणि निरर्थक बनले होते! ती लेसोथो, दक्षिण आफ्रिकेच्या मध्यभागी असलेल्या देशातली एक तरुण मुलगी होती. मॉत्सपांग एका कॅथलिक घरात वाढली होती. काही नन्स तिला देवाच्या समीप जाण्यास मदत करण्याऐवजी पैशांचे आमीष दाखवून अनैतिक कामे करायला लावून कित्येक वर्षे तिच्यावर अत्याचार करत होत्या.

यामुळे, मॉत्सपांगचा धर्मावरून विश्‍वास उडाला होता. एक प्रेमळ निर्माणकर्ता आहे व तो आपल्या मानवी निर्मितीची काळजी वाहतो ही कल्पना तिला पटत नव्हती. तिच्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे आणि तिला सहन कराव्या लागलेल्या अत्याचारामुळे मॉत्सपांगला गहिऱ्‍या भावनिक जखमा झाल्या होत्या आणि आपण काहीच कामाचे नाही असे तिला वाटत होते. ती मोठी झाल्यावर अत्यंत हिंसक आणि रागीट वृत्तीची बनली. यामुळे ती गुन्हेगार बनली.

कालांतराने मॉत्सपांग ट्रेनमधील प्रवाशांना लुटणाऱ्‍या एका टोळीत सामील झाली. तिला अटक करून दक्षिण आफ्रिकेत तुरुंगात टाकण्यात आले. नंतर, तिला लेसोथो येथे तिच्या मायदेशी पाठवण्यात आले आणि तेथे जाऊन तिने पुन्हा गुन्हेगारी, दारूबाजी, हिंसा आणि अनैतिक वर्तन सुरू केले.

एकदा मॉत्सपांग फार निराश असताना तिने देवाकडे कळकळीने मदत मागितली. तिने देवाला वचन दिले, “देवा, मी यातून वाचले, तर मी तुझी सेवा करण्यासाठी वाटेल ते करेन.”

काही दिवसातच, मॉत्सपांगकडे यहोवाच्या साक्षीदारांचे मिशनरी गेले. बायबलचा अभ्यास करण्याविषयी त्यांनी तिला सांगितले. तिच्या अभ्यासातून तिला कळाले की, देव पक्षपाती नाही आणि तो लोकांविषयी बेपर्वा देखील नाही. उलट, तिला समजले की, सैतान हा “लबाडीचा बाप आहे” आणि तो दुष्ट आणि फसव्या युक्‍त्‌या लढवून लोकांना असा विचार करायला लावतो की, ते काही कामाचे नाहीत आणि यहोवाला ते कधीच पसंत पडणार नाहीत.—योहान ८:४४; इफिसकर ६:११.

मॉत्सपांगला हे जाणून दिलासा वाटला की, आपल्या पापांचा आपण पश्‍चात्ताप केला, देवाकडे क्षमा मागितली आणि त्याला संतुष्ट करायचा प्रयत्न केला तर आपल्याला आपला आत्म-सन्मान पुन्हा मिळू शकतो! तिला हे समजून घ्यायला मदत करण्यात आली की, “आपल्या मनापेक्षा देव थोर आहे” आणि आपण समजतो त्यापेक्षा तो फार वेगळ्या दृष्टिकोनातून आपल्याकडे पाहतो.—१ योहान ३:१९, २०.

मॉत्सपांगला स्तोत्रकर्त्या दावीदाचे पुढील शब्द वाचून अत्यानंद झाला: “परमेश्‍वर भग्नहृदयी लोकांच्या सन्‍निध असतो; अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करितो.” (स्तोत्र ३४:१८) ‘अनुतप्त मनाची’ असल्यामुळे तिला हे समजले की, यहोवाचे काही सेवक नाउमेद किंवा निराश झाले असले तरी तो त्यांना त्यागत नाही. देव आपल्या सर्व मेंढरांची काळजी घेतो आणि कठीण काळात त्यांचा पाठिंबा होतो हे कळाल्यावर तिला फार बरे वाटले. (स्तोत्र ५५:२२; १ पेत्र ५:६, ७) खासकरून, “देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल” हे शब्द तिला स्पर्शून गेले.—याकोब ४:८.

देवाच्या वचनाचे, अर्थात बायबलचे सामर्थ्य मॉत्सपांगच्या जीवनात लगेच दिसू लागले. ती नियमितपणे ख्रिस्ती सभांना जाऊ लागली आणि तिने शास्त्राच्या विरोधात असलेल्या सर्व चालीरीती सोडून दिल्या. परिणाम? आपण देवाची प्रीती आणि कृपा मिळवण्यास अपात्र आहोत असे तिला आता वाटत नाही. यहोवाची साक्षीदार या नात्याने तिचा बाप्तिस्मा झाल्यापासून तिने राज्याच्या सुवार्तेची घोषक या नात्याने ख्रिस्ती सेवेत हजारो तास खर्च केले आहेत. गतकाळातील अनुभवांच्या जखमांचे व्रण असूनही मॉत्सपांग सध्या आनंदी आणि अर्थपूर्ण जीवन जगत आहे. जीवन सुधारण्यासाठी बायबल किती सामर्थ्यशाली आहे याचे किती उत्तम प्रदर्शन!—इब्री लोकांस ४:१२.

[९ पानांवरील संक्षिप्त आशय]

“देवा, मी यातून वाचले, तर मी तुझी सेवा करण्यासाठी वाटेल ते करेन”

[९ पानांवरील चौकट]

बायबलची तत्त्वे कार्यात

अत्याचार झालेल्या व्यक्‍तींना सांत्वनदायी ठरलेली बायबलची काही तत्त्वे:

“माझे मन अनेक चिंतांनी व्यग्र होते तेव्हा तुझ्यापासून [देवापासून] लाभणारे सांत्वन माझ्या जिवाचे समाधान करिते.” (स्तोत्र ९४:१९) यहोवाच्या वचनात सापडणारे त्याचे “सांत्वन” फार समाधानकारक ठरते. मनन आणि प्रार्थना करतेवेळी त्यांचा विचार केल्याने अस्वस्थ करणारे विचार दूर करण्यास मदत मिळते आणि देव आपल्या भावना समजून घेणारा मित्र आहे हा भरवसा वाढतो.

“भग्नहृदयी जनांना तो [यहोवा] बरे करितो; तो त्यांच्या जखमांना पट्ट्या बांधितो.” (स्तोत्र १४७:३) आपण यहोवाच्या दयेबद्दल आणि येशूच्या खंडणी बलिदानाच्या आधारे आपल्या पापांची क्षमा करण्याच्या त्याच्या तरतुदीबद्दल कृतज्ञता बाळगली तर मनात दोषी न वाटता आपण देवाला आत्मविश्‍वासाने प्रार्थना करू शकतो. यामुळे मिळणाऱ्‍या सांत्वनाची आणि मनःशांतीची तुलना कशासोबतही करता येणार नाही.

“ज्याने मला पाठविले त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीहि माझ्याकडे [येशू ख्रिस्त] येऊ शकत नाही; त्याला शेवटल्या दिवशी मी उठवीन.” (योहान ६:४४) पवित्र आत्म्याद्वारे आणि राज्य प्रचाराच्या कार्याद्वारे यहोवा स्वतः आपल्याला त्याच्या पुत्राकडे आकर्षित करतो आणि सार्वकालिक जीवनाची आशा देतो.