व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चांगल्या कामांकरता शुद्ध केलेले लोक

चांगल्या कामांकरता शुद्ध केलेले लोक

चांगल्या कामांकरता शुद्ध केलेले लोक

“देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणू.”—२ करिंथकर ७:१.

१. यहोवाची उपासना करणाऱ्‍यांकडून तो काय अपेक्षा करतो?

“परमेश्‍वराच्या डोंगरावर कोण चढेल? त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील?” प्राचीन इस्राएलातील राजा दावीद याने यहोवाला स्वीकार्य असलेल्या उपासनेच्या संबंधाने वरील विचारप्रवर्तक प्रश्‍न मांडले. मग त्याने या प्रश्‍नाचे याप्रकारे उत्तर दिले: “ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे, जो आपले चित्त असत्याकडे लावीत नाही, व कपटाने शपथ वाहत नाही तो.” (स्तोत्र २४:३, ४) यहोवा सर्वस्वी पवित्र आहे, त्यामुळे त्याची संमती मिळवू इच्छिणाऱ्‍याने देखील शुद्ध व पवित्र असले पाहिजे. याआधी यहोवाने इस्राएलच्या मंडळीला याची आठवण करून दिली होती: “आपणांस पवित्र करून पवित्र राहा, कारण मी पवित्र आहे.”—लेवीय ११:४४, ४५; १९:२.

२. पौल व याकोब यांनी खऱ्‍या उपासनेत शुद्धतेच्या महत्त्वावर कशाप्रकारे जोर दिला?

कित्येक शतकांआधी प्रेषित पौलाने करिंथच्या अनैतिक शहरातील ख्रिश्‍चनांना असे लिहिले होते: “प्रियजनहो, आपणाला ही अभिवचने मिळाली आहेत, म्हणून देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणू.” (२ करिंथकर ७:१) यावरून पुन्हा एकदा हेच कळून येते की देवासोबत नातेसंबंध राखण्याकरता आणि त्याने प्रतिज्ञा केलेले आशीर्वाद मिळवण्याकरता आपण शारीरिक व आध्यात्मिक मलीनतेपासून व भ्रष्टतेपासून शुद्ध व मुक्‍त असले पाहिजे. याच अनुषंगाने देवाला स्वीकार्य असलेल्या उपासनेच्या संदर्भात लिहिताना शिष्य याकोबाने असे लिहिले: “देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे, व स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे हे आहे.”—याकोब १:२७.

३. आपली उपासना देवाला स्वीकार्य असावी म्हणून आपण कशाविषयी गांभिर्याने दखल घेतली पाहिजे?

शुद्ध, पवित्र व निष्कलंक राहणे खऱ्‍या उपासनेत महत्त्वाचे असल्यामुळे देवाची संमती मिळवू इच्छिणाऱ्‍या प्रत्येकाने या बाबतीत सुधारणा करण्याविषयी गांभिर्याने विचार केला पाहिजे. आज शुद्धतेविषयी लोकांचे वेगवेगळे स्तर व विचार असल्यामुळे यहोवाच्या नजरेत शुद्ध व स्वीकार्य काय आहे हे समजून घेऊन आपण त्यानुसार वागले पाहिजे. या बाबतीत देव त्याच्या उपासकांकडून काय अपेक्षा करतो आणि त्याच्या नजरेत शुद्ध व स्वीकार्य बनण्याकरता व त्याच स्थितीत राहण्याकरता त्याने कशाप्रकारे मदत पुरवली आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे.—स्तोत्र ११९:९; दानीएल १२:१०.

खऱ्‍या उपासनेकरता शुद्ध

४. बायबलमधील शुद्धतेच्या संकल्पनेचे स्पष्टीकरण करा.

बहुतेक लोकांच्या मते शुद्ध असणे म्हणजे केवळ घाणीपासून व दूषक पदार्थांपासून मुक्‍त असणे. पण बायबलमध्ये, शुद्ध असणे याकरता वापरलेल्या अनेक इब्री व ग्रीक शब्दांतून केवळ शारीरिकदृष्ट्या शुद्ध असण्याचा अर्थ नव्हे तर बहुतेकवेळा नैतिक व आध्यात्मिकदृष्ट्या शुद्ध असण्याचा अर्थ सूचित होतो. म्हणूनच एका बायबल ज्ञानकोशात असे म्हटले आहे: “‘शुद्ध’ आणि ‘अशुद्ध’ हे शब्द [बायबलमध्ये] फारच क्वचित वेळा केवळ आरोग्यविषयक बाबींच्या संदर्भात वापरलेले आढळतात; या मुळात धार्मिक संकल्पना आहेत. त्याअर्थी ‘शुद्धतेचे’ तत्त्व हे जीवनाच्या प्रत्येक पैलूवर प्रभाव करते.”

५. मोशेच्या नियमशास्त्राचे इस्राएली व्यक्‍तीच्या जीवनावर स्वच्छतेच्या संदर्भात कितपत नियत्रंण होते?

मोशेच्या नियमशास्त्रात इस्राएल लोकांच्या जीवनातील जवळजवळ प्रत्येक पैलूसंबंधी नियम व आदेश होते ज्यांच्या माध्यमाने विशिष्ट गोष्ट शुद्ध व स्वीकार्य होते किंवा नव्हते हे त्यांना ठरवता येत होते. उदाहरणार्थ लेवीय ११-१५ अध्यायांत शुद्धता व अशुद्धता यांसंबंधीच्या सविस्तर सूचना आपल्याला वाचायला मिळतात. काही पशू अशुद्ध होते आणि इस्राएल लोकांना त्यांचे मांस खाणे वर्ज्य करण्यास सांगण्यात आले होते. प्रसूतीमुळे स्त्री विशिष्ट काळापुरती अशुद्ध होते असे मानले जायचे. विशिष्ट त्वचा रोग, विशेषतः कुष्ठरोग, तसेच स्त्रीपुरुषांचे जननेंद्रीय स्राव देखील एका व्यक्‍तीला अशुद्ध बनवत होते. अशुद्ध झाल्यास काय करावे याबद्दलही नियमशास्त्रात स्पष्ट सूचना होत्या. उदाहरणार्थ गणना ५:२ यात आपण असे वाचतो: “इस्राएल लोकांना अशी आज्ञा कर की, प्रत्येक महारोगी, प्रत्येक स्रावी आणि प्रेताने अशुद्ध झालेला प्रत्येक जण ह्‍यांना तुम्ही छावणीबाहेर पाठवून द्यावे.”

६. शुद्धतेसंबंधी नियम कोणत्या उद्देशाने देण्यात आले होते?

यहोवाचे हे व इतर नियम कित्येक शतकांनंतर अस्तित्वात आलेल्या वैद्यकीय व शरीरवैज्ञानिक संकल्पनांवर आधारित होते; इस्राएली लोक या नियमांनुसार चालले तेव्हा त्यांना फायदा झाला. पण हे नियम केवळ आरोग्यविषयक नियम किंवा वैद्यकीय मार्गदर्शक सूचना नव्हत्या. तर हे नियम खऱ्‍या उपासनेत अंतर्भूत होते. लोकांच्या दैनंदिन जीवनाच्या लहानमोठ्या पैलूंसंबंधी—आहार, प्रसूती, वैवाहिक संबंध इत्यादींसंबंधी देण्यात आलेल्या सूचनांवरून हेच सिद्ध झाले, की ज्याअर्थी त्यांनी आपले जीवन संपूर्णतः यहोवाला समर्पित केले होते, त्याअर्थी सर्व गोष्टींत त्यांच्याकरता काय योग्य वा अयोग्य आहे हे ठरवण्याचा अधिकार केवळ यहोवा देवालाच होता.—अनुवाद ७:६; स्तोत्र १३५:४.

७. नियमशास्त्राचे पालन केल्यामुळे इस्राएल राष्ट्राला कोणते आशीर्वाद मिळणार होते?

नियमशास्त्राच्या कराराने इस्राएल लोकांचे त्यांच्या जवळपासच्या राष्ट्रांतील लोकांच्या अशुद्ध चालीरीतींपासून संरक्षण केले. नियमशास्त्राचे व यहोवाच्या नजरेत शुद्ध राहण्याकरता त्याच्या सर्व आदेशांचे विश्‍वासूपणे पालन केल्यामुळे इस्राएल लोक आपल्या देवाची सेवा करण्याकरता आणि त्याचे आशीर्वाद प्राप्त करण्याकरता योग्य स्थितीत राहू शकत होते. यासंदर्भात यहोवाने इस्राएल राष्ट्राला असे सांगितले: “तुम्ही खरोखर माझी वाणी ऐकाल आणि माझा करार पाळाल तर सर्व लोकांपेक्षा माझा खास निधि व्हाल, कारण सर्व पृथ्वी माझी आहे; पण तुम्ही मला याजकराज्य, पवित्र राष्ट्र व्हाल.”—निर्गम १९:५, ६; अनुवाद २६:१९.

८. नियमशास्त्रात शुद्धतेविषयी जे सांगण्यात आले आहे त्याकडे आज ख्रिश्‍चनांनी का लक्ष दिले पाहिजे?

इस्राएल लोकांनी आपल्या नजरेत शुद्ध, पवित्र व स्वीकार्य राहावे म्हणून त्यांना नियमशास्त्रातून ज्याअर्थी यहोवाने इतके तपशीलवार नियम दिले होते, त्याअर्थी आज ख्रिश्‍चनांनी देखील या बाबतीत आपली काय स्थिती आहे याचा काळजीपूर्वक विचार करू नये का? आज ख्रिस्ती लोक जरी नियमशास्त्राच्या बंधनात नाहीत तरीसुद्धा, पौलाने खुलासा केल्याप्रमाणे, नियमशास्त्रातील सर्व गोष्टी “पुढे होणाऱ्‍या गोष्टींच्या छाया आहेत; शरीर तर ख्रिस्ताचे आहे.” (कलस्सैकर २:१७; इब्री लोकांस १०:१) यहोवा देव म्हणतो, “मी परमेश्‍वर बदलणारा नव्हे.” जर यहोवा देवाने खऱ्‍या उपासनेत शुद्ध व निष्कलंक राहणे इतके महत्त्वपूर्ण लेखले, त्याअर्थी आज आपणही शारीरिक, नैतिक व आध्यात्मिकरित्या शुद्ध राहण्याची बाब अत्यंत गांभिर्याने घेतली पाहिजे; तरच आपल्याला त्याची संमती व आशीर्वाद मिळू शकेल.—मलाखी ३:६; रोमकर १५:४; १ करिंथकर १०:११, ३१.

शारीरिक स्वच्छता आपली लायकी पटवून देते

९, १०. (अ) ख्रिस्ती व्यक्‍तीकरता स्वच्छता का महत्त्वाची आहे? (ब) यहोवाच्या साक्षीदारांच्या अधिवेशनांबद्दल सहसा कशाप्रकारच्या टिप्पण्या केल्या जातात?

आजही शारीरिक स्वच्छता खऱ्‍या उपासनेतील महत्त्वपूर्ण घटक आहे का? केवळ शारीरिक शुद्धता एखाद्या व्यक्‍तीला देवाचा खरा उपासक ठरवत नसली तरीसुद्धा देवाच्या खऱ्‍या उपासकाने शक्य होईल तितके शारीरिकरित्या स्वच्छ राहावे हे नक्कीच योग्य आहे. खासकरून आजच्या काळात बरेच लोक स्वतःच्या, आपल्या कपड्यांच्या किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसराच्या स्वच्छतेकडे लक्ष देत नाहीत; पण जे देतात त्यांच्याकडे चटकन लोकांचे लक्ष जाते. यामुळे अनेक चांगले परिणाम घडून येतात. याच संदर्भात, पौलाने करिंथ येथील ख्रिस्ती बांधवांना सांगितले: “आम्ही करीत असलेल्या सेवेत काही दोष दिसून येऊ नये म्हणून आम्ही कोणत्याहि प्रकारे अडखळण्यास कारण होत नाही; तर सर्व गोष्टीत देवाचे सेवक म्हणून आम्ही आपली लायकी पटवून देतो.”—२ करिंथकर ६:३, ४.

१० यहोवाच्या साक्षीदारांची कित्येकदा सरकारी अधिकाऱ्‍यांकडून त्यांच्या शुद्ध, व्यवस्थित व आदरणीय आचरणाबद्दल आणि सवयींबद्दल, विशेषतः मोठ्या अधिवेशनांदरम्यान पाहण्यात आलेल्या त्यांच्या वागणुकीबद्दल प्रशंसा करण्यात आली आहे. उदाहरणार्थ, इटलीतील सव्होना प्रांतात झालेल्या एका अधिवेशनाबद्दल ला स्टॅम्पा या वृत्तपत्राने अशी टिप्पणी केली: “आत प्रवेश करताच जी एक गोष्ट लगेच लक्षात येते ती म्हणजे या लोकांची स्वच्छता व सुव्यवस्थितपणा.” ब्राझील येथील साऊं पाऊलु शहरातील एका स्टेडियममध्ये यहोवाच्या साक्षीदारांचे अधिवेशन झाल्यानंतर स्टेडियमच्या एका अधिकाऱ्‍याने आपल्या स्वच्छता पथकाच्या सुपरव्हायजरला अशी सूचना दिली, की “यहोवाच्या साक्षीदारांनी जशी स्टेडियमची स्वच्छता केली तशी तुम्ही येथून पुढे करावी.” त्याच स्टेडियमच्या दुसऱ्‍या एका अधिकाऱ्‍याने म्हटले: “यहोवाच्या साक्षीदारांना स्टेडियम हवे असते तेव्हा आम्हाला काळजी असते ती फक्‍त तारखांची. इतर कशाच्याही बाबतीत आम्हाला काळजी करावी लागत नाही.”

११, १२. (अ) वैयक्‍तिक स्वच्छतेबद्दल बायबलमधील कोणते तत्त्व आठवणीत ठेवले पाहिजे? (ब) आपल्या वैयक्‍तिक सवयींविषयी व जीवनशैलीविषयी कोणते प्रश्‍न विचारले जाऊ शकतात?

११ जर आपल्या उपासनेच्या ठिकाणाच्या स्वच्छतेमुळे व सुव्यवस्थितपणामुळे आपण उपासना करत असलेल्या देवाचे गौरव होते तर मग निश्‍चितच हे गुण आपल्या खासगी जीवनात दाखवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. पण आपल्या घराच्या चार भिंतींच्या आड आपल्याला अगदी बिनधास्तपणे कसेही वागण्याची मोकळीक आहे असे काही जणांना वाटण्याचा संभव आहे. आपली वेशभूषा आणि साजसज्जेविषयी निश्‍चितच आपल्याला जे आवडते आणि सोयीस्कर वाटते ते निवडण्याचे आपल्याला स्वातंत्र्य आहे. पण हे स्वातंत्र्य सापेक्ष आहे. तुम्हाला आठवत असेल, पौलाने विशिष्ट प्रकारचे खाद्य खाण्याविषयी सह ख्रिस्ती बांधवांना अशी ताकीद दिली होती: “ही तुमची मोकळीक दुर्बळास ठेच लागण्याचे कारण होऊ नये म्हणून जपा.” मग त्याने एक बहुमोल तत्त्व मांडले: “मला सर्व गोष्टींची मोकळीक आहे तरी सर्व गोष्टी हितकारक असतातच असे नाही. मला सर्व गोष्टींची माकळीक आहे तरी सर्व गोष्टी उन्‍नति करितातच असे नाही.” (१ करिंथकर ८:९; १०:२३) पौलाचा सल्ला शुद्धतेच्या संदर्भात आपल्याकरता कशाप्रकारे समर्पक आहे?

१२ देवाच्या सेवकाने त्याच्या जीवनात स्वच्छ व सुव्यवस्थित असावे अशी अपेक्षा केली जाणे रास्तच आहे. म्हणूनच आपण नेहमी याची खात्री केली पाहिजे की आपले घर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर, आपण देवाच्या वचनाचे सेवक आहोत या आपल्या दाव्यापासून कोणत्याही प्रकारे लक्ष विचलित करत नाही. आपले घर आपल्याबद्दल आणि आपल्या विश्‍वासांबद्दल काय साक्ष अथवा ग्वाही देते? आपण सर्वांना ज्याविषयी इतक्या आवेशाने सांगतो अशा नीतिमत्तेच्या एका स्वच्छ व सुव्यवस्थित नव्या जगात राहण्याची आपल्याला मनस्वी इच्छा आहे असे आपल्या घराकडे पाहून वाटते का? (२ पेत्र ३:१३) त्याचप्रकारे आपले वैयक्‍तिक स्वरूप—सेवाकार्यादरम्यान असो अथवा एरवी—ते आपल्या संदेशाला अधिक अपीलकारक बनवू शकते किंवा याच्या उलट परिणामही करू शकते. उदाहरणार्थ मेक्सिको येथील एका पत्रकाराने अशी टिप्पणी केली: “खरोखर यहोवाच्या साक्षीदारांच्या सदस्यांमध्ये तरुण लोकांची संख्या मोठी आहे आणि या तरुणांबद्दल सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांचे नीट कापलेले केस, त्यांची स्वच्छता आणि उचित पेहराव.” आपल्यामध्ये असे तरुण आहेत याबद्दल आपल्याला किती आनंद वाटतो!

१३. दैनंदिन जीवनात हरप्रकारे स्वच्छ व सुव्यवस्थित असण्याविषयी खात्री करण्यासाठी आपण काय करू शकतो?

१३ आपण आपले शरीर व स्वरूप, आपल्या मालकीच्या वस्तू आणि आपले घर नेहमी स्वच्छ व नीटनेटके ठेवले पाहिजे हे म्हणणे सोपे आहे पण वास्तवात तसे करणे तितके सोपे नाही. अर्थात, यासाठी काही अत्याधुनिक, महागड्या यंत्रांची किंवा उपकरणांची गरज नाही तर उत्तम नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज आहे. आपले शरीर, कपडे, घर, कार आणि इतर गोष्टींच्या स्वच्छतेकरता वेळ बाजूला ठेवणे आवश्‍यक आहे. जीवनातल्या इतर कर्तव्यांसोबतच सेवाकार्यात, सभा, आणि वैयक्‍तिक अभ्यास यासाठी बराच वेळ द्यावा लागतो हे खरे आहे; पण ही सबब देऊन आपण देवाच्या व मनुष्यांच्या नजरेत स्वच्छ व स्वीकार्य राहण्याकरता परिश्रम करण्याचे टाळू शकत नाही. ‘सर्वांचा काही उचित काळ असतो.’ हे ओळखीचे तत्त्व जीवनाच्या या संदर्भातही तितकेच उचितपणे लागू होते.—उपदेशक ३:१.

निष्कलंक अंतःकरण

१४. नैतिक व आध्यात्मिक शुद्धता ही शारीरिक शुद्धतेपेक्षा अधिक महत्त्वाची आहे असे का म्हणता येईल?

१४ शारीरिक शुद्धतेकडे लक्ष देणे तर महत्त्वाचे आहेच, पण याहीपेक्षा अधिक महत्त्वाचे म्हणजे आपल्या नैतिक व आध्यात्मिक शुद्धतेविषयी जागरूक असणे. इस्राएल राष्ट्राला यहोवाने का नाकारले हे लक्षात घेतल्यास आपण या निष्कर्षावर येऊ शकतो. ते लोक शारीरिकरित्या अशुद्ध नव्हते पण नैतिक व आध्यात्मिकरित्या ते भ्रष्ट झाले होते. यशया संदेष्ट्याच्या माध्यमाने यहोवाने त्यांना सांगितले की ते “पापिष्ट राष्ट्र, दुष्कर्माने भारावलेले लोक” असल्यामुळे त्यांचे यज्ञ, चंद्रदर्शन आणि शब्बाथ, अगदी त्यांच्या प्रार्थनासुद्धा यहोवाला भार वाटू लागल्या होत्या. मग यहोवाची संमती पुन्हा मिळवण्याकरता त्यांनी काय करायचे होते? यहोवाने म्हटले: “आपणास धुवा, स्वच्छ करा; माझ्या डोळ्यांपुढून आपल्या कर्मांचे दुष्टपण दूर करा; दुष्टपणा करण्याचे सोडून द्या.”—यशया १:४, ११-१६.

१५, १६. येशूने सांगितल्याप्रमाणे कोणती गोष्ट एखाद्या मनुष्याला विटाळविते आणि येशूच्या या शब्दांवरून आपण काय शिकू शकतो?

१५ नैतिक व आध्यात्मिक शुद्धतेचे महत्त्व आणखी चांगल्याप्रकारे समजून घेण्याकरता येशूने शास्त्री व परूशांना काय सांगितले हे विचारात घ्या. शास्त्री व परुशी यांचे असे म्हणणे होते की येशूच्या शिष्यांनी भोजन करण्याआधी हात न धुतल्यामुळे ते अशुद्ध होते. येशूने त्यांचा विचार चुकीचा असल्याचे सांगितले व म्हटले: “जे तोंडात जाते ते माणसाला विटाळवीत नाही; तर जे तोंडातून निघते ते माणसाला विटाळविते.” मग त्याने यावर खुलासा केला: “जे तोंडातून निघते ते अंतःकरणातून येते व माणसाला विटाळविते. कारण अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जारकर्मे, चोऱ्‍या, खोट्या साक्षी, शिव्यागाळी ही निघतात. ह्‍या गोष्टी माणसाला विटाळवितात; न धुतलेल्या हातांनी जेवणे हे माणसाला विटाळवीत नाही.”—मत्तय १५:११, १८-२०.

१६ येशूच्या शब्दांवरून आपण काय शिकू शकतो? दुष्ट, अनैतिक व अशुद्ध कृत्ये ही अंतःकरणातील दुष्ट, अनैतिक व अशुद्ध प्रवृत्तीमुळे घडतात याकडे येशू लक्ष वेधत होता. शिष्य याकोबाने म्हटल्याप्रमाणे, “प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलविला जातो तेव्हा मोहांत पडतो.” (याकोब १:१४, १५) तेव्हा, आपल्याला येशूने वर्णन केलेल्या दुःखद पापांत पडायचे नसेल तर पहिल्यांदा आपण अशा गोष्टींबद्दलचे विचार आपल्या मनातून उपटून फेकून दिले पाहिजेत. त्याअर्थी आपण काय वाचतो, पाहतो किंवा ऐकतो याचे आपण परीक्षण केले पाहिजे. आज वक्‍तृत्त्व स्वातंत्र्य आणि कलेच्या नावाखाली मनोरंजन विश्‍व तसेच जाहिरात उद्योग आपल्या पतित शरीराच्या वासनापूर्तीकरता तयार केलेल्या ध्वनी व चित्रांचा सतत भडिमार करत असतात. पण अशा प्रकारच्या विचारांना मनात थारा न देण्याचा आपण पक्का निर्धार केला पाहिजे. देवाला आनंदित करण्यासाठी आणि त्याची संमती प्राप्त करण्यासाठी आपले हृदय सतत शुद्ध व निष्कलंक ठेवण्याकरता आपण नेहमी जागरूक राहणे आवश्‍यक आहे.—नीतिसूत्रे ४:२३.

चांगल्या कामांकरता शुद्ध

१७. यहोवाने त्याच्या लोकांना एका शुद्ध स्थितीत का आणले आहे?

१७ यहोवाच्या मदतीने आपण त्याच्या नजरेत शुद्ध स्थितीत राहू शकतो हा खरोखर एक आशीर्वाद व संरक्षण आहे. (२ करिंथकर ६:१४-१८) पण यहोवाने त्याच्या लोकांना या शुद्ध स्थितीत एका खास उद्देशाने आणले आहे हे देखील आपण आठवणीत ठेवले पाहिजे. पौलाने तीताला सांगितले की ख्रिस्त येशूने “स्वतःला आपल्याकरिता दिले, ह्‍यासाठी की, . . . आपल्याला सर्व स्वैराचारापासून मुक्‍त करावे आणि चांगल्या कामात तत्पर असे आपले स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करून ठेवावे.” (तीत २:१४) शुद्ध केलेले लोक या नात्याने आपण कोणत्या चांगल्या कार्यांकरता तत्पर असणे गरजेचे आहे?

१८. आपण चांगल्या कामांत तत्पर आहोत हे कसे दाखवू शकतो?

१८ सर्वप्रथम, आपण देवाच्या राज्याच्या सुवार्तेची जाहीर घोषणा करण्याकरता परिश्रम घेतले पाहिजेत. (मत्तय २४:१४) असे केल्यामुळे आपण जगातल्या सर्व लोकांना या पृथ्वीवर सर्वदा जगण्याची आशा देऊ करतो, एका अशा पृथ्वीवर जेथे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण राहणार नाही. (२ पेत्र ३:१३) आपल्या चांगल्या कार्यांत, दैनंदिन जीवनात देवाच्या आत्म्याची फळे प्रदर्शित करणे देखील समाविष्ट आहे; असे केल्याने आपण आपल्या स्वर्गीय पित्याचे गौरव करतो. (गलतीकर ५:२२, २३; १ पेत्र २:१२) तसेच जे सत्यात नाहीत पण नैसर्गिक आपत्ती किंवा मानवी दुर्घटनांनी ज्यांचे जीवन उद्धवस्त झाले आहे अशांनाही आपण विसरत नाही. आपण नेहमी पौलाचा पुढील सल्ला आठवणीत ठेवतो: “तर मग जसा आपणाला प्रसंग मिळेल त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः विश्‍वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करावे.” (गलतीकर ६:१०) शुद्ध अंतःकरणाने आणि निष्कपट हेतूने केलेली ही सर्व कामे देवाला संतुष्ट करतात.—१ तीमथ्य १:५.

१९. आपण शारीरिक, नैतिक व आध्यात्मिक शुद्धतेचा उच्च दर्जा कायम राखल्यास कोणते आशीर्वाद आपल्याला मिळतील?

१९ परात्पर देवाचे सेवक या नात्याने आपण पौलाच्या या शब्दांकडे लक्ष देतो: “बंधुजनहो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवितो की, तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.” (रोमकर १२:१) यहोवाकडून शुद्ध केले जाण्याच्या विशेषाधिकाराची आपण नेहमी कदर करत राहू या आणि शारीरिक, नैतिक व आध्यात्मिक शुद्धतेचा उच्च दर्जा कायम राखण्याचा सतत होईल तितका प्रयत्न करू या. असे केल्याने सध्याच्या जीवनात आपला आत्म-सन्मान वाढेल, आपल्याला समाधान मिळेल आणि लवकरच जेव्हा देव ‘सर्व काही नवे करेल’ तेव्हा “पहिल्या गोष्टी” अर्थात सध्याचे दुष्ट व दूषित व्यवस्थीकरण नष्ट होताना पाहण्याचा सुयोग आपल्याला प्राप्त होईल.—प्रकटीकरण २१:४, ५.

तुम्हाला आठवते का?

• इस्राएल लोकांना शुद्धतेच्या संदर्भात अनेक नियम का देण्यात आले होते?

• शारीरिक शुद्धता आपण घोषित करत असलेल्या संदेशाला अधिक अपीलकारक कशी बनवते?

• नैतिक व आध्यात्मिक शुद्धता शारीरिक शुद्धतेपेक्षा अधिक महत्त्वाची आहे असे का म्हणता येईल?

• आपण “चांगल्या कामांत तत्पर” असलेले लोक आहोत हे आपण कशाप्रकारे दाखवू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२१ पानांवरील चित्रे]

शारीरिक शुद्धता आपण घोषित करत असलेल्या संदेशाला अधिक अपीलकारक बनवते

[२२ पानांवरील चित्रे]

येशूने ताकीद दिली की दुष्ट विचार दुष्ट कृत्यांना जन्म देतात

[२३ पानांवरील चित्रे]

शुद्ध केलेले लोक या नात्याने यहोवाचे साक्षीदार चांगल्या कामांकरता आवेशी आहेत