व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘वचनाची घोषणा केल्याने’ तजेला प्राप्त होतो

‘वचनाची घोषणा केल्याने’ तजेला प्राप्त होतो

“माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन”

‘वचनाची घोषणा केल्याने’ तजेला प्राप्त होतो

तो एका महत्त्वपूर्ण कामानिमित्ताने आलेला परिपूर्ण मनुष्य होता. त्याच्या शिकवण्याची पद्धत इतकी प्रभावशाली होती की, “लोकसमुदाय त्याच्या शिक्षणावरून थक्क” होत असत. (मत्तय ७:२८) तो अथकपणे प्रचार करत होता. त्याने त्याचा वेळ, त्याची शक्‍ती व साधनसंपत्ती मुख्यत्वे देवाच्या राज्याचा प्रचार करण्यासाठी वापरली. होय, येशू ख्रिस्ताने आपला संपूर्ण मायदेश पालथा घातला; प्रचारक व शिक्षक म्हणून त्याच्या तोडीचे दुसरे कोणी नव्हते.—मत्तय ९:३५.

आपल्या काळातील लोकांना ‘राज्याच्या सुवार्तेचा’ प्रचार करणे आणि आपल्या शिष्यांना या कामासाठी प्रशिक्षित करणे हे येशूकरता सर्वात महत्त्वाचे व तातडीचे काम होते. (मत्तय ४:२३; २४:१४; २८:१९, २०) प्रचार कार्याची भारी जबाबदारी, या कार्याची निकड आणि प्रचंडता यांमुळे अपरिपूर्ण व वैयक्‍तिक मर्यादा असलेले त्याचे अनुयायी दबून गेले असते का?

मुळीच नाही! अधिक कामकरी पाठवून देण्यासाठी आपल्या शिष्यांना ‘पिकाच्या धन्याला’ अर्थात यहोवा देवाला प्रार्थना करायला सांगितल्यावर येशूने त्यांना लोकांना शिकवण्यास पाठवून दिले. (मत्तय ९:३८; १०:१) मग त्याने असे आश्‍वासन दिले की, त्याचा अनुयायी बनण्याची जबाबदारी—ज्यात प्रचाराच्या नियुक्‍तीचा समावेशही होतो—स्वीकारल्याने खरा विश्राम व दिलासा मिळेल. येशू म्हणाला: “माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन.”—मत्तय ११:२८.

आनंदाचे कारण

या आमंत्रणात किती कनवाळुपणा, प्रेमळपणा आणि दयाळुपणा आहे! त्यातून येशूला आपल्या अनुयायांविषयी असलेली कळकळ व्यक्‍त होते. त्याच्या शिष्यांना देवाच्या राज्याच्या ‘सुवार्तेची’ जबाबदारी पूर्ण करण्यात निश्‍चित तजेला वाटतो. यामुळे त्यांना खरा आनंद आणि समाधान प्राप्त होते.—योहान ४:३६.

येशू पृथ्वीवर होता त्याच्या अनेक वर्षांआधीच शास्त्रवचनांत यावर भर देण्यात आला होता की, आनंद हा देवाच्या पवित्र सेवेचा एक भाग असला पाहिजे. आणि ही गोष्ट स्तोत्रकर्त्याच्या भजनात स्पष्ट करण्यात आली होती: “अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो, परमेश्‍वराचा जयजयकार करा, हर्षाने परमेश्‍वराची सेवा करा; गीत गात त्याच्यापुढे या.” (स्तोत्र १००:१, २) आज, सर्व राष्ट्रातील लोक आनंदाने यहोवाची सेवा करतात आणि त्यांची स्तुती विजयी सैन्याच्या जयजयकारासारखी असते. देवाला खरोखर समर्पित असलेले लोक “गीत गात” त्याच्यासमक्ष येतात. आणि हे अगदी उचित आहे कारण यहोवा हा “आनंदी देव” आहे; त्याच्या सेवकांनी त्याला केलेल्या समर्पणानुसार जगण्यात त्यांना आनंद वाटावा अशी त्याची इच्छा आहे.—१ तीमथ्य १:११, NW.

तजेला प्राप्त झालेले सेवक

क्षेत्र सेवेतील कठीण परिश्रमाने थकवा येत नाही तर तजेला प्राप्त होतो हे कसे शक्य आहे? यहोवाचे कार्य करणे हे येशूला शक्‍ती देणाऱ्‍या अन्‍नाप्रमाणे होते. तो म्हणाला: “ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे हेच माझे अन्‍न आहे.”—योहान ४:३४.

त्याचप्रमाणे, आज आवेशी ख्रिस्ती प्रचारकांना ‘वचनाची घोषणा करण्यात’ आनंद वाटतो. (२ तीमथ्य ४:२) कॉनी नावाची एक मध्यमवयीन ख्रिस्ती स्त्री दर महिन्याला प्रचारकार्यात ७० पेक्षा अधिक तास खर्च करते; ती म्हणते: “सेवाकार्यात वेळ घालवल्यावर, दिवसाच्या शेवटी थकवा जाणवत असला तरी माझ्या मनाला समाधान आणि आनंद मिळतो.”

पण राज्याच्या संदेशाला चांगला प्रतिसाद मिळाला नाही तर? कॉनी पुढे म्हणते: “मला चांगला प्रतिसाद मिळाला नसला तरी सेवेत गेल्याचा पस्तावा मला कधीच वाटला नाही. शिवाय, माझ्या या कार्यामुळे यहोवाला आनंद होतो हे माहीत असल्यामुळे सत्याबद्दल इतरांशी बोलायला मला खूप आवडते कारण इतरांना सत्य सांगताना बायबलमधली आशा माझ्या मनात आणखी पक्की होत असते.”

लोकांना देवाविषयीचे ज्ञान मिळवण्यास मदत करण्यामुळे स्वतःचे जीवन अर्थपूर्ण बनते असे इतर काहींना वाटते. दर महिन्याला प्रचारकार्यात नियमितपणे ५० पेक्षा अधिक तास खर्च करणारी एक तरुण स्त्री मेलॉनी म्हणते: “सेवाकार्याने तजेला मिळतो कारण त्यामुळे माझ्या जीवनाला दिशा आणि उद्देश प्राप्त झाला आहे. सेवेत असताना व्यक्‍तिगत समस्या आणि दररोजच्या चिंता कुठल्या कुठे पळून जातात.”

यहोवाच्या साक्षीदारांमधील आणखी एक आवेशी सेवक मिलिसेंट म्हणते: “देवाचा मानवजातीसाठी काय उद्देश आहे आणि पृथ्वीवर परादीस कसे पूर्ववत केले जाईल याविषयी इतरांशी बोलल्याने माझा प्रत्येक दिवस मोलाचा बनतो. दररोज मला यहोवा खरा वाटू लागतो आणि मला शांती व एकप्रकारचे आंतरिक सुख लाभते; हे इतर कशानेही मिळवता येत नाही.”

तजेला प्राप्त झालेले सेवक

ख्रिस्ती सेवेमुळे राज्य प्रचारकांना निश्‍चितच तजेला मिळतो आणि जीवनाचा संदेश स्वीकारणाऱ्‍यांना सांत्वन मिळते. पोर्तुगालमध्ये एका शाळेतील शिक्षिकेला नन्स आणि पाळकांकडून प्रशिक्षण मिळाले होते तरीपण तिच्या चर्चने तिच्या आध्यात्मिक गरजा भागवल्या नाहीत असे तिला वाटायचे. बायबलबद्दल तिच्या मनात असलेल्या प्रश्‍नांची तिला समाधानकारक उत्तरे मिळाली नव्हती. यहोवाची साक्षीदार असलेल्या एका बहिणीसोबत तिने बायबल अभ्यास करायला सुरवात केली तेव्हापासून तिला शास्त्रवचनांतून एकामागोमाग एक नवीन गोष्टी कळू लागल्या. तिला फारच आनंद झाला. ती म्हणाली, “मी दर बुधवारी माझ्या अभ्यासाची वाट पाहायचे कारण बायबलमधील खात्रीशीर पुराव्याने माझ्या एक-एक प्रश्‍नांची उत्तरे मला मिळत होती.” आज, ही स्त्री यहोवाची एक समर्पित सेविका आहे आणि ती देखील इतरांना बायबलच्या सत्याने तजेला देत आहे.

यावरून हे स्पष्ट होते की, यहोवाच्या साक्षीदारांना प्रचारकार्याच्या भारी जबाबदारीचे किंवा जगाच्या क्षेत्राच्या प्रचंडतेचे दडपण वाटत नाही. लोकांचा निरुत्साह किंवा विरोध यांचाही त्यांच्या आवेशावर काही परिणाम होत नाही. राज्याचे प्रचारकार्य पूर्ण करण्याचा त्यांनी चंगच बांधला आहे. जेथे कोठे लोक भेटतात तेथे त्यांना सुवार्ता सांगण्याचे ते काम करतात—अमेरिकेत एका ट्रक थांब्यावर (१), कोरियातील विमानतळावर (२),अँडीजमध्ये (३), किंवा लंडनमधील बाजारात (४). येशूचे सद्य काळातील अनुयायी आपले प्रतिफळदायी जागतिक काम आनंदाने पार पाडतात. शिवाय, वचन दिल्यानुसार त्याने त्यांना तजेला दिला आहे आणि इतरांनाही तजेला देण्यासाठी तो त्यांचा वापर करत आहे.—प्रकटीकरण २२:१७.